कॅबाझाइट : (चॅबाझाइट, अकॅडियालाइट). झिओलाइट गटातील खनिज. स्फटिक षट्कोणी-समांतरषट्फलकीय विषमत्रिभुजफलकी. स्फटिक घनासारखे दिसतात म्हणून पर्वी ह्याला घनीय झिओलाइट समजत असत [→ स्फटिकविज्ञान]. याच्या चापट भिंगागार स्फटिकांना फॅकोलाइट म्हणतात. बहुधा अन्योयवेशी यमल (एकमेकांत घुसलेले जुळे स्फटिक) आढळतात. पाटन (1011) अस्पष्ट [→ पाटन]. कठिनता ४ ते ५. वि. गु. २⋅०५ ते २⋅१५. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी. रंग पांढरा, पिवळा, मांसासारखा गुलाबी किंवा तांबडा रा. सं. (Ca, Na)2(Al2Si4O12). 6H2O. बहुधा कॅल्शियमाच्या जागी अल्पसे पोटॅशियम आलेले असते. हे द्वितीयक (नंतर तयार झालेले) खनिज इतर झिओलाइटांबरोबर बेसाल्टी खडकांतील पोकळ्यांत व कधीकधी पट्टिताश्मात आणि सुभाजातही आढळते. महाराष्ट्रामध्ये ते बऱ्याच ठिकाणी सापडते. हे ऋणायन-विनिमयाकरिता [धन विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट यांच्या विनिमयाकरिता, → आयन विनिमय], वायु शोषणासाठी व पाणी मृदू करण्यासाठी वापरतात [→ झिओलाइट गट]. रंग व आकारावरून प्लिनी यांनी किंमती खड्याच्या प्राचीन ग्रीक नावावरून ‘गारेसारखे’ या अर्थाचे कॅबाझाइट हे नाव दिले.

कॅबाझाइटचा स्फटिक

मेलिनाइट रासायनिक दृष्ट्या याच्यासारखे असते मात्र ते कमी प्रमाणात आढळते. मेलिनाइटचा रंग मांसासारखा आणि स्फटिक षट्कोणी असतात. मेलिनाइटात कॅल्शियमापेक्षा सोडियमाचे प्रमाण जास्त असल्याने पूर्वी त्याला सोडा कॅबाझाइट म्हणत.

ठाकूर, अ. ना.