क्रिसोबेरील : (सायमफेन). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी वडीसारखे व त्यांच्या पृष्ठांवर लांबीच्या दिशेला समांतर रेखा असतात. यमलन (जुळे स्फटिक)  बहुधा असते व यमलन पृष्ठ सामान्यतः (130) असते. पुष्कळदा पुनरावृत्त यमलनामुळे स्फटिक छद्मषट्‌फलकीय दिसतात. संस्पर्शी आणि अन्योन्यवेशी (एकमेकांत घुसलेले) यमलनही असते. यमल स्फटिकांच्या पृष्ठावरील रेखांकन पिसांप्रमाणे दिसते

क्रिसोबेरिलाचा छद्मषट्फलकीय स्फटिक.

[→ स्फटिकविज्ञान]. पाटन : (110) स्पष्ट. भंजन खडबडीत ते शंखाभ. कठिनता ८·५ वि. गु. ३·६५ – ३·८०. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी. हिरव्या, उदी, पिवळ्या या रंगांच्या विविध छटा. कस रंगहीन. रा. सं. BeAl2O4. रसायनिक सूत्रावरून हे स्पिनेलाप्रमाणे घनीय वाटत असले, तरी बेरिलियम आयनाच्या (विद्युत् भारित अणूच्या) लहान आकारमानामुळे ते समचतुर्भुजी आहे. ग्रॅनाइट, पेग्मटाइट, ॲप्लाइट, अभ्रकी सुभाजा इ. खडकांमध्ये व पुष्कळदा नदीच्या वाळूतही असते. ब्राझील, श्रीलंका, मॅलॅगॅसी, रशिया, प. जर्मनी, इटली, जपान, ऱ्होडेशिया इ. देशांत व भारतातील रजास्थान (किशनगढ), तमिळनाडू (कोईमतूर) व केरळ या राज्यांत हे सापडते. याचा रत्न म्हणून उपयोग होतो. ⇨ मार्जारनेत्री  आणि पाचूसारखे हिरवे अलेक्झांड्राइट हे याचे प्रकार अतिशय मौल्यवान आहेत. सोनेरी वैदूर्य (बेरील) अशा अर्थावरून क्रिसोबेरील नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.