हरताळ : (भूविज्ञान) . आर्सेनिक या मूलद्रव्याचे खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार व लहान वडीसारखे किंवा आखूड प्रचिनाकार ते क्वचित सुटे व बहुधा पर्णित वा स्तंभाकार पुंजांच्या रूपात आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. ⇨ पाटन : (०१०) उत्कृष्ट पाटन पत्रे लवचिक परंतु स्थितिस्थापक नसतात. छेद्य गलनीय कठिनता १.५-२ वि. गु. ३.४९ चमक रेझिनासारखी व पाटनपृष्ठाची मोत्यासारखी दुधी काचेप्रमाणे पारभासी व रंग लिंबासारखा पिवळा. रा. सं. As2S3. [→ खनिजविज्ञान].

हरताळ हे लोणारी कोळशावर तापविल्यास आर्सेनियस ऑक्साइडाचा पांढरा व बाष्पनशील (वाफेच्या रूपात उडून जाणारा) संप्लवित पदार्थ मिळतो आणि त्याला लसणासारखा वैशिष्ट्यपूर्ण वास येतो. ते उघड्या नळीत भाजल्यास ऑर्सेनियस ऑक्साइडाचे स्फटिकी संप्लुत मिळतेव त्याला सल्फर डाय-ऑक्साइडासारखा वास येतो. वैशिष्ट्यपूर्ण रंग वपत्रित संरचना ही त्याची वैशिष्ट्ये असून उत्कृष्ट पाटनामुळे ते गंधकापेक्षा वेगळे ओळखता येते.

हरताळ हे विरळ आढळणारे खनिज असून ते बहुधा रिएलगारया खनिजाबरोबर आढळते. ही दोन्ही खनिजे सारख्या परिस्थितीत तयार होतात. रिएलगार, स्टिब्नाइट इ. आर्सेनिक खनिजांशी निगडित असलेल्या शिसे, चांदी व सोने यांच्या धातुकांच्या (कच्च्या रूपातील धातूंच्या) शिरांमध्ये हरताळ खनिज आढळते. ज्वालामुखीपासून बनलेल्या संप्लवित पदार्थाच्या रूपात आणि गरम पाण्याच्या झऱ्यांनी व ⇨ गायझरांनी (उदा., अमेरिकेतील यलो स्टोन नॅशनल पार्क येथील) साचलेल्या निक्षेपांतही रिएलगारबरोबर हरताळ आढळते. रूमानिया व अमेरिकेत विविध ठिकाणी, तसेच कुर्दिस्तान, पेरू, रशिया, जपान, जर्मनी, स्वित्झर्लंड, तुर्कस्तान इ. ठिकाणी हरताळ आढळते.

पूर्वी रंजनक्रियेत व त्वचेवरील केस काढून टाकणाऱ्या पदार्थांतहरताळ वापरीत असत. विशेषतः अगदी चांगल्या दर्जाच्या किंग्ज यलो या रंगात हरताळ रंगद्रव्य म्हणून वापरीत. तथापि, कॅडमियम यलो (मुख्यतः कॅडमियम सल्फाइड) उपलब्ध झाल्यावर आणि हरताळाच्या विषारी स्वरूपामुळे त्याचा तसा वापर करीत नाहीत.

हरताळाच्या वैशिष्ट्यपूर्ण पिवळ्या रंगामुळे व त्यात सोने असतेया समजामुळे ऑरिपिग्मेंटम (सोनेरी रंग लेप) या लॅटिन शब्दावरून त्याचे ऑर्पिमेंट हे इंग्रजी नाव आले आहे. याला यलो आर्सेनिकअसेही म्हणतात.

पहा : आर्सेनिक स्टिब्नाइट.

ठाकूर, अ. ना. बरीदे, आरती