विभंग, खडकांतील : खडकांतील ज्या भंगाच्या (भेगेच्या किंवा तड्याच्या) लगतचे पृष्ठभाग एकमेकांच्या सापेक्ष विस्थापित झालेले (सरकलेले) असतात, अशा भंगाला विभंग म्हणतात. ताण निर्माण करणाऱ्या  अथवा संपीडक दाब देणाऱ्या प्रेरणांमुळे भंग निर्माण होतो व त्याच्या विरुद्ध बाजूंचे खडक एकमेकांच्या संदर्भात विस्थापित होतात. हे विस्थापन विभंगपृष्ठाला समांतर दिशेत सर्वांत जास्त असून विभंगपृष्ठाला लंब दिशेत होणारे अलगीकरण त्यामानाने अल्प असते. विभंगाची लांबी व विस्थापनाचे मान अगदी भिन्नभिनन असतात. हातनमुन्यांतील खडकांत आढळणाऱ्या अगदी लहान (१ सेमी. वा त्याहून कमी लांबीच्या) विभंगापासून ते शेकडो किमी. पर्यंत लांबीचे विभंग आढळतात आणि त्यांच्यातील खडकांचे विस्थापन १ सेमी. पासून ते काही दशके किंवा शेकडो किमी.पर्यंत असू शकते. उदग्र (उभ्या) दिशेतील विस्थापन बहुधा कमी, तर कधीकधी शेकडो मीटर असते. गाळाच्या खडकांचे थर, ⇨भित्ती, खनिज इ. भूवैज्ञानिक रचनांच्या संदर्भात बहुतकरून विस्थापन मोजतात. समुद्रसपाटीसारख्या पातळीच्या संदर्भातील विस्थापन मात्र सामान्यपणे माहीत होत नाही. एका वेळी विभंगाला अनुसरून झालेले विस्थापन थोडे असते, तरी लाखो वर्षांत पुनःपुन्हा झालेले एकूण विस्थापन पुष्कळच जास्त असते. (मराठी विश्वकोशाच्या १२ व्या खंडातील चित्रपट २८ मध्ये ग्रॅनाइट खडकातील क्वॉर्ट्झाच्या शिरेचे विभंगाने झालेले विस्थापन दाखविले आहे).

विरूपित झालेल्या खडकांतील विभंग सूक्ष्म असतात, तर काही खडकांत अत्यंत निकट अंतरावर असलेले असंख्य समांतर भंगांचे व्यवस्थित असे संच असतात. त्यांना पाटन म्हणतात. सामान्यपणे या भंगांचा विभंगांमध्ये विचार केला जात नाही, ज्या भंगांच्या संदर्भात खडकाचे भंगपृष्ठाच्या समांतर दिशेत विस्थापन झालेले नसते, त्यांना संधी म्हणतात [उदा., ताण संधी ⟶संधी, खडकांतील]. जेथे भंगांच्या पृष्ठांना लंब दिशेत १ मी.वा अधिक रुंदीची मोकळी जागा असते, अशा भंगांना भेगा म्हणतात. उच्च तापमान अथवा उच्च दाब असताना विभंगक्रिया झाल्यास अंतर्वेधी (घुसणाऱ्या) कर्तन-प्रवाहाची क्षेत्रे निर्माण होऊ शकतात. त्यांना तन्य विभंगक्षेत्रे असे म्हणता येईल.

भूकवचातील प्रतिबलांमुळे (ताणांमुळे) विभंग निर्माण होतात. या प्रतिबलांमुळे खडक दाबले वा ताणले जाऊन तुटतात. तथापि खडक पुरेस तन्य (लवचिक) किंवा आकार्य असल्यास या प्रतिबलांमुळे तुटण्याऐवजी ते ताणले वा दाबले जातात आणि कधीकधी ते वाकतात किंवा त्यांना घड्या पडतात [⟶घड्या, खडकांतील].

विभंग पृथ्वीवर सर्वत्र आढळतात, मात्र त्यांची पृथ्वीवरील वाटणी अनियमितपणे झालेली दिसते म्हणजे काही क्षेत्रांत असंख्य लहानमोठे विभंग आढळतात. तर काही मोठ्या क्षेत्रांत ते बहुधा  आढळत नाहीत. सागरी कवचात व खंडीय विचातील सर्व प्रकारच्या खडकांत विभंग आढळतात. स्तरित (स्तरयुक्त) रचना असणाऱ्या गाळाच्या किंवा रूपांतरित खडकांतीत विभंग लगेच लक्षात येतात. कारण विभंगामुळे थरांच्या क्रमात झालेला बदल नजरेस भरण्यासारखा असतो.

काही संज्ञा: विभंगाच्या तड्याच्या पृष्ठभागाला विभंगपृष्ठ किंवा विभंगप्रतल म्हणतात. विभंगपृष्ठाने क्षितिजसमांतर पातळीशी केलेला कोन विभंगाची नती होय. विभंगाची महत्तम उतार व उदग्र दिशा यांच्यातील कोनाला लंबविक्षेप म्हणतात. म्हणजे नती व लंबविक्षेप हे एकमेकांचे कोटिकोन असतात. नतीला क्षितिजसमांतर पातळीत कोटकोनात असणारी दिशा म्हणजे नतिलंब होय. याचा अर्थ विभंगपृष्ठ व क्षैतिज पातळी यांच्यातील छेदनरेषा म्हणजे नतिलंब होय [⟶नति]. विभंगपृष्ठ तिरपे असताना विभंगपृष्ठाच्या वर असलेल्या खडकांच्या ठोकळ्याला उपरिभित्ती (किंवा शीर्षभित्ती), तर खालच्या ठोकळ्याला आधारभित्ती म्हणतात (उपरिभित्ती व आधारभित्ती या संज्ञा खाणकाम ऊद्योगातून आल्या आहेत). विभंगाच्या ज्या बाजूची सापेक्ष हालचाल खालील दिशेत झालेली असते, त्याहालचालीला अधःक्षेप आणि वरील दिशेतील अशा सापेक्ष हालचालीला उत्क्षेप म्हणतात. अधःक्षेप व उत्क्षेप संज्ञा सापेक्ष असल्याने  त्यांच्यावरून निरपेक्ष विस्थापनाची कल्पना येत नाही. याचा अर्थ भासमान विस्थापन हे प्रत्यक्ष विस्थापनाहून बरेच वेगळे असू शकते.

विभंग ओळखण्याचे निकष व स्थाननिश्चिती : विभंग विविध प्रकारे ओळखता येतात. कड्यावरचा अथवा रस्ता बांधताना व खाण खोदताना उघड्या पडलेल्या भागावर विभंग सहज दिसतो आणि त्याची उंची, विस्थापन इ. पुष्कळ अचूकपणे कळू शकते. भूवैज्ञानिक नकाशे तयार करण्याच्या पद्धतीच्या साहाय्याने विभंग लक्षात येतात. उदा., नकाशातील छाटले गेलेले, खंडित किंवा विस्कळीत झालेले शैलसमूह विभंग सूचित करतात व त्यांवरून विभंगाचा मागही काढता येतो. विभंगाच्या निदर्शक किंवा सूचक अशा अनेक खुणा आहेत. त्यांपैकी काही प्रमुख खुणा पुढील होत : खडकांचे थर अचानकपणे निराळ्याच खडकापाशी संपलेले आढळल्यास तेथे विभंग असू शकतो. अशाच रीतीने भित्ती, खनिज शिरा किंवा जुना विभंग एखाद्या ठिकाणी अचानक संपलेला दिसतो व त्याचे विस्थापित भाग अन्यत्र दिसतात. थोडक्यात भूवैज्ञानिक संरचनांमधील खंड विभंगाचे वैशिष्ट्य असू शकते. एखाद्या अखंड शैलसमूहातील एखादा थर अचानक लुप्त होणे किंवा तेच तेच थर पुनः पुन्हा आढळणे, हेही विभंगाचे निदर्शक लक्षण आहे. विभंगपृष्ठाला अनुसरून झालेल्या घर्षणामुळे विभंगपृष्ठाचे पृष्ठभाग पॉलिश केल्याप्रमाणे गुळगुळीत झालेले वा चरे पडलेले असतात. अशा पृष्ठभागाला वृष्ठतल म्हणतात. काही वेळा या पृष्ठभागांवर खोबणी पडलेल्या आढळतात. अशा खोबणी काही मी. लांब व काही सेंमी. खोल असतात. त्यांच्यावरून विस्थापनाची दिशा कळू शकते. विभंगाच्या पातळीत काही खडकांचे चूर्ण होऊन मृत्तिकेसारखे सूक्ष्मकणी द्रव्य बनते, ते सैरसरपणे घट्ट झालेले असते. त्याला विभंग गाउज (उब्जक) म्हणतात. अशा रीतीने तीव्र कडा असणारे खडकाचे तुकडेही निर्माण होतात. या तुकडयांचा व्यास  २ सेंमी.पासून १ मी. किंवा अधिकही असू शकतो. हे तुकडे सूक्ष्मकणी आधारकात असतात. या द्रव्याला विभंग कोणाश्म म्हणतात व त्याची जाडी काही दशक मी.पर्यंत असू शकते. दगडाचे मोठे ठोकळेचही विभंगात आढळतात, त्यांना अंतःस्थ शैल (हॉर्स) किंवा स्तरखंड (स्लाइस) म्हणतात. तसेच पूर्णपणे मरडले, चुरडले गेलेले व न्यपदलिक रीतीने तुकडे होऊन विरूपित झालेले. दलिताश्म (मायलोनाइट) हेही विभंगक्रियेत तयार होतात.


 विभंग या भेगा किंवा भंगांच्या शाखा असतात. त्यांच्यामधून विद्राव वाहतात. या विद्रावांतील द्रव्ये मूळ खडकातील द्रव्याची जागा घेतात. अशा रीतीने सूक्ष्मकणी क्वॉर्ट्झ साचून खडकाचे सिलिकाभवन वा इतर खनिजे साचून खनिजीभवन होते. तसेच तप्त द्रव व वायू यांचे विभंगातून अभिसरण होऊनही मूळ खडकांत बदल होतात. असे बदल विभंगातून ठरतात. अगदी भिन्न प्रकारच्या गाळाच्या खडकांच्या संलक्षणी आढळल्या, तर त्यांवरून उपरिप्रणोदासारख्या मोठ्या विस्थापनाच्या विभंगाची शक्यता सूचित होते.

विस्थापनाने निर्माण झालेला सापेक्षतः तीव्र उताराचा सरळ असा विभंग-कडा, विभंगरेषेला अनुसरून विभेदक (विषम स्वरूपाची) झीज होऊन बनलेला विभंगरेषा-कडा किंवा झीज व विस्थापन यांच्यामुळे निर्माण झालेला संयुक्त विभंग-कडा हे विभंगक्रिया सूचित करतात. पर्वताच्या पायथ्यालगत व पर्वतरांगेच्या तळाला समांतर असे छोटे (३० मी.पर्यंत उंचीचे) कडे आढळतात. त्यांना गिरिपद-कडे म्हणतात. ते क्रियाशील विभंगाचे निदर्शक असू शकतात. जलप्रवाहाच्या रूपरेषेत विभंगरेषेलगत खंड पडलेला आढळतो. तसेच विभंगामुळे पर्वतरांगेच्या अंतर्गत संरचना पर्वताच्या दर्शनी भागात छाटल्या गेलेल्या दिसतात. याचप्रमाणे पर्वतरांगेच्या पायथ्याशी एका रेषेत आढळणारे झरे किंवा उन्हाळी हेही विभंगाचे निदर्शक असू शकतात. भूरूपाची अगदी सरळ अशी बाह्यरेखा (उदा., लांब सरळ समुद्रकिनारा) विभंग सूचित करते. अर्थात वरील गोष्टी विभंगाशिवाय इतर संरचनांच्या संदर्भातही आढळू शकतात. म्हणून त्यांच्या आधारे विभंग ओळखणे अथवा त्याचे स्थान ठरविणे हे काम तज्ञ भूवैज्ञानिक करू शकतात. काही परिस्थितींत विभंग ओळखण्यासाठी हवाई छायाचित्रणाचा चांगला उपयोग होऊ शकतो.

पर्वतनिर्मिती चालू असलेल्या किंवा जेथील पर्वतनिर्मिती अगदी अलीकडील काळात झाली आहे, अशा प्रदेशांतील विभंग ओळखणे सोपे असते. विभंगक्रियेने निर्माण झालेले तेथील कडे चटकन ओळखता येतात.

विभंगाच्या वर मृदेचा जाड थर असल्यास पुष्कळ वेळा पृष्ठभागी विभंगाच्या निदर्शक अशा कोणत्याही खुणा आढळत नाहीत. उलट काही ठिकाणी झीज होऊन असा पुरावा नष्ट झालेला असतो. भूपृष्ठखालील खोलवर असलेले, तसेच महासागरी द्रोणींमधील विभंग ओळखून त्यांचे स्थान निश्चित करणे हे अवघड काम असते. तथापि भूवैज्ञानिक सर्वेक्षण निश्चित करणे हे अवघड काम असते. तथापि भूवैज्ञानिक सर्वेक्षण करताना भूकंपीय, गुरुत्वीय व चुंबकीय या नित्याच्या भूभौतिकीय पद्धती वापरतात [⟶खनिज पूर्वेक्षण भूभौतिकी] तेव्हा मोठे विभंग लक्षात येतात. खोलवरच्या खडकांच्या भूभौतिकीय गुणधर्मांत अचानकपणे विरोधाभास आढळल्यास विभंगाचे अस्तित्व सूचित होते. त्यावरून विभंगाचा नकाशा तयार करता येतो. समुद्रतळावरील विभंग आणि त्यांद्वारे निर्माण झालेल्या संरचना यांचे भूभौतिकीय समन्वेषण करण्यात आले आहे [त्यामुळे पृथ्वी व तिची गतिकी (गतिशास्त्र) यांच्याकडे पाहण्याचा भूवैज्ञानिकांचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला आहे]. समुद्रतळावरील प्रमुख विभंगक्षेत्रे माहीत झाली आहेत (ती  खंडांवरील विभंगक्षेत्रांसारखी नाहीत). या क्षेत्रांची लांबी शेकडो ते हजारो किमी. व व्याप काही दशक किमी. एवढस असून मध्यमहासागरी पर्वतरांगेवर ती आढळतात.

वर्गीकरण : विभंगांचे त्यांच्या निर्मिती-प्रक्रियेनुसार वर्गीकरण केल्यास ते आदर्श वर्गीकरण ठरेल. मात्र विभंगांविषयरी उपलब्ध असलेली माहिती अपुरी असल्याने असे वर्गीकरण करण्यास फार मर्यादा पडतात. समुद्रपातळीसारख्या प्रमाण संदर्भपातळीच्या सापेक्ष विभंगाच्या होणाऱ्या विस्थापनानुसारही विभंगांचे वर्गीकरण करता येईल. तथापि बहुसंख्य विभंगांच्या निरपेक्ष विस्थापनाची माहिती उपलब्ध नसल्याने असे वर्गीकरण करण्यातही अडचणी आहेत. विभंगाला अनुसरून झालेल्या सापेक्ष हालचालींच्या स्वरूपावर आधारलेले वर्गीकरण सद्यःस्थितीत समाधानकारक ठरते. विभंगपृष्ठाचा तिर्यक्कोन (विस्थापनाच्या दिशेचा विभंगनती व विभंगनतिलंब यांच्याशी होणारा कोन) आणि विभंगामुळे झालेले सापेक्ष व भासमान विस्थापन यांनुसार सामान्यपणे विभंगांचे वर्गीकरण करतात. यानुसार विभंगांचे उच्च नतीचे, प्रणोद व नलिलंब-सरक हे तीन मुख्य प्रकार होतात.

आ.१. (अ) गुरुत्वीय विभंग (आ) सोपान विभंग.

उच्च नतीचे विभंग : यांना गुरुत्वीय किंवा सामान्य विभंग म्हणतात. [आ.१(अ)]. गुरुत्वीय विभंगात उपरिभित्ती ही आधारभित्तीच्या सापेक्ष खाली सरकलेली असते. या विभंगांवरून भूकवचाची लांबी वाढल्याचे सूचित होते. भूकवचाची लांबी वाढल्याने उदग्र संपीडन (दाबण्याची क्रिया) होऊन हे विभंग निर्माण होत असावेत. हे विभंग जगभर आढळतात. यांची नती उदग्र ते जवळजवळ क्षितिजसमांतर पातळीपर्यंत असू शकते. मात्र सामान्यपणे ४५ पेक्षा अधिक नतीचे विभंग आढळतात. हे विभंग सूक्ष्म ते प्रचंड (शेकडो किमी.पर्यंत लांबीचे) असतात व यांचे एकूण विस्थापन हजारो मी. असू शकते. यांपैकी लांब विभंग वस्तुतः विभंगक्षेत्रे असतात. यांच्यामुळे सोपान विभंगाचे पट्टे, तिरपे झालेले ठोकळे, हॉर्स्ट (भ्रंशोत्थ) व ग्रावेन (द्रोणि-ठोकळा) ही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे निर्माण होतात.

 कधीकधी शेकडो किमी. व्यापाच्या पट्ट्यात असंख्य लहान, काहीसे समांतर, सुटेसुटे विभंग आढळतात. अशा क्षेत्राला विभंगक्षेत्र किंवा विभंगपट्टा म्हणतात. असे परस्परव्यापी असल्यास आणि विभंगातील विस्थापनाची दिशा एकच असल्यास त्यांना सोपान विभंग म्हणतात [आ.१(आ)].

आ. २. विभंगपट्टा असलेल्या मोठ्या क्षेत्रातील (खचदऱ्यांतील) खाली गेलेले व वर उचलले गेलेले भूकवचाचे ठोकळे : (१) हॉर्स्ट, (२) ग्रावेन.

गुरुत्वीय विभंगक्रिया झालेल्या पुष्कळ ठिकाणी विभंगाच्या एका किंवा दोन्ही बाजूंस खडकांचे ठोकळे तिरपे झालेले वा कललेले दिसतात. कधीकधी यांचेच डोंगर बनतात (उदा., उटा राज्यातील वॉसॅच पर्वतरांग). सैंधवाच्या डोंगरांत (पाकिस्तान) असंख्य विभंग असून तेथे असे तिरपे झालेले ठोकळे स्पष्टपणे दिसतात.


पुष्कळदा ठोकळ्यांच्या दोन्ही बाजूंस गुरुत्वीय विभंग असतात. व त्यांना अनुसरून झालेले विस्थापन जवळजवळ सारखे असते. यामुळे ठोकळा तिरपा होत नाही. रुंदीच्या मानाने लांबी बरीच जास्त असलेल्या आणि दोन्ही बाजूंच्या ठोकळ्यांच्या सापेक्ष खाली गेलेल्या अशा ठोकळ्याला ग्राबेन (द्रोणिका) म्हणतात. याउलट असाच ठोकळा शेजारच्या ठोकळ्यांच्या सापेक्ष वर उचलला गेलेला असला, तर त्याला हॉर्स्ट (उत्खंड) म्हणतात (आ.२). यांचे आकारमान खूप भिन्न असू शकते. यूरोपातील ऱ्हाईन खोरे, आफ्रिकेतील न्यासा ग्राबेन ही ग्राबेनची प्रसिद्ध उदाहरणे होत. भारतातील गोंडवनी संघाचे पुष्कळ खडक हे विभंगांनी बनलेल्या द्रोणींत (ग्राबेनवर) साचले ओहत (उदा., दामोदर खोऱ्यातील पट्ट), तर  नर्मदा व तापी या पद्यांची खोरी ग्राबेनमध्ये आहेत. अशा प्रकारच्या मोठ्या विभंगपट्ट्यांना खचदरी म्हणतात. मृत समुद्र व पूर्व आफ्रिकेतील सरोवरांचा प्रदेश या प्रसिद्ध खचदऱ्या आहेत.

आ. ३. प्रणोद विभंग

प्रणोद विभंग : व्युत्क्रमी विभंग असेही म्हणतात. प्रणोद विभंगात उपरिभित्ती आधारभित्तीच्या सापेक्ष वर सरकलेली दिसते (आ. ३) याचा कोन सामान्यपणे ४५ अंशांपेक्षा कमी असतो. यात भूकवचाचे आकुंचन होऊन संपीडन प्रेरणा निर्माण झाल्याचे सूचित होते. याला कारणीभूत असणारा हा दाब नंतरही कार्यरत राहिल्यास वर रेटल्या गेलेल्या उपरिप्रणोद ठोकळ्याला घड्या पडतात व त्यांचे तुकडेही होऊ शकतात. या विभंगात प्रत्यक्षात कोणती भित्ती सरकली हे निश्चित सांगता येऊ शकत नाही. मात्र तसे सांगता येणे शक्य असल्यास ज्यामध्ये आधारभित्ती उपरिभित्तीच्या खाली रेटली गेली असेल, तर त्याला अधःप्रणोद आणि उपरिभित्ती आधारभित्तीवर कमी नतीने मोठ्या अंतरापर्यंत रेटली गेली असेल, तर त्याला उपरिप्रणोद म्हणतात. उपरिभित्ती क्रियाशील असणाऱ्या उच्च कोनाच्या प्रणोद विभंगांना उत्प्रणोद म्हणता येईल. उपरिप्रणोदाच्या खडकांच्या मोठ्या राशी मोठ्या अंतरावर विस्थापित झालेल्या असतात. यामुळे तेथील खडक क्षैतिज दिशेत मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतात. अशा विस्थापित राशीची झीज होऊन मूळ राशीपासून उलग झालेला कडा मागे राहतो, तेव्हा त्याला क्लिप्पे म्हणतात. तसेच उपरिप्रणोदाने मूह स्थानापासून सु. १.६ किमी.पेक्षा अधिक अंतरावर पुढे नेल्या गेलेल्या खडकांच्या मोठ्या राशीला प्रच्छदपट (नापे) असे म्हणतात. जेव्हा प्रणोद विभंगांनी सीमित झालेल्या खडकांच्या मोठ्या राशी अधिक उंचीवरून (पर्वतावरून) कमी उंचीच्या प्रदेशात खाली सरकतात, तेव्हा त्याला गुरुत्वीय भूमिपात म्हणतात.

आल्प्स पर्वतात प्रणोद विभंगांचे मोठे भाग उघडे पडलेले आढळतात. तसेच तेथे उपरिप्रणोद विभंगही आढळतात. पूर्व हिमालयातही अनेक प्रणोद व व्युत्क्रमी विभंग आढळले आहेत. नकाशे व वेधनांद्वारे त्यांची खातरजमाही झाली आहे. काही ठिकाणी (उदा., आसाममधील दिसांग) खालील खडक वर गेलेले असून काही ठिकाणी ते झिजून गेले आहेत.

आ. ४. नतिलंब-सरक विभंग

नतिलंब-सरक विभंग : यामधील विस्थापन हे मुख्यत्वे नतिलंबाला समांतर दिशेत झालेले असते म्हणजे खडकांचे ठोकळे नतीला नव्हे तर नतिलंबाला अनुसरून अधिक विस्थापित झालेले असतात (आ.४). परिणामी ते उभ्या दिशेत थोडेच आणि आडव्या दिशेत खूपच जास्त सरकलेले असतात. जर या विभंगाची नती जवळजवळ उदग्र असेल व नतिलंब हा प्रादेशिक संरचनेला अनुप्रस्थ (आडव्या दिशेत) असेल, तर त्या विभंगाला प्रपीडित विभंग म्हणतात, तर प्रादेशिक संरचनेला समांतर विभंगांना अनुपाट विभंग म्हणतात. नतिलंब-सरक विभंगांचे दक्षिणावर्ती व वामावर्ती असेही उपप्रकार करतात. बहुसंख्य नतिलंब-सरक विभंग तीव्र उताराचे (जवळजवळ उभे) व सरह असतात. यांच्या लगतचे खडक भरडे, चुरडले गेलेले असतात. यांपैकी मोठे विभंग हे वस्तुतः विभंगपट्टेच असतात.

कॅलिफोर्नियातील सान आंद्रे विभंग हे याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मोहाव्ही वाळवंटाचे दक्षिण टोक ते सॅन फ्रॅन्सिस्कोच्या उत्तरेकडील समुद्रकिनारा असा हा सु. ९६० किमी. लांबीचा विभंग आहे. याचे वार्षिक सरासरी विस्थापन सु. १ सेंमी. आहे व लाखो वर्षात पश्चिम बाजूचे खडक हळूहळू उत्तरेस शेकडो किमी. सरकले आहेत. यामुळे तेथे दरवर्षी हजारो सौम्य भूकंप होतात. १८ एप्रिल १९०६ रोजी झालेल्या मोठ्या भूकंपात कमाल विस्थापन ६ मी. पेक्षा जास्त झाले होते. त्यामुळे सॅन फ्रॅन्सिस्को शहर उदध्वस्त होऊन मोठी जीवितहानी झाली होती.

संक्रामी विभंग : नतिलंब-सरक विभंगाचा मोठ्या क्षेत्रांवर आढळणारा हा खास प्रकार म्हणता येईल. यात उदग्र विभंगपृष्ठाला अनुसरून पार्श्वीय (बाजूच्या दिशेत) विस्थापन होते. मध्यमहासागरी पर्वतरांगांलगत (उदा., अटलांटिक महासागरातील तळावर) खचदरीसारखी विभंग क्षेत्रे आढळतात. या क्षेत्रांतून शिलारस वर येतो. यामुळे समुद्रतळ आडव्या दिशेत पसरतो. यामुळे आडव्या दिशेतील प्रेरणा निर्माण होऊन ते विभंग निर्माण होतात व त्यांना अनुसरून विस्थापन होते.

भूकंप व विभंग : सर्व नव्हे, तर बहुसंख्य भूकंप विभंगाला अनुसरून होणाऱ्या जलद हालचालींद्वारे (विस्थापनांद्वारे) होतात. कारण विभंगाच्या क्षेत्रांत अचानक हालचाल झाली की, भूकंपाचे धक्के बसतात. मध्यमहासागरी खचदऱ्या तसेच नतिलंब-सरक विभंग व संक्रामी विभंग यांच्यालगत प्रमुख भूकंपीय क्षेत्रे आहेत. तसेच महासागराच्या खंदकयुक्त सीमेपासून आणि त्यालगतच्या खंडांच्या सीमांपासून शेकडो किमी.पर्यंत खाली गेलेले उतरते पृष्ठभाग येथेही भूकंपांची मोठी क्षेत्रे आढळतात उदा., अँडीज पर्वतरांगेची पॅसिफिक महासागराकडील बाजू.

विभंगालगतची हालचाल अधूनमधून होते. अशी हालचाल काही सकेंद अखंडपणे होते अथवा एका वेळेस काही मीटरच्या अनेक विस्थापनांची मालिका या रूपातही हालचाल होते. अशा दोन विस्थापनांच्या (हादऱ्यांच्या) दरम्यानच्या काळात विभंगपृष्ठाला अनुसरून असलेल्या घर्षण प्रेरणेवर मात करण्यातइतपत ताण साचला की, पुढील धक्का बसतो. हा मध्यंतरीचा शांततेचा काळ दीर्घ असल्यास झीज होऊन विभंगाच्या भूपृष्ठावरील खाणाखुणा नष्टही होऊ शकतात. पुढी मोठ्या विस्थापनाने अशा नवीन खाणाखुणा निर्माण होतात. [⟶भूकंप].


 काही उदाहरणे : वरील वर्णनात विभंगाची काही उदाहरणे आली आहेत. आणखी काही विभंग पुढील होत : जगातील पर्वतरांगांच्या सर्व पट्ट्यांत गिरिजननाने भूपट्टाची लांबी घटते. यातून प्रणोद विभंग निर्माण होतात. भारतातील उत्तर विंध्व संघाचे खडक व त्यापेक्षा जुने अरवली संघाचे खडक यांच्यातील ईशान्य टोकाचा सांधा हा एक मोठा विभंग आहे. यामुळे उभ्या दिशेत सु. १,५०० मी. एवढे विस्थापन झाले आहे व चंबळ नदीच्या प्रवाहाला जवळजवळ समांतर असलेल्या या विभंगाचा आग्रा व त्याच्या उत्तरेस एकूण ८०० किमी.पर्यंत मागोवा घेता येतो. या विभंगामुळे विंध्य संघातील जवळजवळ क्षिजिसमांतर वालुकाश्माचे विक्षुब्ध न झालेले थर आणि अतिशय तीव्र स्वरूपाच्या घड्या पडलेले अरवली सुभाजा हे खडक एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. अशा तऱ्हेने निराळ्या प्रकारचे व निराळ्या वयांचे खडक एकमेकांलगत आणणाऱ्या अशा विभंगाला सीमावर्ती विभंग म्हणतात. अशाच सीमावर्ती विभंगामुळे शिवालिक संघाचे खडक त्यांच्यापेक्षा जुन्या खडकांच्या संपर्कात आले आहेत. शिवालिक पायथा टेकड्यांच्या सिंधू ते ब्रह्मपुत्रा या संपूर्ण पट्ट्यात जवळजवळ समांतर असे अनेक विभंग आहेत.

भारताचा केप कोमोरीन ते सौराष्ट्रपर्यंतचा समुद्रकिनारा पुष्कळच सरळ आहे व विभंगक्रियेमुळे असे घडले असावे, असे मानतात. उदा., मुंबईजवळ दक्षिण ट्रॅपखडक पूर्वी पश्चिमेला समुद्राच्या भागात पसरलेले असावेत. मात्र विभंगामुळे हा भाग खाली जाऊन समुद्रतळाचा भाग बनला असावा. या समुद्रकिनाऱ्याला समांतर असेही काही विभंग आहेत. रत्नागिरी ते मुंबईच्या उत्तरेकडेही आढळणारी उन्हाळी ही त्यांच्या अस्तित्वाची निदर्शक मानता येतात. पूर्व घाटाचा पश्चिमेचा प्रदेश हे एक विभंगक्षेत्र असावे. तसेच छिंदवाड्यातील सौसर पट्टा व गाविलगडाचा दक्षिण पायथा येथे विभंग आहे. नर्मदा व तापी या नद्यांची पात्रे अगदी सरळ आहेत. यावरून तेथे विभंगक्रिया झाल्याचे अनुमान करतात. याचप्रमाणे दामोदर, सोन, वर्धा, गोदावरी व महानदी यांचे प्रवाहमार्ग निश्चित होण्यामागे विभंगक्रिया हे एक कारण असल्याचे मानतात.

परिणाम : पाणी वाहण्यासाठी विभंगांचा उपयोग होतो. अशा रीतीने भूमिजल पृष्ठभागी येण्यास विभंगाने वाट मिळते व विभंगाच्या पातळीत अनेक झरे, उन्हाळी निर्माण होतात. असे झरे पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तर उन्हाळी खनिज जल चिकित्सेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. सोपान विभंगांमुळे कधीकधी धबधबे निर्माण होतात व त्यांचा वीजनिर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो.

विभंगांद्वारे खनिज तेलाच्या साठ्यासाठी उपयुक्त असा सापळा निर्माण होऊ शकतो. उदा., सच्छिद्र खडकांचा थर सच्छिद्र नसलेल्या खडकांच्या थरांनी बंदिस्त होऊन असा सापळा तयार होतो. खाणकामाच्या दृष्टीनेही कधीकधी विभंग उपयुक्त ठरतात. कारण विभंगामुळे खनिज साठे वर वा पृष्ठभागी येऊ शकतात. अर्थात पृष्ठभागी आलेले असे साठे झिजून नष्टीही होतात. खनिजयुक्त विद्राव वाहण्यासाठी विभंगामुळे वाढ उपलब्ध होते आणि यांचा उपयोग धातुक निक्षेप (कच्च्या रूपातील धातूंचे साठे) व खनिज साठे निर्माण होण्यासाठी होऊ शकतो.

पहा : खचदरी घड्या, खडकांतील भूकंप भूपट्ट सांरचनिकी. 

संदर्भ : 1. Billings, M.P. Structural Geology, Bombay, 1972.

          2. Press, T. Siever, R. Earth, New York, 1982. 

ठाकूर, अ.ना.