बराइटाचेबराइट : (बराइट्स, हेवी स्पार, टिफ). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, द्विप्रसूच्याकार [⟶ स्फटिकविज्ञान] स्फटिक वडीसारखे व पुष्कळदा शंकरपाळ्यासारखे. वडीसारख्या स्फटिकांचे अपसारी (एका ठिकाणाहून विविध दिशांत मांडल्या गेलेल्या स्फटिकांचे) पुंजके आढळतात, त्यांना तुरेदार बराइट वा बराइट (वा डेझर्ट) रोझेस म्हणतात. बराइट भरड पत्र्यांच्या, तंतुमय, कणमय, संपुंजित वा मृण्मय रूपातही आढळते. भंजन खडबडीत. पाटन : (001) उत्कृष्ट. कठिनता ३-३.५ वि. गु. ४-५. चमक काचेसारखी, कधीकधी मोत्यासारखी वा रेझिनासारखी. शुद्ध प्रकार रंगहीन वा पांढरा अशुद्धीमुळे याला निळसर, पिवळसर, तपकिरी, तांबूस वा करडसर छटा येते. कस पांढरा. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी वा अपारदर्शक. हे प्रतिचुंबकीय [चुंबकापासून प्रतिसारित होण्याची व चुंबकीय प्रेरणा रेषांना लंबरूप राहण्याची प्रवृत्ती असलेले ⟶ चुंबकत्व] असते. हे पाण्यात किंवा अम्लात विरघळत नाही व सहज वितळत नाही. कधीकधी हे फुटल्यावर वा याचे तुकडे एकमेकांवर घासल्यास कुजका वास येतो. तो बहुधा खनिजातील कार्बनयुक्त द्रव्यामुळे येत असावा. हे पुष्कळदा तापदीप्त (तापविल्यास प्रकाशित होण्याचा गुणधर्म असलेले), कधीकधी प्रस्फुर (प्रकाश वा प्रारण-तरंगरूपी ऊर्जा-पडली असता दीप्तिमान होण्याचा गुणधर्म असलेले) व जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) प्रारण टाकले असता अनुस्फुरक (प्रकाश बाहेर टाकणारे) होते. रा. सं. BaSo4 यात बेरियमाच्या जागी थोडेसे स्ट्राँशियम वा शिसे आलेले असते. हे बेरियमाचे सर्वांत सामान्य व विस्तृतपणे आढळणारे खनिज आहे. हे बहुतकरून चांदी,शिसे, तांबे, कोबाल्ट, मँगॅनिज आणि अँटिमनी यांच्या धातुकांबरोबर (कच्च्या रूपातील धातूंबरोबर) धातूंच्या जलतापीय (तप्त जलीय विद्रावांच्या वा वायूंच्या क्रियेद्वारे बनलेल्या) शिरांत आढळते. तसेच चुनखडकांतील शिरांत, चुनखडकांवरील अवशिष्ट मातीत, वालुकाश्मात, शेलात आणि गरम झऱ्यांच्या पाण्याद्वारे बनलेल्या सिंटरात हे आढळते. कॅल्साइट, फ्ल्युओराइट, डोलोमाइट व क्वार्ट्‌झ ही याच्या बरोबर आढळणारी खनिजे आहेत. हे इंग्लंड, अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, स्पेन, चेकोस्लोव्हाकिया, रशिया इ. प्रदेशांत आढळते. भारतात हे आंध्र प्रदेशातील कडप्पा, कुर्नूल, खम्मामेट व अनंतपूर या जिल्ह्यांत व राजस्थानात अलवरजवळ आढळते. बिहार, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश व तमिळनाडूतही याचे साठे आहेत. मुख्यत्वे हे नैसर्गिक इंधन वायू व खनिज तेल यांच्या विहिरी खोदण्यास लागणाऱ्या जड चिखलामध्ये वापरतात. बेरियमाची संयुगे व इतर रसायने बनविण्यासाठी, तसेच पांढरा रंग म्हणून बराइट वापरतात. ही रसायने रंगलेप, कृत्रिम फरश्या, कापड, ध्वनिमुद्रिका, कागद, सौंदर्यप्रसाधने, शाई, प्लॅस्टिक, रबर, मेणकापड, लिनोलियम, काच, सिमेंट इ. उद्योगांत, तसेच क्ष-किरण चिकित्सेत ‘बेरियम अशना’ साठीही यांचा वापर करतात. याच्या काही झुंबराकार प्रकारांना झिलाई देऊन त्यांचा दागदागिन्यांत वापर करतात. याच्यासारख्या असलेल्या खनिजांच्या मानाने हे जड असल्याने जड अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याची बराइट व हेवी स्पार ही नावे पडली आहेत.

ठाकूर, अ. ना.