पुष्कराजाचे स्फटिक

पुष्कराज : (टोपॅझ). खनिज. नवरत्नांपैकी एक. स्फटिक समचतुर्भुजी, प्रचिनाकार, प्रचिनाच्या फलकावर उभ्या रेखा असतात व बहुधा प्रचिनाचे एकच टोक निमुळते असते [→ स्फटिकविज्ञान]. कणमय रूपातही हे आढळते. ⇨ पाटन : (००1), अत्युत्कृष्ट (म्हणून स्फटिक आडव्या दिशेत तुटू शकतो). भंजन शंखाभ ते खडबडीत [→ खनिज विज्ञान]. ठिसूळ. कठिनता ८ [मोसमापक्रमातील प्रमाणभूत खनिज → कठिनता]. वि.गु. ३.४ – ३.६. चमक काचेसारखी. रंग पिवळा, राखी, हिरवट, निळसर,गुलाबी किंवा रंगहीन (काही रंग जातात वा बदलतात). कस रंगहीन. हे खनिज द्विवर्णिक (दोन वेगळ्या दिशांनी पाहिल्यास दोन भिन्न रंग दर्शविणारे) असून क्ष-किरणांना हे काहीसे पारदर्शक आहे. याला उष्णता दिल्यास किंवा हे घासल्यास यावर विद्युत् भार निर्माण होतो व तो कित्येक तास टिकतो. ब्राझीलमधील काही स्फटिक बोटांच्या चिमटीत धरून मुख्य अक्षाच्या दिशेने दाबल्यासही त्यांवर विद्युत् भार उत्पन्न होतो. रा.सं. (Al2(F,OH)2SiO4. अग्निज खडकांच्या स्फटिकीभवनाच्या शेवटच्या अवस्थांत ज्या फ्ल्युओरीनयुक्त वाफा बाहेर पडतात, त्यांच्यामुळे हे तयार होते. हे ग्रॅनाइट आणि रायोलाइट खडकांतील पोकळ्यांत, पेग्मटाइटांच्या भित्तींत, उच्च तापमानात तयार झालेल्या व विशेषतः कथिलयुक्त शिरांमध्ये आणि कधीकधी अग्निज खडकांलगतच्या सुभाजांसारख्या (सहज फुटणाऱ्या) रुपांतरित खडकांत हे आढळते. शिवाय अशा (उदा. पेग्मटाइट) खडकांच्या पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या डबरातही हे आढळते. ग्राइझेन खडकांतील हे महत्त्वाचे खनिज असून कधीकधी त्यात ते इतके विपुल असते की, त्यामुळे खडकाला टोपॅझ रॉक म्हणतात. कॅसिटेराइट व कथिलाची इतर खनिजे बहुधा याच्याबरोबर आढळतात. त्यामुळे हे कथिलाच्या धातुकाचे (कच्च्या रूपातील धातूचे) सूचक मानले जाते. यांशिवाय पुष्कराजाबरोबर फ्ल्युओराइट, ॲपेटाइट, तोरमल्ली (टुर्मलीन) आणि कधीकधी क्वॉर्ट्झ, वैदूर्य (बेरिल), फेल्स्पार, अभ्रक इ. खनिजेही आढळतात.

ब्राझील, रशिया (सायबीरिया, उरल), जपान, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, स्वीडन, नॉर्वे, चेकोस्लोव्हाकिया, जर्मनी (सॅक्सनी), मॅलॅगॅसी, श्रीलंका, ब्रह्मदेश, ग्रेट ब्रिटन (स्कॉटलंड), नायजेरिया, ऱ्होडेशिया इ. देशांत पुष्कराज आढळतो. रत्न म्हणून हा प्राचीन काळापासून वापरात असून याला चांगली झिलई देता येते. मद्यासारख्या पिवळ्या रंगाचा पुष्कराज विशेष लोकप्रिय असून तदनंतर निळा, गुलाबी, निळसर हिरवा इ. रंग लोकप्रिय आहेत. रंगहीन पुष्कराज हिऱ्याप्रमाणे दिसत असला, तरी हिरा त्याहून कठीण असतो. रत्नाशिवाय याचे पुढील दुय्यम उपयोगही होतात : उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) पदार्थांमध्ये कायनाइटाऐवजी, पोलादनिर्मितीत फ्ल्युओरस्पाराऐवजी तसेच मृत्तिका उद्योगात इत्यादी. कृत्रिम रीतीने हा केवळ प्रयोगशाळेतच बनविण्यात आला असून तो खऱ्या पुष्कराजापेक्षा हलका असतो.

पूर्वी कोणत्याही पिवळ्या खड्याला (उदा. पेरिडोट) टोपॅझ म्हणत. प्लिनी यांच्या मते तांबड्या समुद्रातील प्राचीन टोपॅझिऑन बेटारून टोपॅझ हे नाव पडले असावे मात्र ते इतरही खनिजांसाठी वापरीत. उदा., प्लिनी यांनी क्रिसोलाइटासाठी हे वापरले असावे. अजूनही टोपॅझ हा शब्द निरनिराळ्या संदर्भांत वापरला जातो. उदा., ओरिएंटल टोपॅझ म्हणजे पिवळे कुरुविंद, स्कॉच बोहीमियन या स्पॅनिश टोपॅझ म्हणजे सीट्रीन (पिवळे क्वॉर्ट्झ), फॉल्स टोपॅझ म्हणजे फ्ल्युओरस्पार. ब्राझीलमधील पिवळे टोपॅझ तापवून गुलाबी करण्यात येते व नैसर्गिक तांबडा पुष्कराज दुर्मिळ असल्याने या गुलाबी प्रकाराला ब्राझीलियन रुबी (माणिक) म्हणतात. तापस् या अग्नी अर्थाच्या संस्कृत शब्दावरून टोपॅझ हे नाव आले असावे, असेही काहींचे मत आहे.

पहा : रत्ने.

ठाकूर, अ. ना.