स्मिथसोनाइट : जस्ताचे हे खनिज पूर्वी जस्त धातू मिळविण्यासाठी वापरीत. त्याचे स्फटिक समांतरषट्फलकीय अथवा विषम त्रिभुजफलकी समूहाचे असून ते लहान असतात [⟶ स्फटिकविज्ञान ]. ते बहुधा मूत्रपिंडाकार व कधीकधी गुच्छाकार, झुंबराकार, स्फटिकी पुटे व मधमाश्यांच्या पोळ्यासारखे पुंज असतात. सुकलेल्या हाडांसारखे दिसतात म्हणून खनिजाला ड्राय-बोन ओअर ( धातुक ) म्हणतात . तसेच कणमय ते मातकट रूपात आढळते. त्याचे पाटन समांतरषट्फलकीय (1011) परिपूर्ण पण क्वचित आढळते. कठिनता ४—४.५ ( कार्बोनेटाच्या दृष्टीने उच्च ) दुधी काचेप्रमाणे पारभासी वि. गु. ४.३०—४.४५ चमक काचेसारखी रंग बहुधा ओंगळ उदी, शिवाय रंगहीन, पांढरा, हिरवट, निळसर, गुलाबी पिवळ्या प्रकारात कॅडमियम असून त्याला टर्की-फॅट ओअर म्हणतात. कस पांढरा रा. सं. ZnCo3. कधीकधी जस्ताची जागा फेरस लोहाने किंवा द्विसंयुजी मँगॅनिजाने आणि क्वचित कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॅडमियम, तांबे, कोबाल्ट व शिसे यांनी घेतलेली असते. [ खनिजविज्ञान ].

स्मिथसोनाइट अगलनीय असून ते थंड हायड्रोक्लोरिक अम्लात फसफसून विरघळते. अम्लांमधील फसफसणे, जस्तदर्शक परीक्षा, कठिनता व उच्च वि. गु. यांमुळे ते वेगळे ओळखता येते.

बहुधा स्मिथसोनाइट चुनखडकांतील जस्ताच्या निक्षेपांच्या ऑक्सिडीभूत पट्ट्यात आढळते. त्याच्या जोडीने स्फॅलेराइट, गॅलेना, हेमिमॉर्फाइट, सेर्‍युसाइट, कॅल्साइट व लिमोनाइट ही खनिजे आढळतात. स्मिथसोनाइट कधीकधी कॅल्साइटाच्या छद्मरूपात आढळते. जस्ताच्या प्राथमिक खनिजांत बदल होऊन त्याचे द्वितीयक खनिज तयार होते. ते लॉरियम ( ग्रीस शोभिवंत प्रकार ), सार्डिनिया ( इटली पिवळा झुंबराकार प्रकार ) आणि ब्रोकन हिल खाण, नॉर्दर्न र्‍होडेशिया व नैर्ऋत्य आफ्रिका ( सूक्ष्मस्फटिक प्रकार ), बिटॉम व टारनुव्हस्की ( पोलंड ) आणि लेडव्हिल ( कोलोरॅडो, अमेरिका ) येथेआढळते. १८८०—९० पर्यंत ते जस्ताचे मुख्य धातुक ( कच्च्या रूपातील धातू ) होते नंतर जस्त स्फॅलेराइटापासून मिळविण्यात येऊ लागले.

पूर्वी स्मिथसोनाइट याला कॅलॅमीन म्हणत. मात्र म स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशनचे संस्थापक जेम्स स्मिथसन या खनिजवैज्ञानिकांच्या नावावरून त्याला स्मिथसोनाइट हे नाव पडले. याशिवाय त्याला झिंक स्पार असेही म्हणतात.

ठाकूर, अ. ना.