क्युप्राइटाचे स्फटिक

क्युप्राइट : (रूबी कॉपर). खनिज. स्फटिक घनीय षडष्टकफलकीय. स्फटिकात बहुधा घनफलक, अष्टफलक व द्वादशफलक असतात [  स्फटिकविज्ञान]. केशनलिकांसारख्या लांबट स्फटिकांना कॅल्कोट्रिचाइट किंवा प्लश कॉपर (मलमलीसारखे तांबे) म्हणतात. संपुंजित, कणमय किंवा मातीसारख्या रूपातही आढळते. पाटन : (111) तुटक [ पाटन]. भंजन शंखाभ. कठिनता ३·५-४. वि. गु. ६·१. चमक मातीसारखी, काहीशी धातूसारखी, स्फटिकांची हिऱ्यासारखी. रंग तांबडा, पारदर्शक स्फटिकांचा माणकासारखा. स्फटिक प्रकाशात दीर्घकाळ उघडे पडल्यास त्यांचा रंग फिकट होतो व ते अपारदर्शक बनतात. कस उदसर तांबडा. रा. सं.  Cu2O. कधीकधी यात लोह ऑक्साइड हे मलद्रव्य असते. वातावरणक्रियेने तांब्याच्या सल्फाइडांचे⇨ऑक्सिडीभवन  होऊन क्युप्राइट बनते. म्हणून ते ऑक्सिडीभूत पट्ट्यात नैसर्गिक तांबे, मॅलॅकाइट, ॲझुराइट, लिमोनाइट इत्यादींच्या बरोबर आढळते. चिली, बोलिव्हिया, ऑस्ट्रेलिया, फ्रेंच काँगो (ब्रॅझाव्हिल), फ्रान्स, रशिया इ. देशांतील व सिंगभूम (बिहार), दार्जिलिंग (प. बंगाल), खेत्री (राजस्थान), चंद्रपूर (महाराष्ट्र) इ. ठिकाणच्या तांब्याच्या धातुक निक्षेपांत (कच्च्या धातूच्या साठ्यांत) क्युप्राइट सापडते. तांब्याचे धातुक म्हणून हे वापरतात. तांब्याच्या काळ्या धातुकापासून वेगळे ओळखता यावे म्हणून पूर्वी याला रेडकॉपर ओअर म्हणत. १८४५ साली डब्ल्यू. हायडिंजर यांनी तांबे अर्थाच्या क्युप्रम या ग्रीक शब्दावरून त्याला क्युप्राइट हे नाव दिले.

पहा : तांबे.

ठाकूर, अ. ना.