व्हर्नाडस्की, व्ह्‍लड्यीम्यिर इव्हानव्ह्यिच : (१२ मार्च १८६३ – ६ जानेवारी १९४५), रशियन भूरसायनशास्त्रज्ञ व खनिजवैज्ञानिक. भूरसायनशास्त्र व जीवभूरसायनशास्त्र या विज्ञानशाखांच्या संस्थापकांपैकी ते एक आहेत.

त्यांचा जन्म सेंट पीटर्झबर्ग (लेनिनग्राड) येथे झाला. १८८५ मध्ये ते सेंट पीटर्झबर्ग विद्यापीठातून पदवीधर झाले व १८८६ मध्ये ते तेथेच खनिजवैज्ञानिक संग्रहाचे अभिरक्षक झाले. १८९७ मध्ये त्यांनी मॉस्को विद्यापीठाची पीएच. डी. पदवी संपादन केली. १८९८ – १९११ दरम्यान ते मॉस्को विद्यापीठात प्राध्यापक होते. रशियन क्रांतीनंतर ते वैज्ञानिक व संघटनात्मक कार्यांत क्रियाशील होते. लेनिनग्राड येथील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या जीवभूरसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेची त्यांनी स्थापना केली व १९२७ साली ते तिचे संचालक झाले.

व्हर्नाडस्की यांचे सुरुवातीचे कार्य खनिजविद्ज्ञानातील होते. अल्युमिनोसिलिकेटांच्या रसायनशास्त्रीय माहितीचे व संरचनेचे अचूक वर्णन करणारे ते पहिलेच शास्त्रज्ञ होत. इतर पुष्कळ खनिजांच्या दृष्टीने हे वर्णन मूलभूत महत्त्वाचे ठरले. भूरसायनशास्त्रात त्यांनी पायाभूत कार्य केले. त्यांनी भूकवचाचे स्तर व अशा स्तरांतील अणूंच्या स्थानांतरणाचे वर्णन यांविषयीची विपुल आकडेवारी संकलित केली. त्या स्तरांतील मुलद्रव्यांच्या उपस्थितीचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आणि एकूण भूवैज्ञानिक प्रक्रियांच्या प्रभावाखाली रासायनिक संयुगांची निर्मिती कशी होते, याचे अध्ययन केले.

किरणोत्सर्ग (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याचा गुणधर्म) हा ऊष्मीय ऊर्जेचा महास्रोत आहे, हे जाणणाऱ्या आद्य शास्त्रज्ञांपैकी ते एक होते, तसेच पुष्कळ भूरासायनिक प्रक्रिया चालू राहण्यामागे किरणोत्सर्गाची दीर्घकाळ संचित झालेली उष्णता आहे, असे सूचित करणारेही ते पहिले शास्त्रज्ञ होत. पर्यावरणाशी सुसंबद्ध जैव प्रक्रियांच्या सहभागाच्या अध्ययनामध्ये त्यांचे उर्वरित आयुष्य गेले. तसेच वातावरणात असलेल्या ऑक्सिजन, नायट्रोजन व कार्बन डाय-ऑक्साइड वायूंच्या निर्मितीचा संबंध त्यांनी सजीवांशी जोडला. ⇨जीवावरण सिद्धांताचे ते उद्गाते मानले जातात.

व्हर्नाडिस्की मॉस्को येथे मरण पावले.

जमदाडे, ज. वि.