कार्नेलियन : (रुधिराक्ष). खनिज. ⇨ कॅल्सेडोनीचा म्हणजे गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिकमय) सिलिकेचा लाल ते उदी रंगाचा प्रकार. याच्यात सिलिकेशिवाय लोहाच्या ऑक्साइडाचा थोडा अंश असतो आणि त्यामुळेच त्याला लाल रंग आलेला असतो. उदी छटा असलेल्या कार्नेलियनाला किंवा कॅल्सेडोनीला सार्ड म्हणतात. या खनिजांना चांगली झिलई देता येते. तसेच भाजून किंवा रंगवून त्यांची शोभा वाढविता येते. मणी, अंगठ्या, कंकणे यांसारखे दागिने, उठावाची नक्षी, मुद्रा, मूर्ती इत्यादींसाठी त्यांचा उपयोग करतात. ज्वालामुखी खडकांतील विशेषतः बेसाल्टांतील पोकळ्यांत जलतापीय (तप्त जलीय विद्रावांच्या किंवा वायूंच्या) क्रियांनी ही खनिजे निक्षेपित (साचून तयार) झालेली आढळतात. भारतातील रतनपूर (गुजरात) येथे चांगले कार्नेलियन आढळते. नाव रंगावरून; मांसासारखा रंग या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून पडले आहे.

पहा : क्वॉर्ट्‌झ गट.

ठाकूर, अ. ना.