आवरणशिला : वातावरणाच्या क्रियेने विघटन (तुकडे होणे) किंवा अपघटन (रासायनिक दृष्ट्या घटक वेगळे होणे) होऊन तयार झालेल्या चुऱ्याचा अंश मूळ जागीच साचत राहून किंवा वारा, वाहते पाणी किंवा हिम, गुरुत्वाकर्षण इत्यादींमुळे वाहत आलेला चुरा किंवा अग्निदलिक (ज्वालामुखीद्वारे तयार झालेले) पदार्थ साचून त्यांनी कित्येक प्रदेशांतील मूळचे खडक (आधारशैल) झाकले जातात. आधारशैलांना झाकणाऱ्या अशा पदार्थांच्या राशींना आवरणशिला म्हणतात. उदा., प्राथमिक (आद्य) जांभ्याच्या किंवा कड्यांच्या पायथ्याशी साचलेल्या डबराच्या किंवा नद्यांचे गाळ ठिकठिकाणी साचून तयार झालेल्या वाळूच्या किंवा किनाऱ्यावरील व वाळंवटातील वाळूच्या राशी. आवरणशिलांवर नैसर्गिक क्रिया होऊन शेतजमिनी तयार होतात.

पहा : गाळाचे खडक.

ठाकूर, अ. ना.