डोलेराइट : सिलिका कमी असलेल्या म्हणजे अल्पसिकत मध्यमकणी अग्निज खडकांचे सामान्य नाव. अमेरिकेत यालाच डायाबेस म्हणतात आणि प्रत्यक्ष क्षेत्रात हा ग्रीनस्टोन म्हणून ओळखला जातो. प्लॅजिओक्लेज (लॅब्रॅडोराइट) व ऑजाइट ही याची आवश्यक खनिजे असून पुष्कळदा यात मॅग्नेटाईट, इल्मेनाइट, कधीकधी कृष्णाभ्रक, ऑलिव्हीन व पायराइट आणि क्वचित क्वॉर्ट्झ वा नेफेलीन व काच असते. हा रंगाने काळपट असून त्याच्यातील कण गॅब्रोपेक्षा लहान व बेसाल्टातील कणांहून मोठे असतात. याचे वयन (पोत) सर्पचित्रित (ऑजाइटाच्या कणांत प्लॅजिओक्लेजाचे स्फटिक असणारे) किंवा कणाभ्यंतरीय (प्लॅजिओक्लेजाच्या स्फटिकात ऑजाइटाचे कण असणारे) असते. वातावरणक्रियेमुळे याच्यात बदल होऊन प्लॅजिओक्लेजापासून सॉस्युराइट, ऑजाइटाचे हॉर्नब्लेंड, ऑलिव्हिनाचे सर्पेंटाइन असे बदल होतात. अशा बदललेल्या खडकांना ब्रिटनमध्ये डायाबेस म्हणतात. याच्या राशी लहान व उथळ असतात. हा मुख्यतः शिलापट्ट, भित्ती, चादरी, लॅकोलिथ यांसारख्या गौण अंतर्वेशनांच्या (घुसलेल्या राशींच्या) रूपात आढळतो. हा चिवट व डांबराशी चांगला एकजीव होत असल्याने रस्त्यासाठी याची खडी वापरतात. तसेच रस्त्याच्या कडेच्या संरक्षक दगडांसाठीही याचा उपयोग करतात. याच्या घटकांमध्ये भेद करणे अवघड असल्याने किंवा खऱ्या ग्रीनस्टोनाशी याचा घोटाळा होत असल्याने फसवा या अर्थाच्या जर्मन शब्दावरून आर्. जे. हॉय यांनी हे नाव दिले.

ठाकूर, अ. ना.