आर्टेशियन विहीर : जिच्यातील पाणी केवळ स्वतःच्या दाबाने आपोआप भूपृष्ठावर येते अशी विहीर. अप्रवेश्य (पाणी अडवू शकणाऱ्या) खडकांच्या दोन थरांमध्ये प्रवेश्य खडकांचा थर असला, प्रवेश्य थराचे पृष्ठ पुरेसा पाऊस पडत असलेल्या उंचवट्याच्या क्षेत्रात उघडे पडले असले व थरांची रचना अनुकूल असली म्हणजे आर्टेशियन विहीर निर्माण होणे शक्य असते. उदा., खालील आकृतीत पन्हळासारख्या वाकविल्या गेलेल्या तीन थरांचा छेद दाखविला आहे. त्यातील मधला प्रवेश्य व उरलेले अप्रवेश्य आहेत. प्रवेश्य थराच्या उंचवट्याच्या जागी उघड्या पडलेल्या भागावर पडणाऱ्या पावसाचे पाणी प्रवेश्य थरात मुरत राहून त्याच्या खोल भागात साचते. त्या भागाच्या वरील जमिनीत प्रवेश्य थरापर्यंत विहीर खणली तर प्रवेश्य थरातील पाणी वर चढून  भूपृष्ठावर येऊ शकेल व दाब पुरेसा असला, तर ते कारंज्याच्या पाण्यासारखे उसळून बाहेर येईल. आकृतीत प्रवेश्य थरातील पाण्याची पातळी तुटक रेषेने दाखविलेली आहे.

आर्टेशियन विहिरीस अनुकूल अशी परिस्थिती भारतातील थोड्याच व जलोढाने (गाळाने) व्यापलेल्या प्रदेशांत, गुजरात, पाँडेचरी, दक्षिण

आर्टेशियन विहिरीचा छेद : (१)झरा, (२)विहीर, (३) प्रवेश्य थर, (४) अप्रवेश्य थर.

अर्‌कॉट व सिंधु-गंगा मैदानात आढळते. फ्रान्समधील आरतॉय (पूर्वीचा रोमन आर्टशियन प्रांत) येथील विहिरीवरून आर्टेशियन हे नाव पडले. लंडनच्या व पॅरिसच्या द्रोणी (खोलगट) प्रदेशांत, पश्चिम ऑस्ट्रेलियात व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील डकोटात आर्टेशियन विहिरींची चांगली उदाहरणे आढळतात.

पहा : भूमिजल.

ठाकूर, अ. ना.