ऑलिव्हीन गट : खनिजांचा गट. या गटात समचतुर्भुजी स्फटिक असणाऱ्या द्विसंयुजी धातूंच्या पुढील सिलिकेटांचा समावेश केला जातो : फॉर्स्टेराइट Mg2SiO4; ऑलिव्हीन (Mg, Fe)2 SiO4; फायलाइट Fe2SiO4; क्नेबेलाइट (Fe,Mn)2 SiO4; हॉर्टोनोलाइट (Fe, Mg, Mn)2 SiO4; टेफ्रॉइट Mn2SiO4; माँटिसेलाइट CaMgSiO4; ग्लॉकोक्रॉइट CaMnSiO4; लार्सेनाइट PbZnSiO4.

ऑलिव्हिनाचे स्फटिक

स्फटिकांची संरचना : SiO4चा चतुष्फलक हा ऑलिव्हीन गटातील खनिजांच्या स्फटिकांचा एकक असतो. स्फटिकांचे घटक चुतुष्फलक एकमेकांस सरळसरळ जोडलेले नसून अलग असतात. ऑक्सिजनाचा ॠण भार आठ एककांइतका असतो व सिलिकॉनाचा धन भार चार एककांइतकाच असतो. म्हणून प्रत्येक चतुष्फलकात जे चार ॠण एकक उरतात त्यांचे संतुलन करण्यास पुरतील इतक्या ॠणायनांची (धन विद्युत्भारयुक्त अणू वा अणुगटांची ) भर घातलेली असते व चतुष्फलकांच्या मधे असणाऱ्याॠणायनांनी चतुष्फलक एकत्र बांधले गेलेले असतात. ॠणायन सामान्यतः Mg”, Fe” व क्वचित Mn” किंवा Ca” असतात.

स्फटिकांच्या अक्षांना समांतर अशा रेखांत एकेकटे चतुष्फलक रांगेने बसविलेले असतात. त्या रेखांपैकी कोणतीही एक घेतली, तर तिच्यातील चतुष्फलकांची टोके एकाच दिशेस रोखलेली असतात. पण एकांतरित रेखा घेतल्या तर एकीतील चतुष्फलकांची टोके उजवीकडे, तर दुसरीतील चतुष्फलकांची टोके डावीकडे असतात. चतुष्फलकांच्या मधे ॠणायन असतात व ते लगतच्या निरनिराळ्या चतुष्फलकांतल्या ऑक्सिजनाच्या अणूंशी सहांचे सहसंयोजन होईल अशा रीतीने रचिलेले असतात [→ स्फटिकविज्ञान ].

वर उल्लेख केलेल्या खनिजांपैकी लोही-मॅग्नेशियमी खनिजे शैलकर (खडक तयार करणारी) खनिजे आहेत. माँटिसेलाइट हे रुपांतरित चुनखडकांत व क्वचित अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांत आढळते. उरलेल्या जाती रुपांतरित चुनखडकातल्या धातुक निक्षेपांत (कच्च्या धातुराशींत) क्वचित आढळतात.

ऑलिव्हीन हे या गटातले महत्त्वाचे खनिज असून ते सामान्यतः कणमय पुंजांच्या व क्वचित चांगल्या स्फटिकांच्या स्वरुपात आढळते. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ६·५-७. वि.गु. ३·२७–३·३७. लोहाच्या प्रमाणात वि.गु. वाढत जाते. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी [→ खनिजविज्ञान]. रंग सामान्यतः ऑलिव्हाच्या फळासारखा हिरवा व त्यामुळेच नाव दिले गेले.

अल्पसिकत व अत्यल्पसिकत अग्निज खडकांत हे खनिज कमीअधिक प्रमाणात वारंवार आढळते. ड्यूनाइट हा खडक जवळजवळ सर्वस्वी ऑलिव्हिनाचा बनलेला असतो. याचे स्वच्छ, पारदर्शक व चांगल्या रंगाचे नमुने रत्न म्हणून वापरले जातात. अशा नमुन्यांना पुष्कळदा पेरिडोट हे नाव दिले जाते. असे नमुने ब्रह्मदेशात व तांबड्या समुद्रातील सेंट जॉन बेटात आढळतात. क्रिसोलाइट हे ऑलिव्हिनाचे आणखी एक नाव आहे.

ऑलिव्हीन हे Mg2SiO4 व Fe2SiO4 या दोन घटकांच्या अखंड घन-विद्रावांच्या (घन स्थितीत एका आयनाच्या जागी दुसऱ्याआयनाच्या स्थापनेने तयार होणाऱ्या) मालेतील मध्यम संघटनाचे व वारंवार आढळणारे खनिज आहे. फॉर्स्टेराइट पांढरे व फायलाइट उदी ते काळे असते. स्फटिकीभवनाच्या क्रियेत फॉर्स्टेराइट किंवा ऑलिव्हीन व मुक्त (शुद्ध) सिलिका एकत्र राहू शकत नाहीत. त्यांची विक्रीया होऊन पायरोक्सीन तयार होते. म्हणून ती सिकत (सिलिका जास्त प्रमाणात असलेल्या) अग्निज खडकांत असत नाहीत. परंतु फायलाइट व सिलिका यांची तशी विक्रीया होत नाही. ग्रॅनाइट, रायोलाइट इ. खडकांत फायलाइट क्वचित आढळते.

केळकर, क. वा.