कॅल्साइट : (कॅल्कस्पार). खनिज. स्फटिक समांतर षट्‌फलकीय समूहातील, स्फटिंकाच्या ठेवणीत अतिशय विविधता आढळते व कित्येकांची ठेवण अतिशय जटिल असते. भिन्नाभिन्न आकारमान असणाऱ्या कॅल्साइटाच्या स्फटिकांचे तीनशेहून अधिक प्रकार आढळलेले आहेत. कॅल्साइटाच्या स्फटिकांच्या ठेवणीचे तीन मुख्य प्रकार आहेत. (१) प्रचिनाकारःप्रचिन लांब(आकृती-अ)किंवा आखूड (आकृती-आ) असतात पण प्रचिनाचे फलक ठळक असतात व त्यांच्या टोकाशी आधार-पिनॅकॉइडाचे किंवा समांतर षट्‌फलकाचे फलक असतात.(२) समांतर षट्‌फलकाकार : यात समांतर षट्‌फलकाचे फलक ठळक असतात. इतर फलक असले तर ते गौण असतात.समांतर षट्‌फलकाचा एकूण आकार बसकट(आकृती-इ) किंवा उभट(आकृती-ई)असतो.(३) विषम त्रिभुजफलकीय :(आकृती-उ)याच्यात विषम त्रिभुजफलकाचे फलक असतात.

कॅल्साइटाचे विविध ठेवणींचे स्फटिक

इतर उदा ,पिनॅकॉइड किंवा प्राचिन यांचे फलक असले, तर ते गौण असतात. प्रचिन आधार-पिनॅकॉइड व निरनिराळे समांतर षट्‌फलक व विषम त्रिभूजषट्‌फलक यांचे निरनिराळे समांतर षट्‌फलक व विषम त्रिभुजषट्‌फलक यांचे निरनिराळे संयोग होऊन तयार झालेल्या स्फटिंकाचे शेकडो प्रकार निसर्गात आढळतात [→ स्फटिकविज्ञान]

कॅल्साइटात(0112)या प्रतलास अनुसरुन असलेले यमलन(स्फटिकांचे जुळेपण)वारंवार आढळते. स्फटिकांवर दाब देऊन त्याच्यात असे यमलन निर्माण करता येते. कित्येक संगमरवरातील कॅल्साइटात असे व्दितीयक (नंतरचे)यमलन असते. बऱ्याच वेळा यमलनाची पुनरावृत्ती होऊन तयार झालेली समांतर पटले संगमरवरातील कॅल्साइटात किंवा दाबल्या गेलेल्या इतर कॅल्साइटात आढळतात. (0001) या प्रतलास (आधार-पिनॅकॉइडास)अनुसरुन असणारे यमलन कित्येकदा आढळते. हे खनिज कणांच्या किंवा तंतूंच्या स्वरुपात किंवा झुंबराकार किंवा गुठळयांसारख्या राशीच्या स्वरुपातही आढळते.

पाटन : (1011)याला संमातर, अशी अती उत्कृष्ट   पाटन   यमलनाने निर्माण झालेली व (0112) यास संमातर अशी विभाजनतले कित्येक स्फटिंकात आढळतात. भंजन शंखाभ पण मिळणे कठीण कारण स्फटिक पाटनास असुसरुनच भंग पावतात. कठिनता ३ पण पाठन पृष्ठावरील निरनिराळया मातीच्यां स्वरुपातल्या कॅल्साइटाची कठिनता कमी असते. वि.गु.२.७१. चमक काचेसारखी, मातीच्या स्वरुपातील कॅल्साइटाची मातीसारखी. शुद्ध कॅल्साइट रंगहीन किंवा पांढरे असते. त्याच्यात मलद्रव्ये असल्यास त्याला हिरवा, तांबडा, निळा किंवा इतर एखादा किंवा काळाही रंग येतो. कस पांढरा ते किंचित करडा. शुद्ध खनिज पारदर्शक असते. कॅल्साइटाच्या अंगी तीव्र व्दिप्रणमन(एकाच किरणाचे दोनदा वक्रीभवन) घडवून आणण्याचा गुण असतो.

रा. स. CaCO3. या खनिजावर विरल व थंड अम्लांची विक्रिया होऊन ते फसफसते.

कॅल्साइटाचे पुढील प्रकार आहेत : (१)आइसलॅंड स्पार : कॅल्साइटाच्या शुद्ध, अगदी स्वच्छ व पारदर्शक जातीला आइसलॅंड स्पार म्हणतात. प्रकाशाचे धु्रवण(प्रकाश तरंगांचे एकाच विशिष्ट प्रतलात कंपन होण्याची क्रिया)करणारे निकोल लोलक याचे बनविलेले असतात.(२)नेलहेड स्पार :  या जातीचे स्फटिक चपटे असून त्यांची चपटी पृष्ठे खिळ्याच्या माथ्यासारखी दिसतात.(३) डॉगटूथ स्पार : या जातीचे स्फटिक विषम त्रिभूजफलकी आणि निमुळते असतात. ते कुष्याच्या दाताप्रमाणे दिसतात. (४)सॅटीन स्पार : तंतुमय व साटणीसारखी चमक असणारा प्रकार.

कॅल्साइट हे पृथ्वीच्या कवचात विपुल प्रमाणात आढळते. शुद्ध चुनखडक व संगमरवर हे जवळजवळ सर्वस्वी कॅल्साइटाचे आणि इतर चुनखडक व संगमरवर हे मुख्यतः कॅल्साइटाचे बनलेले असतात. कित्येक वालुकाश्मांत, इतर अवसादी(गाळाच्या) खडकांत आणि कित्येक रुपांतरित व अग्निज खडकांत कॅल्साइट हे कमीअधिक प्रमाणात आढळते.

चुना, सिंमेट, बांधकामाचा चुना इ. तयार करण्यासाठी, काच तयार करण्यासाठी व कित्येक रासायनिक उद्योगधंद्यांत कॅल्साइट किंवा चुनखडक वापरले जातात.

पहा : चुनखडक.

केळकर, क. बा.