ॲपोफिलाइटाचे स्फटिक

ॲपोफिलाइट : खनिज. स्फटिक चतुष्कोणीय. सामान्यत: (010), (111) व (001) यांचे संयोग. कधीकधी द्विचतुष्कोणी प्रचिनांचे फलकही असतात. कित्येक स्फटिक घनीय आणि घन व अष्टफलक यांचा संयोग असल्यासारखे दिसतात, पण त्यांच्या आधारतलाची म्हणजे (001) ची व प्रचिनाच्या फलकांची चमक वेगळी असल्यामुळे ते चतुष्कोणीय असल्याचे कळून येते [→स्फटिकविज्ञान]. पाटन : (001) उत्कृष्ट [→पाटन]. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. कठिनता ४.५-५. वि.गु. २.३-२.४. आधारतलाची चमक मोत्यासारखी, इतर फलकांची काचेसारखी. सामान्यतः रंगहीन किंवा पांढरे. क्वचित एखाद्या फिटक रंगाचे. रा. सं. KF.Ca4 (Si2O5)4.8H2O.

बेसाल्टासारख्या ज्वालामुखी खडकांच्या पोकळ्यांत आढळणाऱ्या द्वितीयक (मूळच्या निक्षेपात बदल होऊन तयार झालेल्या) खनिजांपैकी ॲपोफिलाइट हे एक आहे. मुंबई, लोणावळे, पुणे, नाशिक व महाराष्ट्रातील इतर भागांतील बेसाल्टात आढळते. भाजल्यावर ॲपोफिलाइटाचे पत्रे सुटू लागतात याला उद्देशून आणि ‘पान’ व ‘पासून’ अशा अर्थाच्या दोन ग्रीक शब्दांवरून नाव दिले गेले.

ठाकूर, अ. ना.