भार : हिमालयाच्या पायथ्यालगत असलेल्या टेकड्यांच्या कडांशी झालरीप्रमाणे आढळणाऱ्या आणि जलोढ – व्यजनासारख्या (गाळाच्या पख्यासारख्या) डबराच्या राशींना भाबर म्हणतात. ह्या कोरड्या त्रिभुज प्रदेशाप्रमाणे दिसतात. या राशींचा विस्तार आणि संघटन ही परिस्थितीप्रमाणे वेगवेगळी असतात. या राशींचा उतार तीव्र आहे. त्या मुख्यतः खडकांचे सुटे तुकडे व गोटे यांच्या बनलेल्या असून त्यांच्यात माती आणि वाळू भरलेली आढळते. या राशींची पायापासून माथ्यापर्यंतची उंचा क्वचितच ३४० मी. पेक्षा जास्त असल्याचे आढळते. भाबरवरून वाहणाऱ्या नदीनाल्यांचे बहुतेक पाणी या दगडगोट्यांतील पोकळ्यांत मुरून खालील भागाकडे जाते. त्यामुळे

पावसाळ्याव्यतिरिक्त येथे पाणी पृष्ठभागावरून वाहताना दिसत नाही. याच्या अधिक उंच भागात दाट वने असून त्यांत साल (शोरिया रोबस्टा) हा महत्त्वाचा वृक्ष आहे. सखल असलेल्या जमिनीत वरील दगडगोट्यात मुरलेले पाणी येऊन तेथे गवताळ प्रदेश बनले आहेत. त्यांना तराई प्रदेश म्हणतात. भाबरचे उत्तर शिवालिक ⇨ पिंडाश्माशी साम्य असून ते पिंडाश्म जुने भाबर असावेत. भाबराचे असे जुने अवशेष सिक्किम हिमालयाच्या पायथ्याशी प्रत्यक्ष नदीनाल्यांच्या पात्रांपासून सु. ३३० मी. उंचीवर आढळतात. अशा प्रकारे भाबर हे अगदी अलीकडच्या काळातील शैलसमूह (खडकांच्या राशी) आहेत.

ठाकूर, अ. ना.