ब्राउनाइट : खनिज, स्फटिक चतुष्कोणी, प्रसूच्याकार संस्पर्शी जुळे स्फटिकही आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. याच्या सूक्ष्म वा भरड स्फटिकांच्या राशी आढळतात. हे कणमय संपुंजित रूपांतही आढळते. ⇨ पाटन (111) चांगले. भंजन खडबडीत ते उपशंखाभ [→ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ६-६.५ वि. गु. ४.७२-४.८२. चमक काहीशी धातूसारखी. रंग व कस गडद उदसर काळा ते पोलादासारखा करडा. अपारदर्शक. रा. सं.३MnMnO.MnSiO. हे हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळते व क्लोरीन वायू निर्माण होतो. सामान्यतः हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी बनलेल्या) स्वरूपात व कधीकधी अवशिष्ट स्वरूपामध्ये सिलोमेलेन, पायरोल्यूसाइट, बराइट व मँगॅनिजाच्या व इतर खनिजांबरोबर आढळते. हे प्राथमिक स्वरूपातही आढळू शकते. हे मँगेनिजाचे महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून जर्मनी, इटली येथे व नागपूर जिल्ह्यात याचे सुंदर स्फटिक आढळतात. अमेरिका, पनामा, द. आफ्रिका, घाना, काँगो, द. मोरोक्को, रूमानिया, चीन, ब्राझील इ. ठिकाणी हे आढळते. भारतामध्ये हे आंध्र प्रदेश, बिहार, गुजरात, गोवा, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान व पं. बंगाल येथे आढळते. महाराष्ट्रात हे नागपूर, भंडारा व रत्नागिरी जिल्ह्यांतही आढळते. मँगॅनीज धातूचे हे भारतातील महत्त्वाचे व सिलोमेलेनानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे धातुक आहे. भारतातील मँगॅनीज धातुकांच्या एकूण उत्पादनामध्ये ९०% वाटा या दोन खनिजांचा असतो. आउगुस्ट एमील ब्राउन (१८०९ – ५६) या जर्मन पुरातत्त्व विद्यावेत्त्यांवरून याचे ब्राउनाइट हे नाव पडले आहे.

पहा : मँगॅनीज

सहस्त्रबुद्धे, य. शि.