पायरोल्यूसाइट : खनिज. स्फटिक चतुष्कोणीय. स्फटिकांना पोलिअँनाइट म्हणतात, मात्र स्फटिक क्वचित आढळतात [→स्फटिकविज्ञान]. सामान्यतः हे तंतुमय व स्तंभाकार रूपांत आढळते ते संपुंजित, समाविष्टांच्या, वृक्काकार (मूत्रपिंडाकार), चूर्ण व शाखाकृती रूपांतही आढळते.⇨पाटन : (110) चांगले. भंजन ढलपीसारखे. कठिनता १-२ मऊ असल्याने हाताला काळे लागते व त्याने कागदावर रेघ उमटविता येते (मात्र पोलिॲनाइटाची कठिनता ६-६.५ असते). वि. गु. ४.४-५. चमक धातूसारखी. रंग व कस लोखंडाप्रमाणे काळा. अपारदर्शक. रा. सं. MnO2. यात अल्प जलांश असतो. रूटाइल व कॅसिटेराइट या खनिजांशी हे समाकृतिक (सारखा स्फटिकाकार असलेले) आहे. तीव्र प्रकारच्या ऑक्सिडीकारक [→ऑक्सिडीभवन] स्थितीत रोडोक्रोसाइटासारख्या मँगॅनिजाच्या खनिजांत बदल होऊन पायरोल्यूसाइट तयार होते. हे शिरांमध्ये सिलोमेलेन, रोडोक्रोसाइट, रोडोनाइट इ. मँगॅनिजाची खनिजे, क्वॉर्टझ वगैरेंबरोबर आढळते. दलदली, सरोवरे वा उथळ समुद्रांतही हे तयार होते. समुद्रतळावर याचे गाठींसारखे निक्षेप (साठे) आढळतात.

मँगॅनिजाचे हे सर्वात सामान्य व विस्तृतपणे आढळणारे खनिज आहे. रशिया, घाना, द. आफ्रिका, मोरोक्को, जर्मनी, ब्राझील, क्यूबा इ. प्रदेशांत याचे विपुल साठे असून तेथे याचे खाणकामही करण्यात येते. भारतामध्येही हे मोठ्या प्रमाणात आढळते व त्याचे खाणकामही चालते. विशेषेकरून बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात व राजस्थान या प्रदेशांत याचे चांगले साठे आहेत. महाराष्ट्रात भंडारा व नागपूर जिल्ह्यांत याचे चांगले साठे असून रत्नागिरी जिल्ह्यातही थोड्या प्रमाणात हे आढळते.

पायरोल्यूसाइट हे मँगॅनिजाचे सर्वांत महत्त्वाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) असून मुख्यत्त्वे मँगॅनिज धातू मिळविण्यासाठी ते वापरले जाते. पोलाद, मँगॅनिज-ब्राँझ, पोटॅशियम परमँगॅनेट इत्यादींच्या निर्मितीमध्ये हे वापरतात तसेच रंगद्रव्ये, मातीची भांडी, विटा, शुष्क विद्युत् घट वगैरेंमध्ये याचा उपयोग होतो. यांशिवाय क्लोरीन, ब्रोमीन व ऑक्सिजन यांच्या उत्पादनात ऑक्सिडीकारक म्हणून रंगलेपात शुष्कक म्हणून व काचनिर्मितीत काचेचा रंग घालविण्यासाठी याचा उपयोग होतो. तापवून काचेचा रंग घालविण्यासाठी पूर्वीही हे वापरीत असत. त्यामुळे अग्नी व धुणे या अर्थांच्या ग्रीक शब्दांवरून व्हिल्हेल्म कार्ल फोन हायडिंजर (१७९५-१८७१) यांनी १८२७ साली पायरोल्यूसाइट हे नाव दिले.

पहा : मँगॅनिज.                               

सहस्रबुद्धे, य. शि.