तापसह माती : (फायर क्ले). मुख्यतः सिलिका (SiO2)  व ॲल्युमिना (Al2O3) यांनी बनलेल्या आणि दीर्घकाल उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या मृत्तिकेला तापसह माती म्हणतात. विशेषकरून ब्रिटिश भूवैज्ञानिक ही संज्ञा वापरतात. सिलिका व ॲल्युमिना यांच्याशिवाय हिच्यात फेरिक ऑक्साइड (Fe2O3), लाइम (CaO), मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) व अल्कली (Na2O,K2O) हीही अल्प प्रमाणात असतात. कधी कधी थोडे पाणी व जैव द्रवही हिच्यात असते. हिचा कमीत कमी वितळबिंदू सु. १,६४०° से. एवढा असतो, परंतु मलद्रव्यांमुळे तो कमी होऊ शकतो. यामुळे ही माती दीर्घकाल उच्च तापमानात राहिली, तरी न वितळता टिकून राहते. शिवाय लागोपाठ होणाऱ्या तापविणे व थंड करणे या क्रियांचा तसेच रासायनिक कारकांच्या विक्रियांचाही हिच्यावर विकृत परिणाम होत नाही. हिला आकार देता येतो आणि हिच्यात लाकडांचा भुसा मिसळून तापविली असता भुसा जळून जाऊन सच्छिद्र पोताची माती तयार करता येते.

ही माती प्रामुख्याने कार्‌बॉनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील दगडी कोळशांच्या थरांखाली विपुलपणे आढळते. इंग्लंड, जपान, पूर्व अमेरिका आणि यूरोप या भागांत हिचे मोठे साठे आहेत. भारतामध्ये गोंडवनी संघात आढळणाऱ्या दगडी कोळशाच्या थरांखाली या मातीचे थर आढळतात. राजमहल टेकड्या, जबलपूर, कोलार, बंगाल, बिहार वगैरे भागांत तापसह माती आढळते. कुर्नूल (आंध्र प्रदेश)  जिल्ह्यातील ऑक नावाच्या शेल खडकांपासूनही चांगल्या प्रकारची तापसह माती मिळते.

सर्व प्रकारचे आधुनिक उच्चतापसह पदार्थ या मातीपासून बनविण्यात येतात. उदा., उच्चतापसह विटा, भांडी, मुशी, बकपात्रे इत्यादींसाठी ही माती वापरतात.

पहा : उच्चतापसह पदार्थ केओलीन.

ठाकूर, अ. ना.