ज्वालामुखी – २ : पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील तप्त शिलारस (मॅग्मा) बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायुलोट आणि राखेसदृश्य असे खडकांचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी हे नाव देतात.

ज्वालामुखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट, धुरासारखे दिसणारे खडकांच्या सूक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वांवरून ही एक पेटलेली निसर्गाची भट्टी आहे, असे वाटणे साहजिक होते. त्यामुळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या खडकांच्या लहानमोठ्या कणांनाही ‘राख’, ‘अंगार’ (निखारे) अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या ज्वाला ‘ज्वलन’ म्हणता येईल अशी कोणतीही क्रिया ज्वालामुखी क्रियेत घडून येत नसते. क्वचित बाहेर पडणाऱ्या वायूंपैकी गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.

जमिनीवर येण्यापूर्वी भूपृष्ठाखाली काही खोलीवर असणाऱ्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात. शिलारस म्हणजे केवळ खडक वितळून तयार होणारा रस नव्हे. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनेक वायू विरघळलेल्या अवस्थेत असतात. काही कारणाने या शिलारसावर असलेल्या खडकात भेगेसारखे दुर्बल प्रतल किंवा मार्ग सापडला की, दाबाखाली असणारा असा शिलारस पृष्ठभागाकडे येऊ लागतो. तो जसजसा पृष्ठभागाकडे घुसत जातो तसतसा वरच्या खडकांचा भार कमी होऊन शिलारसातील वायूंचा दाब वाढू लागतो. शेवटी सोडावॉटरच्या बाटलीचे बूच उडावे तसा वरचा टोपण खडक उडवून देऊन शिलारस उसळून जमिनीवर सांडतो.

शिलारस पृष्ठभागावर आला की, त्यात विरघळलेले बहुतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडू लागतात. ज्या शिलारसातून बहुतेक वायू निघून गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.

मध्यवर्ती निर्गम द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामुखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालचा शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुळे बाजूच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकूच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो, त्याला ‘कुंड’ म्हणतात. अशाप्रकारे सर्वसामान्य केंद्रीय उद्रेकात शंकू-कुंड रचनेचे ज्वालामुखी तयार होतात. काही उद्रेकांत मध्यवर्ती नळीच्या ऐवजी जमिनीत अरुंद व लांब भेग पडून तीतून लाव्हा बाहेर पडून आसपासच्या प्रदेशात थरांच्या रूपाने पसरतो. ही क्रिया बराच काळ चालू राहून आसपासच्या प्रदेशातील लहान मोठ्या दऱ्या भरून जातात व लाव्हा थरांचा पठारी प्रदेश निर्माण होतो. अशा ज्वालामुखी क्रियेला ‘भेगी उद्रेक’ म्हणतात.

केंद्रीय उद्रेकात लाव्हा नेहमीच मधल्या नळीतून बाहेर न येता कित्येकदा वर येताना खालच्या पातळीवरच बाजूने एखाद्या आडव्या भेगेतून तो बाहेर येऊन मुख्य शंकूच्या उताराच्या बाजूवर उपद्वारातून त्याचा उद्रेक होतो व तेथे उपशंकू तयार होतो (आ. ३). इटलीतील एटना या ज्वालामुखीच्या बाजूवर अशी २०० हून अधिक उपद्वारे व उपशंकू तयार झालेली आहेत.

काही थोड्या ज्वालामुखींतून प्रदीर्घ काळापर्यंत सातत्याने उद्रेक क्रिया चालू राहिललेली दिसते, पण बहुसंख्य ज्वालामुखींच्या बाबतीत ही क्रिया खंडितपणे चालू असते. काही ज्वालामुखींच्या बाबतीत तर दोन उद्रेकांमधील विश्रांतीचा काळ खूपच दीर्घ असतो. अशा निद्रिस्त अवस्थेतील ज्वालामुखीच्या निर्गम द्वारातून केवळ तप्त वायू व वाफ बाहेर पडत असतात असे दीर्घकाल विश्रांती घेणारे परंतु पुरते मृत न झालेले ज्वालामुखी फार धोक्याचे असतात. कारण बऱ्याच दीर्घकालानंतर त्यांच्यातून होणारा उद्रेक अत्यंत स्फोटक व अनर्थकारक होतो.

दोन उद्रेकांच्या दरम्यानच्या काळातील किंवा ज्वालामुखी क्रिया संपत आलेल्या अवस्थेतील केवळ तप्त वायू व वाफ बाहेर टाकणाऱ्या ज्वालामुखींना धूममुखे म्हणतात. धूममुखातून बाहेर पडणारे वायू जागृत ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायूंसारखेच असतात. या वायूंत सर्वांत जास्त प्रमाण पाण्याच्या वाफेचे असून इतर वायूंमध्ये क्लोरीन, फ्ल्युओरीन, गंधक, कार्बन डाय-ऑक्साइड व थोड्याफार प्रमाणात क्षार (अल्कली) धातू (लिथियम, सोडियम, पोटॅशियम इ.) हे घटक असतात. सर्वांत तप्त अशा धूममुखांतील तापमान ३००° ते ६००° से. असून त्यांच्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंत वाफेच्या खालोखाल क्लोरीन व फ्ल्युओरीन वायू असतात. त्यामुळे अशा धूममुखांच्या प्रदेशात लोह, ॲल्युमिनियम व अमोनिया यांच्या क्लोराइडांचे निक्षेप (साठे) आढळतात. त्यामानाने कमी म्हणजे १००° ते २००° से. तापमानाच्या धूममुखांत गंधकी वायूंचे प्रमाण जास्त असते व त्याच्या आसपासच्या प्रदेशात नैसर्गिक गंधकाचे निक्षेप आढळतात. अशा गंधकी धूममुखांना नेपल्समधील सोल्फाटेरा गावावरून सोल्फाटेरा हे नाव दिले आहे. काही अत्यंत लहान व कमी तापमानाच्या निर्गम द्वारांतून फक्त वाफ, हायड्रोजन सल्फाइड आणि कार्बन डाय-ऑक्साइड या वायूंचे झोत बाहेर पडत असतात. अशा मर्यादित आकारमानाच्या स्थानिक धूममुखांना सोफिआनी म्हणतात. काही सोफिआनींतून बोरिक अम्लही मिळते. सर्वांत कमी तापमानाच्या धूममुखांतून केवळ कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो, त्यांना मोफेट असे नाव आहे.

धूममुखांचे प्रख्यात उदाहरण अलास्कातील ‘दशसहस्र धूममुख दरी’ (व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स) हे आहे. या प्रदेशात १९१२ मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होऊन कित्येकशे मीटर जाडीचा फेसाळ वालुकामय प्रवाह सर्व दरीत पसरला. नंतरच्या काळात ज्वालामुखी क्रिया संपत आली तेव्हा हा सर्व प्रदेश धूममुखांनी भरून गेला. या धूममुखांपैकी काही अत्यंत तप्त असून त्यांच्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंत ९८% पाण्याची वाफ आणि हायड्रोक्लोरिक, हायड्रोफ्ल्युओरिक व बोरिक अम्ले तसेच कार्बन डाय-ऑक्साइड इ. इतर वायू आहेत. याच प्रदेशात लेशमात्र प्रमाणात जस्त, तांबे, मॉलिब्डेनम, आर्सेनिक, अँटिमनी, कथिल, चांदी, कोबाल्ट, बिस्मथ, सिलिनियम, टेल्युरियम, थोरियम इ. धातूही आढळतात. ज्वालामुखीच्या अखेरच्या अवस्थेत धूममुखाच्या पुढची पायरी म्हणजे ⇨उन्हाळे  व ⇨गायझर  ही असते. न्यूझीलंड, आइसलँड आणि उ. अमेरिकेतील यलोस्टोन नॅशनल पार्क येथे अशी उदाहरणे आढळतात.


ज्वालामुखीजन्य पदार्थ : ज्वालामुखीच्या उद्रेकातून वायू, द्रव लाव्हा आणि घन खडकांचे तुकडे असे तिन्ही अवस्थांतील पदार्थ बाहेर पडतात. ज्वालामुखीजन्य वायूंमध्ये सर्वांत जास्त प्रमाण (६० ते ९०%) पाण्याच्या वाफेचे असते. या वाफेचा उगम काही वेळी अंशतः तर कित्येकदा पूर्णतः भूपृष्ठीय जलापासून म्हणजे ज्वालामुखी कुंडातील जलाशय, भूमिजल किंवा सागरी जल यांच्यापासून असतो. ज्या उद्रेकात इतर तप्त वायूंचा अभाव असून केवळ बाह्य जलापासून निर्माण झालेल्या वाफेचे लोट बाहेर येतात, त्यांना भूमिजल बाष्पी उद्रेक म्हणतात पण बहुतेक उद्रेकांत भूमिजलाची वाफ व शिलारसजन्य जलाची वाफ अशी वेगवेगळी ओळखून काढणे अशक्यच असते. वाफेच्या खालोखाल वैपुल्याच्या क्रमाने असणारे इतर वायू म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड, नायट्रोजन, सल्फर डाय-ऑक्साइड व थोड्याफार प्रमाणात हायड्रोजन, कार्बन मोनॉक्साइड, गंधक, क्लोरीन, हायड्रोजन सल्फाइड इ. असतात.

जागृत ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे वायू गोळा करून त्यांचे प्रमाण ठरविणे हे काम अत्यंत धोक्याचे व अवघड असते. जॅगर यांनी १९१९ मध्ये हवाई बेटांतील कीलाउआ ज्वालामुखीतील वायू गोळा करून एकूण १४ नमुन्यांचे पृथक्करण करून त्याचे सरासरी संघटन काढले, ते असे : पाण्याची वाफ ७०·७५%, कार्बन डाय-ऑक्साइड १४·०७%, कार्बन मोनॉक्साइड ०·४०%, हायड्रोजन ०·३३%, नायट्रोजन ५·४५%, आर्‌गॉन ०·१८%, सल्फर डाय-ऑक्साइड ६·४०%, सल्फर ट्राय-ऑक्साइड १·९२%, गंधक ०·१०% आणि क्लोरीन ०·०५%.

ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या वायूंचे लाव्हाशी असणारे प्रमाण प्रत्यक्षात दिसते त्यापेक्षा बरेच जास्त असते. हवाई आणि पारीकूटीन ज्वालामुखींमध्ये हे वजनी प्रमाण ०·४ ते १·१% होते. वजनाच्या दृष्टीने हे प्रमाण अगदी क्षुल्लक वाटले, तरी १ ग्रॅम पाण्याच्या वाफेचे १,०००° से. तापमानाला ४,५०० घ सेंमी. इतके आकारमान होते, हे ध्यानात घेतले म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातील वायूची खरी कल्पना येईल. व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ च्या उद्रेकात बाहेर पडलेल्या वायूचे प्रमाण आकारमानानेच नव्हे, तर वजनाने सुद्धा एकूण बाहेर पडलेल्या लाव्हा व राखेपेक्षा जास्त असावे, असे अनुमान ज्वालामुखी नळाच्या व्यासावरून करण्यात आले आहे. सिलिकेचे प्रमाण जास्त असणाऱ्या लाव्हाच्या उद्रेकात जो लाव्हाचा फवारा आकाशात उसळतो त्यावरूनही अशा लाव्ह्यात असणारे वायूंचे अतिरिक्त प्रमाण दिसून येते.

विरघळलेल्या अवस्थेतील वायूंमुळे शिलारसाची घनता कमी होते. शिलारसावरील दाब कमी होऊन वायू मुक्त होऊ लागतात व बुडबुडे तयार होऊन विद्रावाचे फेसात रूपांतर होते. अशा विद्रावाची घनता खूपच कमी होते. यामुळे वायूने संपृक्त झालेला (वायूचे जास्तीत जास्त प्रमाण असलेला) शिलारस खूप खोलवरच्या जागेपासून वरपर्यंत सहज येऊ शकतो. स्फोटक रीत्या उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या वायूंची क्षेपक शक्ती किती प्रचंड असते याचे एक उदाहरण म्हणजे १९२९ च्या कोटोपॅक्सी ज्वालामुखीच्या उद्रेकात सु. २०० टन वजनाचा एक पाषाण खंड ज्वालामुखी कुंडापासून सु. १५ किमी. अंतरावर फेकला गेला. या उद्रेकात वायूचे लोट आकाशात कित्येक किमी. उंच गेले होते.

शिलारसाच्या दाटपणानुसार व वायूंच्या दाबानुसार ते बाहेर पडण्याचे मान कमीअधिक स्फोटक असते. जपानमधील असमा ज्वालामुखीच्या काही स्फोटक उद्रेकांत वायूचा दाब दर चौ. सेंमी. ला ६०० किग्रॅ. इतका प्रचंड असल्याचे दिसून आले, पण बहुतेक ज्वालामुखी उद्रेकांत वायूचा दाब याहून बराच कमी असतो.

लाव्हा-प्रवाह : उद्रेकातून नुकत्याच बाहेर पडलेल्या लाव्ह्याचे तापमान त्याच्या वितळबिंदूपेक्षा फारसे जास्त असत नाही. लाव्ह्याचे रासायनिक संघटन आणि त्यातील वायूंचे प्रमाण यांनुसार हे तापमान ९००° ते १,२००° से. इतके असते. बेसाल्टासारख्या अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अल्प असलेल्या) लाव्ह्याचे तापमान अतिसिकत लाव्ह्यापेक्षा बरेच जास्त असते. कीलाउआ ज्वालामुखीच्या निर्गम द्वारातील लाव्ह्याचे तापमान प्रकाशीय उत्तापमापकाने (प्रारणाच्या रंगावरून तापमान मोजणाऱ्या उपकरणाने) मोजले असता ते १,१००° ते १,१५०° से. भरले. हवाई ज्वालामुखीतील लाव्ह्यांचे किमान तापमान ७००° से. असल्याचे आढळते. अतिसिकत लाव्ह्यांचे कमाल तापमान १०००° से. पेक्षाही कमी असते. पण या लाव्ह्यांचे उद्रेक स्फोटक प्रकारचे असल्यामुळे त्यांचे किमान तापमान ठरविणे शक्य झालेले नाही.

लाव्ह्याची सुवाहकता त्याच्या रासायनिक संघटनावर व तापमानावर अवलंबून असते. लाव्ह्यात पुरेसा वायू विरघळलेल्या स्थितीत असल्यास तापमान ७००° से. इतके उतरेपर्यंत असा लाव्हा सुवाही असू शकतो. हवाई ज्वालामुखीतील लाव्ह्याचा दाटपणा निर्गम द्वाराशी एक हजार पॉइज (म्हणजे पाण्याच्या १ लक्षपटीने दाट) असल्याचे आढळून आले. लाव्हा वाहत असताना निवण्यामुळे त्याचा दाटपणा वाढतो. सुवाही लाव्ह्यांच्या बाबतीत निर्गम द्वारापासून कित्येक किमी. अंतर वाहून गेल्यावर त्यांचा दाटपणा १० हजार पॉइज इतका वाढलेला दिसून आला. १९४७ मध्ये आइसलँडमधील हेक्ला ज्वालामुखीच्या उद्रेकातील लाव्ह्याचा दाटपणा निर्गम द्वाराशी १० हजार पॉइज होता. पुढे वाहताना तो ५ लक्ष पॉइजपर्यंत वाढला. अतिसिकत लाव्हे याहूनही दाट असतात. काही अतिरिकत लाव्हे तर इतके दाट असतात की, ते न वाहता जागीच साचून त्यांची ढिगासारखी रास होते.

बेसाल्टी लाव्हा सुवाही असून द्रव असेपर्यंत तो सहजपणे दीर्घ अंतरावर वाहून जातो. प्रवाहाचा वेग लाव्ह्याचा सुवाहीपणा आणि जमिनीचा उतार यांवर अवलंबून असून तीव्र उताराच्या अरुंद दरीत प्रसंगी ताशी ४५ ते ६५ किमी. वेगाने लाव्हा वाहत जातो. पण असा वेग अपवादात्मकच असून ताशी १६ किमी. हा वेगही असामान्यच म्हणावा लागेल. सर्वसामान्य बेसाल्टी लाव्ह्याचा वेग ताशी ५ ते ८ किमी. इतका असू शकतो. लाव्हा निवू लागल्यावर त्याचा दाटपणा वाढून वेग मंदावतो.


नव्याने थिजून घट्ट होणाऱ्या अल्पसिकत लाव्हा-प्रवाहाचे पृष्ठभाग दोन भिन्न रूपांचे दिसतात. त्यांना हवाई भाषेतील शब्दावरून दिलेल्या  ‘आआ’ (aa) म्हणजे खडबडीत व अणकुचीदार पृष्ठाचा किंवा ‘ठोकळ्या’ लाव्हा आणि ‘पाहोहो’ (Pahoehoe) म्हणजे रेशमासारख्या गुळगुळीत पृष्ठाचा किंवा ‘दोरखंडी’ लाव्हा अशी नावे दिलेली आहेत. अंशतः स्फटिकीभूत झालेल्या लाव्ह्यातून वेळोवेळी अकस्मात स्फोटाने वायू निसटून जाण्यामुळे ‘आआ’ किंवा ठोकळ्या लाव्हा हा प्रकार निर्माण होतो. थिजून घट्ट झालेला वरचा थर आतील वायूच्या दाबाने फुगतो आणि स्फोटाने फुटून त्याची खडबडीत, टोकदार शकले होतात. असे धारदार कडा असलेले खडबडीत तुकडे पृष्ठभागी एकमेकांवर आदळत असणारा तप्त लाव्हा-प्रवाह वाहताना दिसतो. ‘आआ’ लाव्ह्याच्या मानाने पाहोहो किंवा दोरखंडी लाव्हा बराच सावकाशीने निघतो. त्यातील वायू शांतपणे बाहेर निघून जातात आणि ठोकळ्या लाव्ह्यापेक्षा हा लाव्हा दीर्घकालापर्यंत सुवाही राहतो. त्यामुळे असा लाव्हा-प्रवाह निवताना त्याच्या पृष्ठभागावर पातळ, गुळगुळीत त्वचा तयार होते. अर्धवाही दाट डांबर वाहताना त्याच्या पृष्ठावर सुरकुत्या पडतात तशाच प्रकारच्या दोरासारख्या वळ्या लाव्ह्याच्या पृष्ठावर दिसतात. लाव्हा-प्रवाहाचा आघाडीचा भाग थिजून घट्ट होतो आणि खालच्या भागात भेग किंवा चीर पाडून तीतून एखाद्या फुग्याप्रमाणे आतील द्रव लाव्ह्याच्या जिव्हा पुढे येतात. या जिव्हांवरही लगेच पातळ त्वचा निर्माण होते. कित्येकदा वरचा पृष्ठभाग घट्ट झालेला असताना आतील लाव्हा खालच्या बाजूने वाहून जाऊन बोगद्याप्रमाणे पोकळी तयार झालेली दिसते.

आ. १. गिरदी लाव्हा

उथळ समुद्राच्या तळाशी अथवा अन्य पाणथळ जागेत लाव्ह्याचा उद्रेक होतो तेव्हा पाण्याच्या संसर्गामुळे तो वेगाने थिजून त्याची एकावर एक रचलेल्या गिरद्या-लोड यांच्या राशीसारखी संरचना होते. या प्रकाराला गिरदी लाव्हा म्हणतात (आ. १). लाव्ह्याची पुढे येणारी जिव्हा फुगत जाऊन साधारणतः लोडाच्या आकाराची होईपर्यंत तिचा पृष्ठभाग थिजून इतका घट्ट होतो की, जिव्हेचे आकारमान याहून मोठे होणे अशक्य होते. आतून येणारा लाव्ह्याचा रेटा खालच्या बाजूने वाट काढून नवी जिव्हा तयार करतो व फुगून तिचाही लोड होतो. ही क्रिया पुन्हापुन्हा होत राहून लाव्ह्याच्या लोड-गिरद्यांची रास तयार होते. सामान्यतः भूद्रोणीतील [दीर्घकाल गाळ साचत जाऊन खाली वाकविल्या गेलेल्या भूकवचाच्या भागातील, [⟶ भूद्रोणी] गाळांशी संबंधित असलेल्या लाव्हा उद्रेकात गिरदी लाव्हे आढळतात. या लाव्ह्यांची सागरी पाण्याशी विक्रिया होऊन त्यांच्या खडकांतील ऑलिव्हीन व पायरोक्सीन यांची जागा काही अंशी क्लोराइट व सर्पेटाइन यांनी आणि प्लॅजिओक्लेजाची जागा अल्बाइट व एपिडोटाने घेतलेली असते. अशा लाव्ह्यांना स्पिलाइटी लाव्हा म्हणतात.

अग्निदलिक पदार्थ: ज्वालामुखीच्या स्फोटक उद्रेकाने माथ्याच्या खडकांची शकले होऊन लहान मोठे तुकडे हवेत फेकले जातात. तसेच तप्त लाव्ह्याच्या गुठळ्या आणि ते फवारे उंच उडून व ते हवेतच थिजून त्यांचा वर्षाव आसपासच्या प्रदेशात होतो. यांपैकी बरेच मोठे तुकडे कुंडाच्या काठाजवळच्या उतारावर पडून गडगडत खाली येतात. त्यांच्या निक्षेपांना त्यांतील तुकड्यांच्या कमीअधिक गोलाईप्रमाणे ज्वालामुखी संकोणाष्म आणि ⇨ॲग्लोमरेट  अशी नावे दिली आहेत.

स्फोटामुळे हवेत उडालेले द्रव लाव्ह्याचे गोळे खाली येताना ते स्वतःभोवती फिरत खाली येतात आणि जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच ते थिजून घट्ट झालेले असतात. फिरत येण्यामुळे त्यांचा आकार गोलकासारखा किंवा घोट्यासारखा झालेला असतो (आ. २). त्यांना ज्वालामुखी बाँब म्हणतात. इतर अनियमित आकाराच्या व कवचाला भेगा पडलेल्या तुकड्यांना ब्रेड क्रस्ट बाँब असे नाव आहे.

आ. २. ज्वालामुखी बाँब व ब्रेड क्रस्ट बाँब

लाव्ह्याच्या गुठळ्या व थेंब घट्ट होऊन तयार झालेल्या लहान वाटाण्याच्या व सुपारीच्या आकारमानाच्या तुकड्यांना लॅपिली म्हणजे ‘छोटे दगड’ असे म्हणतात. सामान्यतः ३ सेंमी.हून मोठ्या आकारमानाच्या तुकड्यांना बाँब व त्याहून लहान तुकड्यांना लॅपिली म्हणतात. कणांचे आकारमान (व्यास) ०.५ सेंमी.हूनही लहान असल्यास त्यांना राख किंवा धूळ म्हणतात. ज्वालामुखीच्या उतारावर व आसपासच्या प्रदेशांत अशा राखेचा वर्षाव होऊन त्यांचे थर साचतात. ते थर घट्ट होऊन तयार होणाऱ्या निक्षेपांना ‘टफ’ म्हणतात. काही उग्र स्फोटक उद्रेकात ज्वालामुखी राख व धूळ वातावरणात हजारो मीटर उंच उडवली जाते आणि वाऱ्यामुळे उद्रेकाच्या जागेपासून दूर अंतरापर्यंत वाहून नेली जाते. क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या १८८३ च्या महास्फोटक उद्रेकातून अतिसूक्ष्म कण असलेली ज्वालामुखी धूळ उडाली ती सर्व जगभरच्या वातावरणात पसरून कित्येक महिने हवेत तरंगत राहिली होती आणि त्या धुळीमुळे पुढे कित्येक महिने सूर्यास्ताचे अत्यंत मनोहर रंगीत देखावे दिसत होते.

संरचना व भूरूपे : ज्वालामुखीचे संरचनात्मक प्रकार व त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे ही प्रामुख्याने लाव्हा आणि अग्निदलिक पदार्थ यांचे परस्परांशी असणारे प्रमाण आणि गुणधर्म यांच्यावर अवलंबून असतात. काही ज्वालामुखी सर्वस्वी निस्सारी स्वरूपाचे असतात, म्हणजे त्यांच्या उद्रेकांतून फक्त लाव्हा बाहेर पडतो. याच्या उलट काही ज्वालामुखी सर्वस्वी स्फोटक स्वरूपाचे असून त्यांच्यातून केवळ अग्निदलिक पदार्थ बाहेर फेकले जातात. पण बहुतेक ज्वालामुखीच्या उद्रेकात हे दोन्ही प्रकार एकानंतर एक किंवा एकाच वेळी घडून येतात. स्फोटकता किंवा निस्सारी स्वरूप यानुसार ज्वालामुखींच्या शंकूंचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे केले आहे. स्फोटक : राख व अंगार शंकू मिश्र : अग्निदलिक पदार्थ व लाव्हा यांचा मिश्र शंकू निस्सारी : (अ) लाव्ह्याचे तीव्र उताराचे घुमट (पाय), (आ) ढाल ज्वालामुखी, (इ) लाव्हा पठारे.


अंगार शंकू : मध्यसिकत आणि सिकत लाव्ह्यांचे उद्रेक अधिक स्फोटक प्रकारचे असतात. त्यामुळे लाव्हा थरांच्या वरच्या बाजूस निर्गम द्वाराशी वर्षावाने खाली पडणाऱ्या अंगार व राखेची रास साचून शंकूसारखा उंचवटा तयार होतो. या शंकूच्या माथ्याशी खोलगट बशीसारखे कुंड तयार झालेले असते. अंगार शंकू काही मी. ते ३०० मी. उंचीपर्यंत वाढलेले दिसतात.

आ. ३. केंद्रीय ज्वालामुखीची शंकु-कुंड रचना : (१) मुख्य शंकू, (२) उपशंकू, (३) कुंड.

मिश्र ज्वालामुखी : बहुतेक ज्वालामुखी हे लाव्हा-प्रवाह आणि राख, अंगार, लॅपिली, मोठे बाँब इ. अग्निदलिक पदार्थ यांचे थर एकाआड एक साचून तयार झालेले आढळतात. त्यांचा आकार सममित शंकूसारखा असून शंकूच्या माथ्याशी कुंड असते. या कुंडाला एका बाजूने पन्हळीसारखी वाट पाडून त्या वाटेने लाव्हा वाहतो (आ. ३). कित्येक मिश्र ज्वालामुखींची उंची हजार मी. आणि घनफळ शेकडो घ. किमी. असते. अल्युशन बेटावरील शिशालदिन, फिलिपीन्समधील मेयॉन तसेच जपानमधील फूजियामा हे मिश्र ज्वालामुखी अत्यंत सौंदर्यपूर्ण निसर्गदृश्ये म्हणून सुविख्यात आहेत.

लाव्हा घुमट : पूर्णतः लाव्ह्याच्या उद्रेकाने तयार होणाऱ्या ज्वालामुखींचे आकार लाव्ह्याच्या दाटपणावर आणि सुवाहितेवर अवलंबून असतात. रायोलाइट, डेसाइट व ट्रॅकाइट यांसारखे सिलिकाप्रचुर लाव्हे इतके दाट असतात की, ते निर्गम द्वारापासून विशेष दूरवर वाहून न जाता त्या जागीच साचत राहतात व त्यांच्या तीव्र उतार असणाऱ्या घुमटाच्या आकाराच्या राशी तयार होतात. त्यांना ‘पाय’ किंवा लाव्हा घुमट असे म्हणतात. फ्रान्समधील ऑव्हरेन्यचे पाय तसेच कॅलिफोर्नियातील लास्सेन घुमट प्रसिद्ध आहेत. लास्सेन घुमट ३⋅२ किमी. व्यासाचा असून त्याची उंची ६०० मी. आहे.

ज्वालामुखी शूल : अत्यंत दाट लाव्ह्याच्या उद्रेकामुळे तीव्र उताराचे घुमट तयार होत असताना कित्येकदा खालून येणाऱ्या लाव्ह्याच्या रेट्यामुळे निर्गम द्वारात आधी थिजून घट्ट झालेला लाव्ह्याचा भाग चकलीपात्रातून दाबल्यावर चकली बाहेर यावी तसा निमुळत्या सुळक्याच्या रूपात वर ढकलला जातो. घुमटाला पडलेल्या भेगांमधूनही असे अनेक शूल बाहेर अलेले दिसतात. १९०२ च्या माँ पलेच्या सर्वनाशक उद्रेकाच्या वेळी घुमटाच्या माथ्यातून असा एक सुळका ३०० मी. उंच आला होता. त्याला माँ पलेचा शूल असे नाव दिले होते. असे वर आलेले सुळके फार काळ टिकत नसून वातावरणक्रियेने त्यांची शकले होऊन पायथ्याशी कोनीय तुकड्यांचे डबर साचते.

ढाल ज्वालामुखी : बेसाल्टासारखा सुवाही लाव्हा मध्यवर्ती नळीतून बाहेर ओतला गेल्यावर तो जागच्या जागी साचून न राहता बऱ्याच विस्तृत प्रदेशात पसरतो. लाव्ह्याचे असे थर एकावर एक साचून त्यांच्यामुळे अत्यंत कमी उताराचे (क्षैतिज पातळीशी ६° ते ८° कोन करणारे) पालथ्या ढालीसारखे विस्तीर्ण घुमट तयार होतात, त्यांना ढाल ज्वालामुखी म्हणतात. हवाई हे बेट अशा अनेक ढाल ज्वालामुखींचे मिळून बनलेले आहे. त्यांच्यापैकी सर्वांत मोठा माउनलोआ ज्वालामुखी समुद्रतळापासून ९,१०० मी. उंच असून त्याच्या पायाचा व्यास ११२ किमी. आणि घनफळ १४ हजार घ. किमी. आहे.

लाव्हा पठारे : काही प्रदेशांत ताणामुळे दीर्घ लांबीच्या भेगा पडून त्यांतून अत्यंत सुवाही बेसाल्ट लाव्ह्याचे पूर आसपासच्या प्रदेशात थरांच्या स्वरूपात साचलेले आढळतात. असे अनेक थर एकावर एक साचून विस्तीर्ण पठारी प्रदेश निर्माण झालेले आहेत. हे थर साधारणतः ३ ते ३० मी. जाडीचे असतात. एकूण सर्व थरांच्या राशींची जाडी हजारो मी. असू शकते आणि त्यांची एकूण व्याप्ती काही क्षेत्रांत १८ लक्ष चौ. किमी. हून अधिक भरते. या पठारी लाव्ह्यांना पूर बेसाल्टअसेही म्हणतात. पूर बेसाल्टाची प्रमुख उदाहरणे म्हणजे उ. अमेरिका खंडातील कोलंबिया व स्नेक नद्यांच्या खोऱ्यांचा प्रदेश होय. याची व्याप्ती ७.८ लक्ष चौ. किमी. असून काही एकेकटे थर प्रत्येकी २,५०० चौ. किमी. क्षेत्र व्यापणारे आहेत. प. भारतातील लाव्हा उद्रेक होऊन तयार झालेल्या ‘दक्षिण (डेक्कन) ट्रॅप’ या खडकांच्या राशीची एकूण व्याप्ती ५ लक्ष चौ. किमी.पर्यंत भरते. द. अमेरिकेतील पराना क्षेत्र (जुरासिक कालीन म्हणजे सु. १८·५–१५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) या लाव्ह्यांच्या राशींची व्याप्ती ५ लक्ष चौ. किमी. आहे. यांच्याशिवाय जुरासिक आणि तृतीय (सु. ६·५ –१·२ कोटी वर्षापूर्वींच्या) काळात मंगोलिया, सायबीरिया, अरेबिया, सिरिया, इथिओपिया तसेच ऑस्ट्रेलियाचा काही भाग या क्षेत्रांत तुरळक प्रमाणात बेसाल्टाचे थर आढळतात. काही लाव्हा थरांचा विस्तार व घनफळ प्रचंड असते. उदा., कोलंबिया नदीच्या क्षेत्रातल्या एका बेसाल्टाच्या थराची लांबी १६० किमी., रुंदी ८० किमी. आणि सरासरी जाडी १२० मी. आहे, म्हणजे त्याचे घनफळ किमान १,६०० घ. किमी. भरते. अर्थात सामान्यतः १ घ. किमी.हून अधिक घनफळ असणारे बेसाल्टांचे थर विरळाच असतात. ऐतिहासिक काळात पूर बेसाल्टाचा सर्वांत मोठा उद्रेक आइसलँडमध्ये लाकी या गावी १७८३ मध्ये घडून आला. या उद्रेकात ३२ किमी. लांबीच्या भेगेतून तप्त लाव्ह्याचे लोंढे बाहेर येऊन ५६५ चौ. किमी. प्रदेशावर लाव्हा थर पसरला. या थराचे एकूण घनफळ १२ घ. किमी. भरले. लाव्ह्याच्या लोंढ्याचे विस्तारणारे बाहू दरीतून वाहत पश्चिमेकडे ६४ किमी. आणि पूर्वेला ४५ किमी. अंतरापर्यंत गेले. आधीची सर्व सुपीक शेतजमीन जाड लाव्ह्याच्या थराखाली गेल्याने तेथील प्रदेश वैराण बनला. ज्वालामुखी क्रियेची तीव्रता जसजशी कमी होत गेली तसतसा घट्ट होणाऱ्या लाव्ह्याने भेगेचा भाग चोंदून गेला. लाव्ह्यातील वायू शांतपणे निघून जाण्याऐवजी ते भेगेत थिजलेल्या लाव्ह्याखाली साचू लागले. शेवटी त्यांचा दाब वरच्या घन लाव्ह्यापेक्षा जास्त झाल्यावर स्फोटक उद्रेक होऊ लागून भेगेच्या रेषेवर जागोजागी छोटे केंद्रीय स्वरुपाचे शंकू निर्माण झाले.

पृथ्वीच्या इतिहासात गेल्या १८ कोटी वर्षांच्या कालावधीत ठिकठिकाणच्या क्षेत्रांत मिळून किमान ४० लक्ष घ. किमी. बेसाल्टी लाव्हा भूपृष्ठावर ओतला गेला असा अंदाज आहे.

वालुका प्रवाह : अत्यंत दाट असा सिकत किंवा अतिसिकत लाव्हा वायूने संपृक्त झालेला असला म्हणजे उग्र स्फोटाने त्या लाव्ह्याचे वालुकाकणांच्या आकारमानाचे अत्यंत सूक्ष्म तुकडे होतात. हे कण अस्फटिकी काचेचे किंवा पमिसाचे (गोलाकार पोकळ्या असलेल्या काचेचे) असतात. वायूने संपृक्त अशा या अग्निय वालुकाकणांचा लोट फेसाळ प्रवाहासारखा उतारावरून ताशी १६० किमी. किंवा त्याहूनही जास्त वेगाने वाहत जातो. हे लोंढे सखल जागी स्थिरावतात तेव्हाही त्यांतील कण अतितप्त असल्यामुळे ते एकमेकांना घट्ट चिकटून त्यांचा वितळजोडित टफ किंवा इग्निब्राइट नावाचा एकसंध खडक तयार होतो. अशा प्रकारच्या थरांचे मोठे निक्षेप न्यूझीलंड, सुमात्रा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पश्चिम भाग व अलास्का या प्रदेशांत आहेत.


चिखली प्रवाह : अत्यंत क्षोभकारी अशा स्फोटक उद्रेकात फार मोठ्या प्रमाणावर ज्वालामुखी राख व धूळ यांचे लोट आकाशात उंच चढतात व त्यांचा वर्षाव ज्वालामुखी शंकूच्या उतारावर तसेच सभोवतीच्या प्रदेशात होतो. शंकूच्या आणि आसपासच्या डोंगरांच्या उतारावर साचलेले हे राखेचे व धुळीचे थर जोरदार पावसाच्या पाण्याने संपृक्त होतात आणि उतारावरून चिखलासारखे त्यांचे लोंढे अत्यंत वेगाने, कधीकधी ताशी ९५ किमी. वेगाने खाली वाहत येतात. येताना वाटेतील दगडधोंडे, झाडे इ. पदार्थ आपल्याबरोबर पुढे नेत शेवटी सखल भागातील शेते, घरे बुडवून टाकून हा लोंढा स्थिरावतो. मानवी जीवित आणि वित्ताला अत्यंत धोकादायक असे हे चिखली प्रवाह फिलिपीन्समध्ये घडून आलेले आहेत.

कुंड व कटाह : केंद्रीय स्वरूपाच्या उद्रेकामुळे तयार होणाऱ्या ज्वालामुखींच्या माथ्याशी खोलगट बशीसारखा खळगा दिसतो. हा खळगा लहान म्हणजे १·६ किमी.हून कमी व्यासाचा असल्यास त्याला कुंड आणि त्यापेक्षा बराच मोठा असल्यास कटाह ( काहील ) अशी नावे दिली आहेत. बहुतेक कुंडे माथ्याचा भाग स्फोटक उद्रेकाने उडून गेल्यामुळे तयार झालेली असतात. शंकूच्या माथ्याप्रमाणेच शंकूच्या बाजूवर असणाऱ्या उपशंकूंनाही कुंडे असल्याचे दिसते.

आ. ४. कटाह निर्मितीतील अवस्था : (अ) सौम्य स्फोटक उद्रेक : निर्गम नळी शिलारसाने भरलेली आहे (आ) तीव्र स्फोटक उद्रेक : अग्निदलिक पदार्थांचा हवेत वर्षाव होत असून उतारावरून न्ये आर्दांतचे (तप्त वायू, राख व लाव्ह्याचे पुंजके यांच्या बनलेल्या ढगांचे) लोंढे वाहत आहेत व शिलारसाची पातळी खूप खाली गेलेली आहे (इ) खालचा आधार गेल्याने शंकूच्या माथ्याचा भाग कोसळून आत पडतो व कटाह निर्माण होतो.

कटाह हे स्फोटामुळे माथा उडून जाण्यापेक्षा माथ्याचा भाग खालचा आधार निघून गेल्यामुळे आत कोसळून तयार झालेले असतात. अत्यंत तीव्र स्फोटक उद्रेकानंतर काही ज्वालामुखींच्या माथ्याशी प्रचंड कटाह निर्माण झाल्याचे दिसते. प्रथमदर्शनी माथ्याचा भाग स्फोटामध्ये उडून गेल्यामुळेच त्याची निर्मिती झाली असावी असे वाटते. पण माथ्याचा भाग उडून गेला असल्यास आजूबाजूला विखरून पडलेल्या अग्निदलिक पदार्थांच्या राशीत माथ्याच्या खडकांचे तुकडे सापडावयास हवेत. मात्र तसे ते आढळत नाहीत. यावरून स्फोटामुळे नळीतील सर्व लाव्हा उडवून दिला गेल्यामुळे नळीत पोकळी निर्माण झाल्याने व आतून असलेला माथ्याचा आधार गेल्याने माथ्याचा भाग आत कोसळून कटाह बनला असावा असे अनुमान निघते. काही वेळेस नळीतील लाव्हा खालून दुसऱ्या एखाद्या मार्गाने निघून गेला म्हणजेही माथ्याचा आतल्या बाजूचा आधार जाऊन माथा आत कोसळतो.

सर्वांत मोठे कटाह मिश्र ज्वालामुखींचे असतात. त्यामानाने ढाल ज्वालामुखींचे कटाह लहान असतात. कीलाउआ ज्वालामुखीचा कटाह ४ किमी. X ३·२ किमी. व १५२ मी. खोल आहे. उ. अमेरिकेतील ओरेगॉन येथील प्रख्यात ‘क्रेटर तलाव’ हा कटाह १० किमी. व्यासाचा असून ५८० मी. खोल आहे. याहूनही मोठे कटाह न्यू मोक्सिकोत जेमेझ पर्वतात (२६ किमी. व्यासाचा) तसेच जपान आणि सुमात्रा बेटांत आढळतात. त्यांपैकी सुमात्रा बेटातील लेक टोबा या राक्षसी कटाहाने १,८०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले आहे.

ज्वालामुखी उद्रेकांचे प्रकार: ज्वालामुखीच्या उद्रेकांचे भेगी आणि केंद्रीय असे दोन ठळक प्रकार पडतात. भेगी उद्रेकात पृष्ठभागी पडलेल्या लांब भेगांतून अत्यंत तरल आणि सुवाही बेसाल्ट लाव्ह्याचे पूर पृष्ठावरून वाहत जाऊन जमिनीला समांतर थरात पसरतात. या प्रकारच्या उद्रेकाचे उत्तम उदाहरण आइसलँडमधील १७८३ सालचा उद्रेक होय. त्यावरून अशा उद्रेकांना आइसलँडी उद्रेक म्हणतात.

केंद्रीय उद्रेकामध्ये एखाद्या नळीसारख्या मध्यवर्ती निर्गम द्वारातून लाव्हा व अग्निदलिक पदार्थ बाहेर पडून ते द्वाराभोवती साचतात. लाव्ह्याचे रासायनिक संघटन व तापमान, विशेषतः लाव्ह्यात असणाऱ्या वायूंचे प्रमाण व दाब यांनुसार केंद्रीय उद्रेकाचे अनेक प्रकार होतात. त्यांतील महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन येथे दिले आहे.

हवाई प्रकार : यामध्ये मध्यवर्ती निर्गम द्वारातून अत्यंत सुवाही अशा लाव्ह्याचे निस्सारण होत असते. लाव्ह्यातील वायू शांतपणे बाहेर पडतात. क्वचित प्रसंगी कुंडात असलेल्या लाव्ह्याच्या पृष्ठावरून वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंच्या धक्क्यामुळे तप्त लाव्ह्याचे फवारे उडतात व ते वाऱ्याच्या झोतात सापडून लाव्ह्याच्या थेंबांचे तारेसारखे लांब काचतंतू तयार होतात. त्यांना ‘पेली’ या पॉलिनेशियन अग्निदेवतेवरून ‘पेलीचे केस’ असे म्हणतात. हवाई प्रकारच्या उद्रेकांमुळे विस्तिर्ण आकारमानाचे ढाल ज्वालामुखी तयार होतात.

हवाई उद्रेकाचा एक दुय्यम प्रकार लाव्हा तलाव हा आहे. ढाल ज्वालामुखीच्या कटाहात अत्यंत तप्त व तरल लाव्हा असतो. तलावाच्या मध्यातून वर येणारा तप्त लाव्हा चोहोबाजूंना काठाकडे वाहत जातो आणि काठाशी पुन्हा आत बुडून हे अभिसरणाचे चक्र चालू राहते. अशा प्रकारे काठाबाहेर लाव्हा न सांडता कटाहात दीर्घकाल एखाद्या तलावाप्रमाणे द्रव लाव्हा राहतो. कीलाउआ ज्वालामुखीतील हालेमाऊ माऊ नावाच्या कुंडामध्ये १८२३ पासून १९२४ पर्यंतच्या काळात असा लाव्हा तलाव तयार झालेला होता.

स्ट्राँबोली प्रकार : लाव्ह्याचा दाटपणा जसजसा वाढत जातो आणि त्याचा सुवाहीपणा कमी होतो, तसतसा लाव्ह्यातील वायू बाहेर पडण्यास होणारा अडथळा वाढत जातो व उद्रेकाचे स्वरूप अधिकाधिक स्फोटक होत जाते. हवाई लाव्ह्यापेक्षा काहीसा कमी सुवाही लाव्हा कुंडात उघडा पडला म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील थर घट्ट होतो आणि त्याच्याखाली अडकून पडलेले वायू साचत राहून मधून मधून धक्क्याने सौम्य स्फोटांच्या रूपाने निसटत राहतात. हे स्फोट ठराविक कालावधीने, तालबद्धतेने किंवा सातत्याने होत असतात. स्फोटामुळे लाव्ह्याचे लहान मोठे थेंब व गोळे हवेत फेकले जाऊन त्यांचे बाँब, लॅपिली, अंगार इ. पदार्थ होतात. अधिक जोराच्या स्फोटात तप्त लाव्ह्याचे कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. सिसिली बेटाच्या उत्तरेस असलेल्या लिपारी समूहातील ज्वालामुखींपैकी स्टाँबोली या ज्वालामुखीत अशी क्रिया दिसत असल्यामुळे या प्रकाराला त्याचे नाव मिळाले आहे. मॅक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखीही स्ट्राँबोली प्रकारचा होता.


आ. ५. ज्वालामुखी उद्रेकांचे प्रकार : (अ) भेगी किंवा आइसलँडी प्रकार, (आ) हवाई प्रकार, (इ) स्ट्राँबोली प्रकार, (ई) व्हल्कॅनी प्रकार, (उ) व्हीस्यूव्हिअसी प्रकार, (ऊ) पेली प्रकार, (ए) प्लिनी प्रकार.

व्हल्कॅनी प्रकार : लिपारी समूहातील व्हल्कॅनो नावाच्या ज्वालामुखीवरून हे नाव दिले आहे. या प्रकांरातील लाव्हा बराच दाट असून कुंडात तो थिजून त्याचा घट्ट खडक होतो. थिजलेल्या कवचाखाली असलेल्या लाव्ह्यात बराच काळ वायू साचत राहून अखेर त्याचा दाब इतका वाढतो की, वरच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवून फार मोठ्या प्रमाणात स्फोटक उद्रेक होतो. घनीभूत लाव्ह्याच्या कवचाचे लहान मोठे तुकडे आणि वायू यांचा प्रचंड लोट आकाशात खूपच उंच उसळून त्याचा फूलकोबीसारखा माथ्याशी विस्तारणारा ढग बनतो. हा ढग काळा दिसतो. दीर्घकाल निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीतून जेव्हा पुन्हा नव्याने उद्रेकाची सुरुवात होते तेव्हाचा उद्रेक व्हल्कॅनी प्रकाराने होतो. या उद्रेकाने नळीच्या तोंडाशी असलेला अडथळा उडवून देऊन नळी मोकळी करण्याचे कार्य होते.

व्हीस्यूव्हिअसी प्रकार : हा व्हल्कॅनी प्रकाराचाच पण अधिक उग्र स्फोटक आविष्कार आहे. दीर्घकालापर्यंत बाह्यतः निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीत नळीच्या खाली असणाऱ्या शिलारसातील वायूंचे प्रमाण व दाब वाढत वाढत इतके वाढते की, शेवटी नळीचे तोंड उडवले जाऊन अत्यंत उग्र स्फोटक रीत्या खालचा तप्त शिलारस बाहेर भिरकावला जातो. शिलारसावरील दाब एकदम कमी झाल्यामुळे त्यातील वायू मुक्त होऊन शिलारसाचे रूपांतर फेसाळ लोटात होते. हा लोट आकाशात खूप उंचीपर्यंत चढून त्याचा माथा विस्तारतो. फुलकोबीसारख्या आकाराचा हा विस्तारणाचा ढग तळपत्या शिलारसाच्या सूक्ष्म थेंबांमुळे प्रकाशमान झालेला असतो. व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ सालच्या स्फोटक उद्रेकात वायूचा स्तंभ १० किमी. उंचीपर्यंत उसळला होता व सतत २० तासांपर्यंत वायूचा लोट बाहेर येत होता.या वायूच्या लोटामुळे ४५० मी. व्यासाचे नळीसारखे भोक पोखरले गेले.

प्लिनी प्रकार : हा व्हीस्यूव्हिअसी प्रकाराचा पण अत्यंत उग्र स्वरूपाचा स्फोटक उद्रेक आहे. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो, त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. व्हीस्यूव्हिअसच्या इ. स. ७९ सालच्या उग्र स्फोटक उद्रेकाचे वर्णन धाकटे प्लिनी यांनी लिहून ठेवले आहे, त्यावरून हे नाव दिले आहे. या उद्रेकात पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही दोन मोठी शहरे नष्ट झाली व याच उद्रेकाचे जवळून निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात थोरले प्लिनी (धाकट्या प्लिनींचे चुलते) यांचा अंत झाला.

पेली प्रकार : या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते. वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भारलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोढें खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन घर्षणरहित झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी.पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ असे फ्रेंच नाव आहे. मार्टिनिक बेटावरील माँ पले या ज्वालामुखीचा १९०२ मध्ये अशा प्रकारचा उद्रेक होऊन त्यात पायथ्याचे ३० हजार वस्तीचे सेंट पिअरे हे शहर काही क्षणांत बेचिराख झाले.

ज्वालामुखी क्रियेचे परिणाम : ज्वालामुखींच्या उद्रेकाने माणसांचे अतोनात नुकसान होते. राखेने व वायूने पिके नष्ट होतात. वेली व झाडे करपतात. क्वचित संपूर्ण शहरेही लाव्हा रसाने व राखेने बुडून जातात. असे असूनही ज्वालामुखी उद्रेकाची टांगती तलवार डोक्यावर बाळगून अशा प्रदेशात माणूस वस्ती करण्यास का उद्युक्त होतो, याचे आश्चर्य ज्वालामुखी प्रदेशापासून दूर राहणाऱ्यांना नेहमीच वाटत आलेले आहे. पण ज्वालामुखीचे कार्य केवळ विध्वंसक असते असे नव्हे, तर भूवैज्ञानिक दृष्ट्या ज्वालामुखी क्रियेमुळे भूकवचाच्या खडकात नवीन भर पडत असल्यामुळे हे कार्य रचनात्मक समजले जाते. चक्री वादळे, भूकंप , प्रचंड पूर इ. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान ज्वालामुखी उद्रेकाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त असते. इ.स. ७९ ची पाँपेईवर किंवा १९०२ मध्ये सेंट पिअरेवर कोसळलेली आपत्ती ही विरळा घडणारी घटना आहे. महायुद्धामुळे किंवा प्रतिवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या मोटार वाहनांच्या अपघातांमुळे होणाऱ्या मानवी हत्येची  बरोबरी ज्वालामुखी करू शकत नाहीत. ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याबरोबरच ज्वालामुखी प्रदेशातील सुपीक जमिनीचे आकर्षण माणसाला असते. लाव्ह्याचे अपक्षयजन्य (वातावरणीय प्रक्रियांनी तयार झालेले) पदार्थ वनस्पतींना आवश्यक अशा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण  असतात. हे पदार्थ पावसाच्या पाण्याने उतारावरून वाहून ज्वालामुखीच्या सभोवती असणाऱ्या जमिनीत साठतात. अधूनमधून होणाऱ्या राखेच्या वर्षावामुळे शेतजमिनीला नवजीवन मिळते. ज्वालामुखींच्या आसपासच्या प्रदेशातील उन्हाळी, गायझरे, धूममुखे इत्यादींपासून उष्ण पाणी व वाफ मिळते. इटली, रशिया, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (कॅलिफोर्निया) इ. देशांत अशा वाफेपासून विद्युत् निर्मिती करण्यात येते. इमारती गरम राहण्यासाठी व रासायनिक उद्योगांतही या उष्ण पाण्याचा उपयोग करण्यात येतो. ज्वालामुखीच्या या विनाशकारी तसेच उपकारी अशा दुहेरी स्वरूपाची ओळख माणसाला प्राचीन काळापासून पटलेली आहे.

ज्वालामुखींची भौगोलिक वाटणी : जगाच्या पाठीवर असा कोणताही भूभाग नाही, जेथे भूवैज्ञानिक कालखंडात केव्हाना केव्हातरी ज्वालामुखी क्रिया घडून आलेली नाही. उदा., भारतात आज जरी कोठेही जागृत ज्वालामुखीची नावनिशाणी राहिलेली नसली, तरी गतकालात प. भारतात फार मोठ्या प्रमाणात भेगी उद्रेक घडून आले होते. हे या भागातील दक्षिण ट्रॅप या लाव्ह्याच्या थरांच्या राशीवरून दिसून येते.

चालू घटकेला ज्यातून ज्वालामुखी क्रिया चालू आहे किंवा ऐतिहासिक काळात जागृत असून जे अगदी अलीकडेच मृत किंवा निद्रिस्त झाले आहेत, अशा ज्वालामुखींची संख्या सु. ८०० भरते. त्यांशिवाय भूवैज्ञानिक दृष्ट्या बऱ्याच पुरातन काळी मृत झालेल्या कित्येक हजार ज्वालामुखींची शंकु-कुंडे अद्यापही सुस्थितीत राहिलेली दिसतात. त्यांचीही गणना ज्वालामुखींच्या भौगोलिक वाटणीमध्ये करावयास हवी.

तृतीय कालापासून तो आजतागायतच्या काळापर्यंत वेळोवेळी जागृत क्रिया असणाऱ्या ज्वालामुखींपैकी बहुसंख्य ज्वालामुखी प्रामुख्याने पॅसिफिक महासागराभोवती असणाऱ्या वलयांकित पट्ट्यात एकत्रित झालेले दिसतात. पॅसिफिकभोवतील पट्ट्याच्या खालोखाल ते आल्प्स–हिमालय–इंडोनेशिया या अगदी अलीकडच्या गिरिजनक हालचालींच्या पट्ट्यात आढळतात. पॅसिफिकभोवतीचा आणि आल्प्स–हिमालय–इंडोनेशिया हे दोन्ही पट्टे सक्रिय गिरिजननाच्या क्षेत्रांशी संबंधित असून या क्षेत्रांतील कवचात अगदी अलीकडच्या काळात घड्या पडणे, ते भाग उंचावून वर येणे किंवा भंग पावणे अशा प्रकारच्या हालचाली झालेल्या आहेत [⟶ गिरिजनन] .


कवचाच्या विभंगात्मक हालचालींशीही ज्वालामुखींचे साहचर्य असते, हे आफ्रिकेतील खचदऱ्या आणि महासागरी पर्वतरांगा यांच्या क्षेत्रात असणाऱ्या ज्वालामुखींवरून दिसून येते.

पॅसिफिकभोवतीचा आणि आल्प्स–हिमालय–इंडोनेशिया या दोन प्रमुख पट्ट्यांखेरीज पृथ्वीच्या इतर भागांत अनेक ठिकाणी जागृत किंवा अलीकडेच मृत झालेले ज्वालामुखी तुरळक प्रमाणात विखुरलेले आढळतात. यांपैकी काही महत्त्वाचे म्हणजे पॅसिफिक महासागरातील हवाई, सामोआ व गालॅपागस अटलांटिक महासागरातील आइसलँड, ॲझोर, कॅनरी व केप व्हर्डे आणि हिंदी महासागरातील रियुन्यन, हर्ड, करताला इ. बेटे आहेत. इटलीच्या विभागात व्हीस्यूव्हिअस, स्ट्राँबोली, एटना त्याचप्रमाणे ज्यावरून या क्रियेला नाव पडले तो व्हल्कॅनो इ. प्रख्यात ज्वालामुखी आहेत.

सध्या जागृत असणाऱ्या ज्वालामुखींपैकी ६६% आणि अलीकडेच मृत झालेल्या ज्वालामुखींपैकी बहुसंख्य ज्वालामुखी पॅसिफिक महासागराला वेढणाऱ्या किनारपट्टीच्या प्रदेशांत आणि बेटांच्या मालिकेत आढळतात. त्यावरून या विभागाला ‘पॅसिफिकचे ज्वालावलय’ असे म्हटले जाते. पॅसिफिकभोवतीच्या पट्ट्यात ३०७ आणि इंडोनेशिया द्वीपसमूहात ९३ जागृत ज्वालामुखी आहेत.

काही प्रमुख ज्वालामुखींच्या उद्रेकांचे वर्णन खाली दिले आहे.

कीलाउआ : हवाई बेटावर माउनलोआ ज्वालामुखीच्या पूर्वेच्या बाजूवर असलेला हा लहानसा बेसाल्टी घुमट आहे. याच्या तोंडाशी सहज पोहोचता येत असल्यामुळे आणि याच्या उद्रेकाचे स्वरूप अस्फोटक व कमी धोक्याचे असल्यामुळे या ज्वालामुखीचे शास्त्रीय निरीक्षण व अभ्यास सर्वांत जास्त प्रमाणात झाला आहे.

याच्या माथ्याशी सु. ४·५ किमी. व्यासाचा व तीव्र उताराच्या उभ्या भिंती असणारा कटाह आहे. कटाहाच्या तळाशी हालेमाऊ माऊ हे जागृत निर्गम द्वार आहे. या जागी लाव्ह्याचा तलाव निर्माण झालेला असून त्यातील लाव्ह्याची पातळी वेळोवेळी खालीवर होत असते. कधीकधी लाव्ह्याची पातळी अगदी खोल जाऊन तो दिसेनासा होतो.

हा तलाव १९१२ मध्ये काठोकाठ भरला होता. त्या वेळी डे व शेफर्ड यांनी लाव्ह्याचे तापमान मोजले. ते २३ दिवसांच्या अवधीत १,०७०° से. पासून १,१८५° से.पर्यंत वाढल्याचे दिसले. याच अवधीत लाव्ह्यातून बाहेर पडणाऱ्या वायूंच्या प्रमाणातही बरीच वाढ झाली होती. त्यावरून बाहेर पडणाऱ्या वायूंची व लाव्ह्यातील लोह ऑक्साइडाची हवेशी रासायनिक विक्रिया झाल्यामुळे तापमानात वाढ झाली, असा निष्कर्ष काढण्यात आला. विशेष म्हणजे लाव्ह्याच्या पृष्ठभागाचे तापमान त्याच्या खाली ६ मी. खोल जागी असणाऱ्या तापमानापेक्षा सु. १००° से. ने जास्त असल्याचे आढळले.

या लाव्हा-तलावातील लाव्ह्याच्या पातळीत कित्येक वर्षे २२० मी. पेक्षा जास्त फरक पडला नाही. १९२४ मध्ये मात्र एकदम लाव्ह्याची पातळी खूप खोल गेली. त्याचा अर्थ असा होता की, खालून दुसऱ्या एखाद्या मार्गाने लाव्हा बाहेर पडला असावा. याच वेळेस पूर्वेला ४८ किमी. अंतरावर भूकंप घडून आले आणि त्या रेषेवर समुद्रतळाशी लाव्ह्याचा उद्रेक झाला. खालचा आधार निघून गेल्यामुळे हालेमाऊ माऊच्या भिंती आत कोसळल्या आणि कुंडाचे तोंड बरेच रुंदावले. त्यानंतर कुंडात भूमिजल शिरून त्याचे रूपांतर वाफेच्या लोटात झाले. कटाहात नव्याने लाव्हा जमा होऊ लागून त्याचे ५० मी. उंच उसळणारे प्रकाशमान फवारे उडू लागले. सध्या हा कटाह लाव्ह्याने पूर्णपणे भरलेला नसून बराचसा रिकामाच आहे.

व्हीस्यूव्हिअस : इ. स. ७९ मध्ये या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही शहरे बेचिराख झाल्याचा उल्लेख मागे आलेलाच आहे. त्यानंतर सतराव्या शतकापर्यंत व्हीस्यूव्हिअसचा एकूण १० वेळा स्फोटक उद्रेक झाला. प्रत्येक वेळी दोन उद्रेकांमधील दीर्घ कालावधीत तो सुप्तावस्थेत राहिला होता. शेवटच्या उद्रेकानंतर १३० वर्षांनी १६३१ मध्ये जो उद्रेक झाला त्यानंतर मात्र व्हीस्यूव्हिअसचे ठराविक आवर्ती (पुनःपुन्हा घडणाऱ्या) चक्रानुसार सातत्याने उद्रेक सुरू झाले. या मालिकेत दोन चक्रांतील अंतर ११ ते ४० वर्षे असते. प्रत्येक चक्रात उद्रेकाच्या स्फोटकपणाची तीव्रता वाढत जाऊन शेवटी अत्यंत उग्र स्फोटात त्याची परिणती होते. असे विशेष मोठे उद्रेक १८७२ मध्ये घडून आले.

इ. स. १९०६ च्या उद्रेकापूर्वी कुंडात एक लहानसा अंगार शंकू तयार झाला होता. मे १९०५ मध्ये या शंकूची उंची कुंडाच्या कडांपेक्षाही जास्त झाली होती. ४ एप्रिल १९०६ रोजी शंकूला खालच्या बाजूने बऱ्याच भेगा पडल्या आणि त्यांतून वायुयुक्त लाव्ह्याचे लोंढे बाहेर पडले. त्यामुळे कुंडातील लाव्ह्यावरचा दाब एकदम कमी होऊन स्फोटक उद्रेकाने अतितप्त लाव्ह्याचा प्रचंड फवारा हवेत उंच उडाला. या स्फोटामुळे सारा डोंगर हादरला. लाव्हामिश्रित वायूचा हा फवारा ९ ते १० किमी. उंचीपर्यंत गेला होता. त्यानंतर दोन आठवड्यांनी पुन्हा वायू व राखेचे प्रचंड स्फोटक उद्रेक होऊन शंकूचा माथ्याचा बराचसा भाग उडून गेला. उद्रेकाचा भर ओसरल्यानंतर कुंडाचे परीक्षण केले तेव्हा तेथे नसराळ्याच्या आकाराचे सु. ६०० मी. खोल विवर झाल्याचे आढळले. कुंडाच्या बाजू आत कोसळून या विवराच्या वरच्या तोंडाचे आकारमान बरेच वाढले होते. १९१३ मध्ये कुंडात पुन्हा नव्याने लाव्हा जमा होऊ लागला आणि आता पूर्वीच्या कटाहात पुन्हा नवा शंकू तयार झाला आहे.


आ. ६. ज्वालामुखींची भौगोलिक वाटणी : आल्प्स, हिमालय व इंडोनेशियालगतच्या भागात ९३ ज्वालामुखी असून त्यांची वाटणी पुढीलप्रमाणे आहे : बांदा समुद्र ५, लेसर सुंदा बेटे २५, जावा १७, क्राकाटाऊ १, सुमात्रा ११, बॅरन बेटे १, सॉलोमन बेटे ३, सांताक्रूझ १, न्यू हेब्रिडीझ ७, लॉयल्टी बेटे १, सामोअन बेटे ४, टोंगा बेटे ९, कर्‌मॅडेक बेटे ३ व न्यूझीलंड ५. पॅसिफिकभोवतालच्या प्रदेशात ३०७ ज्वालामुखी असून त्यांची वाटणी पुढीलप्रमाणे आहे : अल्यूशन बेटे १८, कॅमचॅटका २५, कूरील बेटे ३९, जपानच्या उत्तरेकडील प्रदेश ४८, अलास्का १५, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पश्चिम भाग ३, मॅक्सिको १२, लेसर अँटिलीस ८, ग्वातेमाला ७, एल् साल्वादोर ७, निकाराग्वा ११, कोस्टारीका ६, दक्षिण जपान ते फॉर्मोसा १६, फिलिपीन्स १२, सानिघे बेटे ६, सेलेबीझ ६, हाल्माहिरा ६, न्यू गिनी ९, न्यू ब्रिटन १०, कोलंबिया ६, एक्वादोर २, चिली २६, दक्षिण अँटिलीस २, अंटार्क्टिका ७. प-पाण्याखालील उद्रेक. यांशिवाय काही तुरळक ज्वालामुखी हिंदी महासागर व अटलांटिक महासागरातील क्षेत्रात विखुरलेले आढळतात.

क्राकाटाऊ : जावा व सुमात्रा या बेटांच्या दरम्यानच्या खाडीत हा ज्वालामुखी आहे. १८८३ साली मे महिन्यात उद्रेकांची मालिका सुरू होऊन २६ ते २८ ऑगस्टमध्ये येथे प्रचंड स्फोटक उद्रेक घडून आले. या उद्रेकांची स्फोटकता इतकी उग्र होती की, अग्निदलिक पदार्थ हवेत ८० किमी. उंचीपर्यंत फेकले जाऊन आजूबाजूच्या ७ लक्ष चौ. किमी. प्रदेशात त्यांचा वर्षाव झाला. स्फोटाचा आवाज ऑस्ट्रेलिया खंडात ऐकू गेला होता . या उद्रेकामुळे एकूण सु. २० घ. किमी. इतके अग्निदलिक पदार्थ बाहेर फेकले गेले असावेत असा अंदाज आहे. त्यांच्यामुळे आजूबाजूच्या १६ किमी. त्रिज्येच्या परिसरात ६० मी. जाडीचे अग्निदलिक निक्षेप तयार झाले. उद्रेकाच्या जागी ६·५ किमी. व्यासाचा प्रचंड कटाह तयार झाला.

ज्वालामुखीनिर्मितीची कारणे : ज्वालामुखी क्रियेचे सर्वांत प्रमुख अंग म्हणजे निर्गम द्वारातून तप्त शिलारस व वायू बाहेर पडणे हे असते. पूर्वी एकेकाळी असा समज होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागी असणाऱ्या घन कवचाखाली सर्व जागी द्रव स्थितीतील शिलारस भरलेला असावा आणि वेळोवेळी ज्वालामुखींच्या वाटेने तो जमिनीवर येत असावा. परंतु भूकंपीय तरंगांच्या अभ्यासातून मिळालेल्या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीच्या माहितीवरून असे सिद्ध झाले आहे की, पृथ्वीचा बाहेरचा किमान २,९०० किमी. जाडीचा भाग पूर्णतया घन स्थितीत असला पाहिजे. म्हणजेच कवचाच्या खाली कोठेही मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपाचा शिलारसाचा साठा असणे शक्य नाही. मात्र स्थानिक क्षेत्रात लहान कोठ्यांच्या (कप्प्यांच्या) स्वरूपात वेळोवेळी शिलारसाची निर्मिती होत असावी आणि असा तयार झालेला शिलारस कवचाच्या उथळ भागात येऊन त्याच्यापासून अंतर्वेशी अग्निज खडकांच्या राशी तयार होत असाव्यात, तसेच काही भाग ज्वालामुखी क्रियेने भूपृष्ठावर येत असावा अशी कल्पना आहे [⟶ अग्निज खडक].

शिलारस नेमका कोणत्या जागी, किती खोलीवर, केव्हा आणि कसा निर्माण होतो यांचे पुरेसे ज्ञान अद्याप झालेले नाही. भूपृष्ठीय परिस्थितीत सर्वसामान्य अग्निज खडकांचा वितळबिंदू १,०००° ते १,५००° से. असतो. भूपृष्ठापासून जसजसे खोल जावे तसतसे दर ३० मी. खोलीला १° से.या प्रमाणात तापमान वाढत जाते. खोलीनुसार तापमान वाढण्याचे हे प्रमाण असेच राहिले, तर सु. ३० किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान वाढलेले असेल. परंतु खोलीनुसार वरच्या खडकांच्या वजनामुळे दाबही वाढत जातो आणि वाढत्या दाबाप्रमाणे खडक वितळण्याचा बिंदूही वाढतो. त्यामुळे ३० किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान असूनही वाढत्या दाबामुळे तेथील खडक न वितळता घन राहतात. जर अशा जागी काही कारणाने खडकांवरील दाब तात्पुरता कमी झाला किंवा तापमानात बरीच वाढ झाली, तर तेवढ्या क्षेत्रातील खडक वितळून त्यांचा शिलारस होणे शक्य आहे.

सामान्यतः शिलारसाची निर्मिती कवचाच्या उथळ भागात म्हणजे ३० ते ४० किमी. खोलीवर होते असे दिसून आले आहे. हवाई ज्वालामुखींच्या उद्रेकाची सुरुवात होण्यापूर्वी घडून आलेल्या भूकंपाची नाभी ३२ ते ४० किमी. खोल असल्याचे दिसून आले. याचा अर्थ असा की, सामान्यतः याच खोलीवरून ज्वालामुखी उद्रेकातील शिलारस बाहेर येत असावा. हवाई ज्वालामुखीच्या शिलारसाचे तापमानही सामान्यतः तापमान प्रवणतेनुसार (बदलण्याच्या प्रमाणानुसार) ३२ ते ४० किमी. खोलीवर असणाऱ्या तापमानाइतकेच असते, हे लक्षणीय आहे.


किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणाऱ्या) खनिजांच्या शोधानंतर शिलारसाच्या उत्पत्तीसंबंधी अनेक नवीन कल्पना पुढे आल्या. अग्निज खडकांत किरणोत्सर्गी खनिजांचे प्रमाण बरेच जास्त असते. खडक अत्यंत मंद उष्णतावाहक असल्यामुळे त्यांच्यातील किरणोत्सर्गामुळे उत्पन्न होणारी उष्णता त्या जागीच साचत राहते. त्यामुळे बऱ्याच म्हणजे ३० ते ४० किमी. खोल जागी असणाऱ्या खडकांचे तापमान त्या ठिकाणच्या दाबाशी सुसंगत अशा वितळबिंदूपेक्षा जास्त झाले की, ते खडक वितळून शिलारस तयार होत असावा अशी कल्पना मांडण्यात आली. कवचाच्या बाहेरच्या ३० किमी. जाडीच्या भागातील किरणोत्सर्गी पदार्थांचे प्रमाण त्याच्याखाली असणाऱ्या खडकातील पदार्थांपेक्षा जास्त असते हे खरे पण त्यामुळे या पट्ट्यात काही विशिष्ट वैज्ञानिक कालखंडात आणि काही विशिष्ट ठिकाणीच मर्यादित क्षेत्रात शिलारस का निर्माण व्हावा, याचे उत्तर मिळत नाही.

कवचाच्या ज्या भागात विभंजन, वलीकरण इ. विक्षोभकारी क्रिया घडून आल्या आहेत तेथे ज्वालामुखींचे उद्रेक आणि अंतर्वेशी अग्निज खडक यांचे साहचर्य सर्वांत अधिक प्रमाणात आढळते. यावरून अशा विक्षोभक क्रियांनी खडकांचे विरूपण होत असताना तेथील दाब कमी होऊन शिलारस तयार होत असावा. त्याचप्रमाणे भूद्रोणीत साचणाऱ्या अवसादाच्या (गाळाच्या) राशींमुळे तेथील कवचाचा भाग खचून खडक अधिक खोल जागी गेल्याने तेथील तापमान वाढून शिलारसाची निर्मिती होत असावी. किरणोत्सर्गी उष्णतेचाही या क्रियेला हातभार लागत असावा अशी सध्याची रूढ कल्पना आहे.

ज्वालामुखीविज्ञानाचा इतिहास : ज्वालामुखीविषयक शास्त्राची  सुरुवात इ.स. ७९ साली धाकटे प्लिनी यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या उद्रेकांचे वर्णन लिहून केली. हे वर्णन त्यांनी रोमन इतिहासकार टॅसिटस यांना लिहिलेल्या दोन पत्रांत केले आहे. पुढील सु. १,७०० वर्षे एकूण विज्ञानाकडेच दुर्लक्ष झाल्याने या विज्ञानाची प्रगतीही थांबली होती. १७७४ साली विल्यम हॅमिल्टन या नेपल्समधील इंग्रज राजदूतांनी ऑब्झर्व्हेशन्स ऑन मौंट व्हीस्यूव्हिअस, माउंट एटना अँड अदर व्होल्कॅनोज  हे ज्वालामुखींचे वर्णन करणारे पुस्तक प्रसिद्ध केले. लाद्‌दझारो स्पाल्लानत्सानी ( १७२९–९९) यांनी ज्वालामुखी खडकांवर प्रथम प्रयोग केला, तर दॉलॉम्यूअ (१७५०–१८०९) यांनी ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या द्रव्यांवरून ज्वालामुखीतील क्रियांची माहिती मिळते असे प्रतिपादन केले. त्यांनी ज्वालामुखी खडकांची इतर खडकांबरोबर तुलनाही केली. आर्दुइनो (१७५९) यांनी बेसाल्ट हा खडक शिलारसापासून बनल्याचे मत मांडले होते. देमारे यांनी द. फ्रान्समधील ज्वालामुखीचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता, तर जेम्स हटन यांनी ज्वालामुखीविषयीची आपली निरीक्षणे थिअरी ऑफ द अर्थ  या नावाने प्रसिद्घ केली. बेसाल्ट व त्याच्यासारखे खडक शिलारसापासून व यांपैकी काही खडक शिलारस इतर खडकांमधील भेगांत शिरून थंड होऊन बनल्याचेही त्यांनी सांगितले होते. चार्ल्‌स लायेल यांनी ज्वालामुखी व भूकंप यांचे महत्त्व जाणले होते. खालून वर येणाऱ्या वितळलेल्या द्रव्याने भूकवच वर रेटले जाऊन त्याला घुमटाकार येऊन ज्वालामुखीचे शंकू बनतात असे लिओपोल्ट फोन बूख (१७७४–१८५३) यांच्या गटाचे मत होते. उलट ज्वालामुखीतून बाहेर पडणारे पदार्थ साचून ज्वालामुखीचा शंकू बनतो, असे दुसऱ्या गटाचे मत होते. या मतभेदाने ही ज्वालामुखी विज्ञानाची प्रगती काही काळ खुंटली होती. अलेक्झांडर फोन हंबोल्ट (१७६९–१८५९) यांनी ज्वालामुखी व भूकंप यांचा विशेष अभ्यास केला होता. ज्वालामुखीची पद्धतशीर व सर्वसमावेशक अशी माहिती सर्वप्रथम पॉलिट जॉर्ज स्क्रूप यांनी आपल्या कन्सिडरेशन्स ऑन व्होल्कॅनोज  (१८२५) या ग्रंथात दिली आहे. चार्ल्‌स डॉबेनी यांच्या डिस्क्रिप्शन ऑफ ॲक्टिव्ह अँड एक्स्टिंक्ट व्होल्कॅनोज, ऑफ अर्थक्वेक्स अँड ऑफ थर्मल स्प्रिंग्ज  या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये (१८४८) जगातील ज्वालामुखीच्या सर्व क्षेत्रांची माहिती दिली आहे. जॉन डब्ल्यू. जड यांनी द. यूरोपातील ज्वालामुखींचा सविस्तर अभ्यास करून व्होल्कॅनोज : व्हॉट दे आर अँड व्हॉट दे टीच  हे पुस्तक लिहिले (१८८१). टेंपेस्ट अँडरसन यांनी अनेक ज्वालामुखींचे निरीक्षण करून १९०३ साली त्यासंबंधीचे व्होल्कॅनिक स्टडीज इन मेनी लँड्‌स  हे पुस्तक प्रसिद्ध केले, ते अजूनही उपयुक्त आहे.

फ्रँक ए. पेरेट आणि टॉमस ए. जॅगर यांनी ज्वालामुखीविज्ञानात मोलाची भर घातली असून अनेकांना स्फूर्तीही दिली आहे. पेरेट यांनी व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीचा १९०६ सालाचा उद्रेक प्रत्यक्ष पाहिला, नंतर व्हीस्यूव्हिअस तसेच स्ट्राँबोली (लिपारी बेटे), एटना (सिसिली), टेनेरिफ (कॅनरी बेटे), कीलाउआ (हवाई) व साकुराशिमा (जपान) या ज्वालामुखीचा अभ्यास केला. माँ पले (वेस्ट इंडीज) येथे ज्वालामुखीच्या क्रियांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांनी एक वेधशाळा उभारली. जॅगर यांनी प्रथम हवाईयन व्होल्कॅनो ऑब्झर्व्हेटरीचे संचालक म्हणून काम पाहिले. १९०२ च्या माँ पले ज्वालामुखी उद्रेकाचे परिणाम अभ्यासण्यासाठी ते भूवैज्ञानिक म्हणून गेले होते. ज्वालामुखीविषयक माहिती जमविण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला होता, १९०६ चा व्हीस्यूव्हिअसचा उद्रेक त्यांनी प्रत्यक्ष पाहिला होता व १९०९ साली जपानमधील ज्वालामुखी क्षेत्रे पाहिली होती. कीलाउआ ज्वालामुखीजवळ उभारलेल्या प्रयोगशाळेत त्यांनी लाव्हा सरोवराचे तापमान मोजले. १९१२ साली हवाईयन व्होल्कॅनो ऑब्झर्व्हेटरीचे संचालक झाल्यानंतर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी ज्वालामुखीच्या अभ्यासाची नवीन तंत्रे व पद्धती शोधून काढल्या, त्या जगभर प्रमाणभूत मानल्या जातात. विमानामधून बाँब टाकून लाव्हा प्रवाहाचा मार्ग बदलण्याच्या व तो थांबविण्याच्या कल्पनद्वारे अशा प्रवाहापासून शहरांचे व बंदरांचे कसे रक्षण करावे, हेही त्यांनी सांगितले. जेव्हा शिलारसाची पातळी खाली जाते, तेव्हा त्या अतिशय तप्त अशा खडकांच्या भागात भूमिजल घुसते व वाफेचे स्फोट घडून येतात. या स्फोटांतूनच ज्वालामुखींचा उद्रेक होतो, असे त्यांचे मत असून काही मतभेद वगळता हे मत सर्वमान्य झाले आहे. जी. मेरकाल्ली यांच्या  I Vulcani attivi della Terra (१९०७) या पुस्तकामध्येच जगातील सर्व ज्वालामुखींचे सर्वेक्षण केलेले असून त्यामुळे ज्वालामुखीविज्ञानात महत्त्वाची भर पडली. कार्ल सॅपर यांनी मध्य अमेरिकेतील ज्वालामुखींचे केलेले अध्ययन आजही आधारभूत समजले जाते. त्यांचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक Vulkankunde (१९०७) हे आहे. एफ्. फोन व्होल्फ यांनी जगातील विविध ज्वालामुखी क्षेत्रांचे वर्णन Der Vulkanismus (१९१४–३१) या मालेत प्रकाशित केले आहे. यानंतरही जगातील विविध देशांतील शास्त्रज्ञांनी ज्वालामुखीविज्ञानाच्या ज्ञानात भर घातली असून अजूनही ही प्रगती चालूच आहे.

पहा : शिलारस.

संदर्भ :

1. Bullard, F. M. Volcanoes in History, in Theory, in Eruption, Austin, 1962.

2. Ritmann, A. Trans. Vincent, E. A. Volcanoes and Their Activity, New York, 1962.

3. Roberts, E. Our Quaking Earth, Boston, 1963.

4. Shand, S. J. Eruptive Rocks, London, 1969.

सोवनी, प्र. वि.; ठाकूर, अ. ना.


मायोन (फिलिपीन्स) ज्वालामुखीतून बाहेर पडणारा लाव्ह्याचा प्रकाशमान फवारा.
मौंट नाउरहॉई (न्यूझीलंड) ज्वालामुखीचा उद्रेक
व्हीस्यूव्हिअसच्या (इटली) उद्रेकातून उसळलेला राखमिश्रित वायूंचा फवारा
पारीक्यूटीन (मेक्सिको) ज्वालामुखीचा एप्र १९४७ चा उद्रेक.
१६ डिसेंबर १९०२ रोजी झालेल्या माँ पले (वेस्ट इंडीज) ज्वालामुखीचा अत्यंत स्फोटक असा ‘न्ये आर्दांत’ उद्रेक.
द बिग माउथ ज्वालामुखीतून बाहेर पडणारे तप्त वायू व वाफ
माँ पले ज्वालामुखीचा शूल (स्पाइन)
ज्वालामुखी क्रियेने तयार झालेले ओरेगॉनमधील (अमेरिका) क्रेटर लेक
फूजियामा (जपान) ज्वालामुखी
किलाउला (हवाई) ज्वालामुखीच्या कटाहातून बाहेर पडणारा सुवाही लाव्हा