मार्‌कॅसाइट : (व्हाइट आयर्न पायराइट्‌स), खनिज. स्फटिक समचतुर्भुजी सामान्यतःवडीसारखे, कधीकधी प्रसूच्याकार व प्रचिनाकार प्रचिनांवर उभ्या रेखा असतात. पुष्कळदा जुळ्या स्फटिकांचे पुंजके आढळतात ते कोंबड्याच्या तुऱ्यासारखे दातेरी वा भाल्याच्या फाळांप्रमाणे दिसतात (पहा आकृती). हा आकार व रंग यांमुळे याला ‘कॉक्सकोंब’ वा ‘स्पिअर पायराइट्‌स’ म्हणतात. कधीकधी जुळ्या स्फटिकांमुळे हे षट्‌कोणी भासते [→ स्फटिकविज्ञान].बहुधा याच्या गाठी आढळतात व त्यांच्यातील तंतूची रचना अरीय (त्रिज्यीय) असते. कधीकधी हे झुंबराकार, मूत्रपिंडाकार वा पुटांच्या रूपातही आढळते. ⇨ पाटन : (110) अस्पष्ट. भंजन खडबडीत. ठिसूळ. कठिनता ६–६·५. वि. गु. ४·८९. चमक धातूसारखी. रंग काशासारखा पण फिकट पिवळसर ताज्या पृष्ठाचा रंग जवळजवळ पांढरा पण उघडे पडल्याने ते पिवळे वा उदी होते. कस करडसर काळा. अपारदर्शक.

मार्‌कॅसाइटाचे स्फटिक

रा. सं. FeS2, (कधीकधी यात अल्पसे आर्सेनिक असते). हे उघड्या नळीत तापविल्यास सल्फर डाय-ऑक्साइडाचा वास येतो. हे पायराइटाचे द्विरूप आहे म्हणजे दोघांचे रा. सं. एकच आहे पण स्फटिक समूह भित्र आहेत. या पायराइटाचे स्फटिक घनीय असून ते मार्‌कॅसाइटापेक्षा जड असते. मार्‌कॅसाइटाचे अपघटन (रेणूचे लहान तुकडे होण्याची क्रिया) पायराइटापेक्षा जलदपणे होते. मार्‌कॅसाइटाच्या अपघटनाने फेरस सल्फेट व सल्फ्यूरिक अम्‍ल तयार होतात. पायराइट नायट्रिक अम्‍लात विरघळते, तर मार्‌कॅसाइटाचा त्यात साका तयार होतो. मार्‌कॅसाइट झिरपणाऱ्या अम्‍लीय विद्रावांद्वारे कमी तापमानाला निक्षेपित होते (साचते) व ते भूपृष्ठालगत आढळते. यांमुळे उथळ व कमी तापमानाला बनलेले निक्षेप (साठे) अथवा भूमिजल यांचे अस्तित्व समजण्यासाठी मार्‌कॅसाइटाचा निदर्शकासारखा उपयोग होऊ शकतो. हे प्रतिष्ठापनानेही (एका अणूच्या जागी दुसरा अणू येण्याच्या क्रियेनेही) तयार होते. विशेषतः जस्त व शिसे यांच्या घातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूंच्या) शिरांमध्ये, कधीकधी चॉकसारख्या खडकांत, चुनखडकात (प्रतिष्ठापित प्रकारचे) व मार्ल, मृत्तिका, शेल, लिग्‍नाइट इत्यादींमध्येही संधित्यांच्या (केंद्रकाभोवती गोलाकार थर साचून बनलेल्या गोलसर पुजांच्या) रूपातही हे आढळते. शिवाय दगडी कोळशामध्ये आढळणाऱ्या पितळेसारख्या दिसणाऱ्या गाठी व भिंगाकार राशी या पायराइट व मार्‌कॅसाईट यांच्या बनलेल्या असतात. पायराइट, गॅलेना, ब्‍लेंडा, स्फॅलेराइट इ. खजिनांबरोबर मार्‌कॅसाइट आढळते.

बोहिमिया, प. जर्मनी, इंग्‍लंड, अमेरिका, झेकोस्लोव्हाकिया, फ्रान्स, मेक्सिको इ. प्रदेशात हे आढळते. पूर्वी हे सल्फ्यूरिक अम्‍ल बनविण्यासाठी तसेच घासून व झिलई देऊन दागदागिन्यांत वापरीत. आता

थोड्या प्रमाणात हे पायराइटाप्रमाणे वापरतात व अल्प प्रमाणात गंधक मिळविण्यासाठी हे उपयुक्त आहे.

एके काळी पायराइटासाठी वापरात असलेल्या अरबी शब्दावरून याचे मार्‌कॅसाइट हे नाव आले असावे, असे काहींचे मत आहे. तर इतरांच्या मते मार्‌कॅशी (पर्शिया) या प्रदेशावरून मार्‌कॅसाइट नाव आले असावे. हे पायराइटापेक्षा अधिक सफेद असल्याने याला ‘व्हाइट आयर्न पायराइट्‌स’ म्हणतात.

पहा : पायराइट.

ठाकूर, अ. ना.