झिर्‌कॉनाचे स्फटिकझिर्‌कॉन : खनिज. स्फटिक चतुष्कोणीय. सामान्यतः प्रचिनाकार व प्रचिनाच्या टोकाशी प्रसूची असलेले लहान स्फटिक, क्वचित प्रसूच्याकार. वाकलेल्या गुडघ्याच्या आकाराचे यमल (जुळे) स्फटिकही असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. यांशिवाय अनियमित आकाराच्या कणांच्या रूपातही ते आढळते. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ७–७·५. वि. गु. ४–४·८. चमक हिऱ्यासारखी. बहुधा दुधी काचेप्रमाणे पारभासी, कधीकधी पारदर्शक. रंगहीन अथवा पिवळसर, हिरवट, निळसर वगैरे रंगछटा. कस रंगहीन. रा.सं. ZrSiO4. हे ग्रॅनाइट, सायेनाइट, पेग्मटाइट यांसारख्या सिकत (सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या) अग्निज खडकांत गौण खनिज म्हणून आढळते. काही रूपांतरित खडकांत व गाळांतही हे आढळते. इल्मेनाइट, रूटाइल व मोनॅझाइट ही खनिजे त्याच्याबरोबर आढळतात. हे श्रीलंका, रशिया, ब्रह्मदेश, ब्राझील, नॉर्वे, थायलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॅलॅगॅसी इ. देशांत आढळते.  भारतामध्ये रत्नागिरी, त्रावणकोर, दक्षिण तमिळनाडू, विशाखापटनम्‌ व ओरिसा यांच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या वाळूत गया येथील पेग्मटाइटात व कोईमतूर येथील नेफेलीन सायेनाइटात झिर्‌कॉन आढळते. पारदर्शक स्फटिकांचा रत्न म्हणून वापर होतो. यापासून मिळणारे झिर्कोनियम ऑक्साइड उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणारा) पदार्थ म्हणून वापरले जाते. झिर्‌कॉनापासून मिळविण्यात येणाऱ्या झिर्कोनियम या शुद्ध धातूचा अणुकेंद्रीय विक्रियकात (अणुभट्टीत) उपयोग होतो. विशिष्ट प्रकारच्या पोलादातही ही धातू वापरतात. पिवळसर किंवा सोनेरी या अर्थाच्या जारगॉन (अरबी) अथवा झारगन (फारशी) शब्दावरून झिर्‌कॉन हे नाव पडले आहे.

केळकर, क. वा.