ल्यूसाइटाचा स्फटिकल्यूसाइट : (अँफिजीन, ग्रेनालाइट, व्हीस्यूव्हिअन वा पांढरे गार्नेट). ⇨ फेल्स्पॅथॉइड  गटातील सर्वांत महत्त्वाचे खनिज. स्फटिक छद्मवनीय, सममात्री समलंबफलकीय (२४ पृष्ठे असलेल्या) आकाराचे आणि गोलसर. ५००° से. पेक्षा अधिक तापमानाला स्फटिकरचना घनीय असते. याहून कमी तापमानाला अंतर्गत अणुरचना बदलून स्फटिकरचना बहुतकरून चतुष्कोणीय (काहींच्या मते एकनताक्ष वा त्रिनताक्षही) होते मात्र स्फटिकाचे बाह्यरूप बदलत नाही [⟶ स्फटिकविज्ञान], ल्यूसाइट बहुधा पूर्णाकृती स्फटिकांच्या किंवा कधीकधी विखुरलेल्या कणांच्या रूपात आढळते. रंग पांढरा ते राखेप्रमाणे करडसर कस रंगहीन वा पांढरा. चमक काचेसारखी ते ग्रीजाप्रमाणे मंद. दुधी काचेसारखे पारभासी ते अपारदर्शक. भंजन शंखाभ, ठिसूळ. कठिनात ५.५ ते ६. वि. गु. २.४५-२.५. रा. सं. KAISi₂O₆. कधीकधी उच्च तापमानाला पोटॅशियमाच्या जागी सोडियम आलेले असते. ल्यूसाइ अगलनीय असून हायड्रोक्लोरिक अम्लात विरघळून याचे विघटन होते पण जेली न निर्माण होता सिलिका अलग होते. जिप्समाच्या चूर्णाबरोबर मिसळून वितळविल्यास यातील पोटॅशियमाच्या जांभळ्या ज्वाला दिसतात.

ल्यूसाइट एक दुर्मिळ खनिज असून ते फक्त अग्निज खडकांत आढळते. मुख्यत्वे पोटँश विपुल आणि सिलिका अल्प असणाऱ्या  अलीकडच्या काळातील ज्वालामुखी खडकांच्या सूक्ष्मकणी आधारकात याचे पूर्णाकृती बृहत्स्फट (मोठे स्फटिक) जडवलेले आढळतात. उदा., न्यिरागोंगो (झाईरे) ज्वालामुखीच्या लाव्ह्यात याचे ७ सेंमी. पर्यंत मोठे स्फटिक आढळले आहेत. ल्यूसाइट बेसाल्ट, ल्यूसाइट फोनोलाइट, ल्यूसाइट टेफ्राइट, ल्यूसिटोफायर, ल्यूसिटाइट इ. खडकांत हे विशेषकरून आढळते. क्वचित पातालिक खडकात हे आढळते परंतु क्वॉर्ट्झ हे खनिज असलेल्या खडकांत हे आढळत नाही.

मध्य इटली (व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखी, माँते सोम्मा, रोम इ.), माँटॅना (हायवुड व बेअर पॉ पर्वत), वायोमिंग (ल्यूसाइट टेकडी), ऑस्ट्रेलिया, जर्मनी, बोर्निओ, जावा, युगांडा, सायबीरिया, ब्राझील, सार्डिनिया, बोहीमिया, आशिया मायनर इ. ठिकाणी याचे चांगले स्फटिक आढळतात. नेफेलीन, ऑर्थोक्लेज व ॲनॅलसाइम या खनिजांच्या मिश्रणाची छद्मरूपे ल्यूसाइटाभोवती वनतात त्यांना ‘छद्मल्यूसाइट’ म्हणतात. माँटॅना, आर्कॅन्सॉ व ब्राझील येथे छद्मल्यूसाइट आढळते.

इटलीमध्ये पोटॅश व ॲल्युमिनियमयुक्त खत म्हणून ल्यूसाइट वापरतात (वर्षाला सु. ४० हजार टन) तसेच व्यापारी तुरटीचा व पोटॅशचा गौण उद्गम म्हणूनही तेथे ल्यूसाइट वापरतात. पांढऱ्या रंगामुळे पांढरा या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे  ‘ल्यूसाइट’ हे नाव पडले आहे.

पहा : फेल्स्पॅथॉइड गट.  

ठाकूर, अ. ना.