ॲपेटाइट : खनिज. स्फटिक षट्‌कोनी-त्रिप्रसूची गटातील. लांब किंवा आखूड प्रचिन व त्यांच्या टोकाशी सामान्यत: पहिल्या कोटीच्या प्रसूचीचे फलक व शिवाय आधारतल असतात [→स्फटिकविज्ञान]. कधीकधी वडीसारखे स्फटिक. पाटन : (0001) अस्पष्ट [→पाटन]. भंजन शंखाभ ते खडबडीत. ठिसूळ. कठिनता ५. वि.गु. ३.१७–३.२३. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी ते काहीशी राळेसारखी. रंग सामान्यतः हिरवा किंवा उदी छटा असलेला. कधीकधी निळा, जांभळा, रंगहीन [→खनिजविज्ञान]. रा. सं. सामान्यतः Ca5F(PO4)3. याला ‘फ्ल्युअर ‘ॲपेटाइट‘ म्हणतात. परंतु फ्ल्युओरिनाची जागा क्लोरीन व हायड्रॉक्सिल गट (OH) ही घेऊ शकतात. क्वचित Ca5Cl(PO4)3 व Ca5(OH)(PO4)3 असे संघटन असलेले प्रकार आढळतात. त्यांना अनुक्रमे ‘क्लोर ॲपेटाइट‘ व ‘हायड्रॉक्सिल ॲपेटाइट‘ म्हणतात.

ॲपेटाइट हे सर्व प्रकारच्या खडकांत गौण खनिज म्हणून विखुरलेले आढळते, पण त्याच्या मोठ्या राशी विरळाच आढळतात. ॲपेटाइटाचे पृथ्वीवरील सर्वांत मोठे साठे रशियातील कोला द्वीपकल्पात आहेत. कॅनडातील आँटॅरिओत व क्वेवेकातही औद्योगिक दृष्ट्या उपयुक्त असे साठे आहेत. दक्षिण नॉर्वेच्या किनाऱ्यालगतच्या गॅब्रोतही त्याच्या शिरा व पुंज आहेत.

फॉस्फेटी खडक व जीवाश्मरूपी (अवशेषांच्या रूपातील) आस्थी ही ज्या संपुंजित व गूढस्फटिकी (अतिसूक्ष्म स्फटिक असलेल्या) पदार्थाची बनलेली असतात, ते वस्तुत: ॲपेटाइटच असते. त्याला ‘कलोफन‘ हे नाव देतात. ते शुद्ध नसून त्याच्यात थोडे कॅल्शियम कार्बोनेट असते.

उपयोग : खतांसाठी लागणारे बहुतेक खनिज फॉस्फेटी खडकांपासून मिळविले जाते. खतांसाठी स्फटिकमय ॲपेटाइटाचा पुरवठा करणारे महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे कोला द्वीपकल्प होय. ॲपेटाइटाची कठिनता सापेक्षत: कमी असल्यामुळे रत्‍न म्हणून त्याचा फारसा उपयोग होत नाही. पण त्याचे पारदर्शक व सुंदर रंगाचे स्फटिक इतर रत्‍नांसारखे दिसतात व फसगत होते म्हणून ‘फसविणे‘ या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून ‘ॲपेटाइट‘ हे नाव दिले गेले.

ठाकूर, अ. ना.