आसामातील शैलसमूह : आसामच्या मैदानी प्रदेशातील आणि शिलाँगच्या पठारातील शैलसमूहांचे बरेच अध्ययन झालेले आहे. पण त्याच्या उत्तर सीमेशी असणाऱ्या हिमालयीन शैलसमूहांची फारशी माहिती नाही. शिलाँगचे पठार व त्याच्यातील गारो, खासी व जैंतिया टेकड्या व पठारापासून अलग असणाऱ्या मिकीर टेकड्या या प्रामुख्याने अतिप्राचीन ⇨ आर्कीयन खडकांच्या बनलेल्या आहेत. शिलाँगच्या पठाराचा गाभा ग्रॅनाइटी पट्टिताश्म या रूपांतरित खडकाचा असून त्या पट्टिताश्मात माथेलिम ग्रॅनाइट घुसलेला आहे. हे दोन्ही खडक पठाराच्या विस्तृत व विशेषत: उत्तरेकडील क्षेत्रात उघडे पडलेले आहेत. पठाराच्या पूर्वेकडच्या सु. अर्ध्या भागात व मुख्यत: शिलाँगच्या दक्षिणेस व पूर्वेस क्वॉर्ट्‌झाइट, सुभाजा (सहज भंगणारा रूपांतरित खडक), ॲंफिबोलाइट, ग्रॅन्युलाइट व काही लोही पट्टिताश्म या प्रकारांचे खडक आढळतात. त्या सर्व मिळून होणाऱ्या गटाला शिलाँग माला म्हणतात. तिच्यातील खडकांच्या स्वरूपावरून ती ⇨धारवाड संघापैकी आहे असे मानले जाते. ग्रॅनाइटी पट्टिताश्म तिच्यापेक्षा नवा व माथेलिम ग्रॅनाइट सर्वात नवा आहे.

शिलाँगच्या पठाराचे खडक असलेला भाग हा भारतीय द्वीपकल्पाच्या शैलसमूहांचाच सलग भाग आहे. पण गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या जलोढामुळे (गाळामुळे) विस्तीर्ण प्रदेशांतील खडक झाकले गेल्याने शिलाँगचे आर्कीयन खडक द्वीपकल्पीय आर्कीयन खडकांपासून अलग झाल्यासारखे दिसतात. पण शिलाँगच्या आर्कीयन खडकांचे साम्य हिमालयीन खडकांपेक्षा बंगाल आणि बिहारमधील आर्कीयन खडकांशी अधिक असलेले आढळते. शिलाँगच्या पठाराच्या दक्षिण सीमेलगतच्या भागात क्रिटेशस कालीन (१४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीचे) खडक आहेत. त्यांच्यातील जीवाश्म (जीवांचे अवशेष) त्रिचनापल्ली व कोरोमंडल किनाऱ्यावरील क्रिटेशस कालीन थरातील जीवाश्मांशी मिळते जुळते आहेत. आर्कीयन आणि क्रिटेशस कालीन खडकांच्या या साम्यावरून शिलाँगचे पठार हे भारताच्या द्वीपकल्पाचाच एक भाग आहे असे मानले जाते.

खासी टेकड्यांतील ग्रॅनाइटी पट्टिताश्मात समाविष्ट असलेल्या कृष्णाभ्रकाच्या सुभाजात  संपुंजित (एकत्र झालेल्या) सिलिमनाइटाचे मोठे साठे असून तितके मोठे साठे जगात विरळाच आढळतात. त्यांच्यापैकी बहुतेकात थोडे कुरुविंदही असते. पण काही पुंज केवळ सिलिमनाइटाचे तर काही केवळ कुरुविंदाचे असलेले आढळतात. औद्योगिकदृष्टया ते महत्त्वाचे आहेत. आर्कीयन खडकांत डोलेराइटांच्या भित्ती आहेत. त्यांच्याशी संबंधित अशा ज्वालामुखी खडकांचे थर पठाराच्या दक्षिण भागात आढळतात. ते उत्तर क्रिटेशस कालाच्या आधीचे आहेत. त्यांना सिल्हेट ट्रॅप म्हणतात. त्यांच्यात व राजमहालचा ट्रॅप व दक्षिणेतील ट्रॅप यांच्यात बरेच साम्य आहे.

आसामच्या पठारातील आर्कीयन कालानंतरचे महत्त्वाचे खडक म्हणजे क्रिटेशस कालीन वालुकाश्म होत. क्षरणाने झिजलेल्या आर्कीयन खडकांच्या उंचसखल पृष्ठावर हे वालुकाश्म वसलेले असून त्यांचे थर जवळजवळ आडवे आहेत. पण पठाराच्या दक्षिण सीमेशी ते एकाएकी खाली वळविले जाऊन तेथे त्यांची एकनतवली (एकाच ठिकाणी वाकलेली घडी) झालेली आहे. पठाराच्या पायथ्याच्या भागात ते थर तृतीय कल्पाच्या खडकांनी किंवा आधुनिक जलोढांनी झाकले गेलेले आहेत. त्यामुळे पठाराची दक्षिण बाजू भिंतीसारखी तीव्र उताराची दिसते.

तृतीय कल्पातल्या (६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) खडकाने आसामचे बरेचसे क्षेत्र व्यापिले आहे. शिलाँगच्या पठारात व त्याच्या पूर्वेस नागा टेकड्यांतही ते थर आढळतात. त्यांच्यापैकी अधिक जुने खडक सामान्यतः सागरी व नंतरचे नद्यांच्या मुखांशी किंवा जमिनीवर साचलेल्या गाळांचे आहेत. त्यांच्यापैकी काहींत दगडी कोळशाचे आणि काहींत खनिज तेलाचे महत्त्वाचे साठे आहेत.

पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींमुळे खडकांच्या थरांना घड्या पडून हिमालयाच्या आणि ब्रह्मदेशातील पर्वत रांगा निर्माण होत असताना त्या दोन रांगांच्या पकडीत सापडलेला पण दृढ राहिलेला पाचरीसारखा प्रदेश, असे शिलाँगच्या पठाराचे स्वरूप आहे. मायोसीन (सु. २ कोटी वर्षांपूर्वीच्या) कालात हे पठार उंचावले जाऊन ईशान्येकडे वळविले गेले. पण त्याच्या खडकांना घड्या पडल्या नाहीत. पूर्वेकडील भागात सौम्यनती (सौम्य तिरकेपणा) असणाऱ्या तृतीय कालीन खडकांच्या थरावर ब्रह्मदेशाच्या बाजूने आलेल्या उपरिप्रणोदनामुळे (वर ढकलणाऱ्या दाबामुळे) त्यातील पतकाई रांगांचे तृतीय कल्पातील खडक वर चढविले जाऊन वायव्य दिशेने कित्येक किमी.पर्यंत सरकविले गेले आहेत. पठारात दक्षिणउत्तर विभंग आणि उपरिप्रणोदन असल्याने आसामात वारंवार भूकंप घडून येतात.

सोवनी, प्र. वि.