पेरोव्हस्काइट : खनिज. स्फटिक घनीय. हे घनरूप गोलसर स्फटिकांच्या रूपात आढळते. ð पाटन : घनीय स्पष्ट. भंजन खडबडीत ते काहीसे शंखाभ. ठिसूळ. कठिनता ५.५. वि. गु. ४ -४.३. चमक काहीशी हिऱ्यासारखी ते धातूसारखी. रंग पिवळा, तांबूस व गडद उदी ते काळा. पारदर्शक ते अपारदर्शक. लोहविद्युती. रा. सं. CaTiO3. बहुधा रूपांतरित (उदा., क्लोराइटी वा संगजिरेयुक्त सुभाजा), अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या) खडकांत (उदा., इयोलाइट, किंबर्लाइट) तसेच त्यांच्यांशी निगडित असलेल्या पेग्मटाइटात हे गौण खनिज म्हणून आढळते. क्लोराइट आणि सर्पेंटाइन यांनी युक्त असलेल्या खडकांबरोबर हे आढळते. हे उरल पर्वतात (रशिया) प्रथम आढळले (१८३९). जर्मनी (बाडेन), स्वित्झर्लंड, इटली, ब्राझील, स्वीडन इ. देशांत हे आढळते. सिरियम व निओबियम ही मूलद्रव्ये मिळविण्यासाठी याचे काही प्रकार उपयुक्त आहेत. काउंट एल्‌. ए. पेरोव्हस्की यांच्या नावावरून याला पेरोव्हस्काइट हे नाव देण्यात आले आहे.

ठाकूर,अ.ना.