त्सिटेल, कार्ल आल्फ्रेट रिटर फोन : (२५ सप्टेंबर १८३९–५ जानेवारी १९०४). जर्मन पुराजीववैज्ञानिक (पूर्वीच्या भूवैज्ञानिक कालखंडांतील प्राणी व वनस्पती यांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ) व भूवैज्ञानिक. त्यांचा जन्म बहलिंगेन (बाडेन) येथे व शिक्षण हायड्लबर्ग, पॅरिस व व्हिएन्ना येथे झाले. १८६३ साली व्हिएन्ना येथील रॉयल मिनरल कॅबिनेटमध्ये साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर ते कार्लझ्रूए येथील पॉलिटेक्निक स्कूलमध्ये खनिजविज्ञान, भूरचनाविज्ञान (पृथ्वीचे घटक, विभाग, जलावरण, वातावरण, कवच व तिच्या अंतरंगाची स्थिती यांचा अभ्यास करणारी भूविज्ञानाची शाखा) व पुराजीवविज्ञान या विषयांचे प्राध्यापक झाले. १८६६ साली म्यूनिक येथे प्रथम पुराजीवविज्ञानाचे नंतर भूविज्ञानाचे प्राध्यापक व भूवैज्ञानिक संग्रहाचे संरक्षक म्हणून त्यांनी शेवटपर्यंत कार्य केले.

प्रथम त्यांनी खनिजे व शिलावर्णन (खडकांचे वर्णन व वर्गीकरण यांचा अभ्यास करणारी विज्ञान शाखा) यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी लिबियातील वाळवंटामधील फ्रीड्रिख गेरहार्ट रोल्फस यांच्या मोहिमेत भूवैज्ञानिक म्हणून भाग घेतला होता. त्यांचा पुराजीवविज्ञानाविषयीचा पहिला संशोधनपर लेख १८६१ मध्ये प्रसिद्ध झाला. नंतर त्यांनी सजीवांच्या क्रमविकासाचा (उत्क्रांतीचा) सिद्धांत मान्य करून त्याचा पुराजीवविज्ञानात व विशेषतः स्वतःच्या ॲमोनाइटांविषयीच्या अभ्यासात वापर केला. तथापि त्यांनी या सिद्धांताविषयी विस्तृत लेखन केले नाही. तसेच ॲल्फियस हायअट व एडवर्ड कोप यांच्या नव–लामार्कवादाची तत्त्वे मान्य केली नाहीत. १८७६ सालापासून त्यांनी स्पंजांच्या जीवाश्मांचा (शिळारूप अवशेषांचा) अभ्यास केला. त्यामुळे स्पंजांचे वर्गीकरण प्रस्थापित झाले व आधुनिक प्रकारच्या स्पंजांच्या वर्गीकरणाला ते पायाभूत ठरले. पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांच्या पुराजीवविज्ञानासंबंधीचे त्यांचे मुख्य कार्य म्हणजे बव्हेरियातील लिथोग्राफिक चुनखडकांतील कासव व टेरोडॅक्टिल (उडणारे पृष्ठवंशी प्राणी) यांच्यासंबंधीचा अभ्यास होय. Handbuch der Palaontologie (१८७६–९३) या त्यांच्या प्रसिद्ध ५ खंडांच्या पुस्तकाची अनेक भाषांतरे झाली आहेत. Geschichte der Geologie und Palaontologie (१८९९) या त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकाचे एम्. एम्. ओगल्व्हीगॉर्डन यांनी संक्षिप्त इंग्रजी भाषांतर (हिस्ट्री ऑफ जिऑलॉजी अँड पॅलिआँटॉलॉजी, १९०१) केले. १८९९ साली त्यांना वुलस्टन पदक मिळाले. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.