आ. १. पायऱ्यांप्रमाणे दिसणाऱ्या दक्षिण ट्रॅपच्या टेकड्या, चंदन-वंदन किल्ले, भुईज (जि. सातारा).

दक्षिण ट्रॅप : (काळवथरी दगड, डेक्कन ट्रॅप). प. भारतात विस्तृत क्षेत्रावर पसरलेल्या ज्वालामुखी खडकांच्या राशीचे नाव. क्रिटेशस (सु. १४ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळाच्या अखेरीस भारतीय द्विपकल्पाच्या विस्तृत क्षेत्रावर भेगी उद्‌गिरणांवाटे (उद्रेंकावाटे) लाव्हा बाहेर टाकला जाऊ लागला व नंतर दीर्घकाल अशी उद्‌गिरणे अधुनमधून होत राहिली, परिणामी ज्वालामुखी खडकांचे हे प्रचंड पठार तयार झाले. यामुळे या भागाचे पूर्वीचे भूस्वरूप नष्ट झाले आणि तेथील पूर्वीचे सर्व शैलसमूह त्याच्या खाली झाकले गेले. तसेच सुरत–भडोचजवळील थर नर्मदा खोऱ्यातील जलोढ (गाळ) वगळता दक्षिण ट्रॅपवर नंतरच्या काळातील शैलसमूह आढळत नाहीत. ⇨ आर्कीयन  शैलसमूह सोडल्यास दक्षिण ट्रॅप हा द्वीपकल्पातील सर्वांत मोठा शैलसमूह आहे. जगात असे प्रचंड उद्‌गिरण क्वचित झालेले आढळते. झीज होऊन तयार झालेल्या दक्षिण ट्रॅपच्या टेकड्या सपाट माथ्याच्या असून त्यांच्या कडा जवळजवळ उभ्या असतात व त्यामुळे त्या राक्षसी पायऱ्यांप्रमाणे दिसतात म्हणून पायरी अथवा जिना या अर्थाच्या स्वीडीश शब्दावरून अशा राशीला ट्रॅप ही संज्ञा वापरतात. भारतीय द्वीपकल्पाच्या दख्खन भागात ही राशी आढळत असल्याचे डब्ल्यू. एच्‌. साइक्स यांनी तिला डेक्कन (दक्षिण) ट्रॅप हे नाव दिले (१८३३).

विस्तार, क्षेत्र व जाडी : या शैलसमूहाने सु. ५ लक्ष १८ हजार चौ. किमी. क्षेत्र व्यापले असून तो महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून पसरलेला आहे. मुंबई ते अमरकंटक आणि बेळगाव ते गुणा असा त्याचा आडवा–उभा विस्तार झालेला असून पश्चिमेस अरबी समुद्र दक्षिणेस बेळगावपर्यंत आग्नेयीस राजमहेंद्रीपर्यंत पूर्वेस अमरकंटक, सरगुजा, जशपूरपर्यंत आणि वायव्येस कच्छपर्यंत याच्या सीमा भिडलेल्या आहेत. सिंध, राजमहेंद्री, सरगुजा इ. ठिकाणी याचे वेगळे पडलेले दृश्यांश (पृथक्‌स्थित) आढळले आहेत. वायव्येस क्वेट्टा, काबूल, कंदहारपर्यंत यांचे प्रातिनिधिक दृश्यांश आढलले आहेत. झीज होऊन याचा मूळचा बराच भाग निघून गेला असावा शिवाय प. किनारा हा एक प्रचंड विभंग (तडा) असून त्यामुळे याचा बराच भाग अरबी समुद्रात बुडाला असावा, असेही एक मत आहे. यावरून त्याचे पूर्वीचे विस्तारक्षेत्र आतापेक्षा पुष्कळच जास्त म्हणजे सु. १५ लक्ष चौ. किमी. असावे, असा अंदाज आहे.

दक्षिण ट्रॅपच्या एकूण राशीच्या कमाल जाडीविषयी निश्चित असे काहीच सांगता येत नाही. मुंबईजवळ हिची जाडी ३,२५० मी. पेक्षाही जास्त असून ती पूर्वेकडे कमीकमी होत गेली असल्याने निरनिराळ्या ठिकाणी घेतलेल्या वेधनांवरून (बोअरिंगवरून) दिसून येते. याची निरनिराळ्या ठिकाणची जाडी वेगवेगळी असल्याचेही दिसून आले आहे. बेळगावजवळ ६०० ते ८०० मी., अमरकंटकजवळ १५० ते २०० मी., सरगुजाजवळ १०० ते १२५ मी., राजमहेंद्रीजवळ ३० ते ६० मी., सिंधमध्ये ३० ते ६० मी. व कच्छात सु. ८०० मी. जाडी आढळली आहे. दक्षिण ट्रॅपमधील निरनिराळ्या वैयक्तिक लाव्हा थरांची जाडी काही सेंमी. पासून ३६ मी. पर्यंत आढळते. मात्र सर्वसाधारणपणे त्यांची जाडी १२ ते ३० मी. पर्यंत असते. भुसावळजवळ केलेल्या सु. ४०० मी. खोल वेधनात लाव्ह्याचे २९ स्पष्ट प्रवाह वा थर आढळले व त्यांची जाडी १·५ ते ३० मी. पर्यंत होती. काही विशिष्ट क्षेत्रात लाव्ह्याच्या दोन थरांमध्ये गाळाचे थर आढळतात व त्यांना अंतरा–ट्रॅपी थर म्हणतात.

क्षितिजसमांतरता : दक्षिण ट्रॅपमधील लाव्हा प्रवाह त्याच्या विस्तीर्ण क्षेत्रात जवळजवळ क्षितिजसमांतर असलेले आढळतात. मात्र मुंबईजवळ ते समुद्राकडे कलते झालेले आहेत. हा उतार ५° पासून १५° पर्यंत आहे. हा उतार घडी पडण्यामुळे आला असून घडीचा अक्ष किनाऱ्याला समांतर असावा, असे एक मत आहे. उतार असणारे असे थर प. सातपुडा (कमी उतार), खानदेश व राजपीपला टेकड्या (५° ते २०° उतार), बेतुल (५° ते १०° उतार), प. नर्मदा खोरे (१०° ते १५° उतार), लिंग (१५° पेक्षा जास्त उतार) इ. ठिकाणी आहेत. काही ठिकाणी तर सौम्य घड्या किंवा बाकही आढळतात. मात्र हे उतार मूळचे नसून भूकवचातील नंतरच्या हालचालींनी निर्माण झालेले आसावेत.

सौसर, गाविलगढ टेकड्या, छिंदवाडा, एचिलपूर वगैरे भागांत दक्षिण ट्रॅपमध्ये विभंगाची (भेग पडून खचण्याची) क्रिया झालेली आढळते. तसेच नर्मदा नदी एका प्रचंड पूर्व–पश्चिम विभंगातून वाहते व प. किनारा हाही विभंग आहे, असे काहींचे मत आहे.


शिलावर्णन : दक्षिण ट्रॅपमधील खडकांचे संघटन सर्वत्र जवळजवळ एकसारखे आढळते व नुसत्या डोळ्यांनी दिसणारी त्याची वैशिष्ट्येही बरीचशी एकसारखी असतात. ऑजाइट बेसाल्ट हा यातील सर्वांत सामान्य खडक असून त्यात बहुधा ऑलिव्हीन हे खनिज नसते. या खडकाचे सरासरी वि.गु. २·५८ ते ३·०३ असून रंग व वयन (पोत) यांच्यात मात्र भिन्नता आढळते. करडसर गडद हिरवट छटा हा त्याचा सर्वांत जास्त आढळणारा रंग असून पूर्ण काळी किंवा इतर रंगांच्या फिकट छटाही आढळतात. सिलिकेचे प्रमाण अधिक असणाऱ्या ट्रॅकाइटासारख्या प्रकाराचा रंग चमकदार उदी असतो क्वचित तांबूस व जांभळट छटाही आढळतात. हा खडक समांग, घट्ट आणि सूक्ष्म वा गूढस्फटिकी वयनाचा असतो. मात्र जवळजवळ काचमय ते सर्व तऱ्हेच्या भरड कणी वा भरड स्फटिकी डोलेराइटापर्यंतचे वयनही त्यात आढळते. यात कधीकधी पृषयुक्त (लहान कणांच्या आधारकात भरड स्फटिक असणारे) वयनही आढळते, क्वचित त्यात प्रवाही संरचनाही दिसते मात्र हा पूर्णस्फटिकी कधीच नसतो, हा खडक पुष्कळदा खंगराप्रमाणे पृष्ठभागी खड्डे, खळगे व घळी असणारा आणि बदामी कुहरयुक्त (बदामाच्या आकाराच्या पोकळ्यांनी युक्त) असतो. या पोकळ्यांतून झिओलाइटांसारखी द्वितीयक (नंतर तयार झालेली) खनिजे भरलेली आढळतात. यांचे स्फटिकीभवन जलद झालेले असल्याने जेथे लाव्हा जलद थंड झाला आहे. अशा कंडाजवळ कधीकधी टॅचिलाइट किंवा बेसाल्टी काच आढळते.

भुसावळजवळील वेधनात निघालेल्या या खडकाचे लुईस एल्‌. फेर्‌मॉर यांनी केलेले वर्णन हे नमुनेदार मानले जाते. त्यानुसार हा २·९१ वि. गु. चा बेसाल्ट खडक असून लॅब्रॅडोराइट व एन्स्टॅटाइट ऑजाइट (पिजिओनाइट) ही त्यातील आवश्यक खनिजे होत. या दोन खनिजांनी मिळून खडकाचा प्रमुख भाग बनलेला असून त्यांच्या मधल्या भागात काच असते. या तिन्ही घटकांचे प्रमाण बरेच बदलते उदा., काचेचे प्रमाण वाढले की, ऑजाइटाचे घटते. मॅग्नेटाइट आणि लोहधातुके (कच्च्या स्वरूपातील लोहधातू) ही यातील सामान्य गौण खनिजे असून कधीकधी ॲपेटाइट, इल्मेनाइट व ल्युकॉक्झीन आणि क्वचित क्वॉर्ट्‌झ ही गौण खनिजेही यात आढळतात. भुसावळजवळील खडकात ऑलिव्हीनही आढळते, मात्र ते सर्वत्र आढळतेच असे नाही.

आ. २. दक्षिण ट्रॅपचे विस्तारक्षेत्र


या खडकातील पोकळ्यांत व भेगांत अस्तरांच्या रूपात पुढील द्वितीयक खनिजेही आढळतात : बहुतेक सर्व झिओलाइटे (ॲनॅलसाइट, ओकेनाइट, मेसोलाइट, गायरोलाइट, टॉमसनाइट, स्टिल्बाइट, प्रेहनाइट, ल्यूसॅटाइट, ॲपोफिलाइट, डेलेसाइट, ह्यूलँडाइट, स्कोलेसाइट अथवा पुनाहलाइट, लॉमाेंटाइट) स्फटिकी व अस्फटिकी क्वॉर्ट्‌झ (कॅल्सेडोनी, ओपल, कार्नेलियन, जमुनिया, क्रिसोप्रेज, ऑनिक्स, हेलिओट्रोप, ॲमेथिस्ट) कॅल्साइट, पॅलॅगोनाइट, क्लोरोफीआइट, सिलॅडोनाइट, कॅबाझाइट, इडिंग्साइट, सर्पेंटाइन, ग्लॉकोनाइट इत्यादी.

या खडकाच्या पातळ चकत्यांचे सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण केले असता पुढील वैशिष्ट्ये आढळतात. खडकाचा बव्हंशी भाग प्लॅजिओक्लेज (लॅब्रॅडोराइट वा ॲनॉर्थाइट) आणि ऑजाइट (बहुधा एन्स्टॅटाइट) यांच्या स्फटिकांचा किंवा सूक्ष्मकणी मिश्रणाचा बनलेला असतो. प्लॅजिओक्लेजाचे स्फटिक प्रचिनाकार व वडीसारखे असतात. सामान्य बेसाल्टात काच थोडीच असते मात्र काळ्या व घट्ट प्रकारात ती विपुल असून उदी व हिरवट रंगाची दिसते. काही खडकांतील पोकळ्यांत व भेगांत पॅलॅगोनाइट हे चूर्णरूप समदिक्‌ (सर्व दिशांना एकसारखे घुणधर्म असलेले) द्रव्य आढळते. प्लॅजिओक्लेजाच्या पट्‌ट्या अंशतः ऑजाइटाने वेढल्या जाऊन तयार होणारी सर्पचित्रित संरचना कधीकधी आढळते.

ऑजाइट बेसाल्ट हा यातील सर्वसामान्य खडक असला, तरी क्वचित दक्षिण ट्रॅपच्या लाव्ह्याचे भिन्नीभवन होऊन (स्थूल मानाने समांग रासायनिक संघटनांच्या शिलारसाचे भिन्नभिन्न संधटनाचे भाग तयार होऊन) सिलिकेचे प्रमाण जास्त असलेल्या म्हणजे सिकत किंवा कमी प्रमाणात सिलिका असलेल्या म्हणजे अल्पसिकत प्रकारचे खडकही आढळतात. तसेच बेसाल्टतील भित्ती व शिलापट्टांमध्येही सिकत व अत्यल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण अतिशय कमी असलेले) खडक आढळले आहेत. पावागड व गिरनार टेकड्यांच्या भागात भिन्नीभवन झालेले असून तेथे रायोलाइट, डेसाइट, क्वॉर्ट्‌झ–अँडेसाइट, फेल्साइट, पिचस्टोन व पमीस हे सिकत खडक बेसाल्टाबरोबर आढळतात. गिरनार टेकडीत डायोराइट–माँझोनाइट व भोवती ऑलिव्हीन गॅब्रो आढळतो. मुंबईजवळील भागात रायोलाइट, ग्रॅनोफायर, ट्रॅकाइट, अँडेसाइट, फेल्साइट व ओशनाइट हे खडक बेसाल्टच्या जोडीने आढळतात. पोरबंदरजवळ व नर्मदा खोऱ्यातही सिकत खडक (ट्रॅकाइट, फेल्साइट इ.) बेसाल्टबरोबर आढळले आहेत. गीर जंगलातील ऑलिव्हीन डोलेराइटाच्या काही भित्तींमध्ये ग्रॅनोफायर व रायोलाइट आढळले आहेत. जुनागढ भागात सिकत व अल्पसिकत खडक तर सौराष्ट्रात लिंबुर्गाइट, अँकॅरॅमाइट यांसारखे अत्यल्पसिकत खडक आढळले आहेत.

लाव्ह्याच्या थरांमध्ये बहुतकरून राख, अंगार व हिरवी मृदा यांचे पातळ थर आढळतात. राख व टफ यांचे थर दक्षिण ट्रॅपमधून एकसारखे वाटले गेले आहेत मात्र तळभागातील थरात ते कमी होत गेलेले दिसतात. सिंहगड, दिवा व खंबाटकी घाटांत राखेचे थर चांगल्या प्रकारे आढळून येतात. दक्षिण ट्रॅपवर आढळणाऱ्या जांभा खडक[⟶ जांभा-२] हा बेसाल्टावर विशिष्ट वातावरणक्रिया होऊन तयार झाला आहे.

अंतरा–ट्रॅपी थर : बहुधा लाव्हा प्रवाहांनी नद्या अडविल्या जाऊन सरोवरे बनली होती व त्यांत दोन उद्‌गिरणांच्या मधल्या शांत काळात बेडूक, मासे, लहान कवचधारी प्राणी इत्यादींची भरभराट झाली. लगतच्या जमिनीवर पाम, फुलझाडे इ. वनस्पती वाढल्या. दलदलीत डायनोसॉर तर किनाऱ्यावर कासवे यांची भरभराट झाली. पुढे ही सरोवरे गाळाने भरली व तदनंतर पुढील उद्‌गिरण झाले व त्या लाव्हा थराने हे गाळाचे थर झाकले गेले. अशा प्रकारे दोन लाव्हा प्रवाहांत आढळणाऱ्या पातळ व कमी विस्ताराच्या गाळाच्या थरांना ⇨ अंतरा–ट्रॅपी थर म्हणतात. ते दक्षिण ट्रॅपमध्ये अनियमितपणे विखुरलेले असून ते उत्तर व पूर्व ट्रॅपमध्ये जास्त प्रमाणात आढळतात व मध्य ट्रॅपमध्ये ते क्वचित आढळतात. हे बहुतेक थर गोड्या पाण्यात साचलेल्या गाळाचे आहेत. यांच्यात आढळणाऱ्या जीवाश्मांवरून (जीवांच्या अश्मीभूत अवशेषांवरून) त्या काळचा भूवैज्ञानिक इतिहास, प्राणी व वनस्पती यांची माहिती मिळते. गोड्या पाण्यातील गोगलगायीची एक जाती फायसा प्रिन्सेपी हा यांतील सर्वांत सामान्यपणे आढळणारा जीवाश्म आहे. मुंबईमध्ये मलबार व वरळी भागांत हे थर चांगल्या प्रकारे उघडे पडले असून गोकाक (उपरहट्टी), नागपूर, जबलपूर, छिंदवाडा इ. ठिकाणीही ते आढळतात.


रेड बोल : दक्षिण ट्रॅपच्या क्षेत्रात कित्येक ठिकाणी दोन लाव्हा थरांच्या मध्ये असणारा लालसर रंगाचा मातीसारखा पातळ थर आढळतो, त्याला रेड बोल म्हणतात. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद इ. जिल्ह्यांत असे रेड बोलचे थर विस्तृत प्रमाणावर सापडतात. लाव्ह्यांच्या दोन थरांत अंतरा–ट्रॅपी थरांप्रमाणे हे थर आढळत असल्यामुळे खालच्या लाव्हा थराच्या क्षरणाने (झीज होऊन) तयार झालेला मातीचा हा थर त्यावर कालांतराने ओतल्या गेलेल्या नवीन लाव्हा थरामुळे भाजला जाऊन हे रेड बोलचे थर तयार झाले, असे स्पष्टीकरण पूर्वीच्या भूवैज्ञानिकांनी दिले होते परंतु अलीकडेच झालेल्या संशोधनावरून हे स्पष्टीकरण अपुरे व कित्येक रेड बोलच्या थरांना गैरलागू असल्याचे दिसून आले आहे. रेड बोलचे थर केवळ खालच्या लाव्हा थराच्या सर्वांत वरच्या पृष्ठाशीच आढळतात, असे नसून त्या थराच्या अंतर्भागातही लहान भिंगांच्या वा सुट्या गठ्‌ठ्यांच्या स्वरूपात आढळलेले आहेत. त्यामुळे रेड बोल जलतापीय (उच्च तापमानाच्या पाण्याच्या) क्रियेने बदललेल्या बेसाल्ट खडकावर वातावरणक्रिया होऊन तयार होणे शक्य आहे, असे मत प्रदर्शित केले जाते. धरणे, पूल इत्यादींसारख्या बांधकामांत पायाच्या खडकांत रेड बोलचे थर असणे धोक्याचे असते व तसे ते असल्यास विशेष अभियांत्रिकी संस्कार करून त्यांच्यामुळे होणारा धोका कमी करावा लागतो.

भित्ती व इतर अंतर्वेशने : दक्षिण ट्रॅपमधील खडकाचे संघटन एकसारखे असल्याने त्यांच्यातील भित्ती आणि इतर अंतर्वेशने (आत घुसलेल्या राशी) सहजपणे वेगळी ओळखू येत नाहीत. त्यामुळे त्यांचा बारकाईने शोध घ्यावा लागतो प. किनारी भागात (महाबळेश्वर ते बडोदे) ही अंतर्वेशने अधिक प्रमाणात आढळली आहेत. पूर्व सौराष्ट्र, कच्छ, राजपीपला टेकड्या, नर्मदा खोरे, महादेव टेकड्या, छिंदवाडा, नरसिंगपूर, होशंगाबाद, बेतुल, सातपुडा इ. भागांत या भित्ती आढळतात. सौराष्ट्रात तर त्यांची अरीय मांडणी झालेली आढळते. महाराष्ट्रात कोकण भागात भित्तींची संख्या सर्वांत जास्त असून जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी त्यांची संख्या कमी होत जाते. पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, ठाणे, कुलाबा इ. जिल्ह्यांत या भित्ती आढळतात. या भित्ती असंख्य असल्या, तरी त्यांची वाटणी व दिशा यांत विषमता आढळते. बहुसंख्या भित्ती उत्तर–दक्षिण किंवा पूर्व–पश्चिम दिशेत असून. त्याखालोखाल ईशान्य–नैर्ऋत्य दिशेने जाणाऱ्या भित्ती आहेत आणि आग्नेय–वायव्य दिशेने जाणाऱ्या भित्तींची संख्या त्याहूनही कमी आहे. भित्तींचे पृष्ठभाग खडबडीत असून त्यांचे आकारमान वेगवेगळे असल्याचे आढळले आहे. सर्वसामान्यपणे भित्तींची जाडी २ ते ६ मी. असली, तरी १ ते ५० मी. जाडीच्या भित्तीही आढळल्या आहेत. त्यांची लांबी शेकडो मी. असते व क्वचित त्या ३० ते ९५ किमी. अंतरापर्यंत सलग गेलेल्या दिसतात उदा., धुळे जिल्ह्यातील दोन भित्तींची सलग लांबी ६५ ते ९५ किमी. असल्याचे आढळले आहे. दक्षिण ट्रॅपमधील भित्ती म्हणजे लाव्हा उद्‌गिरणाची केंद्रे जवळच असल्याचे पुरावे मानले जातात व त्यांच्यापैकी काही भित्ती निश्चितपणे लाव्हा थरांना शिलारस पुरविणाऱ्या (संभरक) आहेत मात्र सर्वच भित्ती शिलारस पुरविणाऱ्या नसाव्यात. विशेषतः लाव्हा प्रवाहांच्या राशींत आढळणाऱ्या भित्ती या अंतर्वेशी प्रकारच्या म्हणजे लाव्हा प्रवाहांतील उभ्या भेगांत मागाहून शिलारस घुसून तयार झालेल्या असाव्यात.

सर्वसामान्यतः भित्तींचे क्षरण कमी प्रमाणात होत असल्याने त्या उंचवट्याच्या वा कटकाच्या रूपात टिकून रहातात. नदीच्या पात्राच्या दिशेला काटकोनात असलेल्या भित्तीमुळे छोटासा बंधाराच निर्माण झालेला दिसतो परंतु नदीच्या पात्रामध्ये प्रवाहाच्या दिशेला समांतर भित्ती असल्या, तर भित्तीचे खडक वाहून नेले जाऊन त्यांच्या जागी लांबट, निरुंद चर निर्माण झालेले आढळतात.

गोंडवनी द्रोणीत व कच्छातील जुरासिक थरांमध्ये दक्षिण ट्रॅपचे थोडे शिलापट्टही आढळले आहेत. मुंबईच्या मलबार–वरळी टेकड्यांच्या भागात डोलेराइटी शिलापट्ट आढळला आहे. सामान्यपणे भित्तींचा खडक भरडकणी डोलेराइट ते सूक्ष्मकणी बेसाल्ट असतो, तर शिलापट्टाचा खडक डोलेराइट असतो.

संघटन : एच्‌.एस्. वॉशिंग्टन यांनी दक्षिण ट्रॅपच्या निरनिराळ्या ठिकाणच्या अकरा नमुन्यांचे तपशीलवार रासायनिक विश्लेषण केले असून त्यावरून त्याचे रासायनिक संघटन बरेच एकसारखे असल्याचे दिसून आले आहे. खडकातील सिलिकेचे प्रमाण मात्र ४८·६ ते ५२ टक्क्यांपर्यंत बदललेले आढळले. खनिज संघटनाच्या दृष्टीनेही दक्षिण ट्रॅप समांग असल्याचे आढळले आहे. सर्वसामान्यपणे त्यांच्यात प्लॅजिओक्लेज ५० टक्के, ऑजाइट ३६ टक्के व लोही खनिजे १३ टक्क्यांपर्यंत असतात. दक्षिण ट्रॅपच्या खडकांचे सरासरी रासायनिक व मानक खनिज संघटन (प्रत्यक्षात नसलेल्या परंतु रासायनिक घटकांचे ठराविक पद्धतीने संगणन करून मिळणाऱ्या प्रमाणभूत खनिजांच्या रूपात दिलेले संघटन) कोष्टक क्र.१ मध्ये दिले आहे.


संरचनात्मक वैशिष्ट्ये व वातावरणक्रिया : दक्षिण ट्रॅपच्या बदामी कुहरयुक्त प्रवाहाचा माथा बहुधा खाचखळगे असलेला असतो मध्यभाग बराच संहत (घट्ट) असतो आणि तळाशी लांबट नलिकाकार पोकळ्या आणि त्यांत द्वितीयक खनिजे असतात. सामान्य प्रवाहात मात्र वरचा भाग सूक्ष्मकणी, तर खालचा भाग त्यामानाने भरडकणी असतो. क्वचित तळाशी पायरोक्सिनासारख्या खनिजाचे एकत्रीकरण झालेले असते. विशेषतः लाव्हा प्रवाहाच्या खालील बाजूस प्रचिनाकार संधी (चिरा) वा स्तंभाकार संरचना आढळते. मुंबई, होशंगाबाद, लिंग (छिंदवाडा जिल्हा) व माळव्यात काही ठिकाणी अशी स्तंभाकार संरचना आढळते. कच्छातील भित्तींमध्ये काही ठिकाणी अगदी व्यवस्थित असे सममित स्तंभही आढळतात.

एकाच वा विविध लाव्हा थरांच्या कठिणतेत फरक असतो, तसेच त्यांच्यात संधीही असतात. यामुळे मऊ भाग झिजून निघून जातो व कठीण भाग सपाट माथ्याच्या व सरळ वा तीव्र उताराच्या कडांच्या टेकड्यांच्या रूपात मागे रहातो व त्या टेकड्या राक्षसी पायऱ्यांप्रमाणे दिसतात. दक्षिण ट्रॅपच्या खडकांची पृष्ठभागी होणारी झीज वैशिष्ट्यपूर्ण असते. प्रथम वातावरणप्रक्रियेने संधीलगतचा भाग झिजून ते कोपरे गोलसर होतात. नंतर खडकांचे संकेंद्री (एकच केंद्र असलेले) पापुद्रे एकामागून एक निघून जातात. परिणामी अशा उघड्या पडलेल्या भागात गोलसर आकाराचे मोठे खडक जमिनीवर विखरून पडल्याप्रमाणे दृश्य दिसते. या प्रकारच्या वातावरणक्रियेने होणाऱ्या अपरदनाला (झिजेला) गोलाभ वातावरणक्रिया म्हणतात. रासायनिक अपघटन क्रियेमुळे (रेणूचे लहान तुकडे पडण्याच्या क्रियेने) भूपृष्ठानजीकचा बहुतेक बेसाल्ट खडक मऊ व मातकट झालेला आढळतो, याला मुरूम [⟶ मुरूम-१] असे नाव आहे. वातावरणक्रियेने अखेरीस या खडकाची माती होते.

कोष्टक क्र. १. दक्षिण ट्रॅपचे सरासरी रासायनिक संघटन व मानक खनिज संघटन.

ऑक्साइड

टक्के प्रमाण

खनिज

टक्के प्रमाण

SiO2

५०·६१ 

क्वॉर्ट्‌झ 

४·१४ 

Al2O3

१३·५८ 

ऑर्थोक्लेज 

४·४५ 

Fe2O3

३·१९ 

अल्बाइट 

०·२२००१ 

FeO

९·९२ 

ॲनॉर्थाइट 

२३·०० 

MgO

५·४६ 

डायोप्साइड 

१७·४१ 

CaO

९·४५ 

हायपर्स्थीन 

१७·७० 

Na2O

२·६० 

ऑलिव्हिन 

—— 

K2O

०·७२ 

मॅग्नेटाइट 

४·६४ 

H2O+

१·७०  

इल्मेनाइट 

३·६५ 

H2O-

 ०·४३  

ॲपेटाइट

१·०१ 

TiO2

१·९१ 

 

 

P2O5

०·३९ 

 

 

Cr2O3

नाही 

 

 

MnO

०·१६ 

 

 


 उद्‌गिरणाची तऱ्हा व उत्पत्ती : दक्षिण ट्रॅपमध्ये शंकू व कटाह (कुंड) अशी केंद्रीय प्रकारच्या ज्वालामुखीची संरचना आढळत नाही [⟶ ज्वालामुखी-२]. तसेच लाव्हा थरांची क्षितिजसमांतरता व इतर वैशिष्ट्ये पहाता हा लाव्हा भेगी उद्रेकांद्वारे म्हणजे विस्तृत क्षेत्रावरील लांब व अरुंद अशा चिंचोळ्या असंख्य भेगांमधून बाहेर टाकला गेला, असे दिसते. या लाव्ह्यात फेरस ऑक्साइड जास्त प्रमाणात असल्याने तो अतिशय तरल (पातळ) होता आणि तो घन होण्याचे तापमानही त्यामुळे कमी झाले होते. परिणामी असा लाव्हा लगेच विस्तृत क्षेत्रावर दूरवरपर्यंत पसरू शकला. अशा तऱ्हेने सु. ८० ते ९६ किमी. अंतरापर्यंत तो पसरू शकला असावा म्हणजेच मोठ्या क्षेत्रात विविध ठिकाणी असंख्य भेगांद्वारे उद्‌गिरणे झाली असावीत. दक्षिण ट्रॅपमधील राखेच्या व टफच्या थरांवरून अधूनमधून काहीशी स्फोटक अशी ज्वालामुखी क्रिया झाल्याचे सूचित होते. मात्र ही क्रिया मुख्य भेगेतील स्थानिक नळांद्वारे घडून आली असावी. अन्यथा प्रमुख लाव्हा उद्‌गिरणे मात्र भेगी उद्‌गिरणांप्रमाणे शांत व अस्फोटक प्रकारची होती. उद्‌गिरणांची ठिकाणे वा प्रतले (पातळ्या) यांचे पुरावे म्हणून यातील भित्ती दाखविता येतात. त्यांचे आकारमानही या मताला पुष्टीच देते. भेगी उद्‌गिरणातील बेसाल्टात केंद्रीय उद्‌गिरणातील बेसाल्टापेक्षा लोह (विशेषतः फेरस लोह) व टिटॅनियम ही जास्त प्रमाणात असतात, तर मॅग्नेशिया आणि क्षार (अल्कली) कमी असतात. दक्षिण ट्रॅपमधील खनिजांवरून या मताला पुष्टीच मिळते कारण दक्षिण ट्रॅपमध्ये एन्स्टॅटाइट ऑजाइट आढळते. शिवाय जगात इतरत्र आढळणाऱ्या अशाच ट्रॅपची उदाहरणेही भेगी उद्‌गिरणाच्या मतास पुष्टी देणारी आहेत.

ही उद्‌गिरणे जमिनीवर झाली असावीत म्हणजे पाण्याखाली झालेली नसावीत कारण दक्षिण ट्रॅपचे सर्वांत खालचे थर हे जुन्या खडकांच्या अतिशय ओबडधोबड पृष्ठावर वसलेले आढळतात. उद्‌गिरणे पाण्याखाली झाली असती, तर हे पृष्ठ इतके ओबडधोबड असणे शक्यच नव्हते. तसेच दक्षिण ट्रॅपच्या वरील थरांत आढळणारे राखेचे थर स्तरित नाहीत, म्हणजेच ते पाण्यात साचलेले नाहीत. शिवाय राजमहेंद्रीजवळील अंतरा–ट्रॅपी थर सोडले, तर कोठेही अंतरा–ट्रॅपी थरांत सागरी जीवाश्म आढळलेले नाहीत. उलट यांतील सर्वच जीवाश्म गोड्या पाण्यातील जीवांचे असून ते उथळ सरोवरे, दलदली व डबकी यांत साचल्याचे निश्चितपणे म्हणता येते.

स्तरविज्ञान : दक्षिण ट्रॅपच्या खाली व वर असणाऱ्या शैलसमूहांशी असलेले त्याचे संबंध कोष्टक क्र.२ मध्ये दाखविले आहेत.

कोष्टक क्र.२. भारतातील शैलसमूहांतील दक्षिण ट्रॅपचे स्थान 

सुरत व भडोचजवळील न्युम्युलिटिक, कच्छातील इओसीन

विसंगती———————————————————— 

उत्तर ट्रॅप : (सु. ४५० मी.) यात असंख्य राखयुक्त थर तसेच पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेले) व मृदुकाय (मॉलस्क) प्राणी यांच्या कवचांचे जीवाश्म असलेले अंतराट्रॅपी थर (उदा., मुंबई) व ज्वालामुखी राखही (उदा., मुंबई, सौराष्ट्र) आढळते.

मध्य ट्रॅप : (सु. १,२५० मी. ) हा दक्षिण ट्रॅपमधील सर्वांत जाड विभाग. यात राखेचे थर आढळतात. यात अंतरा–ट्रॅपी थर जवळजवळ नाहीत (उदा., मध्य प्रदेश, माळवा).

पूर्व ट्रॅप : (सु. २६० मी.) यात राखेचे थोडेच थर आढळतात. मात्र जीवाश्मयुक्त अंतरा–ट्रॅपी थर यात असंख्य आहेत (उदा., मध्य प्रदेश, नर्मदा खोरे, विदर्भ).

विसंगती ————————————————————- 

लॅमेटा, बाघ थर, जबलपूर थर व अधिक जुने शैलसमूह.


 वय : दक्षिण ट्रॅपच्या वयासंबंधीचा निर्णायक पुरावा याच्या खडकांत आढळत नाही व याच्यातील अंतरा–ट्रॅपी थरांमधील जीवाश्मांवरून वयासंबंधी निश्चित अंदाज करता येत नाही. यामुळे दक्षिण ट्रॅपच्या खालील आणि वरील सागरी व नदीमुखीय गाळाच्या खडकांतील बाह्य पुरावेच त्याचे वय ठरविण्याच्या दृष्टीने पहावे लागतात. दक्षिण ट्रॅपच्या तळाशी वा दक्षिण ट्रॅप व त्याहून अधिक जुने शैलसमूह यांच्या दरम्यान गाळाचे खडक आढळतात. त्यांना अव–ट्रॅपी थर म्हणतात. बाघ (उ.क्रिटेशस) व लॅमेटा या अशा अव–ट्रॅपी थरांवर दक्षिण ट्रॅप विसंगतपणे वसलेला आहे म्हणजे हे थर साचल्यानंतरच्या काळात दक्षिण ट्रॅपची उद्‌गिरणे झाली असली पाहिजेत. तसेच राजमहेंद्रीजवळ क्रिटेशस कालीन सागरी वालुकाश्मावर (अरियालूर) दक्षिण ट्रॅपचा थोडा भाग वसलेला आहे व प्राण्यांच्या जीवाश्मांवरून दक्षिण ट्रॅपच्या खालील भागाचे वय उ. क्रिटेशस येते. यांवरूनही ही उद्‌गिरणे क्रिटेशस काळानंतर झाली असल्याच्या मतास पुष्टी मिळते. उलट सुरत–भडोचजवळ दक्षिण ट्रॅपवर इओसीन काळातील (सु. ६·५ ते ५·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील) न्युम्युलिटिक (न्युम्युलाइट प्राण्यांच्या जीवाश्मांपासून बनलेले) थर विसंगतपणे वसलेले आढळतात म्हणजे इओसीन काळापर्यंत ही उद्‌गिरणे चालू होती. बेतुल जिल्ह्यातील अंतरा–ट्रॅपी थरामधील माशांच्या खवल्यांच्या जीवाश्मांवरूनही इओसीन वयाला दुजोरा मिळतो. थोडक्यात, बाह्य पुराव्यांवरून दक्षिण ट्रॅपचे खडक क्रिटेशसच्या सर्वांत नवीन थरांपेक्षा जुने नाहीत आणि आत सापडलेल्या मासे, पाम (ताड), फोरॅमिनिफेरा इत्यादींच्या जीवाश्मांवरून ते इओसीन काळानंतरचे नाहीत, असा निष्कर्ष निघतो. ही उद्‌गिरणे इतकी दीर्घकाल चालू होती याचे पुढील निरनिराळे पुरावे मिळतात. सरोवरातील जीवाश्मयुक्त निक्षेप (गाळाच्या राशी) यात आढळतात गाळाच्या खडकांत काही गोलसर धोंडे आढळतात आणि या धोंड्यांपैकी काही धोंडे दक्षिण ट्रॅपचे सुद्धा आहेत. थांबून थांबून ही उद्‌गिरणे दीर्घकाल चालू होती, याचे या गोष्टी पुरावे आहेत.

दक्षिण ट्रॅपच्या वयासंबंधी आणखीही काही मते व अंदाज आहेत. बिरबल सहानी यांनी नागपूर–छिंदवाडा भागातील दक्षिण ट्रॅपमधील जीवाश्मांचा अभ्यास केला व त्यावरून क्रिटेशस काळानंतरचे ॲझोला व इओसीन काळातील निपॉडाइट यांच्या जीवाश्मांवरून दक्षिण ट्रॅप क्रिटेशसनंतर व इओसीनपूर्वी तयार झाल्याचे अनुमान निघते. अंतरा–ट्रॅपी थरांमधील जीवाश्मांच्या आधुनिक अभ्यासावरून इओसीनमध्येही उद्‌गिरणे चालू असल्याची शक्यता दिसून येते आणि उरलेली काही ज्वालामुखी क्रिया कदाचित मायोसीन (सु. ३·५ ते ५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातही झाली असावी, असे अनुमान निघते. मात्र वनस्पतींच्या जीवाश्मांवरून इओसीन काळापर्यंत उद्‌गिरणे चालू असल्याचे निश्चितपणे म्हणता येते. टॉमस ओल्डॅम (१८१६–७८) यांच्या मतेही क्रिटेशसअखेरीस लाव्हा बाहेर पडण्यास सुरुवात झाली व ही क्रिया पूर्व इओसीनपर्यंत चालू होती, मात्र इओसीनमध्ये ती किती काळ चालू होती ते सांगता येत नाही. आर्‌. एन्‌. सुखेसवाला यांनी दक्षिण ट्रॅपच्या किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याच्या) वैशिष्ट्यांचा अभ्यास केला व त्यावरून दक्षिण ट्रॅपचे उद्‌गिरण ऑलिगोसीनपर्यंत (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत) चालू असावे, असा निष्कर्ष निघतो परंतु किरणोत्सर्गाधारे काढलेल्या दक्षिण ट्रॅपच्या वयाच्या बाबतीत अनिश्चितता आढळत असल्याने या वयाचा केवळ पूरक पुरावे म्हणूनच उपयोग होऊ शकतो.

सारांश, क्रिटेशसअखेरीपासून पूर्व इओसीनपर्यंतच्या काळात लाव्हा उद्‌गिरणे घडून येऊन दक्षिण ट्रॅपचे पठार बनले आहे.

आर्थिक महत्त्व : हा खडक संहत, कठीण, घडविण्यास सुलभ व टिकाऊ असल्याने त्याचा वेगवेगळ्या बांधकामांसाठी (उदा., पूल, धरणे, घरे, देवळे, घाट इ.) उपयोग होतो मात्र त्याच्या मातकट, मंद व मळकट रंगामुळे तो तेवढा लोकप्रिय नाही. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडियासाठी वापरलेला ट्रॅकाइटी प्रकार मात्र अधिक पसंत केला जातो. बेसाल्टी दगडाची खडी रेल्वे रुळांखाली टाकण्यासाठी, रस्त्यांसाठी व काँक्रीटमध्ये वापरतात. हा दगड कोरीवकामासाठीही उपयुक्त असून मूर्तींसाठी, तसेच पाटे–वरवंटे, जाती इ. वस्तू बनविण्यासाठी वापरतात. महाराष्ट्रातील वेरूळ, अजिंठा, कार्ले, भाजे, घारापुरी इ. बहुतेक प्रसिद्ध लेणी याच खडकात खोदलेली आहेत. या खडकात भेगा, पोकळ्या, संधी इ. असल्यामुळे तो भूमिजल साठून रहाण्याच्या दृष्टीने योग्य व उपयुक्त खडक आहे.

या खडकापासून तयार होणारा जांभा बांधकामासाठी आणि ⇨ बॉक्साइट  ॲल्युमिनियम मिळविण्यासाठी वापरतात. काही नद्यांमधील व सागरी किनाऱ्याच्या काही भागांतील या खडकाची वाळू ⇨ इल्मेनाइटयुक्त असते व जेव्हा तिच्यातील इल्मेनाइटाचे प्रमाण पुरेसे वाढलेले असते, तेव्हा ती टिटॅनियम ऑक्साइड मिळविण्यासाठी वापरता येते. या खडकापासून तयार झालेली शेतजमीन सुपीक व आर्द्रता चांगली टिकवून धरणारी असल्याने कमी आणि बेभरवशाच्या पावसाच्या भागात ती विशेष उपयुक्त ठरली आहे. यांशिवाय या खडकात आढळणारी द्वितीयक खनिजेही उपयुक्त ठरली आहेत. त्यांपैकी अकीक, कार्नेलियन, जमुनिया, ऑनिक्स, कॅल्सेडोनी इ. खनिजे शोभिवंत उपरत्ने म्हणून वापरली जातात तर झिओलाइटे व क्वॉर्ट्‌झ यांचा विविध उद्योगधंद्यांत उपयोग केला जातो.

पहा : अग्निज खडक जांभा ज्वालामुखी -२ झिओलाइट गट बॉक्साइट बेसाल्ट.

संदर्भ : 1. Dey,  A. K. Geology of India,  New Delhi, 1968.

           2. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, Calcutta, 1962.

           3. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.

ठाकूर, अ. ना.