माणिक : (लाल, पद्मराग, रुबी). खनिज. कुरुविंदाचा तांबड्या रंगाचा प्रकार. स्फटिक षट्‌कोणी, प्राचिनकार [⟶ स्फटिकविज्ञान]. कठिनता ९ (हे हिऱ्याखालोखाल कठीण). वि. गु. ४ चमक काचेसारखी पण हिऱ्याप्रमाणे चमचमत नाही. पारदर्शक ते अपारदर्शक. याचा रंग मध्यम ते गडद तांबडा किंवा जांभळ्या वा नारिंगी रंगाची किंचित छटा असलेला तांबडा असतो. तांबडा रंग बहुधा ह्यातील अत्यल्प (१ टक्क्यापर्यंत) क्रोमिक ऑक्साइडामुळे आलेला असतो. यामध्ये तांबडी ज्योत पेटलेली असते, असा पूर्वी गैरसमज होता. हे उच्च तापमानाला तापविल्यास हिरवे होते परंतु थंड झाल्यावर इतर खनिजांप्रमाणे याचा मूळ रंग बदलत नाही, हे याचे वैशिष्ट्य आहे. रा. सं. हे Al2O3. हे प्रस्फुरणशील आहे म्हणजे यावर प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) टाकल्यास यातून तांबडा प्रकाश बाहेर पडतो. याचे इतर भौतिक गुणधर्म कुरुविंदाप्रमाणे आहेत. [⟶ कुरुविंदा].

माणिक अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांत, तसेच रुपांतरित स्फटिकी चुनखडकात (संगमरवरांत) आढळते. माणकाचे मोठे पारदर्शक असे स्फटिक विरळाच आढळतात. त्यामानाने त्याचे लहान खडे जास्त आढळतात. असे लहान खडे एकत्रित करून मोठे पुनर्रचित माणिक बनवितात. माणकाच्या स्फटिकात रुटाइलाचे सूक्ष्म स्फटिक वा नलिकाकार सूक्ष्म पोकळ्या असू शकतात. अशा पोकळ्या अनियमित असल्यास स्फटिक नितळ दिसत नाही. त्या समांतर असल्यास रेशमी धाग्याप्रमाणे रचना (सिल्क) दिसते. या पोकळ्यांची किंवा स्फटिकांची नियमित मांडणी झालेली असल्यास आणि असा स्फटिक घुमटाकार कापल्यास त्यामध्ये ताऱ्यासारखी आकृती दिसते. या प्रकारच्या तारांकित माणिकाची किंमत कमी असली, तरी त्याला मागणी बरीच असते.

कृत्रिम रीतीनेही माणिक बनवितात. कृत्रिम माणिक हे नैसर्गिक माणकाशारखे दिसते मात्र कृत्रिम माणिक द्विरंगी नसते म्हणजे दोन निराळ्या दिशांनी पाहिल्यास ते दोन भिन्न रंगांचे दिसत नाही. म्हणून तज्ञ दोन्हींतील भेद ओळखू शकतो. अमेरिका, स्वीडन, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी इ. देशांत कृत्रिम माणिक बनविले जाते. त्याचा ‘लेसर’मध्येही उपयोग केला जातो. तारांकित माणिकही कृत्रिम रीतीने बनविण्यात येऊ लागले आहे.

ब्रह्मदेश, थायलंड आणि श्रीलंका येथे मुख्यत्वे माणिक आढळते. त्यांपैकी ब्रह्मदेशातील माणिक हे सर्वोत्कृष्ट असून थायलंडमधील माणिक त्याहून अधिक गडद रंगाचे तर श्रीलंकेतील फिकट असते. यांशिवाय अमेरिका (उ. कॅरोलायना), ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, कोलंबिया, मॅलॅगॅसी, मालावी, ऱ्होडेशिया, झँबिया इ. भागांतही हलक्या दर्जाचे माणिक आढळते. भारतामध्ये कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, काश्मीर इ. ठिकाणी अल्प प्रमाणात माणिक सापडते.

माणिकाचा मुख्य उपयोग रत्न म्हणून दागदागिन्यांत केला जातो. माणिक हे एक सर्वांत मूल्यवान रत्न असून आकारमानानुसार त्याची किंमत वाढत आहे. पारव्याच्या रक्तासारखा रंग असलेले पारदर्शक माणिक सर्वोत्कृष्ट व सर्वांत लोकप्रिय असून एकाच आकारमानाच्या व गुणवत्तेच्या हिऱ्यापेक्षा अशा माणकाची किंमत कित्येकपट जास्त असते. तारांकित माणिक एवढे मूल्यवान नाही मात्र त्यालाही पुष्कळ मागणी असते. यातील क्रोमियमामुळे ⇨ मेसर व ⇨ लेसर या प्रयुक्तींमध्ये याचा वापर होतो. याचे बारीक खडे घड्याळे, शास्त्रीय व विमानातील उपकरणे, मापके इत्यादींमध्ये वापरतात.

माणिक्य, सौगंधिक, मांसखंड, लोहितक, सूर्यकांतमणी, अग्निमणी, कुंभस्थल इ. माणकाची नावे असून लहान माणकांना लालडी, माणकी, चुनलालडी अशी नावे आहेत. श्रीमद्‌भगवतगीतेत पद्मराग (माणिक) हे सर्वश्रेष्ठ रत्न सांगितले असून याला रत्नांचा राजा मानण्यात येते. बृहत्संहिता, शुक्रनीती इत्यादींमध्ये याचा उल्लेख असून मानसोल्लास या ग्रंथात याच्या गुणधर्मांचे वर्णन केलेले आहे.

नवरत्नांपैकी एक असून सूर्याच्या अनुकूलतेसाठी हे रत्न वापरतात. नवग्रहाच्या आंगठीत हे मध्यभागी असते. हे घातल्याने अरिष्ट येत नाही, असा समज काही पौर्वात्य देशांत अजूनही आहे.

अरेबियन नाइट्स, मार्को पोलोचे प्रवासवर्णन इत्यादींमध्येही याचा उल्लेख आलेला आहे. हे जुलै महिन्याचे शुभ जन्म रत्न मानले जाते व लग्नाच्या चाळीसाव्या वर्धापनदिनाचे प्रतीक मानतात. प्लिनी यांनी याला कार्बुक्युलस व थीओफ्रॅटस यांनी ॲँथ्रॅक्स म्हटले होते आणि या दोन्ही संज्ञांचा अर्थ निखारा असा आहे. पुढे तांबडा अर्थाच्या लॅटिन शब्दावरून याचे रुबी हे इंग्रजी नाव पडले.

पहा: कुरुविंद नील रत्ने.

ठाकूर, अ. ना.