वेव्हेलाइट : ॲल्युमिनियमचे खनिज. स्फटिक समचतुर्भुजी प्रचिनाकार पण विरळाच आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. हे बहुधा अरीय (त्रिज्यीय) संरचनेच्या तंतुमय गोलसर पुंजांच्या व कधीकधी लेपाच्या वा झुंबराकार रूपांतही आढळते. ⇨पाटन : (११०) व (१०१) चांगले. रंग पांढरा तसेच हिरवट, निळसर, पिवळसर, करडसर वा तपकिरी छटेचाही. चमक काचेसारखी. कठिनता ३.५ – ४.वि. गु. २.३ – २.५ रासायनिक संरचना A13(PO4)2(OH)3.5H2O(सजल ॲल्युमिनियम फॉस्फेट). कधीकधी हायड्रॉक्सिल गटाच्या (OH) जागी फ्ल्युओरीन (F) येते. तापविल्यावर प्रसरण पावून याचे सूक्ष्म कण बनतात व बंद नळीत तापविल्यास पाणी मिळते.

नंतरच्या क्रियांनी बनणारे म्हणजे द्वितीयक खनिज विरळाच व थोडे थोडे आढळते. ॲल्युमिनियमयुक्त रूपांतरित खडकांमधील भेगांत याचे गोलसर पुंज आढळतात. लिमोनाइट, फॉस्फेटी खडक व जलतापीय (पाण्याच्या उच्च तापमानाच्या क्रियेने बनलेल्या) शिरांतही हे आढळते. अमेरिका (पेनसिल्व्हेनिया, आर्‌कॅन्सॉ), इंग्लंड (कॉर्नवॉल), फ्रान्स, बोलिव्हिया इ. देशांत हे आढळते. हे खनिज इंग्रज शास्त्रज्ञ विल्यम वेव्हेल यांनी शोधल्यामुळे त्यांच्या नावावरून याला वेव्हेलाइट हे नाव देण्यात आले.

ठाकूर, अ. ना.