टेट्राहेड्राइट :(ग्रे कॉपर). खनिज. स्फटिक घनीय चतुष्फलकीय, सामान्यतः चतुष्फलकी, कधीकधी जुळे स्फटिक आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित व कणमय रूपांतही हे आढळते. ⇨पाटन नसते. भंजन खडबडीत. किंचित ठिसूळ. कठिनता ३–४·५. वि. गु. ४·६–५·१. चमक धातूसारखी जवळजवळ अपारदर्शक. रंग लोखंडासारखा काळा. कस काळसर ते उदी. रा. सं. (Cu, Fe, Zn, Ag)12 ⇨ टेनंटाइनाशी समाकृतिक (स्फटिकांचा आकार, संरचना इत्यादींत सारखेपणा असलेले) असते. मध्यम तापमानाच्या जलीय विद्रावांद्वारे तयार झालेल्या शिरांमध्ये हे कॅल्कोपायराइट, स्कॅलेराइट, गॅलेना वगैरेंच्या जोडीने आढळते. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, मेक्सिको, पेरू, बोहीमिया इ. भागांत सापडते. हे तांबे किंवा यांतील एखादी धातू (उदा., चांदी) मिळविण्यासाठी वापरतात. स्फटिकांच्या आकारावरून ‘चार फलक असणाऱ्या’ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून डब्लू. हायडिंगर यांनी टेट्राहेड्राइट हे नाव दिले (१८४५).

टेट्राहेड्राइटाचे स्फटिक

केळकर, क. वा.