बेंटोनाइट: (टेलराइट, विल्किनाइट). ही एक प्रकारची मृत्तिका वा माती आहे. अमेरिकेतील फोर्ट बेंटॉन (माँटॅना) येथे ही प्रथम आढळल्याने तिचे बेंटोनाइट हे नाव पडले आहे. येथील मृत्तिकेसारख्या अतिशय कलिल स्वरूपी [सूक्ष्म परंतु रेणूंपेक्षा मोठे कण असलेल्या पदार्थांचे गुणधर्म असलेल्या ⟶ कलिल] व आकार्य (आकार देता येण्यास योग्य) अशा मृत्तिकेलाच पूर्वी बेंटोनाइट म्हणत. नंतर ज्वालामुखी राख जेथे साचली असेल तेथेच तिच्यावर वातावरणक्रिया होऊन बनलेली व जी मुख्यत्वे माँटमोरिलोनाइट या खनिजाची बनलेली आहे, अशाच मृत्तिकेला बेंटोनाइट म्हणण्यात येऊ लागले. काही वेळेला बेंटोनाइटची व्याख्या करताना तिचे भौतिक गुणधर्म विचारात घेत नाहीत, तर उद्योगधंद्यात उत्पत्तीची तऱ्हा विचारात न घेता कोणत्याही आकार्य व कलिल स्वरूपी मृत्तिकेला बेंटोनाइट म्हटले जाते.

बेंटोनाइट मृत्तिका मुख्यत्वे माँटमोरिलोनाइटाची बनलेली असते. शिवाय तिच्यात थोड्या प्रमाणात बायडेलाइट, अल्प प्रमाणात फेल्स्पार, पायरोक्सीन यांसारखी अग्निज खडकांतील खनिजे व काच आढळते. हिच्यात सु. ५ ते १० टक्के अल्कधर्मी (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवणे देण्याचा गुणधर्म असलेली) संयुगे, सु. ३ टक्के फेरिक लोह आणि अल्प मॅग्नेशियम असते. ही पाण्यात विरघळत नाही. सोडियमयुक्त बेंटोनाइट पाण्यात टाकल्यास तिच्यात पाणी शोषिले जाऊन तिचे मूळचे आकारमान कित्येक पटींनी वाढते आणि थोडीच पाण्यात टाकल्यास ⇨ जेल तयार होते. कॅल्शियमयुक्त बेंटोनाइट मात्र अशा प्रकारे फुगत नाही. बेंटोनाइट द्रवाचे विरंजन करते (रंग घालवते). बेंटोनाइटाचा रंग सामान्यतः पिवळा व पिवळसर हिरवा असतो कधीकधी गुलाबी, करडा व निळाही असतो. वातावरणक्रिया झालेल्या बेंटोनाइटाच्या थरावर कोशिकीय (सूक्ष्म पोकळ्यांनी युक्त) संरचना दिसते. ओले बेंटोनाइट सुकताना आक्रसते व पृष्ठावर विशिष्ट प्रकारे भेगा पडतात.

ऑर्डोव्हिसियन ते तृतीय (सु. ४९ ते १.२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील विविध प्रकारच्या खडकांत बेंटोनाइटचे थर आढळत असून विशेषतः क्रिटेशस (सु. १४ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळानंतरच्या खडकांत ते विपुल आहेत. या थरांची जाडी सामान्यतः २.५ सेंमी. ते ३ मी. पर्यंत असून १५ मी. पर्यंत जाडीचे थरही आढळले आहेत.हे थर कित्येकशे किमी. पर्यंत लांबीचे असतात. थरांची जाडी सर्वत्र एकसारखी असल्याचे दिसून येते. उदा., पेनसिल्व्हेनियातील सु. १६० किमी. लांब थराची जाडी एकसारखी आढळली आहे.

बेंटोनाइट पुष्कळ देशांत आढळत असून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंग्लंड, जर्मनी, युगोस्लाव्हिया, रशिया, अल्जीरिया, जपान व अर्जेंटिना येथे ती मोठ्या प्रमाणावर काढण्यात येते. पेरू, कॅनडा, इटली, न्यूझीलंड, पोलंड, फ्रान्स, रूमानिया, चीन, मेक्सिको, द. आफ्रिका वगैरे भागांतही हिचे साठे आहेत. भारतात जम्मूमध्ये भिंबरजवळ व राजस्थानात जोधपूर, बारमेर व सवाई माधवपूर जिल्ह्यांत बेंटोनाइट आढळते. जम्मू व बारमेर येथील बेंटोनाइट खनिज तेलाच्या विहिरी खणण्यासाठी लागणाऱ्या चिखलात व ओतकामाच्या वाळूत वापरतात.

ज्वालामुखीतून बाहेर फेकली गेलेली राख दूरवरपर्यंत जाऊन जमिनीवर अथवा समुद्राच्या तळावर साचते. मात्र अशा सर्वच थरांचे बेंटोनाइटमध्ये रूपांतर झालेले आढळत नाही. बेंटोनाइटचे थर बहुतकरून सागरी खडकांतच आढळतात. या राखेचे बेंटोनाइटमध्ये रूपांतर होण्यास सागरी परिसरात अधिक अनुकूल परिस्थिती असल्याचे दिसते. राखेचे थर साचताना वा साचल्यावर लगेचच राखेतील काचेचे स्फटिकी माँटमोरिलोनाइटात रूपांतर होण्यास सुरुवात होत असावी. राखेतील जादा सिलिका बेंटोनाइटामध्ये क्रिस्टोबलाइट रूपात मागे राहिलेली आढळते.

बेंटोनाइटच्या गुणधर्मांत व रासायनिक संघटनातही बरीच विविधता आढळत असल्याने तिच्या सर्व प्रकारांचा उपयोग करता येतो, असे नाही. तिच्या भौतिकीय गुणधर्मांनुसार उद्योगधंद्यात तिचा विविध प्रकारे वापर केला जातो.

ओतकामाच्या वाळूत बंधकद्रव्य म्हणून, खनिज तेलाच्या विहिरी खणण्यासाठी लागणाऱ्या चिखलात मद्य, तेल इत्यादींच्या विरंजनासाठी व उत्प्रेरक (विक्रीयेत भाग न घेता तिची गती बदलणाऱ्या पदार्थाच्या) निर्मितीत मुख्यत्वे बेंटोनाइट वापरतात. मृत्तिका उद्योग, रबर, कागद, साबण इत्यादींमध्ये भरणद्रव्य म्हणून भिंती व धरणे यांच्यातील गळती बंद करण्यासाठी खनिज लोकर, पेन्सिलचे शिसे इत्यादींत बंधकद्रव्य म्हणून कागदाच्या लगद्यातील पाणी शोषून घेण्यासाठी तसेच औषधे, सौंदर्यप्रसाधने, जंतुनाशके, सिमेंट, पॉलिशे, रंगलेप वगैरे बनविताना बेंटोनाइट वापरतात. बेंटोनाइटच्या थरातील द्रव्य वाऱ्याने वाहून आणलेले असल्याने विशेषतः सागरी खडकांच्या थरांचा सापेक्ष काल निश्चित करण्यासाठी व अशा थरांमधील परस्पर संबंध प्रस्थापित करण्यासाठी हे थर उपयुक्त ठरले आहेत.

पहा:मृत्तिका.

आगस्ते, र. पां. ठाकूर, अ. ना.