जिप्समाचे स्फटिक जिप्सम : खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार, वडीसारखे सामान्यतः जुळे स्फटिकही आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. संपुंजित, पर्णित (पापुद्रे असलेल्या) व कणमय रूपांतही आढळते. याचे पाच प्रकार असून संहत (जिप्समाचे प्रमाण जास्त असलेल्या) राशींना रॉक जिप्सम, अशुद्ध मातीरूपातील राशी म्हणजे जिप्साइट, तंतुमय व रेशमासारखी चमक असलेल्या प्रकाराला सॅटीन स्पार, तर रंगहीन पारदर्शक व पाटनक्षम [विशिष्ट दिशेत भंग पावू शकणाऱ्या, → पाटन]  प्रकाराला सेलेनाइट व सूक्ष्मकणी संपुंजित प्रकाराला ⇨अलॅबॅस्टर  म्हणतात. पाटन (010) उत्कृष्ट. कठिनता २ (नखाने यावर ओरखडा काढता येतो). वि. गु. २·३२. चमक बहुधा काचेसारखी, कधी कधी मोत्यासारखी वा रेशमासारखी. रंगहीन किंवा पांढरे, कधीकधी मलद्रव्यांमुळे याला पिवळसर, तांबूस वा उदसर छटा येते. कस फुष्कळदा पांढरा. पारदर्शक ते अपारदर्शक. रा. सं. CaSo4·2H2O. गरम व सौम्य हायड्रोक्लोरिक अम्‍लात विरघळते. बंद नळीत तापविल्यास पांढरे होते आणि पाणी बाहेर पडते. तापविल्यास चटकन वितळते व पाणी बाहेर घालविले जाते. विशिष्ट भट्टीत १९०° ते २००° से. पर्यंत तापवून म्हणजे कॅल्सिनीकरण करून यापासून  ⇨प्‍लॅस्टर ऑफ पॅरिस  तयार करतात.

हे सर्वांत सामान्यपणे आढळणारे सल्फेट खनिज आहे. गाळाच्या खडकांत याचे थर सर्वत्र आढळतात. चुनखडक व शेल खडकांच्या थरांमध्ये याचे थर सापडतात. लवणयुक्त पाण्याचे बाष्पीभवन होताना हे सर्व प्रथम स्फटिकीभूत होणारे असल्याने सैंधवाच्या थराखाली याचा थर आढळतो. शिरांमध्ये जिप्समाचे पुन्हा स्फाटिकीभवन होऊन सॅटीन स्पार तयार होते. ॲनहायड्राइटामध्ये बदल होऊनही जिप्सम तयार होते, परंतु या क्रियेत त्याचे घनफळ वाढल्याने त्याला घड्या पडतात. गंधकाच्या वाफेची चुनखडकांवर विक्रिया होऊ शकणाऱ्या ज्वालामुखी असलेल्या भागांतही जिप्सम तयार होते. यांशिवाय शेलात व मृत्तिकेत भिंगाकार राशी तसेच विखुरलेले स्फटिक या रूपांत किंवा सैंधवी घुमटाच्या टोपण शिलांमध्येही जिप्सम आढळते. हॅलाइट, ॲनहायड्राइट, कॅल्साइट, डोलोमाइट इ. खनिजे याच्याबरोबर आढळतात. काराबगास (कॅस्पियनच्या पूर्वेस) जिप्समाचे सध्याही निक्षेपण (साचण्याची क्रिया) चालू आहे. जर्मनी (श्टासफुर्ट), अमेरिकेची संयुक्त संस्थाने (कॅलिफोर्निया, नेवाडा), फ्रान्स (पॅरिस खोरे), ब्रिटन, रशिया, कॅनडा, मेक्सिको, स्पेन, इटली, ऑस्ट्रिया इ. भागांत जिप्समाचे साठे आढळतात. भारतात राजस्थान (जोधपूर, बिकानेर), काश्मीर (बारमूल), कच्छ वगैरे प्रदेशांत जिप्सम आढळते. भारतात सु. २० कोटी टन एवढे जिप्समाचे साठे आहेत. 

जिप्सम मुख्यतः प्लॅस्टर ऑफ पॅरिस तयार करण्यासाठी वापरतात. याशिवाय खते, अग्‍निरोधक पदार्थ, पोर्टलँड सिमेंट, बांधकाम (गिलावा, सजावट इ.), कापड, कागद, रंगलेप, कीटकनाशके, गाळण्या तसेच उष्णता, विद्युत् वा ध्वनी निरोधनाची साधने इ. तयार करताना व अभिवाह (एखादा पदार्थ कमी तापमानास वितळण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ) म्हणूनही जिप्सम वापरले जाते. ॲलॅबॅस्टरचा मूर्ती व कोरीव कामाच्या वस्तू बनविण्यासाठी, तर सॅटिन स्पार व सेलेनाइट यांचा शोभिवंत वस्तू व दागदागिने तयार करण्यासाठी उपयोग करतात.

जिप्सास म्हणजे चॉक या ग्रीक शब्दावरून जिप्सम, तर चंद्राप्रमाणे मंद चमक असणारे म्हणून चंद्र अर्थाच्या शब्दावरून सेलेनाइट आणि रेशमासारख्या चमकेवरून सॅटिन स्पार अशी नावे पडली आहेत. 

ठाकूर, अ. ना.