नती व नतिलंब: (१) नती, (२) नतिलंब, (३) थर, (४) स्तरणपातळी, (५) क्षितिजसमांतर पातळी.

नति : क्षितिजसमांतर पातळी व खडकाचा थर यांच्यातील कोन दर्शविणारी राशी. गाळाचे बहुतेक खडक सामान्यपणे क्षितिजसमांतर साचतात परंतु त्यांपैकी काही नंतर घड्या पडून अथवा भूकवचातील इतर हालचालींमुळे तिरपे होतात. अशा खडकांतील थर भूपृष्ठाखाली कोणत्या स्थितीत आहेत, हे समजण्याच्या दृष्टीने त्यांचा उतार वा तिरपेपणा अचूकपणे समजणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी नती व नतिलंब (नतीला काटकोनात असलेली दिशा) या संज्ञा वापरतात.

तिरप्या थराचा (उदा., घडीच्या भुजेतील थराचा) उतार व क्षितिजसमांतर पातळी यांच्यातील कोनाला नती म्हणतात. हा कोन जास्तीत जास्त उताराच्या दिशेत व उदग्र (उभ्या) पातळीत मोजतात. भूवैज्ञानिक नकाशावर नती लहान बाणाने दर्शवितात व बाणाशेजारी अंक असतो. बाणाने उताराची दिशा व अंकाने उताराचा अंशातील कोन दर्शविला जातो. संधी व विभंगाचे (भेगेचे) पृष्ठ, पाटनपृष्ठ [→ पाटन], भित्ती, शीर वगैरे एकप्रतलीय (सपाट) परंतु तिरप्या भूवैज्ञानिक बाबींची नतीही अशा प्रकारे देतात. मात्र खाणकामामध्ये एखाद्या विभंगाचा वा थराचा उतार नतीऐवजी लंबविक्षेपाने देण्याची पद्धत आहे. लंबविक्षेप म्हणजे विभंगपृष्ठाचा महत्तम उतार व उदग्र दिशा यांच्यातील कोन होय म्हणजेच नती व लंबविक्षेप एकमेकांचे कोटिकोन असतात.

स्तरणपातळीत (थराच्या पातळीत) नतीला काटकोनात असणाऱ्या दिशेला नतिलंब म्हणतात. स्तरणाची पातळी व क्षितिजसमांतर पातळी (उदा., पाण्याचा पृष्ठभाग) यांच्यातील छेदन रेषा किंवा स्तरणपातळीवरील कोणतीही क्षितिजसमांतर रेषा म्हणजे नतिलंब होय. नती व नतिलंब मोजण्यासाठी नतिमापक (क्लिनॉमीटर) व होकायंत्र यांचा वापर करतात.

ठाकूर, अ. ना.