पोरबंदरी दगड : (मिलिओलाइट). काठेवाड व कच्छच्या किनाऱ्यावर आढळणारा सूक्ष्मकणी चुनखडक. पोरबंदर येथून त्याची वाहतूक होत असे, त्यामुळे त्याला हे नाव पडले असून त्याच्यात फोरॅमिनीफेरा जीवांच्या मिलिओलिना या वंशातील जीव विपुल असल्याने त्याला मिलिओलाइट असेही म्हणतात. हा खडक जैव कॅल्शियमी कणांचा, मुख्यतः फोरॅमिनीफेरांच्या चोलांचा (संरक्षक कठीण कवचांचा) बनलेला असून त्यात थोडे अंदुकी (सूक्ष्म गोलसर) कण व लगतच्या अग्निज खडकांतील खनिजांचे सूक्ष्म तुकडे असतात. हे सर्व कण कॅल्साइटाने संयोजित झालेले (चिकटविले गेलेले) असतात. या खडकाचा रंग पांढरा वा मलईसारखा असून हा सुच्छेद्य (फोडण्यास सोपा) आहे. याची जास्तीत जास्त जाडी सु. ३३ मी. आहे. किनारी भागात यामध्ये पुष्कळ प्रमाणात वाळू मिसळलेली आढळते. यामध्ये ओबडधोबड स्वरूपाचे स्तरण (थरयुक्त रचना) आढळते व काही ठिकाणी सूक्ष्मकणी वालुकाश्मांचे कमी जाड थरही यांत आढळतात. यांशिवाय यात प्रतिस्तरण (मुख्य थरांच्या प्रतलाशी कोन करून असलेले दुय्यम स्तरण) आढळते व ते वाऱ्याच्या क्रियेमुळे उद्‌भवले असावे, असे मानतात. तसेच हा खडकही वाऱ्याने वाहून आणलेले कॅल्शियमी सूक्ष्मकण साचून बनला असावा, असे मत आहे. दुसऱ्या मतानुसार या शैलसमूहातील काही भाग उथळ समुद्रात लाटांच्या क्रियेमुळे निक्षेपित झाला (साचला) असावा. पोरबंदरी खडकाचे वय प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीचे) आहे व हे खडक सु. ३५० मी. उंचीच्या चोटिला टेकडीवर आढळत असल्यामुळे वरील किनारा उचलला जाण्याची क्रिया अगदी अलिकडच्या काळात घडून आली असावी. हा काठेवाडच्या पूर्व भागात फक्त किनाऱ्यालगत आढळतो, तर पश्चिम भागात हा विस्तृत क्षेत्रात व तृतीय (सु.६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांवर व ⇨ दक्षिण ट्रॅपवर पसरलेला आहे. हा मुख्यतः बांधकामासाठी वापरतात. शिवाय सिंमेट, विरंजक (रंग काढून टाकण्यासाठी वापरण्यात येणारे) चूर्ण यांच्या निर्मितीत व रासायनिक उद्योगांतही हा वापरला जातो.

ठाकूर, अ. ना.