पर्मो-कार्‌बॉनिफेरस : भूवैज्ञानिक इतिहासाच्या एका विभागाचे नाव. याच्या कालविभागाला पर्मो-कार‌्बाॅनिफेरस कल्प व या कल्पात तयार झालेल्या खडकांना पर्मो-कार‌्बाॅनिफेरस संघ म्हणतात. पर्मियन (सु. २७·५ ते २४·५ कोटी वर्षांपूर्वीच्या) आणि कार‌्बाॅनिफेरस (सु. ३५ ते ३१ कोटी वर्षापूर्वीच्या) काळांमधील संक्रमणी वा सीमावर्ती विभागाचा (काळाचा व खडकांचा) पर्मो-कार‌्बाॅनिफेरसमध्ये समावेश होतो. या काळातील पर्वतनिर्मितीच्या कालखंडाला हीच संज्ञा वापरतात. भारतात काश्मीरमधील हझार व जम्मू टेकड्या (गँगॅमोप्टेरीस थर व पंजाल ज्वालामुखी क्रिया), सिमला-गढवाल भाग (ब्लैनी गोलाश्म संस्तर), मौंट एव्हरेस्ट चुनखडक, दार्जिलिंग व नेफा भाग, मध्य प्रदेश (तालचेर व उमारिया माला), राजस्थान (बधौरा आणि थरचे वाळवंट), आसाम (अबोर टेकड्या व सुबानसिरी जीवाश्मयुक्त चुनखडक), महाराष्ट्र (चंद्रपूर व नागपूर जिल्हे) इ. ठिकाणी या काळातील शैलसमूह आढळतात. सर्वांत खालचा दगडी कोळशाचा समुदाय [⟶ गोंडवनी संघ] या काळातला असून तो गिरिडी, करणपुरा (बिहार), उमारिया (म. प्रदेश) इ. ठिकाणी आढळतो. या दगडी कोळशाबरोबर संकोण वालुकाश्म, वालुकाश्म आणि शेल हे खडकही आढळतात. ग्लॉसोप्टेरीस वनश्री याच काळात उदयास आली असून या वनस्पतींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) महत्त्वाचे आहेत. थरच्या वाळवंटात या काळातील स्फिरिफर व कॉनुलारिया यांचे जीवाश्मही आढळले आहेत. उ. अमेरिका व बोहिमिया येथील या विशिष्ट काळातील शैलसमूहांनाही हीच संज्ञा वापरली जाते.

पहा : कार‌्बाॅनिफेरस गोंडवनी संघ पर्मियन.

ठाकूर, अ. ना.