विदेराइट : बेरियमाचे खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, पुष्कळदा यमल (जुळे), यमलनाची पुनरावृत्ती झाल्याने स्फटिकाचे बाह्यरूप बऱ्याचदा षट्‌कोणी द्विप्रसूचीसारखे दिसते [⟶ स्फटिकविज्ञान]. स्फटिकांच्या पृष्ठावर रेघा असतात. हे संपुंजित, स्तंभाकार, कणमय गुच्छाकार, गोलाकार इ. रूपांतही आढळते. ⇨पाटन अस्पष्ट. भंजन खडबडीत. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची राळेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी. कस पांढरा [⟶ खनिजविज्ञान]. कठिनता ३.२५, वि. गु. ४.३, रंग पांढरा किंवा करडा, कधीकधी पिवळसर, तपकिरी वा हिरवट छटा. रा. सं. BaCO3. हे हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळतो व त्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइडचे बुडबुडे बाहेर पडतात.

विदेराइटाचा स्फटिकहे ⇨बराइटाखालोखाल आढळणारे बेरियमाचे खनिज आहे. मात्र सापेक्षतः हे विरळाच आढळत असल्याने धातुक (कच्च्या रूपातील धातू) म्हणून हे गौण आहे. कमी तापमानाला तयार झालेल्या जलतापीय धातुक (उदा., शिसे) शिरांमध्ये हे गॅलेना व बराइट यांच्याबरोबर आढळते. इंग्लंड, जर्मनी, अमेरिका इ. देशांत हे आढळते. रोझीक्लेअर (इलिनॉय) येथे याचे मोठे स्फटिक आढळतात. हे सामान्य अम्लांत विरघळत असल्याने बेरियमाची इतर संयुगे बनविण्यासाठी हे बराइटाऐवजी वापरणे सोयीचे असते. विशिष्ट प्रकारची काच व पोलाद, साखरेचे परिष्करण, कुंभारकाम वगैरेंमध्ये याचा उपयोग करतात. व्हाइटलेड आणि व्हाइट झिंक या रंगद्रव्यांत याची भेसळ करतात. डी. डब्ल्यू. विदरिंग या इंग्रज शास्त्रज्ञांनी याचा शोध लावून प्रथम याचे विश्लेषण केले म्हणून त्यांच्या नावावरून याचे विदेराइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.