गोंडाइट माला : भारतातील प्राचीन खडकांच्या एका गटाचे नाव. धारवाड कल्पात समुद्राच्या तळावर साचलेल्या मँगॅनीजयुक्त गाळाच्या खडकांचे गतिक रूपांतरण (प्रचंड दाबामुळे बदल) होऊन हे खडक तयार झालेले आहेत. मूळच्या गाळापैकी मातीच्या आणि वाळूच्या थरांपासून स्लेट, फिलाइट व अभ्रकी सुभाजा हे खडक आणि मँगॅनीजयुक्त पदार्थांपासून मँगॅनीजयुक्त ऑक्साइडी व सिलिकेटी खनिजे तयार झाली.

गोंडाइट हा खडक मुख्यतः स्पेसर्टाइट म्हणजे मँगॅनीजयुक्त गार्नेट [Mn3Al2(SiO4)3], क्वॉर्ट्‌झ व थोडे ॲपेटाइट यांचा बनलेला असतो. त्याच्यात फेल्सपार नसते. त्याच्या काही प्रकारांत कमी अधिक रोडोनाइट (MnSiO3) किंवा इतर मँगॅनीज खनिजे असतात. रोडोनाइट खडक जवळजवळ सर्वस्वी रोडोनाइटाचा बनलेला असतो. गोंडाइट हे नाव आदिवासी गोंड जमातीच्या नावावरून आले असून या मालेचे खडक मुख्यतः मध्य प्रदेशातील छिंदवाडा, बालाघाट व सिवनी, महाराष्ट्रातील नागपूर व भंडारा येथे व क्वचित गुजरातेत (पंचमहालात), ओरिसात व बिहारात आढळतात.

गोडाइट मालेपासून मँगॅनिजाची धातुके (कच्ची धातू) फार मोठ्या व इतर कोणत्याही शैलसमूहाच्या मानाने अधिक प्रमाणात मिळत असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या ही माला फार महत्त्वाची आहे. बालाघाटापासून तो नागपूरपर्यंत पसरलेल्या पट्ट्यातील गोंडाइटी खडकांत मँगॅनिजाच्या धातुकाचे प्रचंड साठे आहेत. ब्रॉनाइट, सिलोमेलेन, पायरोल्यूसाइट, सितापराइट व व्रेडेनबर्गाइट ही मँगॅनिजाची गोंडाइटी मालेत आढळणारी मुख्य धातुके होत. त्यांचे नियमित किंवा अनियमित पट्टे किंवा थर त्यांच्या जोडीने असणाऱ्या फिलाइट, सुभाजा खडकांत आढळतात. या धातुकांपैकी काही धातुके मूळच्या खडकांतील मँगॅनिजाच्या ऑक्साइडाचे केवळ संपीडन होऊन (दाबली गेली जाऊन) तयार झालेली आहेत व काही धातुके मँगॅनिजाच्या सिलिकेटी खनिजात रासायनिक फेरफार होऊन व त्यांचे ऑक्साइडात परिवर्तन होऊन तयार झालेली आहेत. 

पहा : मँगॅनीज. 

केळकर, क. वा.