भित्तींची झीज

भित्ति : (डाइक). खडकांच्या स्तरणाला (थरांच्या पातळीला) किंवा अन्य रचनांना छेदून जाणाऱ्या, काहीशा उभ्या भेगांत शिरलेला शिलारस निवून व थिजून तयार झालेली खडकाची भिंतीसारखी राशी. सामान्‍यतः भित्ती अरुंद व लांब असतात त्या बहुधा सरळ परंतु कधीकधी वेड्यावाकड्या नागमोडी असतात. सामान्यपणे भित्तीच्या बाजू जवळजवळ समांतर असतात व मर्यादित अंतरात पाहिल्यास त्यांची जोडी एकसारखी असल्याचे दिसते. भित्तींची जाडी १ सेंमी.पासून शेकडो मी.पर्यंत असते परंतु बहुसंख्य भित्तींची जाडी ३ ते ६ मी.पर्यंत असते. भित्तींची लांबी काही मी. पासून कित्येक किमी.पर्यंत असू शकते. उदा., दक्षिण ऱ्होडेशियातील ‘द ग्रेट डाइक’ ही ४८० किमी. लांब आहे.

सामान्यपणे भित्तींचे अग्‍निज खडक सभोवतालच्या खडकांपेक्षा कठीण आणि वातावरणक्रियेला (वारा, प्रवाह, तापमान इत्यादींच्या क्रियेला) सहज बळी न पडणारे असतात. त्यामुळे सभोवतालच्या खडकांपेक्षा त्यांची झीज कमी होऊन त्यांचा जमिनीवर राहिलेला भाग एखाद्या भिंतीसारखा वर उठून आलेला दिसतो [आ. (अ)]. उलट भित्तीपेक्षा सभोवतालचा खडक अधिक कठीण असल्यास भित्तीच्या खडकाची झीज अधिक जलद होऊन तिच्या जागी चरासारखा खळगा तयार होतो [आ. (आ)]. जेथे सभोवतालच्या खडकांचा वातावरणक्रियेला होणारा रोध भित्ती एवढाच असतो, तेथे भित्तीची वरची बाजू सभोवतालच्या खडकांच्या पातळीतच राहते. मात्र भित्तीचा तप्त शिलारस निवताना त्याच्या उष्णतेने सभोवतालच्या खडकांची स्पर्शपृष्ठे भाजली जाऊन टणक होतात. भित्तीच्या दोन्ही बाजूंना या कठीण झालेल्या कडा उठून दिसतात [आ. (इ)]. स्कॉटिश ‘दगडी कुंपण’ किंवा डच ‘चर’ या अर्थाच्या शब्दांवरून भित्तीचे ‘डाइक’ हे इंग्रजी नाव आले आहे.

भित्तीच्या खडकांचे संघटन कोणतेही, म्हणजे अतिशय सिकत (सिलिकेचे प्रमाण विपुल असलेल्या) अशा ॲप्लाइट, ग्रॅनाइट पेग्मटाइटापासून ते अतिशय मॅफिक (मॅग्‍नेशियम व लोह यांची खनिजे विपुल असलेल्या) अशा पेरिडोटापर्यंत असू शकते परंतु बेसाल्टी व डोलेराइटी संघटन असलेल्या भित्ती सर्वाधिक आढळतात. भित्तीचा जाडीनुसार व शिलारस थंड होण्याच्या वेगानुसार भित्तीचा खडक सूक्ष्मकणी वा भरडकणी झालेला असतो, भित्तीचा मध्यभाग कडांच्या मानाने अधिक भरड स्फटिकी असतो. भित्तीच्या खडकांचे वयन (पोत) सामान्यपणे पृषयुक्त (सूक्ष्मस्फटिकी आधारकात भरड स्फटिकी विखुरलेले असे) असते. बऱ्याच भित्तींत त्यांच्या स्पर्शपृष्ठांना लंब असे आडवे स्तंभाकार संधी (तडे) आढळतात.

भित्ती बहुधा समूहाने आढळतात. हे समूह दोन प्रकारचे असून एकात भित्ती एका विशिष्ट दिशेने एकमेकींना समांतर गेलेल्या असतात (उदा., मल, स्कॉटलंड). दुसऱ्या प्रकारात त्यांची मांडणी अरीय म्हणजे चाकांच्या आऱ्यांप्रमाणे झालेली आढळते (उदा., सौराष्ट्रात अमरेलीजवळ). काही वेळा भित्तीचा पृष्ठभाग उघडा पडलेला भाग सरळ रेषेत असण्याऐवजी ज्याचा संपूर्ण विकास झाला असता, तर पूर्ण वर्तुळाकार होईल अशा प्रकारचा, चापाकृती किंवा चंद्रकोरीसारखा दिसतो. अशा भित्तींना वलयभित्ती म्हणतात. अशा भित्तींच्या चापाची त्रिज्या १.५ ते १५ किमी.पर्यंत व जाडी १५० ते ५,००० मी.पर्यंत असू शकते. स्कॉटलंड, आइसलँड, नॉर्वे इ. ठिकाणी वलयभित्ती आढळल्या आहेत. [⟶ अग्‍निज खडक].

पृथ्वीच्या कवचात अग्‍निज क्रिया चालू असेल अशा प्रदेशातील प्रादेशिक ताणाचे भित्ती हे दृश्य लक्षण आहे. भित्तीच्या भेगेतून शिलारस घुसत असताना त्याला आपला मार्ग मोकळा रुंद करीत घुसावे लागते. केवळ नुसत्या भरण-पूरण क्रियेने भित्ती तयार होण्याइतक्या रुंद भेगा निसर्गात क्वचितच आढळतात पण अगोदरच ताणाखाली असलेल्या खडकांतील भेगांतून शिलारस घुसताना तो जणू कळ दाबून ताण मोकळा करतो. त्यामुळे शिलारसाची कमीत कमी शक्ती खर्ची पडून भेग उघडत जाते. ही क्रिया अत्यंत जलद रीत्या होत असावी, हे भित्तींची प्रचंड लांबी व त्यामानाने अगदी कमी रुंदी यांवरून दिसून येते.

भित्ती सर्व प्रकारच्या व सर्व कालांतील खडकांत आढळतात. भारतात बडोद्यापासून गोव्यापर्यंतच्या भागात दक्षिण ट्रॅप खडकात अनेक भित्ती आढळतात. दामोदर खोऱ्यातील दगडी कोळशाच्या क्षेत्रातही डोलेराइटाच्या व बेसाल्टाच्या भित्ती आढळतात. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बिहार, ओरिसा इ. भागांत ग्रॅनाइटांत आणि पट्टिताश्मांतही भित्ती आढळल्या आहेत.

दलिक भित्ती : काही गाळांच्या खडकांच्या थरांत दलिक (खडकाच्या चुऱ्यापासून बनलेल्या) खडकांचे, विशेषतः वालुकाश्मांचे, भित्तीसारखे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) झाल्याचे दिसते. या वालुकाश्माच्या भित्ती अग्‍निज भित्तीप्रमाणेच आजूबाजूच्या थरांच्या रचनांना छेदून जाणाऱ्या असतात. काही वालुकाश्मांच्या भित्तीची बाजूची पृष्ठे विकृत झालेली तसेच भित्तीपासून निघालेले जिव्हेसारखे भाग आजूबाजूच्या खडकांत घुसलेले दिसतात. यांवरून या भित्तींची निर्मिती एखादी पोकळी नुसती भरली जाऊन न होता दलिक खडक जोरात घुसण्यामुळे झालेली असावी असे दिसते. भित्ती ज्यांत घुसलेल्या आहेत ते थरही क्षोभित झाल्याचे दिसते. दलिक भित्ती आणि त्यांच्या साहचर्याने आढळणाऱ्या इतर संरचना यांवरून भूद्रोणीतील (ज्याच्यात मोठ्या प्रमाणावर दीर्घ काळात प्रचंड जाडीचा गाळ साचला आहे अशा भूपृष्ठावरील लांबट व निरुंद क्षेत्रातील) अवसादनाची (गाळ साचण्याच्या क्रियेची) अस्थिर परिस्थिती सूचित होते.

पहा : अग्‍निज खडक ज्वालामुखी-२.

ठाकूर, अ. ना. सोवनी, प्र. वि.