पाचू: (पाच, पन्ना, मरकत, एमराल्ड). खनिज रत्न. वैदूर्याचा मध्यम ते गडद हिरव्या रंगाचा प्रकार [⟶ वैदूर्य]. हे खनिज विरळाच आढळते, शिवाय त्याचे निर्दोष स्फटिक दुर्मिळ असतात. त्यामुळे हे रत्न हिऱ्याप्रमाणे मूल्यवान आहे. याचे स्फटिक षट्कोणी, प्रचिनाकार असतात [⟶ स्फटिकविज्ञान]. याची कठिनता ७·५ असते, उघडा पडल्यास तो अधिक कठीण होतो. रा. सं. Al2[Be8Si6O18]. यात अल्प प्रमाणात क्रोमियम ऑक्साइड़ असते व त्यामुळेच याला रंग आलेला असतो मात्र जास्त तापविल्यास याचा रंग जातो. पाचूवर अम्लाचा परिणाम होत नाही व धासल्यास तो विद्युत् भारित होतो. याचे इतर गुणधर्म वैदूर्यासारखे असतात.

पाचू बहुधा अभ्रकी सुभाजांत व स्फटिकी चुनखडकांत तर क्वचित पेग्मटाइटांत आढळतो. कोलंबिया (मूसो), रशिया (उरल, सायबीरिया), द. आफ्रिका (ट्रान्सव्हाल), ब्राझील, पेरू, मॅलॅगॅसी, ऑस्ट्रिया इ. प्रदेशांत पाचू आढळतो. भारतामध्ये कालीगुमान, मेवाड, अजमेर इ. ठिकाणी हा आढळतो. 

पाचू प्राचीन काळापासून रत्न म्हणून वापरात असून ईजिप्तमध्ये ते इ.स.पू. १६५० मध्ये काढले जात असे. क्लीओपात्रा राणी ईजिप्तमधील पाचू वापरीत असल्याचा उल्लेख आहे. दक्षिण अमेरिकेतील इंका लोकही पाचू वापरीत असत, तर कोलंबियातील खाणी सतराव्या शतकापासून चालू आहेत. सामान्यतः रत्न म्हणून वापरात असले, तरी देवांच्या मूर्ती तयार करण्यासाठी तसेच खड्यांना बहिर्गोल आकार देऊन त्यावर कोरीव काम करण्यासाठीही पाचू वापरतात. राजा नीरो पाचूचा चष्मा वापरीत असल्याचा उल्लेख आहे. याचा औद्योगिक दृष्ट्या उपयोग होत नाही. 

पाचू बुधाचे व मे महिन्याचे रत्न मानले जाते. त्यात रोगहारक शक्ती असल्याची समजूत होती. रोमन कॅथलिक चर्चच्या पोपने याची अंगठी घालावी, अशी परंपरा आहे. पेरूमध्ये पाचूची प्रार्थना करतात. 

इ. स. १९३५ पासून कृत्रिम रीतीने पाचू बनविण्यात येऊ लागला असून तो नैसर्गिक पाचूसारखा दिसतो. मात्र कृत्रिम पाचूवर जंबुपार (जांभळ्या रंगापलीपडील अदृश्य) किरण टाकल्यास गडद तांबडे अनुस्फुरण (विशिष्ट तरंगलांबीच्या प्रारणाचे शोषण करून अधिक तरंगलांबीच्या प्रारणाचे उत्सर्जन होण्याचा–येथे दृश्य तांबड्या रंगाच्या प्रारणाचे उत्सर्जन होण्याचा–आविष्कार) मिळते नैसर्गिक पाचूवर असा परिणाम होत नाही.

पहा : रत्ने.

ठाकूर, अ. ना.