ट्रेमोलाइट : (ग्रॅमाटाइट). अँफिबोल गटातील खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार, बहुधा पात्यांसारखे. पाटन (110) चांगले [→ स्फटिकविज्ञान]. पुष्कळदा अरीय स्तंभांच्या पुंजक्यांच्या, रेशमासारख्या तंतूंच्या, क्वचित कणमय रूपांत आढळते. कठिनता ५–६. वि. गु. ३–३·३. चमक काचेसारखी. रंग पांढरा, करडा, फिकट हिरवा. लोह जास्त असल्यास रंग गडद होतो. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. याच्या तंतूंच्या बुरणुसासारख्या पुंजक्यांना माउंटन लेदर अथवा माउंटन कॉर्क तर 

ट्रेमोलाइटाचा स्फटिकचिवट व संहत (प्रमाण जास्त असलेल्या) ट्रेमोलाइटाला नेफ्राइट म्हणतात. ⇨जेड नावाने ओळखले जाणारे द्रव्य मुख्यत्वे नेफ्राइटच असते. रा. सं. Ca2Mg5 (Si2O22)(OH)2. बहुधा यात अल्पसे फेरस लोह असते. त्याचे प्रमाण २ टक्क्यांहून जास्त झाल्यास ⇨ॲक्टिनोलाइट  तर अल्प मँगॅनीज असल्यास जांभळट गुलाबी हेक्झॅगोनाइट बनते. डोलोमाइटयुक्त स्फटिकी चुनखडक, संगमरवर, संगजिरेयुक्त सुभाजा इ. खडकांमध्ये डायोप्साइड, संगजिरे वगैरेंच्या जोडीने हे आढळते. स्वित्झर्लंड, इटली, भारत (कर्नाटक, तमिळनाडू, बिहार) इ. देशांत सापडते. ट्रेमोलाइट मृत्तिका उद्योगात, रंगलेपांत तंतुमय प्रकार ॲस्बेस्टस म्हणून तर नेफ्राइट दागदागिन्यांत वापरले जाते. स्वित्झर्लंडमधील ट्रेमोलो खोऱ्यावरून ट्रेमोलाइट हे नाव पडले.

पहा : अँफिबोल गट ॲस्बेस्टस.       

ठाकूर, अ. ना.