निकोलेअस स्टीनोस्टीनो, निकोलेअस : (१० जानेवारी १६३८—२६ नोव्हेंबर १६८६). डॅनिश भूवैज्ञानिक, खनिजवैज्ञानिक, शारीरविज्ञ व चर्चमन ( धर्माधिकारी ). त्यांनी अनेक प्रकारची भूवैज्ञानिक निरीक्षणे केल्यामुळे आधुनिक भूविज्ञानाच्या प्रगतीला मोठा हात-भार लागला. त्यांनी स्तरविज्ञाना-तील महत्त्वाचे अध्यारोपण तत्त्व प्रथम सुचविले. तसेच खनिजांच्या वैशिष्ट्यपूर्ण स्फटिकांचे वर्णन करताना विशिष्ट खनिजाच्या स्फटि-कांच्या ठराविक दोन पृष्ठांमधील आंतरपृष्ठीय कोन नेहमी सारखा असतो, हे त्यांनी दाखविले. स्फटिकांचे आकार व आकारमाने कोणतीही असली तरी हा कोन बदलत नाही, हे यावरून दिसून आले. जीवाश्म हे एकेकाळी असलेल्या जीवांचे शिळाभूत अवशेष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी विविध प्रकारे बनलेल्या गाळाच्या खडकांमधील फरक स्पष्ट केला. स्तरविज्ञान, ऐतिहासिक भूविज्ञान व स्फटिकविज्ञान यांचे ते संस्थापक मानले जातात आणि आधुनिक अर्थाने ते पहिले भूवैज्ञानिक गणले जातात. स्टीनो यांचा जन्म कोपनहेगन ( डेन्मार्क ) येथे झाला. मानवी शारीर ( शरीररचनाशास्त्र ) शिकण्यासाठी ते ॲम्स्टरडॅमला गेले. तेथे त्यांनी शरीरातील अनुकर्ण लाला वाहिनी शोधून काढली, म्हणून या वाहिनीला नील्स स्टेनसेन या त्यांच्या डॅनिश नावावरून स्टेनसेन डक्ट ( वाहिनी ) किंवा डक्ट्स स्टेनाझिॲनस असे नाव पडले आहे. तसेच अनुकर्ण ग्रंथी मानवेतर प्राण्यांतही असते, असे त्यांनी दाखविले. पदवी संपादन केल्यानंतर ते कोपनहेगन विद्यापीठात दाखल झाले (१६५६). तेथे वैद्यकाचा अभ्यास करताना त्यांच्यावर सीमाँ पाउली व टॉमस बार्टोलिन या अध्यापकांचा प्रभाव पडला. तेथे स्टीनो यांनी रक्ताभिसरण व स्नायूंचे आकुंचन या क्रियांविषयी संशोधन केले. तेव्हा स्नायू तंतुकांचे बनलेले असतात, हे त्यांच्या लक्षात आले होते. ते चार वर्षे लायडेन येथे होते व तेथून त्यांनी एम्.डी. पदवी संपादन केली. नंतर ते पॅरिसला गेले व तेथे त्यांनी मेंदूची शारीरविषयक निरीक्षणे केली. १६६५ मध्ये ते फ्लॉ रेन्सला परत आल्यानंतर टस्कनीचे ग्रँड ड्यूक फर्डिनांड ( दुसरे ) यांचे राजवैद्य झाले. ड्यूकने त्यांच्या कार्याला मदत केली. १६६७ मध्ये त्यांनी रोमन कॅथलिक पंथात प्रवेश केला. कोपनहेगन येथे ते शारीरविषयक प्राध्यापक होते (१६७२—७४). १६७४ मध्ये ते फ्लॉरेन्सला गेले, तेथे त्यांनी ख्रिश्चन धर्माधिकारीपदाची दीक्षा घेतली.

स्टीनो यांचे परदेशातील प्रवास व अध्ययन १६६० मध्ये सुरू झाले होते. त्यांनी इटलीत सर्वत्र प्रवास केला, तसेच टस्कनीचा भूवैज्ञानिक अभ्यास करताना त्यांनी त्याच्याशी निगडित असलेला खनिजविज्ञानाचा व पुराजीवविज्ञानाचा अभ्यासही केला होता. स्टीनो यांच्या १६६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या द प्रोडोमस ऑफ निकोलेअस स्टीनोज डेझर्टेशन कन्सर्निंग ए सॉलिड बॉडी एन्क्लोज्ड बाय प्रोसेस ऑफ नेचर विदिन द सॉलिड या पुस्तकामुळे भूविज्ञानाच्या इतिहासात क्रांतीच घडून आली. यांत भूविज्ञानातील अनेक मूलभूत संकल्पना व तत्त्वे प्रथमच विशद केलेली आढळतात. मात्र, या संकल्पना नंतरच्या शंभर वर्षांत मान्य झाल्या नव्हत्या.

स्टीनो यांनी जीवाश्म व गाळाचे स्वरूप यांचा सखोल अभ्यास करून जीवाश्म हे प्राचीन जीवांचे अवशेष असतात, ही संकल्पना सुचविली. तसेच जीवाश्म ज्या साचलेल्या निक्षेपांत ( गाळांत ) आढळतात त्या निक्षेपांच्या भिन्न पर्यावरणाचे निदर्शकही असतात, हे त्यांच्या लक्षात आले होते. जीवाश्म असलेले खडक एकेकाळी समुद्रतळावर साचले होते, असे त्यांचे मत होते. शार्क माशाचे विच्छेदन करताना त्यांना दातांची भेददर्शक वैशिष्ट्ये आढळली होती. समुद्रात खूप आत असलेल्या ठिकाणी आढळलेल्या जीवाश्मांशी त्यांनी या वैशिष्ट्यांची तुलना केली, तेव्हा हे जीवाश्म म्हणजे समुद्रात एकेकाळी साचलेल्या निक्षेपात टिकून राहिलेले शार्कचे अवशेष असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जीवाश्म कसे तयार होतात याचे तपशीलवार वर्णन त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात आले आहे.

क्वॉर्ट्झ खनिजाचे स्फटिक भौतिक दृष्टीने वेगळे दिसत असले, तरी त्यांच्या ठराविक ( समतुल्य ) पृष्ठांमधील कोन एकच असतो, हे संरचना-त्मक निश्चिततेचे तत्त्व त्यांना समजले होते, याला स्टीनो नियम म्हणतात. पृष्ठांमधील कोन हे स्फटिकाचे वा निजाचे व्यवच्छेदक लक्षण असते. यामुळे खनिजांचा अभ्यास या नियमाच्या आधारे होऊ लागला, ही माहिती या पुस्तकाच्या तिसर्‍या भागात आली आहे.

स्टीनो यांच्या सदर पुस्तकातील चवथ्या भागात त्यांचे भूवैज्ञानिक बदलांविषयीचे विचार आले आहेत. या बदलांचा अर्थ त्यांनी आपल्या टस्कनीतील निरीक्षणांनुसार लावला होता. भूकवचात भूवैज्ञानिक घटनांचा इतिहास दडलेला असतो, ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती. खडकांचे थर व त्यांच्यामधील जीवाश्म यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यास भूवैज्ञानिक इतिहासाचे वर्णन करता येईल, असे त्यांचे म्हणणे होते. यातून त्यांना स्तरविज्ञानातील महत्त्वाचे अध्यारोपणाचे तत्त्व लक्षात आले. त्यानुसार गाळाचे खडक कोणत्या क्रमाने साचले ते लक्षात येते. म्हणजे विक्षुब्ध न झालेल्या गाळाच्या खडकांच्या थरांमध्ये सर्वांत वरचा थर हा सर्वांत नवीन ( कमी वयाचा ) असतो किंवा अशा थरांमधील एखादा खालचा थर हा त्याच्या वरच्या थरापेक्षा जुना असतो. पर्वत वृक्षाप्रमाणे वाढतात ही तेव्हा प्रचलित असलेली कल्पना त्यांना मान्य नव्हती, त्याऐवजी भूकवचात फेरबदल होऊन पर्वत बनतात असे त्यांनी सुचविले होते. अशा रीतीने संरचनात्मक भूविज्ञानाच्या दृष्टीने त्यांनी विभंगांमुळे बनलेले, पाण्याचे प्रवाह वा नद्या यांच्यामुळे झीज होऊन बनलेले आणि जमिनीखालील अग्नीचा प्रकोप ( उद्रेक ) होऊन बनलेले ( ज्वालामुखी ) असे तीन प्रकारचे पर्वत त्यांनी कल्पिले होते. त्यांनी घडीच्या पर्वताच्या रचनेचे प्रथमच आकृती देऊन विवरण केले होते. त्यांनी इटलीतील स्तरित खडकांचेही वर्णन केले होते. तथापि, धार्मिक असहिष्णुता व धर्मातील प्रमाण वचनांविषयीचा कर्मठपणा यांच्यामुळे त्यांना सर्वभूवैज्ञानिक इतिहास फक्त सहा हजार वर्षांच्या कालमर्यादेत बसवावा लागला. त्यांच्या या पुस्तकाच्या तीन लॅटिन आवृत्त्या निघाल्या होत्या. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद रॉयल सोसायटीचे सचिव हेन्री ओल्डेनबर्ग यांनी १६७१ मध्ये केला होता.

स्टीनो यांच्या काळातील वैज्ञानिक संशोधन हे मीमांसक तर्काच्या स्वरूपाचे होते. मात्र, या पुस्तकावरून स्टीनो यांचे निरीक्षण शक्ती, विश्लेषण क्षमता व विगामी युक्तिवाद हे गुण उघड होतात. विश्वाविषयीची स्टीनो यांची सर्वसाधारण संकल्पना ॲरिस्टॉटलप्रणीत स्वरूपाची होती तर द्रव्याविषयीची संकल्पना रने देकार्त यांच्या संकल्पनेसारखी होती. स्टीनो यांचे जर्मनीतील श्‍व्हेरिन येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.