अर्कोज : खडक. वातावरणाने जवळजवळ अपघटन (घटक पदार्थ सुटे होणे) न झालेल्या फेल्स्पारांचे विपुल कण असलेल्या भरडकणी ⇨वालुकाश्माचे नाव. अती रूक्ष किंवा शीत प्रदेशातील ग्रॅनाइटाचे किंवा ग्रॅनाइटी-पट्टिताश्मांचे [⟶ पट्टिताश्म] वेगाने अपघटन होऊन तयार झालेल्या व फार दूरची वाहतूक न झालेल्या गाळापासून अर्कोज तयार झालेले असतात. हे खडक मुखतः क्वा‌‌र्ट्झ व फेल्स्पार यांच्या कणांचे (क्वा‌‌र्ट्झाचे कण ७५ ते ५०% व उरलेले बहुतेक फेल्स्पारांचे) बनलेले असतात. फेल्स्पारांचे विपुल पण अपघटित कण असणाऱ्‍या वालुकाश्मास ‘अर्कोज’ न म्हणता ‘फेल्स्पारमय वालुकाश्म’ म्हणतात [⟶ गाळाचे खडक].

 

कर्नाटकातील जमखिंडीजवळील कलादगी खडकांत अर्कोजाचे उत्कृष्ट नमुने आढळतात.

 

ठाकूर, अ. ना.