निकोलाइट : (निकेलाइन, क्यूफरनिकेल). खनिज. स्फटिक षट्‌कोणी पण क्वचित आढळतात. बहुधा संपुंजित कधीकधी वृक्काकार (मूत्रपिंडाकार) व स्तंभाकार रूपांत आढळते. कठिनता ५–५·५. वि. गु. ७·७८. चमक धातूसारखी. अपारदर्शक. रंग तांब्यासारखा परंतु फिकट गंजल्यावर करडा ते काळसर होतो. रा. सं. NiAs. यात बहुधा थोडे लोह, कोबाल्ट व गंधक असून आर्सेनिकाच्या जागी थोडे अँटिमनी आलेले असते. दमट हवामानात निकोलाइट चटकन बदलते व ॲनाबर्गाइट (निकेल ब्लूम) हे खनिज बनते. मध्यम तापमानाच्या पाण्यातील विद्रावांद्वारे निकोलाइटाच्या शिरा निक्षेपित होतात (साचतात). निकेलाची इतर आर्सेनाइडे व सल्फाइडे, पायरोटाइट, कॅल्कोपायराइट यांच्याबरोबर नोराइट खडकांत व या खडकांबरोबर तसेच कोबाल्ट व चांदी यांच्या खनिजांबरोबरही हे आढळते. निकेलाचे गौण धातुक (कच्ची धातू) म्हणून याचा उपयोग होतो. क्यूफरनिकेल हे याचे मूळ नाव त्याच्या तांब्यासारख्या रंगावरून, तर या मूळ नावावरून निकेल हे धातूचे नाव पडले व निकेल धातूवरून निकोलाइट हे नाव आले आहे.

पहा : निकेल.

ठाकूर, अ. ना.