हिरा : हे पूर्णपणे कार्बन या मूलद्रव्याचे, बहुधा रंगहीन खनिज असून त्याचे घनीय समूहाचे स्फटिक अष्टफलकीय, द्वादशफलकीय व घन रूपाचे असतात [→ स्फटिकविज्ञान]. हिरा ज्ञात असलेला सर्वांत कठिण (कठिनता १०) पदार्थ असून तो दुसऱ्या हिऱ्यानेच कापता येतो. सौंदर्य व कठिनता यांच्यामुळे तो रत्न म्हणून दागदागिन्यांत आणि उद्योगधंद्यांत (उदा., कर्तक हत्यारे) वापरतात. हिरा हे कार्बनाचे एक बहुरूप (एकाच मूलद्रव्याच्या अनेक स्वरूपांपैकी एक) असून लॉन्सडेलेइट या दुसऱ्या बहुरूपाला कधीकधी षट्कोणी हिरा म्हणतात. अंटार्क्टिका खंड वगळता हिरा सर्व खंडांत आढळतो. हिऱ्याचे रत्न वा औद्योगिक गुणवत्तेचे एकेकटे स्फटिक निसर्गात आढळतात. त्याच्या बहुस्फटिकी राशीही आढळतात व त्यांना बोर्ट, फ्रेमसाइट किंवा कार्बोनाडो म्हणतात. काही अशनींमध्ये हिऱ्याचे काळे सूक्ष्मकण आढळले आहेत. प्रयोगशाळेत कृत्रिम रीतीने हिऱ्याची निर्मिती करता येते व असे संश्लेषित हिरे औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात तयार करतात. हिरा हे एप्रिल महिन्याचे रत्न मानतात. 

 

गुणधर्म : हिऱ्याच्या घनीय स्फटिकाच्या संरचनेत सर्व कार्बन अणूंमध्ये सहसंयुजी बंध असतात. या भक्कम बंधांमुळे हिरा कठिण झालेला असतो. तथापि त्याच्या ⇨ पाटन या गुणधर्मामुळे विशिष्ट दिशांमध्ये हिऱ्यावर आघात केल्यास तो त्या दिशांमध्ये सहजपणे तडकतो. सपाट व सफाईदार पृष्ठाचे रत्न म्हणून वापरताना या गुणधर्मांचा उपयोग करून घेतात. हिऱ्याचा प्रणमनांक व अपस्करण [→ प्रकाशकी] यांच्या एकत्रित परिणामामुळे हिरा कापून त्याला पॉलिश केल्यावर त्याची तेजस्विता व तेज वा झळाळी (तथाकथित फायर) प्राप्त होते. कोणत्याही द्रव्यांपेक्षा हिऱ्याची ऊष्मीय संवाहकता सर्वोच्च म्हणजे तांब्यापेक्षा पाचपट असते. ऊष्मीय संवाहकता व कठिनता यांच्यामुळे उद्योगातील कर्तन हत्यारांसाठी वापरावयाचे आदर्श द्रव्य, तसेच इलेक्ट्रॉनिकीमधील उष्णताशोषक म्हणून हिरा उपयुक्त आहे. 

 

पूर्णपणे रंगहीन हिरे सर्वोच्च गुणवत्तेचे आणि सर्वांत दुर्मिळ व मूल्यवान असतात. पुष्कळ हिरे पिवळसर असतात. काळा, निळा, उदी, हिरवा, गुलाबी, जांभळा व तांबडा या छटांचे हिरे आढळतात. तांबडा हिरा सर्वांत दुर्मिळ आहे. हिरा कार्बनाचा बनलेला असला, तरी नैसर्गिक हिऱ्यामध्ये इतर किमान ५८ मूलद्रव्ये अशुद्धी म्हणून आढळली आहेत. उदा., दर दशलक्ष भागांमध्ये ॲल्युमिनियम १० भाग हायड्रोजन १,००० भाग सिलिकॉन ८० भाग इत्यादी. तथापि हिऱ्याच्या स्फटिक-जालकांत कार्बनाची जागा नायट्रोजन व बोरॉन या फक्त दोन मूलद्रव्यांनी घेतली असल्याचे आढळले आहे. नायट्रोजन ही हिऱ्यातील मुख्य अशुद्धी असून तो सामान्यपणे सुटे अणू वा अणूंच्या जोडीच्या रूपात कार्बनाची जागाघेऊ शकतो. नायट्रोजन असणे वा नसणे आणि त्यातील प्रतिष्ठापनाची तर्‍हा यांमुळे हिऱ्याला भिन्न भौतिक गुणधर्म प्राप्त होतात. उदा., ऊष्मीय संवाहकता, विद्युत् रोधकता व अवरक्त वर्णपट. यानुसार हिऱ्याचे पुढील चार मुख्य प्रकारांत वर्गीकरण करतात : सर्व नैसर्गिक हिऱ्यांमध्ये बहुधा ९८% नायट्रोजन असलेला la प्रकार कमी नायट्रोजन असणारा, विरळपणे आढळणारा व बहुतेक संश्लेषित (कृत्रिम) हिऱ्यांचा प्रकार असलेला lb प्रकार निसर्गात अगदी विरळपणे आढळणारा, सर्वाधिक संवाहकता असलेला व ओळखता येण्याजोगा नायट्रोजन जवळजवळ नसलेला खखर प्रकार आणि नायट्रोजन नसलेला व बोरॉन असलेलाअर्धसंवाहक असलेला, निसर्गात अगदी विरळपणे आढळणारा व कधीकधी निळसर रंगाचा असलेला llb प्रकार. 

 

तीव्र ऑक्सिडीकारकांव्यतिरिक्त इतर रसायनांचा (उदा., साधी अम्ले) हिऱ्यावर रासायनिक परिणाम होत नाही. निर्वातात किंवा अक्रिय वाता-वरणात नितळ (स्वच्छ) रंगहीन रत्न प्रकारच्या हिऱ्याचे सु. १,५००° से. तापमानालाग्रॅफाइटाच्या करड्या-काळ्या राशीत परिवर्तन होते. ग्रॅफाइट मऊ (कठिनता १-२) असून ते वंगण म्हणून वापरतात. हवेत ८००° से. वा अधिक तापमानाला हिऱ्याचेऑक्सिडीभवन होऊन (जळून) कार्बन डाय-ऑक्साइड वायू तयार होतो. उच्च तापमानाला टंगस्टन, टिटॅनियम व टँटॅलम यांसारख्या काही धातूंची हिऱ्याशी विक्रिया होऊन या धातूंचीकार्बाइडे तयार होतात. लोखंड, निकेल, कोबाल्ट व प्लॅटिनम यांसारख्या धातू वितळलेल्या स्थितीत कार्बनासाठी विद्रावक (विरघळविणाऱ्या) असून त्यांच्यात हिरा विरघळतो. हा आविष्कार हिऱ्याच्या संश्लेषणासाठी मूलाधार म्हणून वापरतात. 

 

उत्पत्ती व आढळ : अशनींतील हिऱ्यांव्यतिरिक्त इतर बहुतेक नैसर्गिक हिरे भूकवचाखालील प्रावरणाच्या वरच्या भागात [→ पृथ्वी] सु. १८० किमी. खोलीवर ९००° ते १,२००° से. या उच्च तापमानाच्या व उच्च दाबाच्या पल्ल्यात स्फटिकीभूत होतात. मॅग्नेशियम विपुल व सिलिकेची त्रुटी असणाऱ्या अल्ट्रामॅफिक (पेरिडोटाइटिक) खडक अथवा अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अत्यल्प असणाऱ्या)एक्लोजाइट या आश्रयी खडकात हिरे तयार होतात. आश्रयी खडकांनुसार हिऱ्यातील समाविष्ट खनिजे भिन्न असतात व त्यांवरून आश्रयी खडक ओळखता येतो. या प्रत्येक गटातील हिरे प्रावरणाच्या वरच्या भागात पृथक् व भिन्न भूरासायनिक परिसरांत तयार झालेले असतात. 

 

कालनिर्णय : हिऱ्यातील काही समाविष्टे (समाविष्ट द्रव्ये) ही हिऱ्याबरोबरच एकाच वेळी स्फटिकीभूत झालेली असू शकतात व ती वैशिष्ट्यदर्शक द्रव्ये हिऱ्याबरोबर सहजात आहेत, असे म्हणतात. अशा समाविष्टांच्या समस्थानिकीय विश्लेषणामुळे त्यांच्या स्फटिकीभवनाचा व पर्यायाने हिऱ्याच्या स्फटिकीभवनाचा काळ ठरविता येतो. पृथ्वीचे वय सु. ४.६ अब्ज वर्षे असून काही हिरे ३.२ अब्ज वर्षांपूर्वी तयार झाले आहेत तर या पद्धतीने अभ्यास केलेल्या सर्वांत अलीकडील हिऱ्यांचे वय ६२.८ कोटी वर्षे आले आहे. [→ खडकांचे वय]. 

 

हिरे ज्वालामुखी उद्रेकाच्या एका एकमेवाद्वितीय प्रकाराद्वारे भूपृष्ठावर आणले जातात आणि यामध्ये वायूंचे कार्य मुख्य स्वरूपाचे असते. अशा उद्रेकामुळे भूकवचात अरुंद (१,००० मी.पेक्षा लहान) स्फोटजन्य नलिकाकार छिद्र वा निर्गम द्वार तयार होते.किंबर्लाइट व लँप्रॉइट हे दोन भिन्न प्रकारचे हिरे असणारे खडक तयार होऊ शकतात व त्यांनी हे ज्वालामुखी नळ भरले जातात. हिरे सर्वसाधारणपणे त्यांना भूपृष्ठावर आणणाऱ्या ज्वालामुखी उद्रेकांहून खूप जुने (जास्त वयाचे) असतात. अशा रीतीने ३.२ अब्ज वर्षे वयाचे हिरे केवळ ८.५ कोटी वर्षांपूर्वी भूपृष्ठावर आलेले आहेत. किंबर्लाइट हे विरळ खडक दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, अंगोला, सिएरा लिओन, गिनी, टांझानिया, ब्राझील, व्हेनेझुएला, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, रशिया, सायबीरिया, चीन, भारत व ऑस्ट्रेलिया येथे आढळतात. फक्त पश्चिम ऑस्ट्रेलिया व आर्कॅन्सॉ (अमेरिका) येथील लँप्रॉइट खडकांत हिरे आढळले आहेत. 


जलोढीय हिरे : किंबर्लाइट व लँप्रॉइट यांच्यावर सामान्य भूवैज्ञानिक प्रक्रिया होऊन त्यांचे अपक्षरण (झीज) व अपक्षय (वातावरणक्रिया) होते. यामुळे त्यांच्यातील हिरे सुटे होतात. हिरा कठिण, रासायनिक दृष्ट्या अक्रिय व घट्ट (दाट) असतो. त्यामुळे तो नदीच्या निःसरण प्रणालीत व तिच्या बरोबर वाहून नेला जातो. अखेरीस हिरे व इतर खनिजे जलोढीय (वाळू व रेतीसारख्या गाळाच्या) किंवा प्लेसर निक्षेपांत अडकून पडतात. प्राथमिक स्रोत असलेल्या किंबर्लाइटातून या दुय्यम निक्षेपांत येऊन पोहोचण्यास हिऱ्यांनी लाखो वर्षांत शेकडो किमी.चा प्रवास केलेला असू शकतो. नमुनेदार हिरेयुक्त जलोढीय निक्षेप व्हाल व ऑ रेंज या दक्षिण आफ्रिकेतील नद्यांच्या किनाऱ्यांलगत, तसेच अंगोला, झाईरे, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, घाना, सिएरा लिओन व गिनी येथे आढळतात. 

 

दक्षिण अमेरिकेत ब्राझील, गुयाना व व्हेनेझुएला येथील जलोढीय निक्षेपांतून खाणकामाद्वारे हिरे काढले जातात. बारावे ते सतरावे शतक या काळात नोंद झालेले ऐतिहासिक हिरे हे भारतातील जलोढीय निक्षेपांतून मिळविले होते. चीन, कालीमांतान, रशिया व पश्चिम ऑस्ट्रेलिया येथेही हिरेयुक्त जलोढीय निक्षेप आढळले आहेत. 

 

दक्षिण आफ्रिका व नामिबिया यांच्या पश्चिम किनाऱ्यावरील हिरेयुक्त सागरी रेती हा आगळ्यावेगळ्या प्रकारचा जलोढीय निक्षेप आहे. या निक्षेपातील हिरे दक्षिण आफ्रिकेच्या अंतर्गत भागातून ऑ रेंज नदीनेसागरी किनाऱ्यापर्यंत वाहून आणले असून तेथे लाटांद्वारे व इतर सागरी प्रक्रियांनी पुन्हा विखुरले गेले. नदी व लाटांचा खळबळाट असलेला भाग यांसारख्या उच्च ऊर्जायुक्त परिसरातील वाहतुकीमुळे सर्वसाधारणपणे तडे, दोष व छिद्रे यांसारख्या गंभीर त्रुटी असणारे हिरे नष्ट होतात आणियातून केवळ अधिक चांगल्या गुणवत्तेचे हिरे टिकून राहतात. अशा प्रक्रियेतून अंतिमत: तयार झालेल्या निक्षेपात ९५% हिरे रत्नाच्या गुणवत्तेचे असतात. याउलट किंबर्लाइट व लँप्रॉइट या प्राथमिक स्रोतांतील रत्नाच्या गुणवत्तेच्या हिऱ्यांची टक्केवारी पुष्कळच कमी असते. उदा., पश्चिम ऑस्ट्रेलियातील आरगाइल खाणीत फक्त सु. १० टक्केच हिरे रत्नाच्या गुणवत्तेचे आढळतात. 

 

अशनी : हिऱ्याचे सूक्ष्म काळसर स्फटिक आणि १ मिमी.पेक्षा लहान व अनियमित आकाराचे बहुस्फटिकी पुंज विशिष्ट अशनींपासून मिळविण्यात आले आहेत. उदा., ॲरिझोनातील अशनी विवर तयार करणारा कॅन्यय डिॲब्लो लोहयुक्त अशनी. अवकाशातील ⇨ लघुग्रहाच्या आकारमानाच्या खगोलीय पिंडांमधील टकरीतून किंवा भूपृष्ठभागा-वरील आघातातून हे हिरे निर्माण झाले की नाही, याविषयी मतमतांतरे आहेत. यांपैकी दुसरी कल्पना सर्वसाधारणपणे उचलून धरली जाते. लॉन्सडेलेइट (षट्कोणी हिरा) हा अतिउच्च दाबात बनणारा कार्बनाचा प्रकार अशनीशी व आघात विवरांशी निगडित असल्याचेही आढळले आहे. लॉन्सडेलेइट पुष्कळदा हिऱ्याच्या बहुस्फटिकी पुंजांबरोबर (कार्बोनॅडो किंवा फ्रेमसाइट) आंतरवृद्ध झालेले आढळते. [→उल्का व अशनि]. 

 

खाणकाम व पुनःप्राप्ती : हिऱ्यांचे मुख्य उत्पादन हे दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, झाईरे, ऑस्ट्रेलिया व सायबीरिया येथील प्राथमिक स्रोतांपासून होते. असेच उत्पादन गौण प्रमाणात टांझानिया व चीन येथे होते. या सर्व देशांतील हिऱ्याच्या खाणी या किंबर्लाइटावर आधारलेल्या आहेत. मात्र ऑस्ट्रेलियातील आरगाइल खाणीतील स्रोत खडक लँप्रॉइट हा आहे. बोट्स्वाना व दक्षिण आफ्रिका येथे बहुतेक रत्नाच्या गुणवत्तेच्या हिऱ्याचे उत्पादन होते. मात्र रशियातील या उत्पादनाचे निर्धारण करणे अवघड आहे. जगातील हिऱ्याचे सर्वाधिक उत्पादन आरगाइल खाणीतून होत असले, तरी तेथील बहुतेक सर्व उत्पादन औद्योगिक हिऱ्यांचे होते. जलोढ व प्लेसर या दुय्यम निक्षेपांपासून होणारे हिऱ्याचे उत्पादन सापेक्षत: कमी आहे. शिवाय दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील सागरी रेतीतही हिऱ्यासाठी व्यापकपणे खाणकाम केले जाते. गिनी, घाना, रशिया व ऑस्ट्रेलिया येथील जलोढातील हिऱ्यांसाठीचे खाणकाम मोठ्या कंपन्या किंवा सरकारी यंत्रणा करतात. इतर सर्व जलोढीय हिऱ्याचे खाणकाम स्थानिक लहान गटांमार्फत वा व्यक्तिगत पातळीवर केले जाते. 

 

लहान जलोढीय निक्षेपातील हिरे मिळविण्यासाठी मानवी बळाचा उपयोग करणाऱ्या पद्धती वापरतात. उदा., चाळणे व घनतेनुसार कण अलग करण्याची क्रिया (जिगिंग) करणे आणि त्यानंतर अवशिष्ट भागात डोळ्यांनी हिरे शोधणे. या खाणी उघड्या वा भूमिगत असू शकतात. अर्थात नवीन प्राथमिक निक्षेपात प्रथम उघडे खाणकाम करतात व नंतर भूमिगत खाणकाम विकसित होत जाते. फक्त दक्षिण आफ्रिकेतील खाणीच भूमिगत आहेत. उदा., प्रेमियर, फिन्श व किंबर्ली. अर्थात सायबीरियातील काही उघड्या खाणींचे भूमिगत खाणींमध्ये परिवर्तन केले आहे. 

 

सरासरीने पाहता टाकाऊ खडकाच्या २ कोटी भागांमागे हिऱ्याचा १ भाग असतो. हिऱ्याच्या खाणकामात १०० मेट्रिक टनांमागे असणाऱ्या हिऱ्याच्या कॅरटमधील संख्येने खाणीची प्रत दर्शवितात. उदा., किंबर्ली खाणीत दर १०० मेट्रिक टनांमागे ८० कॅरट, तर आरगाइल खाणीची प्रत दर १०० मेट्रिक टनांना ४०० कॅरट पर्यंत आहे. तथापि हिऱ्याच्या खाणीचे अर्थकारण हिऱ्याच्या प्रतीएवढेच त्याचे आकारमान व गुणवत्ता यांच्यावरही अवलंबून असते. 

 

खणून काढलेले खडक प्रथम भरडतात (त्यांचे दलन करतात) . नंतर ते चाळून विविध आकारमानांनुसार अलग करतात. त्यानंतर ते जड--माध्यम अलगीकरण सामग्रीतून जाऊ देतात. यामुळे दर घ.सेंमी.ला२.७ ग्रॅ.पेक्षा हलका भाग हिरेयुक्त जड भागापासून अलग होतो. या जड भागाला संहत भाग म्हणतात. १९७० सालच्या आधी असे बरेचसे प्रारंभिक अलगीकरण घूर्णी (फिरणाऱ्या) प्रक्षालन थाळ्यांमार्फत करीत. या थाळ्यांतील द्रवरूप चिखलाची घनता दर घ.सेंमी.ला सु. १.२५ ग्रॅ. ठेवीत असत. हलके द्रव्य पृष्ठभागी तरंगते, तर हिरेयुक्त जड खनिजेद्रव्य थाळीच्या तळाशी एकत्रितपणे साचते. नंतर अधूनमधून ही जड द्रव्ये काढून घेत असत. आधुनिक जड-माध्यम अलगीकरण सामग्रीही याच तत्त्वानुसार कार्य करते मात्र तिच्यातील अलगीकरण माध्यमाचे नियंत्रण अधिक कार्यक्षम रीतीने होते. त्यानंतर संहत द्रव्य पाण्यासह कंपनकारी टेबलावरून किंवा वाहक पट्ट्यावरून वाहत जाते. त्यावर ग्रिझाचे आच्छादन असते. हिऱ्यांना ग्रिझाविषयी आसक्ती असल्याने ते त्याला चिकटतात. इतर द्रव्ये पाण्याबरोबर ग्रिझावरून वाहत जातात व टाकून दिली जातात. ग्रीझ टेबले काही खाणींत वापरतात किंवा दुय्यम पुनःप्राप्ती पद्धत म्हणून वापरतात. 


 

बहुतेक आधुनिक संयंत्रांत संहत द्रव्यातील टाकाऊ द्रव्यांपासून हिरे अलग करण्यासाठी क्ष-किरणांवर आधारलेली पद्धत वापरतात. जेव्हा हिरे क्ष-किरणांनी उद्दीप्त होतात तेव्हा ते प्रकाशमान (दीप्तिमान) होतात मात्र संहत द्रव्यातील इतर बहुतेक खनिजे प्रकाशमान होत नाहीत. संहत द्रव्याचा बारीक प्रवाह क्ष-किरणांच्या शलाकेतून जातो. प्रकाशसंवेदी स्वयंघटकाला (मॉड्युलला) हिऱ्याच्या दीप्तीची जाणीव होते व तो बहुधा हवेच्या झोताकडे आवेग पाठवितो. त्यामुळे प्रवाहातील हिरा उडवला जाऊन सीलबंद धारकपात्रात जातो. ही पद्धत ९७% विश्वासार्ह असून तिला ‘सॉर्टेक्स पद्धत’ म्हणतात. जड-माध्यम अलगीकरण व सॉर्टेक्स पुन:प्राप्ती या दोन्हींना घूर्णी थाळ्या, जड-माध्यम चक्रवाती विलगक, ग्रीझ टेबले, विद्युत् स्थितिक विलगक व त्वक्-प्लवन यांची मदत होऊ शकते. त्वक्-प्लवन पद्धती बहुधा १ मिमी.पेक्षा कमी व्यासाचे हिरे परत मिळविण्यासाठी वापरतात. हिरे मिळविल्यावर ओबडधोबड हिरे अम्लात स्वच्छ करतात आणि आकार, आकारमान, गुणवत्ता व रंग यांनुसार त्यांचे प्रकारीकरण करतात. 

 

कापणे व पॉलिश करणे : ओबडधोबड (असंस्कारित) हिरे विविध आकारांचे आढळतात. उदा., अष्टफलकीय, द्वादशफलकीय, जुळे अष्टफलक आणि तुटलेले किंवा पाटनामुळे बनलेले तुकडे. या ओबडधोबड हिऱ्यांचे कापण्यायोग्य (रत्न वा जवळजवळ रत्न प्रकारचा) व औद्योगिक असे प्रकार पाडण्यात आले. कुलिनन हा आढळलेला सर्वांत मोठा हिरा पाटनामुळे झालेला तुकडा होता. एखादा विशिष्ट हिरा कशा आकारात व पॉलिश केलेल्या रत्नाच्या रूपात बनविता येईल या विषयी निर्णय घेण्यासाठी प्रकारीकरण करतात. कापणे व पॉलिश करणे या प्रक्रियांमुळे मूळ हिऱ्यात ६० टक्क्यांएवढी घट होऊ शकते. हिरा कापून पॉलिश केल्यानंतर त्याच्या विशिष्ट भागांना चमक येते (आ. १ व २).

 

आ. १. (अ) पैलू पाडलेल्या हिऱ्याचे विशिष्ट भाग : (१) क्राउन (मुकुट), (२) गर्डल (मेखला), (३) पॅव्हिलीअन (तंबूसारखा मोठा भाग) (आ) पैलू पाडलेल्या हिऱ्याचे गणितीय कोन आणि क्राउन, गर्डल व पॅव्हिलीअन भागांचे प्रमाण (व्यासाच्या सापेक्ष प्रमाणात टक्केवारीत).
 

 

 

 

 

 

 

 

 

खडबडीत हिऱ्याचा आकार प्रथम बदलतात व तो अगदी जवळजवळ अंतिम रूपातील हिऱ्यासारख्या आकाराचा दिसेल, असे पाहतात. यासाठी हिरा तासतात किंवा खांडतात व कापतात. हे करण्यापूर्वीहिरा कापणारे कुशल कारागीर खड्याचा पोत वा रेखा ठरवितात. तासणे व पॉलिश करणे ही कामे हिऱ्याच्या कोणत्या स्फटिकीय दिशांमध्ये अधिक सुलभपणे करणे शक्य होईल, हे पोत ठरविण्यामुळे लक्षात येते. या रेखेची (पोताची) दिशा पुष्कळदा विविध स्फटिक पृष्ठांवरील वा फलकांवरील नैसर्गिक रेखांवरून व आकृतिबंधावरून निरखून पाहतात. तासकाम करताना तासणारा कारागीर अष्टफलकीय पोतानुसार पुढील काम करतो : ज्या दिशेत हिरा तासावयाचा आहे, त्या दिशेला अनुसरून दुसऱ्या हिऱ्याने हिऱ्यामधील विदलनाच्या दिशेत बारीक भेग वा ओरखडा काढतात. या भेगेला कर्फ म्हणतात. नंतर या बारीक भेगेत पातळपोलादी पाते ठेवतात व त्यावर आघात करतात( ठोकतात) . हे काम अचूकपणे झाल्यास हिरा परिपूर्ण रीतीने तासला जातो. (आ. ३). 

 

काहीवेळा हिरा तासण्याऐवजी कापणे गरजेचे ठरू शकते. त्यासाठी वापरण्यात येणारी करवत म्हणजे फॉस्फर ब्राँझची चकती (तबकडी) असून तिच्या कडांवर हिऱ्याचे सूक्ष्म चूर्ण व ऑलिव्ह तेल यांची रबडी एकजीव होईल अशा रीतीने लावतात. हिरा धारकात बसवितात (जडवितात) व फिरत्या कर्तक (कापण्याच्या) तबकडीच्या वरील भागावर ठेवतात. हिऱ्याचे आकारमान व स्वरूप यांनुसार तो पूर्णपणे कापण्यास अनेक तास किंवा काही दिवस लागू शकतात. आधुनिक व्यवहारांत कापण्याऐवजी अनेक हिऱ्यांचेलेसर शलाकेने काप करतात (वा घेतात). लेसरची पद्धती अधिक जलदपणे कार्य करते, हा एक फायदा आहे. शिवाय हिऱ्यातील स्फटिकवृद्धीची ओबडधोबड क्षेत्रे असलेले गाठाळ हिरे या पद्धतीने कापता येतात हे अधिकमहत्त्वाचे आहे. कारण गाठाळ हिरे करवतीने कापणे अवघड वाअशक्य असते. 

 

निष्ठूरपणे कर्तन करणे वा छाटणे म्हणजे गोलाई देणे (ब्रूटिंग) होय. ही या प्रक्रियेतील पुढील पायरी होय. यात दुसऱ्या हिऱ्याचा हत्यार म्हणून वापर करतात. त्यामुळे खडबडीत खड्याचे तसेच तासलेल्या वाकापलेल्या हिऱ्याचे कोपरे व कडा गोलसर केल्या जातात. खड्याला गोलसर आकार यावा हा या क्रियेचा उद्देश असतो. या गोला-कारावर घासण्याची शाणन क्रिया करून अंतिम रत्नावरील पैलू पाडणे शक्य होते. 

आ. २. (अ) हिऱ्याच्या क्राउन भागातील विविध फलक : (१) टेबल-१, (२) मेन--४, (३) कॉर्नर-४, (४) क्रॉस-१६, (५) स्टार-८ (आ) हिऱ्याच्या पॅव्हिलीअन भागातील विविध फलक : (१) क्यूलिट-१, (२) मेन-४, (३) कॉर्नर-४, (४) क्रॉस--१६ (फरकानंतरच्या संख्या त्या-त्या आकारांचे एकूण फलक दर्शवितात).
 

 

आ. ३. हिऱ्याच्या अष्टफलकीय स्फटिकाचे पैलू पाडण्यापर्यंतच्या विविध पायऱ्या
 

 हिऱ्यावरील पैलूंचे शाणन करणे व त्यांना पॉलिश करणे या प्रक्रियेतील अखेरच्या पायऱ्या आहेत. या क्रिया बिडाच्या आडव्या (क्षितिज- समांतर) चाकावर करतात. त्या चाकावर (स्केफ) हिऱ्याचे बारीक चूर्ण व ऑलिव्ह तेल लावलेले असते. हिरा धारकात (डॉपमध्ये) ठेवतात.भिन्न फलकांचे शाणन व पॉलिश करणे शक्य होण्यासाठी हा धारक जुळवता येतो. पैलू तयार करण्याचा पहिला मार्ग म्हणजे शाणन होय. नंतर पैलूंना हिऱ्याच्या सूक्ष्मतर कणांच्या रबडीने पॉलिश करतात. जेव्हा ही क्रिया पूर्ण होते तेव्हा सुबक चमकदार पैलूंचा हिरा तयार होतो. सर्वांत सामान्य असलेल्या हिऱ्याच्या आकारांत भिन्न आकारमानांचे व सापेक्ष कोनांचे ५८ सममितीय (समप्रमाण) पैलू असतात. हिरे पॉलिश करण्याच्या उद्योगात स्वयंचालन वाढत्या प्रमाणात वापरले जात आहे. शिवाय अनेक हिऱ्यांवरील पैलूंचे शाणन व पॉलिश एकाच वेळी करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमण करता येऊ शकतील अशी अनेक स्वयंचलित यंत्रे उपलब्ध झाली आहेत. स्वयंचलनाचा वापर बहुतेक अधिक लहान हिऱ्यांच्या बाबतीत करतात. अधिक मोठ्या व महत्त्वाच्या हिऱ्यांचे पॉलिश हातांनीच करतात. १९४० सालापूर्वी हिरा कापण्याचे व त्यांच्यावर पॉलिश करण्याचे  बहुतेक काम ॲम्स्टरडॅम व अँटवर्प या शहरांत होत असे. तेव्हापासून लंडन, न्यूयॉर्क, तेल आवीव्ह, सुरत इ. शहरांत आणि रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका, चीन, अगदी पूर्वेकडील देश इ. देशांतील विविध शहरांत हिऱ्याला पॉलिश करण्याचे काम होऊ लागले आहे. 


 

आ. ४. हिऱ्याचे विविध आकार : (अ) गोलीय, (आ) लंबवर्तुळाकार, (इ) नासपतीसारखा आकार, (ई) मार्क्विझ.
 

पॉलिश केलेल्या हिऱ्यांचा दर्जा (श्रेणी) कॅरट, पैलुकाम, सुस्पष्टता (नितळपणा) व रंग यांच्या आधारे ठरवितात. कॅरट हे हिऱ्याच्या उद्योगातील वजनाचे एकक असून ०.२ ग्रॅ. (२०० मिग्रॅ. वा ०.००७ औंस) हे त्याचे प्रमाणभूत मूल्य आहे. त्याची १०० बिंदूंमध्ये (विशेष गुणांमध्ये) विभागणी करतात. अशा रीतीने १० बिंदू (रती) हिऱ्याचे वजन ०.१ कॅरट वा २० मिग्रॅ. असते. कुलिनन या सर्वांत मोठ्या हिऱ्याचेवजन सु. ३,००० कॅरट (६०० ग्रॅ.) आहे व तो माणसाच्या मुठीच्या सरासरी आकारमानाएवढा आहे. 

 

काहींच्या बाबतीत वजन राखण्यासाठी किंवा वैगुण्ये झाकण्यासाठी हिरा प्रमाणभूत प्रमाणांपेक्षा अधिक पातळ वा अधिक जाड कापतात व पॉलिश करतात. पॉलिश केलेल्या हिऱ्याचा नितळपणा समाविष्टे, तडे व इतर नैसर्गिक दोष (भेगा, छिद्रे, बुडबुडे, धूसरता इ.) उपस्थित असण्यावर वा नसण्यावर अवलंबून असतो. असे दोष नसलेल्या व माथ्यावर नितळपणा असलेल्या हिऱ्याला निर्दोष, व्यंगहीन किंवा वैग्ाुण्यहीन हिरा म्हणतात. 

 

हिरे बहुधा रंगहीन असल्याचे सामान्यपणे मानले जाते. प्रत्यक्षात इंद्रधनुष्यातील सर्व रंगांचे हिरे आढळतात. रंगीत हिऱ्यांना विलक्षण( स्वप्नवत) हिरे म्हणतात आणि ते उत्कृष्ट अशा एकसारख्या रंगाचे असल्यास ते सर्वाधिक इष्ट मानतात. गडद निळ्या रंगाचा होप हा सर्वांत प्रसिद्ध रंगीत हिरा आहे. विविध प्रकारच्या किरणीयनांनी हिऱ्यांचा रंग कृत्रिम रीतीने बदलता येऊ शकतो. उदा., न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, आल्फा कण, गॅमा कण व किरणोत्सर्गी समस्थानिक (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे, तोच अणुक्रमांक पण भिन्न द्रव्यमानांक असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) ही किरणीयने आहेत. किरणीयनानंतर उष्णता संस्करण केल्याने फिकट पिवळ्या सापेक्षतः किंमत नसलेल्या हिऱ्याचे फिकट वा गडद हिरव्या खड्यात परिवर्तन होते. जर हा रंग नैसर्गिक असेल, तर हिरा मौल्यवान ठरतो. दुर्दैवाने अशा कृत्रिम रीतीने रंग आणलेला हिरा व नैसर्गिक रंगाचा हिरा वेगळा ओळखणे नेहमीच शक्य नसते.

 

संश्लेषण : (कृत्रिम हिरानिर्मिती) . स्वीडनमध्ये १९५५ साली प्रथम हिरे संश्लेषणाने बनविण्यात आले. तथापि ही बातमी अमेरिकेतील जनरल इलेक्ट्रिक कंपनीला याचे एकस्व (पेटंट) मिळेपर्यंत गुप्त ठेवण्यात आली.आवर्त सारणी तील ८ ते १० गटांमधीलसंक्रमणी मूलद्रव्यां मध्ये (उदा., लोह, निकेल) कार्बन विरघळतो, हे तत्त्व या आधीच्या प्रयोगांत वापरले होते. उच्च दाबांना (५०–६० किलोबार किंवा ५–६ गिगॅपास्काल) व उच्च तापमानांना (१,५००° से.) विरघळलेला कार्बन हिऱ्याच्या रूपात केंद्रकीभूत (स्फटिक केंद्रनिर्मिती झालेला) व स्फटिकीभूत होतो. १९६१ मध्ये आघात तरंगांच्या प्रयोगांमध्ये ग्रॅफाइटाचे थेट हिऱ्यात परिवर्तन करणे शक्य झाले. या प्रयोगांत ३०० किलोपास्कालपेक्षा अधिक क्षणिक दाब व सु. १,१००° से. तापमान होते. अशनींमधील हिऱ्यांच्या निर्मितीला यांसारखा नैसर्गिक आविष्कार कारणीभूत असल्याचे मानतात. 

 

नकली हिऱ्यांमध्ये काच, घनीय झिर्कोनिया किंवा स्ट्राँशियम टिटॅनेट ही हिराहीन द्रव्ये असतात. त्यामुळे ते नैसर्गिक हिऱ्यांसारखे (वा समरूप) नसतात. मात्र संश्लेषित हिरे नैसर्गिक हिऱ्यांशी समरूप असतात. या दोन्हींचे गुणधर्म (उदा., स्फटिक रचना, घनता) एकसारखे असतात. मात्र संश्लेषणाची व नैसर्गिक वृद्धीची प्रक्रिया भिन्न असल्याने त्यांच्या गुणधर्मांत अल्प फरक असू शकतात. अशा प्रकारे संश्लेषित हिरे पुष्कळ फिकट पिवळे असतात. कारण संश्लेषण कोठीत वातावरणातील नायट्रोजन हिऱ्यात समाविष्ट होतो. परिणामी बहुतेक संश्लेषित हिरे खल प्रकारचे असतात. संश्लेषित हिऱ्यांमध्ये धातूंची समाविष्टे असू शकतात. ते ज्यापासून वाढले त्यांच्या ?अभिवाहा चे निदर्शक असतात. यांपैकी निकेलाची सूक्ष्म समाविष्टे सामान्यपणे आढळतात. शिवाय विविध आकारांचे संश्लेषित हिरे तयार करता येत असले, तरी बहुतेक हिरे घन-अष्ट-फलकीय आकाराचे असतात. हा आकार नैसर्गिक हिऱ्यात जवळजवळ आढळतच नाही. सर्वसाधारणपणे संश्लेषित हिरे मोठ्या आकारमानाचे नसतात तर बहुतेकांचे आकारमान ०.१ मिमी. पेक्षा कमी असते. औद्योगिक शाणन कामांसाठी हे हिरे विस्तृत प्रमाणात रेव वा खर म्हणून वापरतात. रंगहीन रत्नाच्या गुणवत्तेचे हिरेही संश्लेषित करता येतात. मात्र यासाठी येणारा खर्च हा नैसर्गिक हिऱ्याच्या किमतीपेक्षा जास्त असतो. ११ कॅरेटपेक्षा मोठे संश्लेषित रत्नाच्या गुणवत्तेचे स्फटिक तयार केले आहेत. यामुळे संश्लेषित व नैसर्गिक हिऱ्यांमधील भिन्नता ओळखता येऊ शकते. 

 

उच्च दाब व तापमानाला हिरे वाढविण्याऐवजी १ वातावरणीय दाबापेक्षा कमी दाबाला व सु. १,०००° से. तापमानाला हिऱ्यांचे संश्लेषण करणे शक्य आहे. या प्रक्रियेत हिरा, सिलिकॉन, काच किंवा दुसरे कोणते तरी योग्य द्रव्य यांसारख्या आधारद्रव्यावर विपुल कार्बनाच्या बाष्पाद्वारे कार्बनाचा पातळ बहुस्फटिकी थर निक्षेपित होतो. या प्रकारचे संश्लेषणाचे सुरुवातीचे प्रयोग सु. १९६२ मध्ये करण्यात आले होते. मात्र १९६०–७० दरम्यान सोव्हिएट युनियनमध्ये तपशीलवारपणे हे काम करण्यात आले आणि त्यातून जपानमध्ये व नंतर जगभर असे अधिक जोमदार संशोधन करण्यात आले. हिऱ्याची पटले (फिल्म) अनेक प्रकारे वाढविता येऊ शकतात. उदा., सिलिकॉन आधारद्रव्यावर मिथेन व हायड्रोजन यांच्या मिश्रणापासून सु. ६.७ किलोपास्काल दाबाला व १,०००° से. तापमानाला ०.५ मिमी. पर्यंत आकारमानाच्या हिऱ्याचे स्फटिक तयार होऊ शकतात. औष्णिक दृष्ट्या प्रवर्तित रासायनिक बाष्प निक्षेपण हे या पद्धतीचे नाव आहे. परंतु इतर तंत्रेही वापरता येतात. उदा., आयनद्रायू (प्लाझ्मा) रासायनिक बाष्प आयन निक्षेपण आणि इलेक्ट्रॉन-शलाका निक्षेपण. या हिऱ्याच्या पटलांचे गुणधर्म नैसर्गिक हिऱ्याच्या गुणधर्मासारखे असतात. त्यांचा कठिनता व औष्णिक संवाहकता हे गुणधर्मही नैसर्गिक हिऱ्यासारखे असून ते हिऱ्याच्या पटलांच्या उपयोगाच्या दृष्टीने महत्त्वाचे गुणधर्म आहेत. 

 

उपयोग : साखरपुडा वा विवाहाच्या वेळी घालण्यात येणाऱ्या अंगठ्यांसारख्या दागदागिन्यांतील रत्न हा उपयोग वगळता हिऱ्याचे उद्योगधंद्यांत अनेक उपयोग होतात आणि हिरा हे मोक्याचे खनिज मानतात. नैसर्गिक व संश्लेषित हिऱ्यांचे अनेक उपयोग समतुल्य व एकसारखे आहेत. जगातील ५०% हिरे केवळ औद्योगिक उपयोगां-साठी योग्य असून दागदागिन्यांत ते अल्पप्रमाणात वापरले जातात. मुळात नैसर्गिक हिऱ्याचा भुगा करून विविध आकारमानांची चूर्णे तयार करतात. ही चूर्णे काचा, मृत्तिका वस्तू व द्रव्ये आणि लोहेतर धातू यांच्यासाठी शाणन व पॉलिश करणारी द्रव्ये म्हणून वापरतात. या नैसर्गिक हिऱ्यांमध्ये बोर्ट, कार्बोनॅडो व फ्रेमसाइट हे प्रकार येतात. धातूचे छिद्रक (गिरमिट) व सामत्याचे पुढचे पाते वा भोक पाडण्याचे लहान हत्यार वा बिट यांत हिऱ्याचे एकेकटे स्फटिक वा चूर्णे बद्ध करतात. दंतवैद्यकीय कामासारख्या उपयोगांत छोटे छिद्रक वापरतात. खनिज तेल व इतर खनिजांच्या छिद्रणामध्ये मोठे छिद्रक वापरतात. हिरे बसविलेली चाके काँक्रीट व घडीव दगड यांसारखी कठीण द्रव्ये कापण्यासाठी वापरतात. कधीकधी विविध उपयोगांमध्ये संश्लेषित हिरे वापरण्यासाठी प्राधान्य देतात. कारण संश्लेषित हिरा विशिष्ट आकारमानाच्या कणाएवढा वाढविता येतो. उलट नैसर्गिक हिऱ्याचे चूर्ण या दृष्टीने गैरसोयीचे ठरू शकते. चुरा केल्याने सुट्या कणांमध्ये अंगभूत भेगा वा तडे निर्माण होतात. त्यामुळे त्याचा वापरण्यासाठी असलेला कालावधी कमी होतो. 


डोळ्याच्या शस्त्रक्रियांमध्ये उष्णता शोषक हे संरक्षक साधन आणि इलेक्ट्रॉनिकी उद्योगात अर्धसंवाहक म्हणूनही हिरे वापरतात. प्रकाशकीय भिंगे, कॉम्पॅक्ट डिस्क (सी. डी.) व अगदी हिरे नसलेले जडजवाहीर यांच्यावर ओरखडे पडू नयेत यांसाठी संरक्षक आवरण म्हणून हिऱ्याच्या पटलांचा उपयोग होऊ शकेल. तसेच यंत्रांमधील धारवे, इलेक्ट्रॉनिकीमधील उष्णता शोषक व अर्धसंवाहक, उच्च रासायनिक संक्षारण (झीज) होणाऱ्या क्षेत्रांतील सर्वसाधारण अक्रिय आवरणे किंवा पृष्ठे ही हिऱ्याच्या संभाव्य उपयोगाची उदाहरणे आहेत. अवकाशयानामध्ये प्रकाशकीय गवाक्ष म्हणूनही नैसर्गिक हिरा वापरला आहे. 

 

नकली हिरे : नकली हिरे अस्सल हिऱ्यांसारखे दिसतात परंतु ते अस्सल हिऱ्यापेक्षा मऊ वा कमी कठीण असतात आणि त्यांच्यावर ओरखडे व झीज झाल्याच्या इतर खुणा दिसतात. स्पिनेल व झिर्कॉन या खनिजांच्या रंगहीन प्रकारांसारखी नैसर्गिक रत्ने नकली हिऱ्यांत येतात. हिऱ्यासारख्या दिसणाऱ्या द्रव्यांपासून काही नकली हिरे तयार करतात. काच, इट्रियम, ॲल्युमिनियम गार्नेट व घनीय झिर्कोनिया ही अशी द्रव्ये आहेत. घनीय झिर्कोनिया अस्सल हिऱ्यापासून वेगळा ओळखणे अवघड असते. तो वेगळा ओळखण्यासाठी रत्नपारखी कसोटीची (परीक्षण करण्याची) सामग्री वापरतात.

 

प्रसिद्ध हिरे : दुर्मिळ गुणवत्तेचे अनेक मोठे हिरे सरकारच्या वा राजघराण्याच्या मालकीचे आहेत. कुलिनन हा आढळलेला सर्वांत मोठा हिरा दक्षिण आफ्रिकेतील प्रेमियर खाणीतून १९०५ साली मिळाला. तेव्हा त्याचे वजन ३,१०६ कॅरट (सु. ०.६ किग्रॅ.) होते. तो ब्रिटिशांची वसाहत असलेल्या ट्रान्सव्हालच्या सरकारने खरेदी केला व इंग्लंडचे राजे सातवे एडवर्ड यांना दिला (१९०७). ॲम्स्टरडॅम येथील हिरे कापणाऱ्या कारागिरांनी चिरून (विभागून), कापून व पॉलिश करून याची ९ मोठी रत्ने व ९६ अधिक लहान खडे तयार केले. यांपैकी सर्वांत मोठा ५३० कॅरट वजनाचा स्टार ऑफ आफ्रिका (किंवा कुलिनन) हा जगातील एक सर्वांत मोठा हिरा आहे. 

 

जाँकर हा १९३४ साली इलांड्सफाँटेन येथे सापडलेला ७२६कॅरट वजनाचा हिरा जगातील सर्वाधिक शुद्ध हिरा मानला जातो. हा न्यूयॉर्क येथील हॅरी विन्स्टन इन्कॉर्पोरेशनने विकत घेतला. १९३५–३७ दरम्यान हा हिरा कापून १२ निर्दोष हिरे तयार करण्यात आले. त्यांपैकी सर्वांत मोठ्या हिऱ्याचे वजन १२५ कॅरट आहे. प्रेसिडेंट व्हारगस हा दक्षिण अमेरिकेत सापडलेला सर्वांत मोठा (७२७ कॅरट) हिरा ब्राझीलमधीलसान आंतोनिओ नदीत १९३८ मध्ये सापडला व त्याला कापून २९ खडे बनविण्यात आले. त्यांतील सर्वांत मोठा ४८ कॅरटचा आहे. स्टार ऑफ द साउथ हा ब्राझीलमध्ये बागाजेम खाणीत १८५३ मध्ये आढळलेला हिरा २६८ कॅरट वजनाचा होता व यापासून बनलेला तेजस्वी हिरा सु. १२९ कॅरटचा आहे. एक्सेलसियर हा दक्षिण आफ्रिकेतील यागर्सफाँटेन खाणीत १८९३ मध्ये आढळला. ९९५ कॅरटच्या या हिऱ्याचे कापून २१ हिरे बनविण्यात आले व त्यांतील सर्वांत मोठा सु. ७० कॅरटचा आहे. एक्सेलसियर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा, तर स्टार ऑफ सिएरा लिओन हा ९६९.८ कॅरटचा हिरा तिसऱ्या क्रमांकाचा आहे. जुबिली हा दक्षिण आफ्रिकेत १८९५ मध्ये आढळलेला ६५० कॅरटचा हिरा कापून २४५ कॅरटचा रत्न गुणवत्तेचा हिरा बनविला. राणी व्हिक्टोरियाच्या १८९७ च्या जुबिलीच्या (पन्नासाव्या वाढदिवसाच्या) सन्मानार्थ त्याला हे नाव दिले. टिफनी हा गडद पिवळा २८७ कॅरटचा कच्चा हिरा किंबर्ली खाणीत (दक्षिण आफ्रिका) आढळला. रत्न रूपातील त्याचे वजन १२८ कॅरट आहे. 

 

फ्लोरेन्टाइन हा भारतातील फिकट पिवळा १३७ कॅरटचा हिरा सतराव्या शतकाच्या सुरुवातीस टस्कनीच्या ड्यूककडे आला व तो ऑस्ट्रियाच्या राजमुकुटात वापरला होता. त्याचा ठावठिकाणा माहीत नाही. ग्रेट मोगल हा सु. १६५० मध्ये आढळलेला २८० कॅरटचा हिरा भारतात कापला गेलेला सर्वांत मोठा हिरा आहे. त्याचे मूळ वजन सु. ८०० कॅरट असू शकेल. तो सु. १६६५ मध्ये शेवटचा पाहण्यात आला होता. कदाचित तो कापून अधिक लहान खडे तयार केले असण्याची शक्यता आहे. कोहिनूर (प्रकाशपर्वत) हा सर्वांत जुना आढळलेला हिरा असून १३०४ सालापर्यंतचा त्याचा उल्लेख आढळतो. तेव्हा तो अल्लाउद्दीनाने माळव्याच्या राजाकडून घेतला. तो माळव्याच्या राजाकडे अनेक पिढ्या होता. तो अनेकांकडे जाऊन जेव्हा ब्रिटिशांनी पंजाब आपल्या साम्राज्याला जोडला त्या सुमारास म्हणजे १८४९ मध्ये ब्रिटिशांकडे आला. तो ब्रिटनमधील क्विन मदरच्या मुकुटात आहे. आधी त्याचे वजन १८६कॅरट होते. राणी व्हिक्टोरियाच्या आज्ञेने कापल्यावर त्याचे वजन १०८.९३ कॅरट झाले. त्याआधी तो अनेक शतके भारतीय व पर्शियन सत्ताधीशांकडे होता. ऑर्लोफ (ऑर्लोव्ह) हा २०० कॅरटचा हिरा रशियन सम्राज्ञी दुसऱ्या कॅथरीन यांच्यासाठी राजपुत्र ऑर्लोफ यांनी आणला होता व तो त्यांच्या मुकुटात बसविला. हा मोठा हिरा हिंदू मंदिरातील देवतेच्या एका डोळ्यातून काढून चोरून आणला असल्याचे म्हणतात. रीजंट (पूर्वीचा पिट) हिरा भारतातील असून हा जगातील सर्वांत सुंदर रीतीने कापलेला हिरा आहे. १७०१ मध्ये तो आढळला तेव्हा त्याचे वजन ४१० कॅरट होते. तो कापून तयार केलेला १४०.५० कॅरटचा हिरा फ्रान्सच्याशासनाला विकण्यात आला होता. आता तो पॅरिस येथील लूव्ह्र् संग्रहालयात ठेवला आहे. ४४.५ कॅरटचा निळा होप हिरा १९५८ मध्ये अमेरिकेतील स्मिथसोनियन इन्स्टिट्युशनच्या मालकीचा झाला. ४८ कॅरट वजनाचा सांकी हा भारतीय हिरा १७९२ मध्ये इतर हिऱ्यांबरोबर चोरीला गेला. ड्रेझ्डेन ग्रीन हा ४१ कॅरटचा हिरा भारतातील आहे. दक्षिणआफ्रिकेत आढळलेला अर्थ स्टार हा हिरा १११.५९ कॅरट वजनाचा बाउमगोल्ड (न्यूयॉर्क शहर) बंधूंच्या मालकीचा आहे. काँडे हा भारतात आढळलेला ५० कॅरट वजनाचा हिरा शँडिली (फ्रान्स) येथील काँडे संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. 

 

पहा : अपघर्षक अलंकार कठिनता कार्बन जडजवाहीर बहुरूपता रत्ने. 

 

संदर्भ : 1. Bruton, E. Diamonds, 1978.

           2. Davies, G. Diamond, 1984.

           3. Field, J. E., Ed., The Properties of Natural and Synthetic Diamonds, 1992.

          4. Gael, R. A. The Diamond Dictionary, 1977.

          5. Harlow, G. E., Ed., The Nature of Diamonds, 1997.

          6. Koskoff, D. The Diamond World, 1981.

         7. Orlov, Yu L. Mineralogy of the Diamond, 1977.

         8. Wilks, J. Wilks, E. M. Properties and Applications of Diamonds, 1991. 

ठाकूर, अ. ना.


 

काँडे कोहिनूर कुलिनन
     
     
टिफनी होप जुबिली
  संश्लेषित हिऱ्यांचे विविध रंग व आकार
  हिरेजडित आभूषणे