सिंधु-गंगा जलोढ : भारताचे द्वीपकल्प, सिंधु-गंगा मैदानआणि उर्वरित (द्वीपकल्पबाह्य) भाग असे तीन प्रमुख भौगोलिक (प्राकृतिक) विभाग केले जातात. सिंधु-गंगा मैदान देशाच्या एकाबाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत पूर्व-पश्चिम पसरलेले आहे. सिंधू व गंगानद्या आणि त्यांच्या उपनद्या यांनी वाहून आणलेला जलोढ (गाळ)साचून हे मैदान तयार झाले आहे. हाजलोढ प्लाइस्टोसीन (६ लाखते ११ हजार वर्षांपूर्वीचा) काळ आणि अभिनव कल्पाचा (मागील सु.११ हजार वर्षांपैकी) आधीचा काळ यांमध्ये साचला आहे. म्हणजेहिमालयाच्या शेवटच्या उत्थानानंतर सुरु झालेली जलोढ साचण्याची क्रिया चालूच आहे. या जलोढाने भारताचे येथील जुने भूपृष्ठ शेकडो मीटरखाली झाकले जाऊन तेथील भारताच्या भूवैज्ञानिक इतिहासविषयक नोंदीझाकल्या गेल्या. त्यामुळे त्यांची पूर्ण माहिती मिळू शकत नाही. शिवाय या जलोढात सर्वत्र एकसारखेपणा असून त्यात वैचित्र्याचा अभाव आहे.

जलोढाखालील खोलगट भागाचे स्वरुप व निर्मिती :उत्तरेस सरकणारा भारतीय भूखंड आणि टेथिस या प्राचीन समुद्राच्याद्रोणीत साचलेला अधिक मऊ अवसाद (गाळ) यांच्यात हा खोलगटभाग (अग्रद्रोणीचा खळगा) तयार झाला. उत्तर इओसीन (४·५ ते ३·५कोटी वर्षांपूर्वीच्या) काळात हा खळगा तयार होऊ लागला आणिमध्य मायोसीन (सु. १·६० कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील हिमालयाच्यातिसऱ्या उत्थानात याचा सर्वाधिक विकास झाला. नंतर यात सावकाशपणेगाळ साचत जाऊन जवळजवळ सपाट मैदान बनले. मात्र याखळग्याचा नेमका आकार माहीत नाही.

अशा रीतीने प्लाइस्टोसीन काळात भारताची प्रमुख भौगोलिकवैशिष्ट्ये (भूमिस्वरुपे) अस्तित्वात येऊन त्याला आजचे भौगोलिकस्वरुप प्राप्त झाले. नव्याने वर आलेल्या पर्वतरांगांपुढील या प्रचंडखळग्यात नद्यांमुळे पर्वतांची झीज होऊन तयार झालेला गाळ साचूनबनलेले सिंधु-गंगा मैदान नंतर अस्तित्वात आले. हा खळगा कसा तयारझाला याविषयी मतभिन्नता असून त्याविषयीची चर्चा चालूच आहे.ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक ⇨एडूआर्ट झ्यूस (स्वेस) यांच्या मते हा खळगा म्हणजे समधोवली [गुंतागुंतीची अधोवली ⟶ घड्या, खडकांतील]आहे तर सर सिडनी बर्रार्ड यांच्या मते दोन्ही बाजूंना समांतर विभंग(तडे) असलेली ही एक मोठी ⇨खचदरी  आहे. मात्र बर्रार्ड यांचे मतविशेष मान्य झाले नाही. कारण या मैदानाची खोली माफक असून गाळसाचण्याच्या साध्या क्रियेने ते सपाट झालेले आहे. हा खोलगट भागसावकाशपणे खाली जात राहिला आणि त्याच गतीने तेथे असंख्यनद्यांचा गाळ साचत राहिला.

जलोढाचा व्याप व जाडी : या जलोढाचे क्षेत्रफळ सु. ७·७७लाख चौ. किमी. असून त्याने सिंधचा सर्वांत मोठा भाग, उत्तर राजस्थान,जवळजवळ संपूर्ण पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल आणि पूर्वीच्याआसामचा अर्धा भाग व्यापला आहे. पश्चिमेला याची रुंदी सु. ४८०किमी. असून पूर्वेकडे ती कमी होत जाऊन सु. १४४ किमी. झाली आहे.

सिंधु-गंगा जलोढाची एकूण जाडी नक्की कळलेली नाही. याची जाडीहिमालयाच्या बाजूला अधिक असून द्वीपकल्पाकडे ती कमी होत गेलीआहे. काही वेधनांवरुन ती जमिनीच्या पातळीखाली सु. ४०० मी. वसमुद्रपातळीखाली सु. ३३० मी. असावी. यात ⇨आर्टेशियन विहिरी  खोदताना गाळाचा तळ जवळ आल्याचे चिन्ह आढळले नाही. उत्तरसीमेलगत हा सु. ५०० मी. जाड असल्याचा रिचर्ड डी. ओल्डॅम यांचाअंदाज आहे. भूगणितीय सर्वेक्षणांद्वारे ही जाडी याहून खूपच कमी (सु. १८० मी.) आली आहे. हवाई चुंबकीय सर्वेक्षणाद्वारे बंगालमधील त्रिभुज प्रदेशात याच्या खालील आधार खडक ३,००० – ५,६०० मी. खोलीवर असल्याचे अनुमान करण्यात आले आहे.भूकंपीय तरंगांच्या परावर्तनाच्या मापनाद्वारे जलोढाचा तळ सु. ८००मी. खोलीवर असल्याचा अंदाज आहे. तसेच यावरुन हे परावर्तनकरणाऱ्या थरांचा उतार पूर्वेला व आग्नेयीस असल्याचे दिसते. आसामातीलखनिज तेल पूर्वेक्षणात हा जलोढ सु. १,६०० मी. जाड असल्याचे आढळले आहे तर भूभौतिकीय सर्वेक्षणात याची जाडी याहून बरीचअधिक (६ – ८ हजार मी.) असल्याचा अंदाज आहे. दिल्ली  व राजमहालटेकड्या यांच्या दरम्यान याची जाडी सर्वाधिक असून ती राजस्थानातआणि राजमहाल व आसाम दरम्यानच्या भागात सर्वांत कमी आहे.

या मैदानाखाली खळग्याचा तळ सपाट नाही. त्यावरील लहानलहानउंचवट्यांमुळे तो पन्हाळासारखा झाला आहे. या जलोढाखालीलसिंधु-गंगा जलोढखडकांची माहिती अत्यल्पच आहे. तो दाट आर्कीयन आधार खडकांवरवसला असावा. तसेच या जलोढाखाली विंध्य खडकांवर पूर्व गोंडवनीखडक असू शकतील. तथापि याच्याखाली तृतीय कल्पातील (६·५ – १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडक निश्चितपणे आहेत. जलोढाच्याउत्तर सीमेवरील वलीभवन व सीमा विभंग या क्रिया झालेल्या दिसतात.यामुळे मैदानाची उत्तर बाजू भूसांरचनिक ताणाखाली असून हा भाग भूकंपप्रवणआहे. उत्तर भारतात झालेल्या बहुसंख्य मोठ्या भूकंपांची अपिकेंद्रे[ ⟶ भूकंप] या मैदानात आढळली आहेत. मैदानाच्या दक्षिण भागातहीवलीकरण व विभंग क्रिया झाल्या असाव्यात. मात्र दक्षिण सीमेवर अशावैशिष्ट्यपूर्ण घटना घडल्या असल्याच्या खुणा आढळत नाहीत.


नद्यांच्या पात्रांतील बदल : सहारनपूर, अंबाला व लुधियानादरम्यान या मैदानाची उंची सर्वाधिक (सस.पासून सु. ९,९०० मी.) आहे.त्यामुळे हा मैदानाच्या जलोत्सारणाचा भाग आहे. यामुळे पूर्वेस गंगा नदीप्रणालीचे आणि पश्चिमेस सिंधू नदी प्रणाली व पंजाब यांचे अशी दोनजलोत्सारण क्षेत्रे अलग झाली आहेत. या मैदानातील नद्यांच्या पात्रांतमोठे बदल झालेले दिसतात. दरवर्षी या नद्या मोठ्या प्रमाणात गाळवाहून आणून आपल्या पात्रांत साचवितात. परिणामी पात्राची पातळी सभोवतालच्या सपाट पृष्ठासारखी होत जाते. यातून पात्र सरकत राहते.वैदिक काळातील सरस्वती नदी पूर्व पंजाबातून व राजस्थानातून वाहतजाऊन अरबी समुद्राला मिळत असे. आता या पात्रात लहान झरेवाहतात आणि ते बिकानेरच्या वाळवंटात जिरुन लुप्त होतात. या नदीचेपात्र पूर्वेकडे अधिकाधिक सरकत जाऊन बनलेली यमुना नदी अखेरीस प्रयाग येथे गंगेला मिळते.

पंजाबातील नद्यांची पात्रेही वारंवार सरकली आहेत. १५५०–१६००या काळादरम्यान उच येथे चिनाब व झेलम नद्या सिंधूला मिळत. त्याआता तेथून दक्षिणेला ९६ किमी. वरील मिठानकोट येथे सिंधूलामिळतात. मुलतान शहर तेव्हा रावी नदीच्या किनाऱ्यावर होते. आता तेरावी व चिनाब यांच्या संगमापासून सु. ५५ किमी. अंतरावर आहे.बिआस नदीच्या पात्रात सु. २२५ वर्षांपूर्वी बदल झाला. तिच्या जुन्यापात्राच्या खाणाखुणा मंगमरी व मुलतान येथे पाहावयास मिळतात. आताही नदी फिरोजपूरजवळ सतलज नदीला मिळते. इ. स. पू. तिसऱ्याशतकात सिंधू नदी तिच्या सध्याच्या पात्राच्या सु. १२८ किमी. पूर्वेलावाहत होती. कोरडे पडलेले हे पात्र कच्छच्या रणात गेले असून कच्छचेरण तेव्हा अरबी समुद्राचे आखात होते. अशा प्रकारे सिंधू नदीचे पात्रपश्चिमेला सरकणे ही ठळक घटना आहे.

अशाच तऱ्हेने नदीपात्रातील बदल बंगालमध्ये व गंगेच्या त्रिभुजप्रदेशांतही १७५० नंतर झाले आहेत. तेव्हापासून या त्रिभुज प्रदेशाचेशेकडो चौ. किमी. क्षेत्र माणसाने वसती करण्यालायक बनले आहे.१७८५ मध्ये बह्मपुत्रा नदी मैमनसिंगमधून वाहत असल्याचा उल्लेखमेजर जे. रेनेल या भूगोलतज्ञांनी केला आहे. सध्या बह्मपुत्रा याच्यापश्चिमेला सु. ६४ किमी. वरुन वाहते आहे. तसेच तेव्हा तिस्ता नदीदक्षिणेस दिनाजपूरमधून वाहत जाऊन गंगेला मिळत होती. आता तिचाप्रवाह नैऋर्त्येस असून ती बह्मपुत्रेला मिळते. बंगालच्या जुन्या नकाशांनुसार जास्तीतजास्त २०० वर्षांपूर्वी बह्मपुत्रा नदी आताच्या मानाने अनेककिमी. पूर्वेकडे वाहत होती. आता ती डाक्क्याच्या पश्चिमेस वाहत असूनतिच्या उत्तरेस मधुपूर जंगल हा उंच भाग येतो. हा बदल अचानकपणे म्हणजे काही वर्षांत झालेला दिसतो.

शिलावर्णन : या मैदानातील सर्व शैलसमूह नादेय (नदीच्या क्रियेने बनलेले) व जमिनीवर तयार झालेले आहेत. त्यांच्यात मृत्तिकांचेघट्ट थर असून ते वालुकामय किंवा कॅल्शियमयुक्त आहेत. काही ठिकाणच्याजलोढांत ३० टक्क्यांपर्यंत कॅल्शियमयुक्त द्रव्य आढळते. या शैलसमूहांतील घटक आधुनिक नद्यांधील गाळवट, पंक (चिखल) व वाळू यांच्यासारखे आहेत. टेकड्यांपासून दूर जाताना रेती व वाळू यांचे प्रमाणघटत जाते. भूपृष्ठाखाली काही खोलीवर वाळूच्या व रेतीच्या घट्टपिंडाश्माचे थोडे थर आढळतात. विशेषतः अधिक जुन्या मृत्तिकायुक्तजलोढात खडबडीत कॅल्शियमी ⇨संघिते  मोठ्या प्रमाणात विखुरलेलीआढळतात, त्यांना कंकर म्हणतात व हे येथील वैशिष्ट्य आहे. कंकरसर्व आकारांचे आणि लहान कण ते मस्तक या आकारमानांचे असतात.जलोढातील कॅल्शियमयुक्त द्रव्य अलग होऊन पुंज किंवा गाठीच्यारुपातील कंकर तयार होतात [ ⟶ कंकर]. बंगाल व बिहार येथीलमृत्तिकांत अशाच रीतीने बनलेली लिमोनाइटाची संघिते आढळतात.जलोढात काही ठिकाणी अशुद्घ पीटासारख्या जैव द्रव्याचे भिंगाकारथर आढळतात [ ⟶ पीट].

भूवैज्ञानिक वर्गीकरण : अजूनही साचत असलेला हा जलोढवैचित्र्यपूर्ण नाही, यामुळे त्याचे वर्गीकरण करणे अवघड आहे. तथापिविलुप्त झालेल्या व जिवंत असलेल्या सस्तन प्राण्यांच्या जीवाश्मांच्या(शिळारुप झालेल्या अवशेषांच्या) आधारे सोयीसाठी याचे पुढीलप्रमाणे वर्गीकरण करतात : (१) सिंधू , गंगा इ. नद्यांच्या त्रिभुज प्रदेशांतीलगेल्या सु. अकरा हजार वर्षांतील जलोढाचे निक्षेप सर्वांत वर (नवीन)आहेत. (२) यांच्याखाली नेवार जलोढ असून त्यांमध्ये मुख्यतः जिवंत जीवजातींचे जीवाश्म व मानवी अवशेष असलेले पंजाबमधील खादरआणि हत्ती, घोडे, बैल, म्हैस, हरीण, मगर, मासे इत्यादींच्या आधीच्याजातींचे तसेच विलुप्त गेंडे व पाणघोडे यांचे जीवाश्म असलेले गंगेच्याखोऱ्यातील बांगर निक्षेप येतात. याच्याखाली भूवैज्ञानिक विसंगती[ ⟶ विसंगति, भूवैज्ञानिक] असून तिच्याखाली अज्ञात काळातीलखडकांचे (कदाचित द्वीपकल्पातील आर्कीयन, पुराण व गोंडवनीखडकांचे तसेच हिमालयातील न्युम्युलिटिक खडक आणि मरी वशिवालिक समूह यांचे) विस्तारित भाग असावेत. यापुढे जलोढातीलवैशिष्ट्यपूर्ण खडकांची माहिती दिली आहे.

बांगर : बंगाल व उत्तर प्रदेशातील अधिक जुन्या जलोढाला बांगरम्हणतात. याचे वय मध्य प्लाइस्टोसीनकालीन आहे. बांगर लहानपठारांच्या रुपात अधिक उंचीवर आढळत असल्याने त्याच्यावर पुराचेपाणी पोहोचत नाही.

अभिनव कल्पातील खादर हा जलोढ बांगरापेक्षा नवीन असूनहीत्याच्यापेक्षा खालच्या पातळीवर आढळतो. नदीचे वय वाढत जाते तसेतिच्यातील निक्षेप अधिक नवीन असतात. नदीचे पात्र अखंडपणे खालीखाली जात असल्यास नवीन निक्षेप जुन्यापेक्षा अधिक खोलीवर साचतात.सर्व जुन्या नद्यांच्या बाबतीत हा अनुभव येतो. बांगर भूमीचे अवशेष नदीच्या प्रवाहाच्या दिशेतील प्रत्येक बदलाने झिजतात आणि नदीच्यासरीसर्पाने (नागमोडी वाहण्याच्या प्रवृत्तीमुळे) ते सपाट होतात. उत्तरप्रदेशातील बांगर बहुधा संपुंजित मृत्तिकायुक्त व फिकट तांबूस तपकिरीअसून उघडे पडल्याने हा जलोढ पिवळसर होतो. यात कंकर विपुलपणेआढळतात. जुन्या जलोढाच्या काहीशा उंच वेदिकांधून नदी जलोढ कापत खाली जाते.

खादर : नवीन जलोढाला खादर म्हणतात. हा अधिक नवा फिकटरंगाचा जलोढ नदीपात्रात व लगत आढळतो. यात कंकर क्वचित आढळतात.

गंगेचा त्रिभुज प्रदेश : गंगेच्या सध्याच्या पात्रालगतच्या या जलोढातकंकर कमी असून त्यात जिवंत जीवजातींचे जीवाश्म व अशुद्घ पिटाचेथरही आढळतात. याचे क्षेत्रफळ सु. १·२५ लाख चौ. किमी. असूनयात मृत्तिका, वाळू व मार्ल यांचेएकाआड एक थर पुनःपुन्हाआढळतात. गंगेच्या त्रिभुज प्रदेशाचा पूर्वेचा समुद्राकडील भाग जलदपणे बदलत असून पश्चिमेकडील भाग सु. १७०० पासून आहे तसाच आहे.हा गंगेतील खादरचा समुद्राकडील केवळ विस्तार आहे.


सिंधूचा त्रिभुज प्रदेश : सिंधूतील खादरचा हाही फक्त विस्तार आहे.याचा व्याप कमी आहे, कारण हा बहुतकरुन नवीन आहे. उत्तर ऐतिहासिक काळात याचा व्याप पुष्कळ वाढल्याचे जुन्या नकाशांवरुनलक्षात येते. सिंधूच्या पात्रातील बदलावरुन याची पुष्टी होते. कॅल्शियमयुक्त द्रव्य अत्यल्प असून यात वाळूचे व रेतीचे भिंगाकार तसेच पिटाचे थर आहेत. यातील भूवैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाच्या काही वैशिष्ट्यपूर्णनिक्षेपांना स्थानिक नावे दिली असून त्यांची माहिती पुढे दिली आहे.

काहीशा तीव्र उताराच्या पायथ्यालगत टेकड्यांच्या बाह्य सीमेवरपायथा डबर झालरीप्रमाणे साचलेली आढळते, अशा येथील निक्षेपालाभाबर म्हणतात. जलोढीय व्यजन (पंखा) किंवा शुष्क त्रिभुज प्रदेशाशीभाबरचे साम्य आहे. भाबरला ओलांडून जाणाऱ्या नदीचे पाणी सैलसररेतीत मोठ्या प्रमाणात झिरपून कमी होते. भाबर उतारावरील पाणी खाली येऊन दलदल बनते. गंगेच्या किनाऱ्यावर वर उचलले गेलेले जमिनीचेतुकडे आढळतात, त्यांना भूर म्हणतात. कडक ऊन असलेल्या शुष्कमहिन्यांत वाऱ्याने वाहून आणलेली वाळू साचून हे बनतात. अधिक शुष्कमैदानी भागात विशिष्ट प्रकारचा फुलारणारा लवणी पदार्थ म्हणजे रेह(कालार) आढळतो. तो भूपृष्ठाखाली आच्छादला गेल्याने जमिनीची सुपीकता पुष्कळच घटते. यात सोडियमाची कार्बोनेट, सल्फेट, क्लोराइडतसेच कॅल्शियमाची व मॅग्नेशियमाची लवणे यांचे मिश्रण झालेलेआढळते. पर्वतावरील गाळाचे रासायनिक विघटन होऊन बनलेली हीलवणे झिरपणाऱ्या पाण्यात विरघळतात. उष्ण व शुष्क हवामानांत तीकेशाकर्षणाद्वारे जमिनीवर येऊन रेह बनते. सिंधमधील धांड ही लहान,उथळ, अल्कधर्मी वा लवणी सरोवरे असून ती वालुकागिरींमधीलपोकळ्यांत तयार होतात. वाऱ्याने वाहून आणलेल्या वाळूतून पाणी झिरपूनसोडियमाची वरील लवणे येथे येऊन साचतात. काही ठिकाणी यांच्यातनॅट्रॉन खनिज (सोडियम कार्बोनेट) एकवटून दाट झालेले आढळते. सिंधव कच्छ दरम्यानच्या जलोढाच्या पट्ट्यात अशा रीतीने बनलेल्या शुद्घ सैंधवाचे बरेच मोठे थर व भिंगे वाळूमध्ये गाडलेली आढळतात. येथीलसैंधवाचे साठे काही लक्ष टन आहेत.

आर्थिक महत्त्व : सिंधु-गंगा जलोढात खनिज साधनसंपत्तीअत्यल्पच आहे. मात्र शेतीसाठीची सुपीक जमीन ही या मैदानाची सर्वांतमोठी संपत्ती आहे. येथील मृत्तिका ही वीट व मृत्तिका उद्योग यांच्याकच्च्या मालाचा अमर्याद साठा आहे. वीट हे या भागातील मुख्यबांधकाम साहित्य आहे. यातील कंकर रस्तेबांधणीसाठी तसेच चुना वसिमेंट निर्मितीसाठी उपयुक्त आहे. हा जलोढ गोड्या पाण्याचा प्रचंडसाठा असून ते सहजपणे मिळविता येते. काही ठिकाणी आर्टेशियन विहिरींकरिता अनुकूल परिस्थिती असून तशा काही विहिरी वापरातहीआहेत. यातील कूपनलिका शेतीसाठीही उपयुक्त ठरल्या आहेत. तसेच यामैदानात खनिज तेल साठण्याच्या दृष्टीने अनुकूल संरचना असू शकतील.

पहा : बांगर व खादर. 

संदर्भ : 1. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

    2. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

    3. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.

ठाकूर, अ. ना.