सुभाजा : (शिस्ट). हा मध्यम ते भरडकणी आणि अभ्रकयुक्त ⇨रूपांतरित खडकां चा गट आहे. या खडकातील पर्णन किंवा पट्टन (पापुद्र्यांसारखी रचना) चांगल्या प्रकारे विकसित झालेले असते, म्हणजे या खडकातील थर सहजपणे वेगळे होतात. या नैसर्गिक पट्टनाला सुभाजन असे म्हणतात. सुभाजन अतिशय दुर्बल असते किंवा कधीकधी नसते. सुभाजन मुळात खडकाच्या विरुपणाने निर्माण होते. विरुपणामुळे कण व स्फटिक फिरविले जाऊन त्यांचे पुनर्स्फटिकीभवन होते आणि अभ्रकांची नवीन वाढ होऊन सुभाजन निर्माण होते. मुख्यतः शुभ्र अभ्रक, कृष्णाभ्रक, क्लोराइट, संगजिरे (टाल्क), सेरिसाइट व ग्रॅफाइट ही पत्ररुप खनिजे सुभाजांत जास्त प्रमाणात असतात. विरुपणाद्वारे या खनिजांची विशिष्ट दिशेत चांगल्या प्रकारे मांडणी होऊन समतल ते नागमोडी प्रकारचे पर्णन निर्माण होते. या खनिजांच्या सापेक्षतः मोठ्या म्हणजे एक सेंमी. पर्यंतच्या आकारमानाच्या कणांमुळे खडकावर पडलेल्या प्रकाशाचे वैशिट्यपूर्ण रीतीने परावर्तन होते. ⇨ पट्टिताश्म खडकांपेक्षा सुभाजांमध्ये क्वॉर्ट्‌झ व फेल्स्पारे ही खनिजे पुष्कळच कमी प्रमाणात असतात. अनेक सुभाजांचा हिरवा रंग तसेच त्यांची तापमानाच्या व दाबाच्या ठराविक पट्ट्यात झालेली निर्मिती यांमुळे रूपांतरित खडकांच्या वर्गीकरणातील खनिज ⇨ संलक्षणीं मध्ये ग्रीन शिस्ट या संलक्षणीला वेगळे स्थान मिळाले आहे. पत्ररुप खनिजांची समांतर दिशेतील मांडणी आणि अनेक सुभाजांत निर्माण झालेले चांगले वलीकरण (घड्या पडण्याच्या क्रिया) यांवरुन त्यांची निर्मिती सर्व दिशांमध्ये भिन्न प्रतिबले (दाब) असलेल्या परिस्थितींमध्ये झाल्याचे सूचित होते. सुभाजांचे खनिज संघटन व त्यांच्यातील पाण्याचे उच्च प्रमाण यांवरून त्यांची निर्मिती सापेक्षतः कमी तापमान व दाब असलेल्या परिस्थितीत झाल्याचे दिसते.

अशा रीतीने सुभाजांची रूपांतरणाची प्रत ग्रीन शिस्ट संलक्षणीचा मध्यम ते उच्च भाग (३५०°– ५००°से.) आणि अँफिबोलाइट संलक्षणीचा खालचा भाग (५००° – ६००°से.) अशी असते. अँफिबोलाइट संलक्षणीत अभ्रकावर विक्रिया होऊन फेल्स्पारे बनतात आणि यातून पट्टिताश्म हा भरडकणी व पट्टित खडक बनतो. अनेक सुभाजांमध्ये सामान्यपणे नागमोडी पर्णन आकृतिबंध आढळतो. तो गार्नेट, स्टॉरोलाइट व क्लोराइट यांसारख्या मोठ्या आकारमानाच्या द्वितीयक खनिजांमुळे येतो. या मोठ्या आकारमानाच्या द्वितीयक खनिज कणांच्या गटाला रूपांतरणातील बृहत्‌स्फटिक म्हणतात.

सुभाजांमध्ये मूळची व बदललेली (द्वितीयक) खनिजे विस्तृतपणे आढळतात. अभ्रक, गार्नेट, स्टॉरोलाइट, अँडॅल्युसाइट, संगजिरे, क्लोराइट, एपिडोट, ॲक्टिनोलाइट, कायनाइटे, सिलिमनाइट व हॉर्नब्लेंड ही गौण खनिजे सुभाजांत आढळतात. प्रत्यक्ष क्षेत्रात आढळणाऱ्या सर्वाधिक वैशिष्ट्यदर्शक खनिज समुदायांवरून सुभाजांचे नाव ठरवितात. उदा., गार्नेट-कृष्णाभ्रक सुभाजांमध्ये गार्नेटाचे बृहत्‌स्फटिक असतात आणि कृष्णाभ्रकाच्या प्रभावातून सुभाजन निर्माण झालेले असते. संगजिरे सुभाजांमध्ये संगजिरे विपुल असते. अभ्रकी सुभाजांमध्ये पुष्कळदा कृष्णाभ्रक नव्हे तर शुभ्र अभ्रक विपुल असते. अर्थात ही दोन्ही अभ्रके सुभाजांत सामान्यपणे आढळतात. अभ्रकी सुभाजांच्या रूपांतरणाची प्रत संगजिरे सुभाजांपेक्षा काहीशी उच्च असते आणि अभ्रकी सुभाजांमधील कण अधिक भरड असून त्यांमधील अभ्रकाच्या पत्र्या नुसत्या डोळ्यांनी दिसू शकतात.

रूपांतरणादरम्यान असलेले खनिजांचे परस्परसंबंध, तापमान व दाब यांच्या बदलत्या परिस्थितीनुसार होणाऱ्या खनिज विक्रिया आणि रूपांतरणात होणारे विरुपण यांविषयीची महत्त्वाची माहिती सुभाजांवरुन मिळू शकते. सुभाजांतील बृहत्‌स्फटिक वाढत असताना विक्रियांशी संबंध नसलेली ग्रॅफाइट, झिर्‌कॉन व मोनॅझाइट यांसारखी गौण खनिजे अथवा क्वॉर्ट्‌झ व फेल्स्पार यांच्यासारखी जादा खनिजे यांची समाविष्टे तयार होतात. समाविष्टांमुळे बृहत्‌स्फटिकांत अंतर्गत पर्णन निर्माण होऊ शकते. त्यांच्या भोवतीच्या आधारद्रव्यातील पर्णनाला बाह्य पर्णन म्हणतात. या दोन पर्णनांमधील परस्परसंबंधावरुन विरूपण व रूपांतरण यांच्या सापेक्ष काळाविषयी माहिती मिळू शकते.

भिन्न संघटनांच्या गाळाच्या व अग्निज खडकांचे प्रादेशिक (मोठ्या प्रमाणावरील) रूपांतरण होऊन सुभाजांचे भिन्न प्रकार तयार होतात. मूळ खडकांतील खनिज संघटन व पोत यांमध्ये झालेल्या बदलाचे मान म्हणजे रूपांतरणाची प्रत असते. शेल व शेली वालुकाश्म यांच्या रूपांतरणाने बनलेल्या अभ्रकी सुभाजांत अभ्रक-समृद्घ खनिजे कमी प्रमाणात तर क्वार्ट्‌झ व प्लॅजिओक्लेज ही खनिजे अधिक प्रमाणात आढळतात. अभ्रकी सुभाजांच्या उच्च प्रतीच्या रूपांतरणाने पट्टिताश्म तयार होतात. कॅल्शियमयुक्त (चूर्णीय) शेलच्या रूपांतरणाने चूर्णीय सुभाजा बनतात आणि अभ्रक, संगजिरे, ट्रेमोलाइट, अँफिबोल व डायॉप्साइड ही रूपांतरित खनिजे आढळतात. अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) व अत्यल्पसिकता खडकांच्या प्रादेशिक रूपांतरणाने ग्रीन शिस्ट बनतात. क्लोराइट, एपिडोट व ॲक्टिनोलाइट या खनिजांमुळे या खडकाला हिरवट छटा आलेली असते. त्यांच्यामध्ये पांढरे प्लॅजिओक्लेज व फेल्स्पारही असते. अत्यल्पसिकत अग्निज खडकांच्या रूपांतरणाने मॅग्नेशियन सुभाजा बनतात. इतर प्रकारचे सुभाज (शिस्टोज) खडकही आहेत. ते मुख्यतः फेरोमॅग्नेशियन खनिजे विपुल असलेल्या अग्निज खडकांच्या रूपांतरणाने बनतात. क्लोराइट व अँफिबोल (हॉर्नब्लेंड) सुभाजा हे यांपैकी महत्त्वाचे प्रकार आहेत. या नावांवरुन त्या खडकांमध्ये काही रूपांतरित फेरोमॅग्नेशियन खनिजे अधिक असल्याचे दिसते.

जगात विशेषेकरून कँब्रियनपूर्व म्हणजे ६० कोटी वर्षांपूर्वीच्या काळातील खडकांत सुभाजा खडक आढळतात. पट्टिताश्मांनंतर अभ्रकी सुभाजा हे सर्वांत सामान्यपणे आढळणारे रूपांतरित खडक आहेत. भारतात ⇨ धारवाडी संघा त सुभाजा आढळतात. गाळांचे अनुक्रमाने साचलेले थर, अंतःस्तरित लाव्ह्याचे थर व टफ नावाचे खडक, तसेच त्या सर्वांमध्ये घुसलेले अग्निज व सामान्यतः अल्पसिकत अग्निज खडकांचे ⇨ शिलापट्ट यांचे रूपांतरण होऊन सुभाजा खडक बनलेले आहेत. कर्नाटक व तमिळनाडू राज्यांत आढळणाऱ्या या खडकांच्या गटाला धारवाडी संघ म्हणतात. त्यांच्याशी तुल्य अशा गुजरातमधील खडकांना ⇨ चांपानेर माला, राजस्थानातील खडकांना ⇨अरवली संघ, मध्य प्रदेशातील खडकांना सौसर, साकोली व आयर्न ओअर (लोह धातुक) माला ही नावे आहेत.

पहा : पट्टिताश्म रूपांतरित खडक.

ठाकूर, अ. ना.