ब्रगर, व्हाल्डेमार क्रिस्टोफर : (१० नोव्हेंबर १८५१-१७ फेब्रुवारी १९४०). नॉर्वेजियन भूवैज्ञानिक व खनिजवैज्ञानिक. ऑस्लो (नॉर्वे) भागातील पर्मियन (सु. २७.५ ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील अग्निज खडकांचे यांनी संशोधन केले. त्यामुळे अग्निज खडकांचा उत्पत्तीच्या सिद्धांतात मोठी प्रगती झाली.

ब्रगर यांचा जन्म व शिक्षण क्रिस्तियाना (आताचे ऑस्लो) येथे झाले. त्यांनी प्रथम प्राणिविज्ञानाचे व नंतर भूविज्ञानाचे अध्ययन केले. त्यांशिवाय त्यांना संगीत व इतर सांस्कृतिक गोष्टीत रस होता. काही वर्षे ऑस्लो विद्यापीठात काम केल्यानंतर १८८१ साली ते नव्याने स्थापन झालेल्या स्टॉकहोम विद्यापीठात भूविज्ञान व खनिजविज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी खनिजविज्ञानाची एक संस्था उभारली. तदनंतर ते ऑस्लो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून होते (१८९०-१९१७). तेथे असतानाच

जीवाश्मयुक्त (शिळारूप अवशेष असलेल्या) पुराजीव (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील खडकांसंबंधीही त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले. त्यांनी दक्षिण नॉर्वे भागातील हिमनद्यांनी आणलेल्या गाळाचा अभ्यास करून भूतकाळात हिम या भागात कसे पसरले होते, याविषयी पुष्कळ माहिती प्रसिद्ध केली. वर उचलल्या गेलेल्या समुद्रकिनाऱ्यांविषयीही त्यांनी संशोधन केले होते. कँब्रो-सिल्युरियन (सु. ६० ते ४५ कोटी वर्षापूर्वीच्या) काळातील खडकांचे स्तरविज्ञान (थरांच्या अनुक्रमाविषयीचे शास्त्र) व पुराजीवविज्ञान (जीवाश्मांचा अभ्यास करणारे शास्त्र) तसेच चतुर्थ कल्पातील (गेल्या सु. ६ लाख वर्षांतील) खडकांचा त्यांनी अभ्यास केला होता. अशा प्रकारे पुराजीवविज्ञानाच्या अभ्यासाद्वारे त्यांनी विविध खंडांतील खडकांमधील सहसंबंध (स्तरविज्ञान व काळ यांच्या दृष्टीने तुलना करून ठरवावयाचे परस्परसंबंध) प्रस्थापित करण्याचा प्रयत्ना केला. यांशिवाय इतरांच्या साहाय्याने त्यांनी अनेक भूवैज्ञानिक नकाशे प्रसिद्ध केले.

ब्रगर हे नॉर्वेजियन संसदेचे सदस्य (१९००-०६) होते, तसेच काही वर्षे ऑस्लो विद्यापीठाचे कुलमंत्री व पुष्कळ वर्षे नॉर्वेजियन अँकॅडेमी ऑफ सायन्स (ऑस्ले) चे अध्यक्ष होते. यांशिवाय वुलस्टन पदकासारखे (१९११) अनेक बहुमानही त्यांना मिळाले होते. थोरियमयुक्त युरॅनिनाइट (किंवा पिचब्लेंड) या खनिजाला त्यांच्या सन्मानार्थ ‘ब्रगराइट’ असे नाव देण्यात आले आहे. ते ऑस्लो येथे मृत्यु पावले.

ठाकूर, अ. ना.