पुरापरिस्थितीविज्ञान : पुराजीवविज्ञानाची ही एक प्रमुख शाखा आहे. या शाखेत जीवाश्म (गतकालीन जीवांचे शिळारूप अवशेष) व त्यांच्या आपापसांतील आणि तत्कालीन अधिवासांबरोबरच्या परस्परसंबंधांचा अभ्यास केला जातो. थोडक्यात ही शाखा कोट्यवधी वर्षांपूर्वीच्या ⇨ परिस्थितिविज्ञानाचाच अभ्यास करते. अर्थात ह्या अभ्यासात हाती येणाऱ्या पुराव्यांवरून निष्कर्ष, अनुमाने इ. काढताना एक तत्त्व आधारभूत मानले जाते आणि ते म्हणजे ‘हल्लीचे प्राणी व वनस्पती ज्या परिस्थितीत राहत आहेत त्याच परिस्थितीत त्यांचे पूर्वज राहत असावेत’, हे होय. ह्या विज्ञानशाखेचा प्रमुख उद्देश आजच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून गतकालांतील परिस्थिती व तीतील स्थित्यंतरे ह्यांच्याशी तत्कालीन जीव कसे जुळवून घेत असत व त्यातून ⇨ क्रमविकास (उत्क्रांती) कसकसा घडत गेला, हे पाहणे हा होय.

परिस्थितिविज्ञानात जसा निरनिराळ्या प्रकारच्या पर्यांवरणांचा अभ्यास केला जातो (उदा., जमीन, गोडे पाणी, सागरी पर्यावरण इ.), तसाच ह्याही शाखेत केला जातो. तथापि पुरापरिस्थितिविज्ञानविषयक अभ्यासात पुरावेवजा वापरले जाणारे बहुसंख्य जीवाश्म सागराच्या गाळातील असल्याने या शाखेत स्वाभाविकच सागरी पर्यावरणाच्या अभ्यासास विशेष करून प्राधान्य दिले जाते.

पुरापरिस्थितिविज्ञानविषयक काही निरीक्षणांचे लेखी उतारे सर्व प्रथम ग्रीकांनी इ. स. पू. पाचव्या शतकाअखेर केल्याचे आढळते. तदनंतर सु. १,९०० वर्षांनी लिओनार्दो दा व्हींची (१९५२–१५१९) यांनी प्राण्यांच्या कवचांच्या जीवाश्मांच्या साहाय्याने ते कोणत्या परिस्थितीत गाडले गेले असावेत ह्याचे परिकल्पन केले. ह्या शाखेच्या अभ्यासास खरी सुरुवात अठराव्या व एकोणिसाव्या शतकांत झाली असे मानले जाते. पुरापरिस्थितिविज्ञाविषयक अभ्यासाचा आणि संशोधनाचा पाया एल‌्. एफ‌्. मार्सील्यी (१६५८–१७३०) ह्या इटालीयन, आंरी मिल्नेद्वार्स(१८००–८५) ह्या फ्रेंच व ई. फॉर्ब्झ (१८१५–५४) ह्या इंग्लिश शास्त्रज्ञांनी घातला, तर ओ. कव्हल्येव्हस्कइ (१८४२–८३) ह्या रशियन शास्त्रज्ञांनी जीवाश्मांचा आणि विशेषतः तृतीय कल्पातील (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील)भूचर सस्तन प्राण्यांचा परिस्थितीविज्ञानात्मक, कार्यात्मक व क्रमविकासाच्या दृष्टिकोनांतून सखोल अभ्यास केला व ह्या शाखेच्या अभ्यासात मौलिक भर टाकून तिला योग्य महत्त्व प्राप्त करून दिले.

आधुनिक परिस्थितिविज्ञानाच्या अभ्यासात वापरावयाच्या पद्धती ह्या शाखेच्या अभ्यासातही वापराव्या लागतात. उदा., तत्कालीन परिस्थितीचा व अधिवासांचा प्राकृतिक, भौगोलिक, भौतिकीय, रासायनिक इ. दृष्टिकोनांतून अभ्यास करावा लागतो. जीवाश्मांच्या साहाय्याने वनस्पती व प्राणी ह्यांचे प्रकार, संख्या, विपुलता, आकारमान, संभाव्य कालखंड इत्यादी तपशीलवार माहिती गोळा करवी लागते. जीवाश्मांच्या आकारावरून (आकृतीवरून) जीव खोलवर राहणारे होते की तलप्लावी (पृष्ठभागावर तरंगणारे) होते, त्यांच्या संचलनाच्या पद्धती काय होत्या इ. अंदाज बांधवे लागतात. ह्या शाखेच्या अभ्यासात अनेक संज्ञाही वापराव्या लागतात. उदा.,जीवाश्मांच्या समूहास मृतांचा समूह असे सर्वसाधारणपणे मानून ‘थॅनॅटोसेनोझ’ म्हटले जाते. अभ्यासातील पुराव्यात जीवाश्म, जीवाश्म असलेले खडक, गाळ ह्यांचा स्वतंत्र किंवा एकत्रित विचार करून परिकल्पन, तर्क इ. करून अनुमाने काढावी लागतात. ह्या माहितीवरून तत्कालीन परिस्थिती कशी असावी, प्रजीवांचे एकूण परस्परसंबंध कसे असावेत ह्यांविषीयी शास्त्रीय दृष्टिकोनातून अनुमान काढणे ही अतिशय अवघड कामगिरी ह्या शाखेच्या अभ्यासकांना करावी लागते. त्रोटक उपलब्ध पुरावे एकाच ठिकाणी गाडले गेल्याने निरनिराळ्या परिस्थितीत राहणाऱ्या जीवांचे एकत्रित आढळणारे अवशेष ह्यामुळेही हे काम अधिक अवघड होते. असे असले, तरी परिस्थितिविज्ञानात व क्रमविकासात ह्या शाखेच्या अभ्यासाने मोलाची भर पडते ह्यात शंका नाही.

 परांजपे, स. य.

पुरापरिस्थितीविज्ञानाची रूपरेखा, स्वरूप व व्याप्ती यांविषयीचे वर्णन वर आले आहेच. या विज्ञानातील माहितीचा अर्थ लावणाऱ्या पद्धती समजण्याच्या दृष्टीने पुढे काही उदाहरणे दिली आहेत.

ग्रॅप्टोलाइट : या प्राण्यांच्या जीवाश्मांच्या माहीत असलेल्या आढळांवरून त्यांचे विशेष निवडक असे गाळाच्या खडकांचे एखादे पर्यावरण असल्याचे दिसत नाही. कारण ते कधीकधी वालुकाश्म, शेल (एक खडक) व विशेष कार्बनयुक्त नसलेला चुनखडक यांच्यात आढळतात आणि काही बाबतींत ते प्राण्यांच्या इतर गटांच्या जीवाश्मांबरोबर आढळतात. तथापि त्यांची सर्वांत सामान्य आढळण्याची रीती म्हणजे ते कार्बनयुक्त काळ्या शेलांमध्ये आढळतात या शेलांत बऱ्याचदा् पुष्कळ प्रमाणात लोह सल्फाइड असते व रॅब्डोसोम [ग्रॅप्टोलाइट निवहाचा म्हणजे समूहाचा एकून सांगाडा ⇨ ग्रॅप्टोलाइट] नेहमी शेलांच्या पत्रणपृष्ठाला (पापुद्र्यांच्या पातळीला) अनुसरून आडवे पडलेले असतात तसेच ग्रॅप्टोलाइटांबरोबर प्राण्यांच्या इतर गटांचे जीवाश्म आढळत नाहीत.

ज्यांच्याच ग्रॅप्टोलाइटांचे जीवाश्म आढळतात ते शेल खडक सूक्ष्मकणी असतात यावरून जेथे प्रवाहाचा खळबळाट वा परिणाम जाणवत नाही अशा संथ पाण्यात हे खडक साचले असल्याचे सूचित होते. खोल पाण्याची परिस्थिती किंवा सागरांतर्गत अडथळे यामुळे महासागरातील प्रवाहांचा परिणाम या भागावर झाला नसावा. शेलातील पत्रणपृष्ठाला समांतर व सपाट स्थितीत आढळणाऱ्या रॅब्डोसोमांवरून ग्रॅप्टोलाइट स्थानबद्ध नीतलस्थ प्राणी म्हणून राहत नव्हते, तर तरंगत्या निवहांच्या रूपात राहत होते, असे दिसते. तरंगण्याकरिता त्यांचे दूरस्थ टोक तरंगणाऱ्या समुद्रतृणांना जोडलेले असे किंवा त्यांची तरंगण्याची कोणती तरी यंत्रणा होती (उदा., काही द्विश्रेणी ग्रॅप्टोलाइटांच्या दूरस्थ टोकाशी विकसित झालेली तथाकथित तरणी) अथवा सच्छिद्र किंवा वायुयुक्त ऊतके (समान रचना व कार्य असणारे पेशीसमूह) तयार होऊन रॅब्डोसोमांना उत्प्लावकत प्राप्त होत असे आणि मृत्यूनंतर ते बुडून समुद्राच्या तळावर जाऊन पडत. ज्या समुद्रतृणांना ग्रॅप्टोलाइट चिकटलेले असत, ती तृणेही वरचेवर बुडून समुद्राच्या तळावर जाऊन पडत. ग्रॅप्टोलाइटयुक्त शेलांमधील कार्बनयुक्त द्रव्य याच तृणांपासून मिळाले असून तेथील विशिष्ट प्रकारच्या यूक्झिनिक परिस्थितीत तृणांमुळेच शेलांचा खास काळा रंग आला आहे (खोल किंवा बंदिस्त म्हणजे अडथळे असलेल्या समुद्राच्या भागात जड वा दाट खारे पाणी खाली जात असते, तेथे ऑक्सिजनाचा अभाव असतो आणि काळा व विपुल सल्फाइड असलेला चिखल तयार होत असतो या वैशिष्ट्यपूर्ण स्थितीला यूक्झिनिक परिस्थिती म्हणतात). ग्रॅप्टोलाइटयुक्त शेल जेथे साचले त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती, हे त्यांच्यातील  लोह सल्फाइडावरूनही सूचित होते. समुद्रतृण व इतर जैव द्रव्ये यांच्यामुळे अशी परिस्थिती उद्‌भवली असली पाहिजे. सागराच्या अशा बंदिस्त (संरक्षित) भागांत हे जैव द्रव्ये बुडून खाली जात असते. तेथील पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन सुमुद्रतृण व इतर जैव द्रव्यांद्वारे वापरला जातो. समुद्रतृण व जैव द्रव्य तेथे पुन:पुन्हा येत राहत येत राहत असल्याने ऑक्सिजन अभावाची स्थिती टिकून राहते. लोह सल्फाइड हे यूक्झिनिक पर्यावरणाचा पुरावा तर आहेच, शिवाय शेलांचा काळा रंगही थोड्या प्रमाणात त्यामुळे आला असला पाहिजे. ग्रॅप्टोलाइटयुक्त शेलांमध्ये इतर प्राण्यांचे जीवाश्म नसतात. या अपूर्व गोष्टीचे स्पष्टीकरणही यूक्झिनिक पर्यावरणाच्या साहाय्याने देता येते. कारण हे पर्यावरण जीवांना अनुकूल तर नव्हतेच पण मारकही होते आणि त्यामुळे प्राणी या भागापासून दूर राहीले.


ज्या पर्यावरणीय परिस्थितीत ग्रॅप्टोलाइट राहिले असतील, ज्या स्थितीत ते बुडून खाली सागरतळावर जाऊन पडले असतील आणि पुरले जाऊन जीवाश्म म्हणून टिकून राहिले असतील त्या पर्यावरणीय व्यवस्थेचे चित्र वर उल्लेखिलेल्या बाबींनी रेखाटता येते.

ग्रॅप्टोलाइट निवहांच्या तरंगण्याच्या सवयीद्वारे त्यांच्या विस्तृत प्रसाराचेही (फैलावाचेही) स्पष्टीकरण करता येते. त्यांचा प्रसार महासागरातील प्रवाहांनी झाला असला पाहिजे. ग्रॅप्टोलाइटांच्या आढळांच्या पुराव्यांचा काळजीपूर्वक विचार केला, तर त्याची ग्रॅप्टोलाइटांच्या प्रसाराला कारणीभूत झालेल्या महासागरी प्रवाहांच्या प्रसारांची रीती समजून घेण्यास मदत होईल. [→ ग्रॅप्टोलाइट].

प्रवाळभित्ती : भित्ती निर्माण करणाऱ्या पोवळ्यांच्या पॉलिपांना (निवहातील व्यक्तिगत जींवांना) स्थिरावण्यासाठी खडकाळ तळ, दगडगोटे अथवा स्थानबद्ध प्राण्यांच्या सांगाड्यांचे कठीण भाग यांसारख्या एखादा आधार स्तर आवश्यक असतो व मुक्त डिंभावस्थेच्या (स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या व प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील असलेल्या अवस्थेच्या) काळात पोवळ्यांचा महासागरातील प्रवाहाद्वारे प्रसार होतो. बारीक वाळू चिखल व गाळवट यांपासून पोवळी दूर राहतात. ज्यात ऑक्सिजन व पोषक द्रव्ये (मुख्यत्वे प्राणि-प्लवक म्हणजे पाण्यावर तरंगणारे सूक्ष्म प्राणी) विपुल असतात, असे पाणी पोवळ्यांना आवश्यक असते. प्राणि-प्लवकांवरून पाण्याचे चांगले अभिसरण होत असल्याचे सूचित होते. ही पोवळी पृष्ठभागापासून ९० मी. खोलीपर्यंत आढळतात परंतु त्यांपैकी बहुसंख्य ५० मी. खोलीपर्यंत आढळतात आणि त्यांना सर्वांत अनुकुल परिस्थिती २० मी. खोलीपर्यंत असते. ही पोवळी लवणतेच्या विस्तृत पल्ल्यात जगू शकत असली, तरी त्यांची चांगली भरभराट होण्यांसाठी पाण्याच्या एक हजार भागांमागे लवणाचे सु. ३६ भाग इतक्या लवणतेचे पाणी सर्वांत अनुकूल असते. त्यांच्या वाढीकरिता भरपूर सर्यप्रकाश आवश्यक असून त्यांना गढूळपणा सहन होत नाही. १५ से. कमी व ३६ से.पेक्षा जास्त तापमानात ही पोवळी जगू शकत नाहीत. त्यांच्यापैकी बहुतेक पोवळी १८ से. पेक्षा जास्त तापमानात चांगली जगू शकतात परंतु २५ से. ते २९ से. हा तापमानाचा पल्ला त्यांच्या विपुल वाढीसाठी सर्वाधिक अनुकूल असतो.

या पोवळ्यांच्या सध्याच्या वाटणीच्या संदर्भात पाहिल्यास वरील भौतिक घटकांच्या मर्यादा पोवळ्यांच्या वाढीवर व प्रसारावर पडत असतात, मात्र ही पोवळी जेव्हा मध्य ट्रायसिक काळात (सु. २३ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळाच्या मध्यास) अवतरली तेव्हा त्यांना ज्या परिस्थितीमध्ये जगावे व जीवनासाठी झगडावे लागले असेल, ती परिस्थिती आताच्या वर वर्णिलेल्या परिस्थितीहून फार वेगळी नसावी.

आता आपल्याला माहिती आहे तशा खऱ्या भित्ती ही पोवळी त्यांच्या प्रारंभीच्या काळात निर्माण करू शकली नसावीत किंवा त्या त्यांनी निर्मिल्या नाहीत परंतु त्यांनी लहान प्रवाल किनारे व पट्टे तयार केले होते. जसजशी पोवळ्यांच्या नवनव्या जातींची भर पडत गेली व काळ लोटत गेला तसतशी खऱ्या भित्ती निर्माण करण्याची क्षमता व सवय पोवळ्यांमध्ये येत गेली. स्थूलमानाने पाहता भित्ती निर्मिण्याची क्षमता व सवय उत्तर ट्रायसिक, मध्य उत्तर जुरासिक (सु. १८·५ ते १५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या), पूर्व क्रिटेशस व क्रिटेशसच्या (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) शेवटी, ऑलीगोसीन (सु. ३·५ ते २ कोटीवर्षांपूर्वीच्या), मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) व प्लाइस्टोसीन (सु. ६ लाख ते ११ हजार वर्षांपूर्वीच्या) या काळांमध्ये विशेषत्वाने असल्याचे दिसून येते. हा विकास टेथिस समुद्राच्या दोन्ही बाजूंना विस्तृत प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. उदा., दक्षिण यूरोप व उत्तर आफ्रिका, तसेच याच्या पुढील शाखा : उत्तरेस रशियात व इंग्लंडमध्ये गेलेली पश्चिमेला मेक्सिको- फ्लाॅरिडा-व्हेनेझुएला हा भाग व उष्ण कटिबंधीय अटलांटिकमध्ये गेलेली आणि पूर्वेस मध्यपूर्व, भारत, हिंदी महासागरातील २६ दक्षिण अक्षांशापर्यंचा भाग, चीनचा समुद्र, उष्ण कटिबंधीय पॅसिफिक ते ऑस्ट्रेलिया व पुढे पनामाचा उपसागर ते कॅलिफोर्नियाच्या आखातापर्यंत गेलेली शाखा. मायोसीन काळापासून प्रवलभित्तीचे सध्याचे पुढील दोन प्रदेश (क्षेत्रे) प्रस्थापित होण्याची वाढती प्रवृत्ती दिसून येते : (१) कॅरिबियन प्रदेश : मेक्सिको, फ्लॉरिडा, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग व गिनीचे आखात यांच्या किनाऱ्यालगतचा कॅरिबियन समुद्र आणि (२) इंडो-पॅसिफिक प्रदेश :  तांबडा समुद्र, इराणचे आखात, भारत, २६ दक्षिण अक्षांशापर्यंतचा हिंदी महासागराचा भाग, ईस्ट इंडीज, चीनचा समुद्र, पॅसिफिकचा उष्ण कटिबंधीय प्रदेश, ऑस्ट्रेलिया ते पनामाचा उपसागर व कॅलिफोर्निया आखाताचा दक्षिण भाग.

या अल्पशा मर्यादित पर्यावरणीय पट्ट्यात सध्याच्या प्रवलभित्ती वाटल्या गेल्या आहेत, त्यावरून प्राचीन प्रवालभित्ती ज्या संभाव्य परिस्थितीत निर्माण झाल्या असतील, ती परिस्थिती मूलतः आताच्या परिस्थितीसारखी असावी व तिच्यासंबंधीची कल्पना हल्लीच्या प्रवालभित्तींच्या वाटणीवरून येते. पृथ्वीच्या इतिहासात भिन्नभिन्न काळी अशा प्रकारची पुरापरिस्थितिवैज्ञानिक व्यवस्था ज्या पट्ट्यात घडून आली होती, ते

पट्टेही आताच्या प्रवालभित्तींच्या वाटणीवरून सूचित केले जातात [⟶ पोवळे प्रवाळद्वीपे व प्रवाळशैलभित्ती].

 ऑयस्टर किनारे(किंवा भित्ती) : हल्लीचे ⇨ ऑयस्टर प्राणी महासागरांतील पुष्कळ बेटांभोवती तसेच अंटार्क्टिका वगळता सर्व खंडांत आढळतात आणि ध्रुवीय प्रदेशाचा अपवाद सोडता ते विविध प्रकारच्या जलवायुमानांमध्ये (दीर्घकालीन सरासरी हवामानांमध्ये) राहतात. ग्रिफीइडी कुलातील प्राण्यांसारखे काही ऑयस्टरांचे गट महासागरातील लवणतेच्या परिस्थितीत राहत आहेत परंतु काही ऑस्ट्रिइडी कुलासारख्य़ा गटांतील प्राण्यांचे नदीमुख व सिंधुतडाग (ज्यात समुद्राचे पाणी वाहून येत असे उथळ तळे) येथील मचूळ पाण्याच्या स्थितीशी अनुकूलन झाले आहे म्हणजे या परिस्थितीशी त्यांनी जुळवून घेतले आहे.

ऑयस्टरांची डिंभावस्था ३२ दिवसांची किंवा काही बाबतींत ५० दिवसांची असते आणि या मुक्त डिंभावस्थेच्या काळात मुख्यतः समुद्रातील प्रवाहांद्वारे त्यांचा प्रसार होतो. वाळूचे किनारे वा दगडगोटे यासारख्या घट्ट आधार स्तरावर डिंभ स्थिरावतात स्थिरावण्याच्या व भरभराटीच्या दृष्टीने सैलसर मृत्तिकामय आधार स्तर त्यांना अनुकूल नसतो. ऑयस्टरांचे डिंभ मृदुकायसारख्या (मॉलस्कसारख्या) प्राण्यांच्या कवचांवरही स्थिरावतात. अशा कवचांतील आश्रयी प्राण्यांच्या हालचालींमुळे व स्थलांतरणाद्वारे ऑयस्टर डिंभाचा प्रसार होतो.

उघडे महासागर, लवणता व काही ठराविक तापमान-पल्ल्याच्या पलीकडचे तापमान हे ऑयस्टरांचा प्रसार होण्यामधील अडथळे आहेत. उदा., अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंना विस्तृत किनारा आहे. तरीही ऑयस्टरांचे एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे स्थलांतर होण्यास हा महासागरच एक अडथळा आहे. ऑयस्टरांना अटलांटीक महासागर सरळ पार करून जाता येत नाही किंवा किनाऱ्याकिनाऱ्याने जाऊन महासागर बाजूला टाकता वा  टाळता येत नाही. कारण त्याच्या दक्षिण व उत्तर भागांमधील तापमान ऑयस्टरांना सहन होण्यासारखे नाही. मात्र जर एखादा द्वीपसमूह एकाच जलवायुमानीय व लवणतेच्या पट्ट्यात येत असेल, तर अशा द्वीपसूहात ऑयस्टरांचा प्रसार एका बेटांतून होऊ शकतो.


ऑयस्टरांची वाढ व भरभराट यांचे नियंत्रण हिवाळ्यातील व उन्हाळ्यातीलही तापनमानाच्या पल्ल्याद्वारे होत असते. उदा., क्रॉसोस्ट्रिआच्या ठराविक जाती ऑस्ट्रिआच्या जातींपेक्षा तापमानाच्या अधिक विस्तृत बदलांमध्ये टिकून राहू शकतात, असे हल्लीच्या निरीक्षणांवरून दिसून येते. तसेच ऑस्ट्रियाला अधिक एकसारख्या तापमानाच्या परिस्थितीची आवश्यकता असते. क्रॉसोस्ट्रिआ व्हर्जिनिका ही जाती पाण्याच्या १,००० भागांत ७·५ लवणाचे भाग इतकी लवणता असताना प्रजोत्पादन करीत नाही परंतु १००० भाग पाण्यात १०ते ४० भाग लवण इतक्या लवणतेच्या पाण्यात ती जगू शकते. आस्ट्रिया एड्युलिस जातीचे काही ऑयस्टर पाण्याच्या १, ००० भागांमध्ये लवणाचे २४ ते ३१ भाग इतकी लवणता असलेल्या पाण्यात जगू शकतात.

ऑयस्टरांची कवचे नैसर्गिक रीतीने साचून किनाऱ्यालगतच्या मचूळ पाण्यात (१) झालर-भित्ती माळेसारख्या भित्ती तयार होतात आणि (३) पट्टा भित्ती किंवा ऑयस्टर किनारे किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी समुद्रात तयार होतात. या भित्तींवर एकमेकांना चिकटलेली ऑयस्टरांची कवचे जडविली गेल्यासारखी असतात त्यामुळे टणक (कठीण) व भक्कम किनारा किंवा फरसबंदी तयार होते.

(१) झालर-भित्ती : नदीच्या मुखातील प्रवाहांच्या आणि या प्रवाहांच्या शाखांच्या किनार्यातलगतच्या कडांशी या भित्ती तयार होतात. ऑयस्टरांचे डिंभ भरतीच्या पाण्याबरोबर वरील भागात आणले जातात व हे पाणी मागे जाताना डिंभ किनाऱ्यावर स्थिरावतात. अशा तऱ्हेने या भित्ती नदीच्या मुखांतील प्रवाह व त्यांच्या शाखा यांच्या पात्रांना अनुसरून झालरीप्रमाणे बनलेल्या असतात.

(२) माळेसारख्या भित्ती : या भित्ती भरती-ओहोटीच्या प्रवाहांच्या दिशेला आडव्या दिशेत निर्माण होतात व अशा तऱ्हेने त्या लगतच्या किनारपट्टीला किंवा सिंधुतडागाच्या किनाऱ्याला काटकोनात असतात आणि त्यामुळे त्यांच्या आडव्या दिशेत दांडे वा अडथळे निर्माण होतात.

(३)पट्टा-भित्ती (ऑयस्टर किनारे) : समुद्रात किनाऱ्यापासून दूरच्या व जेथे स्थिर आधार स्तर असतो, अशा ठिकाणी या भित्ती तयार होतात. आधार स्तराचा आकार व व्याप यांवर या भित्तींचा आकार व व्याप अवलंबून असतात. ज्यांना मऊ तळाची त्यातून उकरत पुढे जाण्यासाठी अथवा सूत्रगुच्छिय बंधनासाठी (उदा.,मायटिलस) आवश्यक असते असे मृदृकाय व इतर प्राणी ऑयस्टर किनाऱ्याभोवतीच्या मऊ मृत्तिकामय़ समुद्रतळाच्या प्रदेशात राहत असणे शक्य असते.

हल्लीच्या ऑयस्टरांसंबंधीच्या अशा माहितीच्या आधाराने स्तरांच्या मालिकेचा एख भाग म्हणून आढळणाऱ्या  ऑयस्टर किनाऱ्याच्या माहितीद्वारे त्या काळातील ऑयस्टर कोणत्या पुरापरिस्थितिवैज्ञानिक स्थितीमध्ये राहत असत, त्या परिस्थितीविषयीच्या माहितीची कल्पना करता येते.

पहा : परिस्थितिविज्ञान पुराजीवविज्ञान.

चिपळूणकर,गं. वा. (इं.) ठाकूर, अ. ना. (म.)

संदर्भ : 1. Ager D. V. Principles of Palaeoecology, New York, 1963.

           2. Brouwer, A. General Palaeontology, Edinburgh, 1967.

           3. Hecker, R. F. Introducution to Palaeoecology, New York, 1965.

           4.Laport, L. F. Ancient envirnments Englewood cliffs N.J.,1968.